सोमवार, ८ डिसेंबर, २०२५
'कर्मयोगी' नागोठणेकर आणि जाधव आजोबा!
'कर्मयोगी' नागोठणेकर आणि जाधव आजोबा!
शेखर जोशी
शुक्रवारी सकाळी गुहागरहून गुहागर- भांडूप एसटीबसने येताना हे दोन्ही आजोबा महाडला बसमध्ये चढले. डावीकडे बसलेले हिरामण नागोठणेकर , उजवीकडे उभे असलेले नामदेव जाधव. दोघांची वये अनुक्रमे ८५ आणि ९०.
एसटी पूर्ण भरलेली होती. वाहकाला आपली आधार कार्ड दाखवून दोघेही जण कोणतीही तक्रार न करता शांतपणे उभे राहिले. दोघांना नागोठणे येथे जायचे होते. मात्र बस नागोठणे आगारात जाणार नसल्याने आधी काही अंतरावर उतरुन दोघेही वेगळ्या बसने किंवा अन्य जे मिळेल त्या वाहनाने घरी पोहोचणार होते. दत्त जयंतीच्या निमित्ताने महाड येथे कीर्तन/ भजन सप्ताहासाठी हे दोन्ही आजोबा गेले होते.
बराच वेळ ते दोघे शांतपणे उभे होते. बसमधील एक प्रवासी माणगावला उतरणार आहेत, तिथे जागा होईल असे वाहकांने त्यांना सांगितले होते. त्यामुळे नागोठणेकर आजोबा थोडे पुढे गेले. माझ्या जागेवर बसा थोडा वेळ असे जाधव आजोबांना सांगून मी माझ्याजागेवरून उठलो. तर जाधव आजोबा चार पावले पुढे गेले आणि उभ्या असलेल्या नागोठणेकर आजोबांना मागे आसनावर येऊन बसायला सांगितले आणि ते उभे राहिले.
नागोठणेकर आजोबा आसनावर येऊन बसल्यावर त्यांच्याशी गप्पा सुरू झाल्या. ते म्हणाले, खरे तर माझ्यापेक्षा जाधव वयाने पाच वर्षांनी मोठे नव्वदीचे आहेत. तुम्ही तुमच्या जागेवर त्यांना बसण्यासाठी सांगितले पण ते स्वतः न बसता त्यांनी मला बसायला सांगितले. का ते माहीतेय? मी नाही अशी मान हलवली. काही वर्षांपूर्वी माझी बायपास शस्त्रक्रिया झाली आहे आणि म्हणून ते स्वतः उभे राहिले आणि मला बसायला दिले, असे नागोठणेकर आजोबांनी सांगितले. खरोखरच धन्य आहे.
माझ्या जागेवर नागोठणेकर आजोबांना बसायला दिल्यामुळे मी त्यांच्या शेजारीच उभा होतो. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा झाल्या. दरम्यान जाधव आजोबांनाही माणगावला बसायला जागा मिळाली.
नागोठणेकर आजोबा एसटीतच नोकरीला होते. आम्ही दोघेही जण आसपासच्या परिसरात जिथे कुठे कीर्तन, भजन, नामसप्ताह असेल तिथे अधूनमधून येत जात असतो. आपल्या धर्मात त्या त्या वयानुसार जी आश्रम व्यवस्था/ दिनचर्या सांगितली आहे त्यानुसार आम्ही दोघेही आता वानप्रस्थाश्रमाच्याही पुढील व्यवस्थेत म्हणजे संन्यास आश्रमात आहोत. संसारातील सर्व बंधनातून मुक्त होऊन/ त्याग करून मोक्षप्राप्तीसाठी पूर्णपणे देवाप्रती लिन होणे, घराबाहेर/ गावाबाहेर राहून, सातत्याने भ्रमण करणे, संसारातील सर्व सुख दुःखापासून अलिप्त राहून देवाचे नामस्मरण करणे या संन्यासाश्रमात सांगितले आहे. आणि आम्ही तेच करतो आहोत, असे नागोठणेकर आजोबांनी सांगितले. हे सांगताना आम्ही कुणीतरी वेगळे आहोत, आम्ही काही जगावेगळे करत आहोत, असा कोणताही आव/ अभिनिवेश अजिबात नव्हता.
अर्धा तास झाल्यावर नागोठणेकर आजोबा उठून उभे राहायला लागले आणि मला म्हणाले तुम्ही तुमच्या जागेवर बसा, त्यावर आता तुमचे उतरायचे ठिकाण येईपर्यंत तुम्हीच बसा, असे मी त्यांना म्हटले. त्यांना बसतानाही संकोचल्यासारखे झाले होते. इतरवेळी लोकल/ लांब पल्ल्याच्या गाडीत जो अनुभव आपण घेतो त्या पार्श्वभूमीवर हा वेगळा अनुभव होता. या वयात तुम्ही दोघेही फिरता, सर्वच ठिकाणी राहण्याची/ जेवणाखाण्याची चांगली व्यवस्था होत असेलच असे नाही, मग याचा त्रास होत नाही का? यावर आजवर देवाने भरपूर दिले आहे. सुखी आहे. आता जे आयुष्य राहिले आहे ते सर्व देवाचे कोणाबद्दल, कशाहीबद्दल कसलीही तक्रार करायची नाही. देवाने आजचा दिवस छान घालवला तसा उद्याचाही दिवस छान जाईल, यावर विश्वास ठेवून तो जसा ठेवेल तसे राहायचे, असे उत्तर त्यांनी दिले.
नागोठणे यायच्या आधी जिथे या दोन्ही आजोबांना उतरायचे होते, ते ठिकाण आले. वाहकाने आवाज दिला आणि दोघेही त्या थांब्यावर उतरले. उतरण्याआधी मी या दोघांही 'कर्मयोग्यां'च्या पाया पडलो, त्यांना नमस्कार केला आणि पुन्हा भेटीचा योग येईल तेव्हा भेटू या, असे म्हणत या नागोठणेकर, जाधव आजोबांचा निरोप घेतला.
शेखर जोशी
८ डिसेंबर २०२५
छायाचित्रात डावीकडून नागोठणेकर आजोबा, जाधव आजोबा.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा