गुरुवार, २ मार्च, २०१७

यंदाच्या वर्षी गुढीपाडवा अमावास्येला


यंदाच्या वर्षी गुढीपाडवा अमावास्येला

-८ वाजून २७ मिनिटांनंतर गुढी उभारावी

यंदाच्या वर्षी फाल्गुन अमावास्येच्या दिवशी गुढीपाडवा येत आहे. यंदा चैत्र शुक्ल प्रतिपदा क्षयतिथी असल्याने मंगळवार, २८ मार्च २०१७ या दिवशी सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी अमावास्या संपल्यानंतरच गुढी उभारावी, असे आवाहन ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी केले आहे.

यावर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी कोणत्याही दिवशी सूर्योदयाला नाही. अशा तिथीला ' क्षय तिथी ' असे म्हणतात. यापूर्वी २८ मार्च १९९८ , १९ मार्च २००७ आणि ६ एप्रिल २००८ रोजी अशी स्थिती आली होती. तेव्हाही फाल्गुन अमावास्या संपल्यानंतरच गुढी उभारून गुढी पाडवा साजरा करण्यात आला होता. या वर्षानंतर पुन्हा १९ मार्च २०२६ रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदा क्षय तिथी येणार असल्याची माहिती सोमण यांनी दिली.

गुढी पाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईसह राज्यात सर्वत्र नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येतात. त्याची सुरुवात २८ मार्च रोजी सकाळी ८ वाजून २७ मिनिटांपूर्वी करण्यास काहीही हरकत नाही. मात्र गुढी ही ८ वाजून २७ मिनिटांनंतरच उभारावी आणि गुढीची पूजा करावी, असेही सोमण म्हणाले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: