रविवार, १२ मार्च, २०१७

दादर येथे सापडलेला स्कुटर बॉम्ब आणि...


दादर येथे सापडलेला स्कुटर बॅाम्ब आणि....

(सोमवार १५ मार्च १९९३ च्या मुंबई सकाळमध्ये प्रसिद्ध झालेली माझी बातमी आणि आठवण)

१२ मार्च १९९३, मुंबई आणि भारताच्या इॉतिहासातील एक दुर्देवी व काळा दिवस. याच दिवशी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले गेले. या भयानक व धक्कादायक घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांनी दादर (पश्चिम) येथे एका बेवारस स्कुटरमध्ये शक्तीशाली बॉम्ब सापडला. वेळीच लक्षात आल्याने बॉम्बशोधक पथकाने तो निकामी केला. रस्त्यावर उभ्या केलेल्या या स्कुटरला कोणी सहज खेळ महणून नुसती किक मारली असती तरी हा स्फोट घडेल, अशी व्यवस्था करण्यात आली होती.

दादर (पश्चिम) येथे डॉ. मांडोत यांच्या दवाखान्यासमोर एका बेवारस स्कुटरमध्ये बॉम्ब ठेवला असल्याची बातमी कळली. तेव्हा आजच्या सारखे वृत्तवाहिन्यांचे प्रस्थ नव्हते. त्यामुळे वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी व छायाचित्रकार घटनास्थळी होते.मी तेव्हा मुंबई सकाळमध्ये वार्ताहर म्हणून नोकरी करत होतो. आमचे मुख्य वार्ताहर रमाकांत पारकर ऊर्फ तात्या यांनी मला आणि आमचा छायाचित्रकार सचिन चिटणीस याला तिकडे जायला सांगितले. दोघेही तिकडे गेलो. बॉम्बशोध पथक घटनास्थळी आले आणि त्यांनी बॉम्ब निकामी केला. संध्याकाळी पाच/साडेपाच वाजल्यापासून जवळपास दोन-तीन तास हे सर्व सुरु होते. बॉम्ब निकामी केल्यानंतर वृत्तपत्रांचे पत्रकार व छायाचित्रकार तिथून निघाले.

मी आणि सचिन थोडा वेळ तिथेच थांबलो. बॉम्ब तर निकामी केला आता पुढे काय करणार, याची माहिती घेतली. मिळालेल्या माहितीुसार तो बॉम्ब, आतील आरडीएक्स हे सर्व विक्रोळी येथे नेले जाणार होते. कार्यालयात हे सगळे कळविले.सचिन आणि मी तेथे जायचे ठरविले. आम्ही तिथे गेलो. तेव्हा चंद्रकांत हंडोरे हे मुंबईचे महापौर होते. ते ही विक्रोळीला त्या ठिकाणी होते. तेथे रात्री त्या बॉम्बची पूर्ण विल्हेवाट लावण्यात आली. या सगळ्याचे मी आणि सचिन साक्षीदार होतो. रात्री तिथून निघालो. मोबाईल व अन्य संपर्काचे प्रभावी माध्यम तेव्हा नव्हते. कार्यालयात दूरध्वनी करुन अशी बातमी आहे हे सांगितले. नारायण पेडणेकर, प्रभाकर नेवगी हे वरिष्ठ तसेच उमेश करंदीकर रात्रपाळीत होते. कार्यालययात गेल्यानंतर मी बातमी लिहून काढली. आणि फक्त मुंबई सकाळमध्ये त्या बातमीची आठ कॉलम हेडलाईन झाली. तेव्हाच्या सर्व अन्य मराठी वृत्तपत्रात दादर य़ेथे बॉम्ब सापडला आणि तो निकामी केला एवढीच बातमी होती. आमच्याकडे त्यानंतरचा सगळा घटनाक्रम आणि बातमीचा पाठपुरावा केल्यामुळे सचिनच्या फोटोसह सविस्तर बातमी आली.

मुंबई सकाळची ही बातमी त्या दिवशी (१५ मार्च १९९३) वेगळी ठरली. त्याबाबत मुंबई सकाळचे संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांनीही आमचे कौतुक केले. इतरांपेक्षा वेगळी बातमी फक्त आपल्याकडे दिल्याचे आणि बातमीलाही व्यवस्थित न्याय मिळाल्याचा आनंंद काही वेगळाच होता.

दादर (पश्चिम) येथे असलेला हा स्कुटर बॉम्ब अत्यंत शक्तीशाली होता. जर त्याचा स्फोट झाला असता तर सेंच्युरी बाजार येथील स्फोटापेक्षाही त्याची तीव्रता जास्त असती. दादर रेल्वे स्थानक परिसर उध्वस्त होईल इतका तो शक्तीशाली होता. सुदैवाने तो वेळीच निकामी केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण आज इतक्या वर्षांनंतरही ते सगळे आठवले की अंगावर अजूनही काटा येतो....

-शेखर जोशी

सोमवार १५ मार्च १९९३ च्या मुंबई सकाळमधील मी दिलेल्या त्या बातमीचे कात्रण, सचिन चिटणीस याच्या छायाचित्रासह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: