शनिवार, ६ डिसेंबर, २०२५
दत्तजयंतीच्या पूर्वसंध्येला रंगली ताल सुरांची मैफल!
दत्तजयंतीच्या पूर्वसंध्येला रंगली ताल सुरांची मैफल!
शेखर जोशी
गुहागर, दि. ६ डिसेंबर
'शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले' असे म्हणतात, याची प्रचिती येथे रसिकांना आली. रत्नागिरीतील पाच कलाकारांनी तालसुरांची अप्रतिम मैफल गुहागर येथे रंगविली. निमित्त होते दत्तजयंतीच्या पूर्वसंध्येला झालेल्या कार्यक्रमाचे.
मूळचे गुहागरवासीय असलेले आणि गेल्या काही वर्षांपासून नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने गुहागराबाहेर पडलेले जोशी कुटुंबीय दरवर्षी गुहागर येथील 'ब्रह्मचैतन्य' या आपल्या निवासस्थानी येऊन दत्तजयंती उत्सव गेली काही वर्षे साजरा करत आहेत. या उत्सवासाठी माहेरवाशिणींसह सर्व जोशी कुटुंबीय एकत्र जमतात. दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. त्यापैकी हा एक कार्यक्रम बुधवारी झाला. ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत 'ब्रह्मचैतन्य' वास्तूत हे सर्व कार्यक्रम पार पडले.
प्रसन्न जोशी (बासरी), उदय गोखले (व्हायोलिन), चैतन्य पटवर्धन (संवादिनी), निखिल वझे (तबला), हरिश केळकर ( तालवाद्ये) हे कलाकार सहभागी झाले होते. सर्वच कलाकारांनी अप्रतिम सादरीकरण केले. स्वर/शब्दांशिवाय या सर्वांनी एकापेक्षा एक अशी सरस गाणी वाद्यांच्या साथीने सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात 'हंसध्वनी' राग सादरीकरणाने झाली. आणि त्यांनतर सर्व कलाकारांनी वाद्यवादनाच्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची उत्तम व अद्ययावत ध्वनीव्यवस्था गुहागरच्याच निखिल ओक यांची होती.
निघालो घेऊन दत्ताची पालखी, केव्हा तरी पहाटे, लग जा गले, लाजून हासणे, बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात, तोच चंद्रमा नभात, ह्दयी प्रीत जागते, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, थकले रे नंदलाला, अबीर गुलाल उधळीत रंग, नीज माझ्या नंदलाला, बाजे मुरलिया इत्यादी मराठी, हिंदी गाणी सादर केली आणि उत्तरोत्तर कार्यक्रम चढत्या श्रेणीत रंगत गेला.
आता आम्ही जी गाणी सादर करणार आहोत ती तुम्ही ओळखा, असे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच गोखले यांनी सांगितले आणि रसिकांनाही कार्यक्रमात सहभागी करून घेतले. त्यामुळे व्यासपीठावरील वादक कलाकार आणि रसिक प्रेक्षकांत आपसूकच भावबंध निर्माण झाला व रसिक कार्यक्रमात गुंतत गेले. काही गाण्यांची तर केवळ सुरुवात झाल्यानंतर लगेचच गाण्याचे शब्द काय आहेत, ते रसिक सांगत होते. अवीट गोडीची ही सर्वच गाणी रसिकांच्या हृदयात कोरली गेली असून या गाण्यांचे रसिकांच्या मनावर असलेले गारुड अद्यापही कायम आहे, याचेच प्रत्यंतर कार्यक्रमप्रसंगी पाहायला मिळाले. कलाकार एकेक गाणे सादर करताहेत आणि सर्व रसिक त्यावर गाणे गाताहेत, असेही पाहायला मिळाले.
'कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर' भैरवीने या रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम औपचारिकपणे संपला असला तरी रसिकांच्या मनात कलाकारांनी सादर केलेल्या तालसुरांचा नाद गुंजत राहिला. उदय जोशी, गणेश जोशी बंधूंनी वादक कलाकारांचा यथोचित सन्मान केला.
दत्त जयंतीच्या दिवशी गुरुवारी सकाळी काकड आरती, फेर धरणे, नामस्मरण, भजनाने कार्यक्रमांना सुरुवात झाली. सत्यनारायण पूजेसह औदुंबराच्या वृक्षाखालील पादुकांवर अभिषेक, दत्त नामावली याचाही यात समावेश होता. गणेश जोशी यांनी दुपारी बाराच्या सुमारास गुरुचरित्रातील शेवटचा अध्याय - अवतरणिका वाचन केले.
संध्याकाळी सौ. स्मिता जोशी यांनी दत्त जन्मोत्सवाचे कीर्तन सादर केले. त्यांना अनंता आणि श्रीराम वैशंपायन बंधूंनी अनुक्रमे ऑर्गन व तबल्याची संगीतसाथ केली. यावेळी जोशी कुटुंबातील महिलांनी दत्त जन्माचा पाळणाही सादर केला.
दत्त जयंतीच्या निमित्ताने आयोजित अन्य कार्यक्रमात कीर्तनकार शिल्पा पटवर्धन यांचे सीतेवरील आख्यान/कीर्तन सोबतच विभावरी नेवरेकर, कल्याणी मेहेंदळे यांनी गाण्यांवर सादर केलेले कथ्थक नृत्य, सायंप्रार्थना, दुर्गादेवी देवळात गोंधळ, तन्वी दामले यांचा भक्तीगीत, नाट्यगीत मैफलीचा समावेश होता. ही संगीत मैफलही छान रंगली. मित्रवर्य अजय जोशीमुळे दत्तजन्मोत्सवात सहभागी होता आले आणि अन्यही सर्व कार्यक्रमांचा आनंद घेता आला. गुहागरवासीय विक्रम खरे यांच्या सुग्रास भोजन/नाश्ता व्यवस्थेने हा आनंद आणखी द्विगुणित झाला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा