शनिवार, २७ डिसेंबर, २०२५

द्रौपदी बुध्दिमान, तेजस्विनी आणि विवेकी-प्रा. मेधा सोमण

द्रौपदी बुध्दिमान, तेजस्विनी आणि विवेकी- प्रा. मेधा सोमण 'द्रौपदी : काल, आज, उद्या' महाकादंबरी प्रकाशित मुंबई, दि. २७ डिसेंबर द्रौपदी बुध्दिमान, तेजस्विनी आणि विवेकी‌ होती. द्रौपदीचा मातृत्व आणि विवेकाचा हा गुण अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन संस्कृत तज्ज्ञ, अभ्यासक व लेखिका प्रा.‌ मेधा सोमण यांनी केले.‌ ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक अशोक समेळ यांनी लिहिलेल्या 'द्रौपदी : काल, आज, उद्या' या महाकादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डिंपल पब्लिकेशन'ने ही कादंबरी प्रकाशित केली आहे.‌ द्रौपदीच्या पाचही मुलांना अश्वत्थाम्याने अत्यंत क्रूरतेनं आणि अधर्मानं मारल्यावर त्याला तिच्यासमोर आणले असता आणि अश्वत्थाम्याला ठार करण्यासाठी तिची अनुमती मागितली असताना ती, त्याला मारू नका.' असे सांगते. यामागची द्रौपदीची विवेकबुध्दी स्पष्ट करताना प्रा.सोमण म्हणाल्या, कृपीला पतीवियोगाचे दुःख आहे. अश्वत्थाम्याला ठार केले तर तिला पुत्र वियोगाचे दुःख सहन होणार नाही. पुत्र वियोगाचे दुःख काय असते, ते मी अनुभवतेय. ज्या द्रौपदीच्या पाचही मुलांना ठार मारले हे कळले आहे, तरीही ती आपला विवेक ढळू देत नाही. 'द्रौपदीला एकाच दुर्योधनाकडून, एकाच दुःशासनाकडून अत्याचार सहन करावा लागला. आजच्या द्रौपदीला अनेक दुर्योधन, दुःशासनांशी सामना, संघर्ष करावा लागतोय. द्रौपदीला जे एक कृष्णतत्व मिळाले, तसे आज अनेकांमधून कृष्णतत्व मिळायला हवे, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षपदावरून बोलताना दा. कृ. सोमण म्हणाले, आज मी सगळ्या नक्षत्र, ताऱ्यांना घेऊन आलोय. अशोक समेळ यांच्या महकादंबर्‍या वाचल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांच्या शंभर आवृत्या निघोत आणि त्या मागच्या पिढीपासून पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचोत. डिम्पल पब्लिकेशनचे अशोक मुळ्ये यांनीही मनोगत व्यक्त केले. लेखक समेळ यांची मुलाखत किरण वालावलकर, स्मिता गवाणकर यांनी घेतली. संग्राम समेळ, संजीवनी समेळ यांनी 'द्रौपदी' महाकादंबरीतील काही भागाचे अभिवाचन केले. सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले तर अरूण घाडीगावकर यांनी आभार मानले. छायाचित्रात डावीकडून कौतुक मुळ्ये, अशोक समेळ, किरण वालावलकर, प्रा. मेधा सोमण, दा. कृ. सोमण, अशोक मुळ्ये, अरुण घाडीगावकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: