डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संस्कृत भाषेवरील प्रेम
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव उच्चारले की आपल्याला आठवते त्यांनी दलित आणि स्त्रियांच्या मुलभूत हक्कांसाठी केलेले कार्य आणि भारताची राज्यघटना. त्यांच्या या कामाबरोबरच डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाविषयी फारसा प्रकाशात न आलेला एक भाग व तो म्हणजे त्यांचे संस्कृत भाषेवरील प्रेम आणि आस्था.
लेखक व प्राध्यापक प्र.शं. जोशी यांनी डॉ. आंबेडकर यांच्यावर संस्कृत श्लोकांच्या स्वरुपात भीमायन हे चरित्र काव्य लिहिले आहे. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील या प्रा. जोशी यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी हे चरित्र लिहिले. डॉ. आंबेडकर यांना संस्कृत भाषेविषयी किती आदर होता आणि संस्कृत भारताची राष्ट्रभाषा व्हावी यासाठी डॉ. आंबेडकर यांनी कसे प्रयत्न केले ते यात वाचायला मिळते.
दलित महासंघाच्या कार्यकारिणीच्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृत भाषेला राष्ट्रभाषा करण्यात यावी, असा ठराव मांडला होता. हिंदी प्रमाणेच राष्ट्रभाषेच्या जागी संस्कृत भाषा असावी, अशी त्यांची इच्छा होती.
संस्कृत भाषा ही भारतीय संस्कृतीचे मूळ आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातील, वेगवेगळ्या भारतीय भाषांना जन्म देणारी, विद्वानांना नेहमीच आदरणीय वाटणारी अशी ही संस्कृत भाषा भारताची राष्ट्रभाषा होण्यास योग्य आहे, अशा शब्दात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृत भाषेचे महत्व अधोरेखीत करत हा ठराव मांडला होता.
पुढे घटना समितीच्या बैठकीतही डॉ. आंबेडकर यांच्यासह भारताच्या परराष्ट्र खात्याचे उपमंत्री डॉ. बी. व्ही. केसकर आणि खासदार नजिरुद्दिन अहमद यांनी संस्कृत राष्ट्रभाषा व्हावी, असा प्रस्ताव/ठराव मांडण्याचा प्रयत्न केला होता. पश्चिम बंगालचे खासदार पं. लक्ष्मीकांत मैत्र यांनीही त्याला पाठिंबा दिला. पं. मैत्र यांना डॉ. आंबेडकर यांच्या संस्कृत भाषेच्या ज्ञानाविषयी खात्री वाटत नव्हती. म्हणून पं. मैत्र यांनी आपल्या काही शंका संस्कृतमधूनच डॉ. आंबेडकर यांना विचारल्या. आणि डॉ. आंबेडकर यांनी संस्कृतमधूनच पं. मैत्र यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. हा संवाद ऐकून घटना समितीच्या बैठकीतील सर्व सदस्य आश्चर्यचकित झाले. ही बातमी तेव्हाच्या काही प्रमुख वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती.
मात्र घटना समितीच्या सभेतील अनेकांच्या विरोधामुळे संस्कृत भाषेला राष्ट्रभाषा करण्याचा हा ठराव/प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. संस्कृत भाषेवर मनापासून प्रेम करणाऱया डॉ. आंबेडकर यांच्यासह अनेकांना वाईट वाटले.
डॉ.आंबेडकर यांनी राज्यघटना तयार करताना वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ वाचून, त्यांचा सखोल अभ्यास करुन नवीन कायदे करुन राज्य घटनेत स्त्रिया व दलितांच्या हक्कांचा समावेश केला. यासाठी त्यांनी भारद्वाज, याज्ञवल्क्य आदी स्मृतीग्रंथाचाही अभ्यास केला.
डॉ. आंबेडकर यांचे हे संस्कृतप्रेम, त्यांनी मांडलेला हा ठराव याबाबतची माहिती प्रा. जोशी यांनी लिहिलेल्या भीमायन या ग्रंथात आहे. या ग्रंथातील ही माहिती देणारे श्लोक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या इयत्ता १० वी संस्कृत संपूर्ण या पाठ्यपुस्तकात देण्यात आली आहे.
-शेखर जोशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा