शुक्रवार, १९ डिसेंबर, २०२५
महापालिका निवडणुकीत राष्ट्रासाठी मतदान करा - आमदार व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन
महापालिका निवडणुकीत राष्ट्रासाठी मतदान करा
- आमदार व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन
- स्थानिक समस्यांना ओझरता स्पर्श
- मोदी, फडणवीस यांचे गुणगान
- भाषणे सुरू होण्यापूर्वी आवाजाची पातळी ८८ डेसीबल
- महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात
- भाजपचाच महापौर हवा याचा चव्हाणांकडून अप्रत्यक्ष तर दोन्ही पाटील यांच्याकडून थेट उल्लेख
डोंबिवली, दि. १९ डिसेंबर
केरळसारख्या डावी विचारसरणी असलेल्या राज्यात भारतीय जनता पक्षाचा महापौर झाला असल्याचे सांगून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रासाठी, विकासासाठी योग्य ठिकाणी, योग्य वेळी मतदान करा, असे आवाहन आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केले.
भाजप कल्याण जिल्ह्यातर्फे डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदानात आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
कल्याण डोंबिवली महापालिकेची ही निवडणूक कल्याण डोंबिवलीचे भविष्य ठरविणारी निवडणूक असून विचारसरणीला मतदान करा. ठरविलेले साध्य करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन भाजपचे विचार पटवून द्यावेत, असेही चव्हाण म्हणाले.
आपण शहरांतील समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी, पूर्णत्वास नेण्यासाठी पारदर्शक कारभार करणारा महापौर असणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही व कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. केंद्रात आणि राज्यात अनुक्रमे राष्ट्रीय लोकशाही आघाडी व महायुतीचे शासन आल्यानंतर विकास कामांना गती मिळाली आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचीही भाषणे झाली.
आवाजाची पातळी ८८ डेसीबेल
मेळाव्याची वेळ संध्याकाळीच साडेपाच अशी होती. मेळाव्याला सुरूवात होण्यापूर्वी ढोल ताशा पथकाचे वादन, भाजप, फडणवीस, चव्हाण यांच्यावरील गाणी, मेळाव्यासाठी येणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी आणलेले ताशा पथक, स्पिकर लावून आणलेली रिक्षा या सगळ्या आवाजाची पातळी ८८ डेसीबेल इतकी होती. कानठळ्या आणि छातीत धडकी भरविणारा हा आवाज होता. भाषणांच्या वेळी असलेला आवाज सहन करण्यायोग्य होता. नियमानुसार निवासी क्षेत्रात दिवसा आवाजाची पातळी ४५ डेसीबेल इतकी असायला हवी.
स्थानिक समस्यांना ओझरता स्पर्श
महापालिका निवडणूक असल्याने रवींद्र चव्हाण स्थानिक गंभीर प्रश्न, नागरी समस्यांवर अधिक बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र चव्हाण यांनी त्यांना ओझरता स्पर्श केला. दररोज सकाळी नोकरीसाठी मुंबईत जाणारे येथील नागरिक, त्यांच्या अडचणी, शहरातील वाहतूक कोंडी हे प्रश्न आहेत. या सर्व समस्या येणाऱ्या काळात सोडवायच्या आहेत, इतकाच उल्लेख केला. शहरातील अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकामे, रेल्वे स्थानक परिसराला पडलेला फेरिवाले व रिक्षाचालक यांचा विळखा, अरुंद रस्ते, न झालेली रिक्षा मीटर सक्ती, मुजोर व बेशिस्त रिक्षाचालक, शहरातील पाणी समस्या, घनकचरा आणि इतरही गंभीर नागरी समस्यांवर चव्हाण एका शब्दानेही बोलले नाहीत.
नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचे गुणगान
चव्हाण यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार गुणगान गायले. पहेलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर,भाजप पुन्हा सत्तेवर आला तर राज्यघटना बदलण्यात येणार, असा लोकसभा निवडणुकीत विरोध पक्षाकडून करण्यात आलेला अपप्रचार, २०१४ ते २०१९ आणि त्यानंतर फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी विकास कामांना दिलेली गती, स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी दिलेले भरघोस अर्थसहाय्य याविषयी सांगितले.
दोन्ही पाटील म्हणाले भाजपचाच महापौर हवा
आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्याच उमेदवारांना मतदान करून महापालिकेत भाजपचाच महापौर बसला पाहिजे, असे जगन्नाथ पाटील यांनी सांगितले तर भाजपचाच महापौर होणे ही कल्याण डोंबिवलीतील गरज असून कार्यकर्त्यांनी आपले योगदान द्यावे. भाजपचाच महापौर होईल, असे कपिल पाटील म्हणाले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा