शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा, विचारच देश आणि जगापुढील आजच्या सर्व समस्यांचे उत्तर - किशोरजी व्यास उर्फ गोविंददेवगिरी महाराज यांचे प्रतिपादन

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा,विचारच देश आणि जगापुढील आजच्या सर्व समस्यांचे उत्तर - किशोरजी व्यास उर्फ गोविंददेवगिरी महाराज यांचे प्रतिपादन आळंदी, दि.‌६ नोव्हेंबर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा आणि विचार हेच देश, जगापुढील आजच्या सर्व समस्यांवरील उत्तर आहे, असे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त निधीचे कोषाध्यक्ष किशोरजी व्यास उर्फ गोविंददेवगिरी महाराज यांनी गुरुवारी येथे केले. गोविंददेवगिरी महाराज यांच्या हस्ते ' शिवप्रताप २०२६' या दैनंदिनीचे प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते. दैनंदिनीचे मुख्य संकल्पनाकार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचे अभ्यासक रविंद्र पाटील, डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे आणि महाराष्ट्र फेडरेशनचे संचालक मिलिंद आरोलकर, दैनंदिनीचे प्रवर्तक संजय जोशी, दैनंदिनीचे मुद्रणकर्तेसुबोध पटवर्धन इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.‌ शिवजयंती साजरी केली,एखादा उत्सव/ कार्यक्रम उरकला,अशी वृत्ती समाजात नसावी.छत्रपती शिवाजी महाराज या चैतन्याचा,विचारांचा संस्कार दररोज आपल्या मनावर झाला पाहिजे.या संस्कारांचे मूळ प्रभू श्री रामचंद्रांमध्ये आहे आणि प्रभू श्रीराम धर्माची पहिली आवृत्ती असतील तर छत्रपती शिवाजी महाराज धर्माची दुसरी आवृत्ती आहेत, असेही गोविंददेवगिरी महाराज यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने निघालेल्या काही दैनंदिनी या आधी पाहिल्या,पुस्तकेही चाळली आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभावी डोस देणारी'शिवप्रताप २०२६'सारखी अन्य कोणतीही दैनंदिनी मला दिसली नाही,अशा शब्दांत गोविंददेवगिरी महाराजांनी या दैनंदिनीचे कौतुक केले. दैनंदिनी निर्मितीत सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन करून गोविंददेवगिरी महाराज म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि प्रेरणा आपल्या अंगी बाणविण्यासाठी ही दैनंदिनी म्हणजे एक प्रभावी औषध असून सर्वांनी ते दररोज घ्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र, चैतन्य आणि प्रेरणेचा समाजात जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा, असे आवाहनही त्यांनी केले. छायाचित्र ओळी. छायाचित्रात डावीकडून रवींद्र पाटील, मिलिंद आरोलकर, गोविंददेवगिरी महाराज, संजय जोशी, सुबोध पटवर्धन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: