गुरुवार, ९ मार्च, २०१७

पुस्तक देवाण-घेवाण योजना


पुस्तक देवाण-घेवाण योजना

पै फ्रेंड्स लायब्ररीचा आगळा उपक्रम

दूरचित्रवाहिन्या, स्मार्ट भ्रमणध्वनी, संगणक आणि सध्याच्या माहितीच्या महाजालात वाचन संस्कृती हळूहळू लोप पावत असल्याची भीती व्यक्त करण्यात येते. काही प्रमाणात ती खरीही आहे. आत्ताच्या तरुण पिढीचे किंवा सध्या शाळेत व महाविद्यालयात असलेल्या विद्यार्थ्यांचे अवांतर मराठी वाचन हे कमी झाले आहे. शालेय किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी असलेल्या पाठ्यपुस्तकांचे वाचन सोडले तर काही अपवाद वगळता हल्लीची पिढी मराठी पुस्तकांचे वाचन करत नाही, असे पाहायला मिळते. आत्ताचे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी हेच भावी वाचक असणार आहेत. त्यामुळे या नव्या पिढीत आणि एकूणच समाजातील लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे पुस्तक आदान-प्रदान योजना (डोंबिवली बुक इ चेंज एक्झिबिशन) या आगळ्या उपक्रमाचे आयोजन डोंबिवलीत करण्यात आले आहे. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ आणि डोंबिवलीकर मासिक यांचेही सहकार्य या उपक्रमास लाभले आहे.

आपल्यापैकी काही जण पुस्तके विकत घेतात तर काही जणांना वाढदिवस आणि अन्य काही निमित्ताने पुस्तके भेट म्हणून मिळतात.ही पुस्तके एकदा वाचून झाल्यानंतर काही पुस्तकांचा अपवाद वगळता तशीच पडून राहतात. ती पुन्हा काही वाचणे होत नाही. पडून राहिलेल्या या पुस्तकांच्या बदल्यात नवी पुस्तके मिळावीत, एकमेकांकडे असलेल्या अशा अनेक पुस्तकांचे आदान-प्रदान व्हावे आणि विविध विषयांवरील अशी हजारो पुस्तके पुन्हा वाचनात यावी, हा उद्देशही या योजनेमागे आहे. डोंबिवलीतील एक प्रमुख ग्रंथालय म्हणून पै फ्रेंड्स लायब्ररीची ओळख आहे. डोंबिवली पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही ठिकाणी ग्रंथालयाच्या शाखा आहेत. ग्रंथालयाचे संपूर्ण संगणकीकरण झाले असल्याने सभासदांना पुस्तक कोणत्याही शाखेत जमा करता येऊन नवीन पुस्तक घेता येऊ शकते. दोन वर्षांपूर्वी पै फ्रेंड्स लायब्ररीने एका दिवसात एक हजारांहून अधिक नवे सभासद करुन घेण्याचा आगळा विक्रमही केला होता. १ जानेवारी २०१५ रोजी सकाळी या नवीन सभासद योजनेस सुरुवात झाली आणि दिवस अखेरीस १ हजार २१ नव्या सभासदांची नोंदणी करण्यात आली. २२ मे १९८६ रोजी पुंडलिक पै यांनी टिळकनगर विभागात अवघ्या शंभर पुस्तकांसह ग्रंथालय सुरु केले. डोबिवलीत ग्रंथालयाच्या पाच शाखा आहेत. ग्रंथालयाचे चौदा हजारांहून अधिक सभासद असून विविध विषयांवरील एक लाखांहून अधिक पुस्तके ग्रंथालयात आहेत. मुंबई, पुणे, नाशिक येथील वाचकांसाठी ऑनलाईन ग्रंथालयही चालविण्यात येते. या ऑनलाईन ग्रंथालयाचेही सुमारे दोन हजार सभासद आहेत. ऑनलाईन ग्रंथालयाच्या सभासदांना त्यांना हवे असलेले पुस्तक घरपोहोच देण्यात येते. पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे डोंबिवलीत साहित्य, वाचनविषयक अन्यही विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.

पुस्तक आदान-प्रदान योजनेअंतर्गत आपल्याकडे असलेली आणि वाचून झालेली कोणत्याही विषयांवरील मराठी व इंग्रजी भाषेतील दहा पुस्तके अवघे शंभर रुपये भरुन पै फ्रेंड्स लायब्ररीकडे जमा करायची आहेत. ही पुस्तके जमा केल्यानंतर त्याची पावती देण्यात येणार आहे. आपण दिलेल्या दहा पुस्तकांच्या बदल्यात आपल्याला पाहिजे ती मराठी व इंग्रजी भाषेतील अन्य कोणतीही दहा पुस्तके घेता येणार आहेत. हे करताना आपण दिलेली पुस्तके जेवढ्या किंमतीची असतील तेवढ्याच किंमतीची पुस्तके घेतली पाहिजेत असे कोणतेही बंधन नाही. तुम्ही दिलेल्या दहा पुस्तकांच्या बदल्यात अन्य कोणतीही दहा पुस्तके तुम्हाला घेता येणार आहेत. पुस्तके ग्रंथालयाकडे जमा करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१७ अशी असून पै फेंड्स लायब्ररीच्या कोणत्याही शाखेत ही पुस्तके जमा करता येणार आहेत.

जमा केलेली दहा पुस्तके आणि त्या बदल्यात आपण घेणार असलेल्या दहा पुस्तकांच्या आदान-प्रदान सोहोळ्यासाठी पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे येत्या ९ ते १६ एप्रिल २०१७ या कालावधीत टिळकनगर विद्या मंदिर, डोंबिवली (पूर्व) या शाळेच्या पटांगणावर भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आह. सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. आपल्याकडे असलेली कोणतीही दहा पुस्तके येत्या ३१ मार्च पर्यंत १०० रुपये भरुन ग्रंथालयात जमा करायची आहेत. ही पुस्तके सुस्थितीत आणि वाचण्यायोग्य असली पाहिजेत. पुस्तकांच्या मूळ प्रतीच स्विकारल्या जाणार आहेत. मराठी आणि इंग्रजी भाषेतील कथासंग्रह, कादंबरी, ललितलेख संग्रह, चरित्र-आत्मचरित्र आदी पुस्तके घेण्यात येणार आहेत.

या संदर्भात अधिक माहिती ९८३३७३२७१३ या क्रमांकावर मिळू शकेल.

शेखर जोशी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: