गुरुवार, २ मार्च, २०१७


'प्रतिभा'वंत दिलखुलास पवार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्र व भारतीय राजकारणातील अनाकलनीय व्यक्तिमत्व म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. धूर्त, पाताळयंत्री, विश्वासघातकी, मनाचा थांगपत्ता लागू न देणारे वगैरे वगैरे अशा अनेक शब्दांत त्यांच्यावर टिका केली जाते. राजकारणात पवार हे कधी कुणाला कात्रजचा घाट दाखवतील याची कल्पना नसते, तसेच पवार यांचे हो म्हणजे नाही आणि नाही म्हणजे हो असेही त्यांच्याबाबतीत म्हटले जाते. पण पुण्यातील एका कार्यक्रमात पवार यांचे एक वेगळेच रुप उपस्थिताना पाहायला मिळाले. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या राम कदम कलागौरव पुरस्कार सोहोळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी शरद पवार आणि त्यांच्या सौभ्यागवती प्रतिभा पवार यांची प्रकट मुलाखत घेतली आणि या मुलाखतीमधून 'प्रतिभा'वंत पवार आणि राजकारणाबाहेरील 'दिलखुलास'पवार उलगडले गेले. सोमवारी रात्री झी २४ तास वर 'प्रतिभा'वंत पवार या कार्यक्रमात त्याची झलक पाहायला मिळाली. राजकारणाबाहेरील पवार यांचा मिश्कीलपणा, हजरजबाबीपणा, त्यांचे वाचन, अभ्यास या पैलूंचे दर्शन घडले.

त्या मुलाखतीमधील काही किस्से

येड्याचा पाटील ठाण्याचा नगराध्यक्ष झाला रे ही १९६८-६९ मधली गोष्ट आहे. मी विधानसभेवर निवडून गेलो होतो. वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते. काही कामानिमित्त मी वसंतराव नाईक यांच्या घरी गेलो होतो. तिथे ग.दि.मा अर्थात ग.दि. माडगूळकर आलेले होते. त्यांनी वसंतराव नाईक यांना सांगितले आमचा मित्र सावळराम पाटील अर्थात कवी पी. सावळाराम हे ठाणे नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे आहेत आणि कोणत्याही परिस्थीतीत आमचा हा दोस्त निवडून आला पाहिजे. वसंतराव नाईक यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी तुझ्यावर सोपवली. त्यांना कसेही करुन निवडून आणायचेच. मी म्हटले हे कवी राजकारणाच्या भानगडीत कशाला पडताहेत. पण नाईक साहेबांनी सांगितले आणि मी कामाला लागलो. ठाण्यात दोन दिवस राहिलो. दोन/चार मते कमी पडत होती. माझ्या परीने काय करायचे ते 'उद्योग'केले आणि पी. सावळाराम नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर आम्ही त्यांना घेऊन वसंतराव नाईक यांच्याकडे गेलो. तिथे माडगूळकर यांंनी मला मिठी माररली आणि मला म्हणाले, दोस्ता येड्याचा पाटील ठाण्याचा नगराध्यक्ष केलास रे. (पी. सावळाराम यांचे मूळ गाव येडे निपाणी होते.)

माझ्या बायकोची प्रत्येक साडी मीच आणलेली

माझ्या बायकोने नेसलेली प्रत्येक साडी मी स्वतः खरेदी केलेली आहे. मी जिथे जिथे जाईन तिथून तिला साड्या घेऊन येतो. गेली पन्नास वर्षे मी हे करतोय. मग आठवड्याचे सात दिवस फिरायला मी मोकळा असतो. शरद पवार यांच्या चेहऱयाककडे पाहून त्यांच्या मनात काय चाललाय याचा थांगपत्ता तुम्हाला तरी कधी लागतो का, असा प्रश्न गाडगीळ यांनी प्रतिभाताई यांना विचारला तेव्हा त्या 'नाही' असे उत्तरल्या. त्यावर पवार यांनी आयुष्यात ‘गुगली बॉलरच्या मुलीशी लग्न केले की विकेट जातेच' तसेच आत्ता घडले. असे प्रत्युत्तर दिले.

आवडत्या गायिका किशोरी आणि गायक पं. भीमसेन जोशी

‘आवडते गायक-गायिका कोण?’या प्रश्नावर पवार म्हणाले, माझी आवडती गायिका किशोरी (आमोणकर) आहे. आणि गायक अर्थातच भीमसेन (जोशी), असे उत्तर दिले.

चरित्र व आत्मचरित्र वाचण्यात जास्त गंमत

चरित्र व आत्मचरित्रात्मक पुस्तके वाचायला जास्त मला आवडते.त्यातून ती माणसे कळायला व जाणून घ्यायला मदत होते.

विल्सन आणि यशवंतराव यांची मैत्री

लंडनच्या पार्लमेंटमधील मी गेलो होतो. एक वयस्कर गृहस्थ बसले होते. त्यांना कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते. मी शेजारच्या माणसाला विचारले ते कोण आहेत, त्याने सांगितले की ते इंग्लंडचे माजी पंतप्रधान विल्सन होते. त्यांच्यापाशी मी गेलो. माझी ओळख करुन दिली. कठुन आलात ते त्यांनी विचारले तेव्हा मी महाराष्ट्रतून आलो असे सांगितल्यावर ते म्हणाले आमचे मित्र वाय.बी. चव्हाण कसे आहेत. तुम्ही एकमेकांना ओळखता असे दिसताय. ते म्हणाले आम्ही दोघेही परराष्ट्र मंत्री होतो. 'युनो'च्या अधिवेशनाला आम्ही न्यूयॉर्कला बरोबर असायचो. काम झाले की दुपारी मी ग्रंथालयात येऊन बसायचो. माझ्याबरोबर ग्रंथालयात आणखी एक व्यक्ती यायची आणि ती म्हणजे वाय. बी. चव्हाण. माझ्यासारखीच त्यांनाही पुस्तके वाचण्याची आवड होती. जगात प्रकाशित झालेल्या कोणत्याही चांगल्या इंग्रजी पुस्तकावर आमची चर्चा व्हायची तेव्हा चव्हाण मला त्या पुस्तकाचा थोडक्यात परिचय करुन द्यायचे.

http://zeenews.india.com/marathi/news/video/prabhavant-pawar-24th-february-2017/354381

पवार यांच्या मुलाखतीची लिंक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: