गुरुवार, १८ डिसेंबर, २०२५
कडोंमपाची परिवहन सेवा जास्तीत जास्त मार्गांवर सक्षमपणे सुरू झालीच पाहिजे..
कडोंमपाची परिवहन सेवा जास्तीत जास्त
मार्गांवर सक्षमपणे सुरू झालीच पाहिजे...
'रिक्षा मीटरसक्ती नाही तर मतदान नाही'
कडोंमपा निवडणूक २०२६
शेजो उवाच - ४
शेखर जोशी
डोंबिवली- कल्याणमध्ये रिक्षा चालक मालक संघटना आणि काही मुजोर, बेशिस्त रिक्षाचालकांमुळे कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन बससेवा पूर्णपणे सुरू झालेली नाही. अपवाद फक्त बाजीप्रभू चौक, डोंबिवली पूर्व ते एमआयडीसी निवासी विभाग. प्रचंड प्रतिसादात ही बससेवा सुरू आहे. रिक्षा चालक मालक संघटना आणि मुजोर रिक्षाचालकांचा विरोध मोडून कडोंमपाची परिवहन बससेवा सक्षमपणे सुरू करण्याची गरज आहे.
डोंबिवली आणि कल्याण दोन्ही शहरे प्रचंड प्रमाणात विस्तारली असून नागरिकांना घर ते रेल्वे स्थानक आणि रेल्वे स्थानक ते घर जाण्यासाठी रिक्षा हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे दोन्ही शहरांत जास्तीत जास्त मार्गांवर कल्याण डोंबिवली महापालिका परिवहनची बससेवा सुरू झाली पाहिजे. डोंबिवलीत काही वर्षांपूर्वी गोग्रासवाडी, डोंबिवली पूर्व ते रेल्वे स्थानक, डोंबिवली पूर्व अशी कडोंमपाची परिवहन सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र रिक्षा चालक मालक संघटना, रिक्षाचालकांच्या दबावामुळे ती रद्द करण्यात आली. काही मुजोर रिक्षाचालकांनी या बसवर दगडफेक केली होती. डोंबिवली पश्चिमेला रेल्वे स्थानक ते महापालिका ह प्रभावक्षेत्र कार्यालय अशी परिवहन सेवा आहे. मात्र ती नावाला, शोभेला असल्याने असून नसल्यासारखीच आहे. जेमतेम एखादा प्रवासी असतो किंवा नसतो. बसमध्ये चालक, वाहकच असतात. ही बस चालविण्याचे नाटक कशासाठी?
परिवहन सेवा सुरू झाली तर आमच्या पोटावर पाय येतो, असे रिक्षाचालक म्हणतात. मुळात हा दावा खोडसाळ व चुकीचा आहे. एक बस गेल्यावर पुढची बस येण्यासाठी पंधरा, वीस मिनिटांचा अवधी असेल तर ज्या प्रवाशांना थांबायचे आहे ते थांबतील. इतर प्रवासी रिक्षाचाच आधार घेतील. ठाण्यात, मुंबईत महापालिका परिवहन सेवा चालविली जातेच ना? डोंबिवली कल्याणमध्ये मुठभर रिक्षाचालकांचा कळवळा आणि हजारो प्रवाशांकडे दुर्लक्ष अशी परिस्थिती आहे.
डोंबिवली व कल्याण दोन्ही ठिकाणी रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर खरे तर कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवेच्या बस उभ्या राहिल्या पाहिजेत. परिवहन सेवेचे बसथांबे असले पाहिजेत, त्याला प्राधान्य हवे. दोन्ही ठिकाणी उलट चित्र आहे. बाहेर पडल्यानंतर रिक्षातळ आहेत. डोंबिवली पूर्व भागात तर बाहेर पडल्यानंतर चार/ सहा वेगवेगळे रिक्षातळ आहेत. या रिक्षातळावरील रिक्षा शेअर पद्धतीने अमूकच ठिकाणी जाणार, दुसऱ्या रिक्षातळावरील रिक्षा तमूक ठिकाणी जाणार. हे कशासाठी? हा प्रकार बंद झाला पाहिजे. डोंबिवली पश्चिम भागाचा विचार केला तर जेमतेम कोपर रस्ता, पं. दीनदयाळ रस्ता, घनश्याम गुप्ते रस्ता, महात्मा फुले रस्ता, नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता आणि गणेश नगर, राजू नगर- बावनचाळ मार्गे जाणारा रस्ता इतके प्रमुख रस्ते आहेत. या सर्व मार्गांवर सुरुवात ते शेवट आणि तसेच उलट बाजूने शेवट ते सुरुवात कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सेवा सुरू केली तर प्रचंड प्रतिसाद मिळेल. पण आजपर्यंत डोंबिवली पश्चिमेला महापालिका परिवहन सेवा सुरू झालेली नाही.
कल्याण डोंबिवलीतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस यांनी रिक्षा चालक मालक संघटना आणि रिक्षा चालकांपुढे अक्षरशः नांगी टाकली आहे. त्यामुळे इथे रिक्षा मीटर सक्ती होऊ शकली नाही. मुद्रीत किंवा इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे, समाज माध्यमातून बातम्या आल्या की थातुरमातुर कारवाईचे नाटक पार पाडले जाते. पुन्हा ये रे माझ्या मागल्या.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक आता संधी आहे. मतं मागायला घरी येणारे सर्वपक्षीय उमेदवार, त्यांचे राज्यस्तरीय आणि स्थानिक पातळीवरील नेते यांना जाब विचारण्याची आवश्यकता आहे. रिक्षा मीटरसक्ती नाही, सक्षम परिवहन सेवा नाही, तर मतदान नाही किंवा निषेध म्हणून 'नोटा' चा वापर, केला पाहिजे.
शेखर जोशी
१८ डिसेंबर २०२५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा