बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५
सरसंघचालकांचे ऐकून झाडांची कत्तल थांबणार का?
डॉ. मोहन भागवत सांगती वृक्षांची महती!
- महाराष्ट्र भाजप सरसंघचालकांचे ऐकून
झाडांची कत्तल थांबवणार की कत्तल करणार?
शेखर जोशी
भारतीय जनता पक्षासाठी आदरणीय, गुरुतुल्य असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा आदर राखून नाशिक येथील हजारो वृक्षांची संभाव्य कत्तल थांबवायची की सोयीस्कर दुर्लक्ष करून कत्तल करायची? असा पेच भाजपपुढे निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपची मातृ/ पितृ संघटना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते/ पदाधिकारी किंवा भाजपचे नेते जाहीरपणे मान्य करोत अथवा न करोत पण रा.स्व. संघाचे सरसंघचालक व संघ नेते, पदाधिकारी जे सांगतील ते भाजपसाठी शिरसावंद्य असते. कधीतरी नड्डा काहीतरी बरळतात आणि त्याचा प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष फटका कसा बसतो हे भाजपने लोकसभा निवडणुकीत पाहिले. आणि म्हणूनच पाठोपाठ झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रा. स्व. संघ, संघप्रणित संस्था, संघटना भाजपच्या बाजूने अप्रत्यक्षपणे निवडणुकीत उतरल्यावर काय परिणाम झाला ते ही पाहायला मिळाले. नगरसेवक ते खासदार पदापर्यंतच्या निवडणुकीत संघ आणि संघप्रणित संस्था/ संघटना भाजप उमेदवारांसाठी किंवा संघ ज्याच्यामागे आपली संपूर्ण ताकद उभी करेल ते निवडून येतात. संघ व संघप्रणित संस्था संघटनांचे कार्यकर्ते निस्वार्थीपणे प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष काम करतात म्हणूनच भाजपचे उमेदवार निवडून येतात हे कटू सत्य आहे. असो.
नाशिक येथे होणा-या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्रामसाठी सुमारे १ हजार ७०० झाडे तोडण्याच्या निर्णयामुळे स़ध्या वातावरण तापले आहे. पर्यावरण व निसर्गप्रेमी नाशिककर या संभाव्य वृक्षतोडीच्या विरोधात एकवटले आहेत. हा विषय ऐरणीवर आला आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरावरील धर्मध्वजारोहणप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी जे भाषण केले, एक संस्कृत श्लोक सांगून वृक्षांची सांगितली, ते भाषण महाराष्ट्र भाजप पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनावर घेऊन हजारो वृक्षांची होणारी संभाव्य कत्तल थांबविणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
भागवत यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरावरील धर्मध्वजारोहणप्रसंगी केलेल्या भाषणात
छायां अन्य कुर्वन्ति:,
तिष्ठन्ति स्वयं आतपे:,
फलान्यपि परार्थाय:
वृक्षाः सत्पुरुषा इव:
असा संस्कृत श्लोक अर्थासहित सांगितला होता.
' या धर्मध्वजावर रघुकुलाचे प्रतिक असलेला कोवीदार वृक्ष आहे. मंदार आणि पारिजात या दोन्ही वृक्षांचे गुण या कोविदार वृक्षात आहेत. हे दोन्ही वृक्ष 'देव वृक्ष' म्हणून मानले जातात. वृक्ष स्वतः उन्हात उभे राहून दुसऱ्यांना सावली, फळे देतात. वृक्ष हे सत्पुरुष असतात', असा भावार्थ भागवतांनी सांगितला.
आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्रामसाठी नाशिकच्या तपोवनातील सतराशे झाडांची कत्तल केली जाणार आहे. भाजपसाठी मातृ/पितृतुल्य असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्या संघाच्या सरसंघचालकांनी जे वृक्षमहात्म्य सांगितले, वृक्ष हे सत्पुरुष असतात, असा गुणगौरव केला त्या भागवतांचा व त्यांच्या भाषणाचा आदर करणार का? हा खरा प्रश्न आहे.
या संभाव्य वृक्षतोड/ कत्तल प्रकरणी नाशिकमध्ये अलिकडेच जनसुनावणी झाली. या जनसुनावणीत उपस्थित सर्वच नाशिककरांनी ठाम विरोध केला. झाडांची कत्तल केली जाऊ नये, अशी आग्रही भूमिका घेतली. आता महाराष्ट्र भाजपने विचार करून निर्णय घ्यायचा आहे. जनभावनेचा अनादर करून महाराष्ट्र भाजपने/ सरकारने वृक्षतोड करण्याचा निर्णय घेतलाच तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी महाराष्ट्र भाजप व सरकारला या निर्णयापासून परावृत्त केले पाहिजे. चार शब्द सुनावले पाहिजेत, अशी निसर्ग आणि पर्यावरणप्रेमींनी अपेक्षा आहे. नाहीतर भागवत यांचे भाषणही 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी' ठरेल. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला याची किंमत मोजावी लागेल, मतदारांनीही ती मोजून दाखवावी.
शेखर जोशी
२६ नोव्हेंबर २०२६
👇सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या भाषणातील काही
भाग
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा