शुक्रवार, १५ मे, २०२६

धार येथील 'भोजशाळा' हे हिंदू मंदिरच; मंदिरमुक्तीच्या लढ्याला ऐतिहासिक यश

धार येथील 'भोजशाळा' हे हिंदू मंदिरच; मंदिरमुक्तीच्या लढ्याला ऐतिहासिक यश - नवलकिशोर शर्मा, हिंदू जनजागृती समितीची प्रतिक्रिया इंदूर, १५ मे मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक 'भोजशाळा' हिंदूंचेच पवित्र श्री वाग्देवी (श्री सरस्वती) मंदिर आहे, यावर इंदूर उच्च न्यायालयाने कायद्याची आणि पुराव्यांची मोहर उमटवली आहे. हा निकाल म्हणजे केवळ एका वास्तूचा विजय नसून शतकानुशतके दडपल्या गेलेल्या ऐतिहासिक सत्याचा आणि परकीय इस्लामी आक्रमकांनी अतिक्रमित केलेल्या मंदिरांच्या मुक्ती लढ्याचा भव्य विजय आहे, अशी प्रतिक्रिया भोजशाळा मुक्ती आंदोलनाचे प्रमुख नवलकिशोर शर्मा आणि हिंदू जनजागृती समितीने व्यक्त केली आहे. धार येथील भोजशाळेच्या मुक्तीसाठी हिंदू जनजागृती समितीने केवळ रस्त्यावर आंदोलने केली नाहीत, तर राष्ट्रीय स्तरावर व्यापक जनजागृती केली. गोवा येथे होणाऱ्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ (अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन) या राष्ट्रीय व्यासपीठावरून दरवर्षी या संदर्भात कायदेशीर आणि धोरणात्मक ठराव मंजूर करून लढ्याची दिशा ठरवली. देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मध्यप्रदेश सरकार आणि केंद्र सरकारकडे याविषयी सातत्याने दाद मागितली. न्यायालयाने दिलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे कोट्यवधी हिंदूंच्या भावनांना आणि समितीच्या प्रदीर्घ आंदोलनाला न्याय मिळाला असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी सांगितले.
भारतातील हिंदूंची केवळ एक-दोन देवस्थाने आक्रमित झालेली नाहीत. तर परकीय आक्रमकांनी आणि धार्मिक कट्टरतावाद्यांनी हिंदूंच्या सहिष्णुतेचा फायदा घेऊन हजारो मंदिरांवर अनधिकृतपणे अतिक्रमणे केली आणि त्यावर स्वतःचा खोटा अधिकार सांगितला. अयोध्या आणि धार (भोजशाळा) येथील निकालांनी हे सिद्ध केले आहे की, असत्याचा बुरखा फार काळ टिकत नाही. आता काशीच्या ज्ञानवापीपासून ते मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमीपर्यंतची सर्व आक्रमित क्षेत्रे मुक्त करण्याची वेळ आली आहे, असेही हिंदू जनजागृती समितीकडून सांगण्यात आले.

मानखुर्द येथील ११ एकर शासकीय जमीन कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द

मानखुर्द येथील ११ एकर शासकीय जमीन कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार मुंबई, शुक्रवार १५ मे राज्यातील कारागृहांवरील वाढता ताण आणि कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगत असलेली ११ एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करून नवीन कारागृह उभारण्यासाठी मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत जमिनीचा आगाऊ ताबा अधीक्षक, मुंबई मध्यवर्ती कारागृह यांना शुक्रवारी देण्यात आला. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. केवळ एका दिवसात १ हजार २०० हून अधिक झोपड्या हटवून प्रशासनाने ११ एकर जागा मोकळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मौजे मानखुर्द, ता. कुर्ला येथील गट क्रमांक १/२ मधील ही जमीन कारागृहासाठी देण्याचे निर्देश देण्यात आले होते. (छायाचित्र गुगल फोटोंच्या सौजन्याने)