गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५
कल्याणमध्ये मीटर पद्धतीने रिक्षा सुरू;ही तर धूळफेक.
ही तर निव्वळ धूळफेक...
शेखर जोशी
कल्याणमध्ये मीटर पद्धतीने रिक्षा सुरू झाली म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रिक्षा चालक मालक संघटनांचे नेते, पदाधिकारी, वाहतूक पोलीस डांगोरा पिटत आहेत, पण ही निव्वळ धूळफेक आहे. रिक्षा मीटर सक्ती एखाद्या ठराविक ठिकाणी नको तर संपूर्ण कल्याण डोंबिवली शहरात सर्वत्र होण्याची आवश्यकता आहे.
या बातमीनुसार सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी कल्याण रेल्वे स्थानकातून मीटर रिक्षा चालविण्यात येत आहे. मंगळवारपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. याआधीही कल्याण, डोंबिवलीत मीटर रिक्षासाठी वेगळी रांग ठेवण्याचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी तो बंद पडला. अर्थात तो फसणारच होता. आता कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर मीटर रिक्षा सुरू करण्याचा प्रयोगही फसण्याचीच शक्यता जास्त आहे. फक्त सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळेत कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरून मीटर पद्धतीने रिक्षा चालविण्याचा हा प्रकारच मुळात हास्यास्पद आहे. म्हणजे कल्याण शहराच्या अन्य वेगवेगळ्या भागातून एखाद्याला रेल्वे स्थानकावर मीटर पद्धतीने यायचे असेल तर तो येऊ शकत नाही. रिक्षाचालक मनमानी पद्धतीने जेवढे पैसे सांगतील तेवढे देऊनच यावे लागेल. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरून सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी मीटर पद्धतीने रिक्षा सुरू करण्याचा प्रयोग अत्यंत अयोग्य व चुकीचा आहे. प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रिक्षा चालक मालक संघटना, पदाधिकारी यांना खरोखरच आणि मनापासून मीटर पद्धतीने रिक्षा सुरू करायच्या असतील तर त्या संपूर्ण कल्याण शहरात सुरू कराव्यात. संपूर्ण कल्याण शहरात मीटर पद्धतीने रिक्षा सुरू झाल्या म्हणजे शेअर पद्धत बंद करावी, असे अजिबात म्हणणे नाही. दोन्ही पद्धतीने रिक्षाप्रवास करता आला पाहिजे. रिक्षाचालक किंवा रिक्षा चालक मालक संघटना, पदाधिकारी यांना मीटर पद्धतीने रिक्षा नकोत आणि फक्त शेअर पद्धतीनेच रिक्षा चालवायचे एकमेव कारण म्हणजे जर रिक्षा मीटर सक्ती केली गेली तर रिक्षा चालकांना मनमानी पद्धतीने पैसे उकळता येणार नाहीत.
कल्याण किंवा डोंबिवलीत रेल्वे स्थानकाच्या बाहेर जे रिक्षातळ आहेत, तिथे प्रवासी बसला की ठरवून दिलेले जे शेअर भाडे आहे त्यापेक्षा जास्त पैसे रिक्षाचालक घेऊ शकत नाहीत. याउलट मीटर सक्ती नसल्याने रिक्षातळ सोडून शहराच्या कोणत्याही भागात प्रवासी रिक्षात बसला की त्याला मनमानी पद्धतीने पैसे उकळता येतात. मीटर पद्धतीने १.०५ किलोमीटर अंतरासाठी फक्त २६ रुपये इतके भाडे ठरवून दिलेले आहे. मात्र इतक्या किंवा यापेक्षाही कमी अंतरासाठी रिक्षाचालक ५० ते ७० रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त पैसे सांगतात. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि अन्य हतबल प्रवाशांना ते देऊन प्रवास करावाच लागतो. अशा रिक्षाचालकांची तक्रार करा, असे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस सांगत असतात. पण प्रत्येक वेळी प्रत्येक प्रवासी, ज्येष्ठ नागरिक रिक्षाचालकांशी वाद घालत बसत नाही. सर्वांना ते शक्य होते असे नाही.
त्यामुळे संपूर्ण शहरात, कोणत्याही भागात प्रवासी रिक्षात बसला आणि त्याने मीटरने जायचे आहे सांगितले तर रिक्षाचालकाने मीटर टाकलेच पाहिजे. आणि त्यासाठीच अमूक एखाद्या ठिकाणी, अमूक रिक्षा तळावर, मीटर रिक्षांची वेगळी रांग असा तोंडाला पाने पुसण्याचा आणि मीटर पद्धतीने रिक्षा सुरू झाल्याची धुळफेक न करता तातडीने संपूर्ण कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रिक्षा मीटर सक्ती केली जावी. सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी, रिक्षा चालक मालक संघटना, त्यांचे पदाधिकारी आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधी- अर्थात निवडून आलेले आमदार व खासदार या सर्वांनी मुठभर आणि मुजोर, बेशिस्त रिक्षाचालकांच्यापुढे नांगी टाकली आहे.
लवकरच कल्याण डोंबिवली महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत कल्याण डोंबिवलीत रिक्षा मीटर सक्ती हा मुद्दा ऐरणीवर आला पाहिजे. सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी आणि उमेदवार मत मागायला येतील तेव्हा प्रत्येकाने 'आधी रिक्षा मीटर सक्ती नंतर मतदान' किंवा ' रिक्षा मीटर सक्ती नाही तर मतही नाही' अशी भूमिका घेतली पाहिजे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही संधी आहे. आत्ता झाले तरच काहीतरी हालचाल होईल. निवडणूक पार पडली की काहीही होणार नाही.
गुगल मॅपवर अंतर पाहून भाडे द्यावे
आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो. प्रत्येक प्रवाशाने रिक्षात बसल्यावर जिथे बसलो ते आणि जिथे उतरायचे असेल ते ठिकाण टाकावे. जितके किलोमीटर अंतर दाखवतील तितकेच पैसे द्यावे. एम. इंडिकेटर ॲपवर १.०५ किलोमीटर अंतरापासून ते पुढील किलोमीटरपर्यंत किती भाडे होते त्याचा तक्ता दिला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रिक्षा चालक मालक संघटनांनी या भाडेतक्त्याचा फलक सर्व प्रमुख रिक्षातळांवर आणि शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी लावावेत. रिक्षा चालक मालक संघटना, पदाधिकारी आणि रिक्षा चालकांना मीटर सक्ती मान्य नसेल तर या पद्धतीने प्रवासी पैसे देतील आणि ते तुम्हाला मान्य करावेच लागेल, असे आदेश, सूचना द्याव्यात.
आमदार व खासदारांचे दुर्लक्ष
विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रिक्षा मीटर सक्ती या प्रश्नाकडे सोयीस्कर डोळेझाक केली आहे. या दोघांनी आणि त्यांच्या राज्यातील वरिष्ठांनी अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनावर घेतले तर कल्याण डोंबिवलीत रिक्षा मीटर सक्ती होऊ शकते. ते अशक्य नाही. भाजप स्वतःला 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवून घेतो. आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी किमान भाजपप्रणीत रिक्षाचालक मालक संघटनेला व याचे सभासद असलेल्या रिक्षाचालकांनी तरी आपली रिक्षा मीटरप्रमाणे चालविण्यासाठी सक्ती करावी, आवाहन करावे.
शेखर जोशी
२० नोव्हेंबर २०२५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा