मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३

'सहस्रबुद्धे आणि मंडळी' शताब्दी स्मरणिका

कल्याण येथील सहस्रबुद्धे कुटुंबीयांच्या व्यवसायास यंदा आषाढी एकादशीला १०१ वर्षे पूर्ण झाली.‌ दिवंगत कृष्णाजी विश्वनाथ ऊर्फ बाबुराव सहस्रबुद्धे यांनी १९२१ मध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी कल्याण येथे व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.‌ सहस्रबुद्धे परिवारातील तिसरी आणि चौथी पिढी हा व्यवसाय सांभाळत आहे. आता सहस्रबुद्धे यांचे सहयोग वस्त्र भांडार आणि सहस्त्रबुद्धे आणि मंडळी (आयुर्वेदिक औषधांचे विक्रेते) या नावाने सहस्त्रबुद्धे कुटुंबियांचा व्यवसाय सुरू आहे. व्यवसायाच्या शताब्दीपूर्ती निमित्ताने सहस्रबुद्धे कुटुंबियांतर्फे नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.‌ पितांबरी उद्योग समूहाचे संस्थापक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
कृष्णाजी विश्वनाथ ऊर्फ बाबुराव सहस्रबुद्धे
 
स्मरणिकेत पाहिला लेख 'मागे वळून पाहताना' ( विश्वास सहस्रबुद्धे) यांचा आहे. 'मनोगत' (अरविंद सहस्रबुद्धे) या लेखात कृष्णाजी विश्वनाथ यांनी सुरू केलेल्या व्यवसायाचा सविस्तर आढावा घेतला आहे.‌ 'सहस्रबुद्धे आणि मंडळी' (डॉ. श्रीनिवास साठे) यांनी सहस्रबुद्धे कुटुंबीयांचे मूळ गाव, त्यांच्या मागील पिढ्या, त्यांचे झालेले स्थलांतर, कृष्णाजी विश्वनाथ आणि त्यांची मुले, त्यांनी व्यवसायाचे केलेले जतन, संवर्धन आणि एकूणच कर्तृत्वाचा आढावा घेतला आहे. विश्वास सहस्रबुद्धे यांनी ' शंभर वर्षांच्या व्यावसायिक प्रवासाची' कथा सविस्तर उलगडून सांगितली आहे.‌ डॉ. रत्नाकर फाटक यांनी समाजसवेचा वारसा जोपासणा-या शतायुषी उद्योगाची कहाणी सादर केली आहे.‌ मनिषा आपटे (सुशिला सहस्रबुद्धे), सौ. माधवी नातू ( लता सहस्रबुद्धे) या माहेरवाशिणींनी कवितेतून आठवणी जागविल्या आहेत.‌ 

 स्मरणिकेत मला भावलेले संस्थान- सहस्रबुद्धे आणि मंडळी (अनंत खरे), बहुकष्टाने कल्पवृक्ष बहरून आला ( सौ. शुभा सहस्रबुद्धे) शंभर वर्षांचा प्रवास (सौ. विद्या सहस्रबुद्धे) सहस्रबुद्धे आणि मंडळी म्हणजे आमच्या अभिमानाचा विषय (सौ. स्मिता सहस्रबुद्धे) राखीव खेळाडूचे मनोगत ( यशवंत आपटे), हिमनग (अच्युत सहस्रबुद्धे), सचोटीने व्यवसायाची शताब्दी ( आनंद सहस्रबुद्धे) तेथे कर माझे जुळती (नेत्रा सहस्रबुद्धे- नरवणे), सहस्रबुद्धे आणि मंडळी म्हणजे मॅनेजमेंटचे कॉलेजच ( प्राची सहस्रबुद्धे-आपटे) यांचेही लेख आहेत. 

 स्मरणिकेत सार्वजनिक गणेशोत्सव, सुभेदारवाडा, कल्याण शताब्दी पुरस्कार मानपत्र, सहस्रबुद्धे कुलप्रतिष्ठान आयोजित कोतवडे येथे झालेल्या सहस्रबुद्धे कुल संमेलनात मिळालेले गौरवपत्र तसेच व्यवसायाशी संबंधित काही आणि सहस्त्रबुद्धे कुटुंबियांची छायाचित्रेही देण्यात आली आहेत.‌

 संपर्क सहयोग वस्त्र भांडार ०२५१- २२०२१७१ 

 सहस्रबुद्धे आणि मंडळी, नरहर सहकारी गृहनिर्माण संस्था, टिळक चौक, कल्याण (पश्चिम) 
 ©️ शेखर जोशी

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

धन्यवाद! सर्व कुटुंबियांतर्फे आभार !

अनामित म्हणाले...

धन्यवाद सहस्रबुद्धे आणि मंडळी