शनिवार, १८ फेब्रुवारी, २०२३
दोन्ही काँग्रेसशी करता संग शिवसेनेचा होई अंत
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ, अशी मराठी भाषेत म्हण आहे. निवडणूक आयोगाच्या कालच्या निर्णयानंतर यात थोडा बदल करून दोन्ही काँग्रेसशी करता संग, शिवसेनेचा झाला अंत असेच म्हणावे लागेल.
कारण मुळात शिवसेना हा पक्ष आधी मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून नावारूपाला आला. नंतर शिवसेनेने हिंदुत्ववादी भूमिका घेतली. आणि त्याचा शिवसेनेला फायदाच झाला. पुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी शिवसेना भाजप युती करण्याचा निर्णय घेतला. प्रमोद महाजन यांचीही यात महत्त्वाची भूमिका होती. युती झाल्याचा फायदा शिवसेना आणि भाजप दोघांनाही झाला. आधी शिवसेना मोठा भाऊ व भाजप धाकटा भाऊ असे महाराष्ट्रात चित्र होते. नंतर यात बदल होऊन भाजप मोठा भाऊ आणि शिवसेना छोटा भाऊ असे महाराष्ट्रात घडले.
हिंदुत्ववादी विचारधारा घेऊन शिवसेना आणि भाजप यांनी एकत्रच असायला हवे असे माझे तेव्हाही मत होते, आजही आहे आणि यापुढेही ते राहील. भाजपची युती करण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी इतर पक्षांशीही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष युती, आघाडी केली होती. कोणताही राजकीय पक्ष सूर सापडेपर्यंत असे प्रयोग करत असतोच. पण बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाला इतर नेत्यांच्या किंवा पक्षाच्या दावणीला बांधले नव्हते, आपला पक्ष गहाण ठेवला नव्हता. उद्धव ठाकरे यांनी ती मोठी चूक केली. आणि शिवसेना दोन्ही काँग्रेसच्या दावणीला बांधली.
उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे भाजपने त्यांना फसवले, मुख्यमंत्रीपद वाटून घेऊ असे बंद दाराआड सांगितले आणि नंतर शब्द फिरवला. हे सत्य आहे असे मानले तरी २०१९ मध्ये जनादेश भाजप शिवसेना यांनाच मिळाला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर जाऊन सत्तेत सहभागी होऊन भाजपच्या नाकी नऊ आणता आले असते. किंवा महत्वाची खाती पदरात पाडून घेता आली असती. नाहीतरी दोन्ही काँग्रेसबरोबर जाऊन मुख्यमंत्रीपद वगळता इतर सर्व महत्वाच्या खात्यावर पाणीच सोडावे लागले.
सर्वसामान्य शिवसैनिकांला मुख्यमंत्री करेन, असा शब्द बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता तर मग तुम्ही मुख्यमंत्री होण्याऐवजी सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून तेव्हाच एकनाथ शिंदे यांन किंवा शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांला मुख्यमंत्री म्हणून मान्यता द्यायला हवी होती. पण तुम्हालाच मुख्यमंत्री होण्याची हाव सुटली आणि तिथेच चुकले.
विश्वासार्हता गमावलेल्या आणि पाठीत खंजीर खुपसणारे अशी ज्यांची ओळख आहे त्या शरद पवार आणि देशातून हद्दपार होत चाललेल्या दोन्ही काँग्रेसशी तुम्ही हातमिळवणी केली, हिंदुत्ववादी विचारधारेशी फारकत घेतली इथेच चुकले. त्यांनी विशेषतः शरद पवार यांनी फेकलेल्या जाळ्यात तुम्ही फसलात तिथेच चुकलात.
अर्णव गोस्वामी, कंगना राणावत, पालघर साधू हत्याकांड, क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव मुंबईतील उद्यानाला देणे, नवाब मलिक, सचिन वाझे या सगळ्या प्रकरणी शरद पवार यांनी किंवा तुमच्या बदसल्लागारांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तुम्ही जे वागलात, निर्णय घेतले त्या प्रत्येक वेळी तुम्ही तोंडघशी पडलात, बदनाम झालात. पण तरीही भानावर आला नाहीत, तिथे चुकले.
एकनाथ शिंदे आणि काही शिवसेना आमदारांनी शिवसेना सोडल्यानंतर त्याच वेळी दोन्ही काँग्रेसची साथ सोडली असती आणि दोन्ही काँग्रेसच्या दावणीला बांधलेला शिवसेना पक्ष मोकळा केला असतात तरी आज तुमच्यावर ही वेळ आली नसती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कष्टाने ऊभी केलेली शिवसेना तुम्ही तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे, असंगाशी संग केल्यामुळे हातातून घालवली आहे.
भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांच्याबरोबर जाऊन शपथ घेणे हे चुकीचेच होते. त्याचे समर्थन अजिबात नाही. विश्वासार्हता गमावलेल्या शरद पवार यांच्याबरोबर मुळातच जाणे चुकीचेच होते. शेवटी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनाही तोंडघशी पडावे लागले. आता बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा निष्ठावान सर्वसामान्य कार्यकर्ता असलेल्या एकनाथ शिंदे यांना बरोबर घेतले आहे. आता निवडणूक आयोगानेही शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा देऊन शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. ( उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यायचे ठरविले आहे. तिथे काय निर्णय लागेल तो लागेल) त्यामुळे आता बृहन्मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच विधानसभा निवडणुका भाजप व मुख्यमंत्री शिंदे यांनी गुण्यागोविंदाने लढवाव्यात. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही काँग्रेसच्या एकाही आयारामांना पायघड्या घालून निष्ठावंतांचे पोतेरे करू नये अशी अपेक्षा. मुख्यमंत्री शिंदे यांनीही दोन्ही काँग्रेसच्या एकाही आयारामांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी शिवसेना भाजप युतीचे बघितलेले स्वप्न काही काळापुरते भंगले होते असे समजून पुढील वाटचाल सुरू करावी आणि दोन्ही काँग्रेसला महाराष्ट्रात पूर्णपणे गाडावे अशी अपेक्षा.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...
३ टिप्पण्या:
छान लेख
छान लेख 👍
धन्यवाद
टिप्पणी पोस्ट करा