शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

पादचारी पुलाला अडथळा ठरणारा रेल्वेस्थानक सुशोभीकरणाचा पूर्वेकडील काही भाग जमीनदोस्त

पादचारी पुलाला अडथळा ठरणारा रेल्वेस्थानक सुशोभीकरणाचा पूर्वेकडील काही भाग जमीनदोस्त - तोडकाम केलेला भाग रेल्वे पुन्हा बांधून देणार असली तरी सुशोभीकरणावर झालेला खर्च वाया डोंबिवली, दि. ७ नोव्हेंबर डोंबिवली रेल्वे स्थानकात नव्याने उभारण्यात येत असलेल्या पादचारी पुलाला अडथळा ठरणारा रेल्वे स्थानक सुशोभीकरणाचा पूर्वेकडील काही भाग शुक्रवारी सकाळी जमीनदोस्त करण्यात आला. डोंबिवली पश्चिमेतील चार मीटर आणि पूर्व भागातील वीस मीटर असा सुमारे २४ मीटर इतका सौंदर्यीकरणाचा भाग काढण्यात येणार आहे.अवघ्या काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेले हे सुशोभीकरण व पाट्यांचा काही भाग जमीनदोस्त केल्याने त्यावर झालेला खर्च वाया गेला आहे. पादचारी पुलाच्या कामात सुशोभिकरणातील एकूण २४ मीटरचा भाग अडथळा ठणारा एकूण २४ मीटरचा भाग तात्पुरता काढण्याचा प्रस्ताव कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागाने मंजूर केला होता. त्यानुसार पूर्वेकडील काही भाग शुक्रवारी तोडण्यात आला. रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ते पाच दरम्यानचे पादचारी पूल उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूकडील तोडण्यात आलेले सुशोभीकरणाचे काम रेल्वेने पू्र्ववत करून देण्याची अट महापालिकेच्या प्रस्तावात समाविष्ट आहे. डोंबिवली पूर्व व पश्चिम जोडणारा नवा पादचारी पूल डोंबिवली रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज एण्ड दिशेने उभारण्यात येत आहे. त्यासाठी डोंबिवली पश्चिमेला छत्रपती शिवाजी महाराज एण्ड दिशेकडे असलेले लोकल ट्रेनचे तिकीट कार्यालय व लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण केंद्रही काही महिन्यांपूर्वी हटविण्यात आले.‌ लोकसभा/ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक सुशोभीकरणाचे उदघाटन करण्यात आले होते. पादचारी पुलाच्या उभारणीत डोंबिवली पूर्व व पश्चिम भागातील या सुशोभीकरणाचा काही भाग अडथळा ठरणार आहे, ही गोष्ट आधी का लक्षात आली नाही? की लक्षात येऊनही जाणूनबुजून सुशोभीकरणाचे काम करण्याची घाई करण्यात आली? तोडण्यात आलेल्या सुशोभीकरणाचा भाग रेल्वे पुन्हा बांधून देणार असली तरी सुशोभीकरणावरील वाया गेलेला खर्च कोणाकडून वसूल करणार? रेल्वे आणि कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय, संवाद नव्हता का? काही महिन्यांत नवीन पादचारी पुलाचे बांधकाम सुरू करायचेच होते तर या सुशोभीकरणाला सुरुवातच का केली? पादचारी पूल बांधून पूर्ण झाल्यानंतरच सुशोभीकरण केले असते तर आकाश कोसळले असते का? असे अनेक प्रश्न डोंबिवलीकरांना भेडसावत आहेत.
जाता जाता- सुशोभीकरण आणि उभारण्यात आलेल्या कमानी, पाट्यांना डोंबिवली पूर्वैतील रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांचा विळखा पडला आहे. फेरीवाले त्यांचे सामान, विकण्याच्या वस्तू या सुशोभीकरणाला बिनधास्त टांगून ठेवतात. तर पश्चिमेला अधिकृत रिक्षा थांबा आणि मुठभर मुजोर रिक्षाचालकांचा विळखा पडलेला असतो. हे असले सुशोभीकरण व सौंदर्यीकरण काय कामाचे? शेखर जोशी ७ ऑक्टोबर २०२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: