आपल्यापैकी बहुतेकांना लहानपणी म्हणजे शालेय वयात पोस्टाची तिकिटे गोळा करणे, वेगवेगळ्या देशातील नाणी व नोटा जमविणे, मान्यवर व्यक्तींच्या स्वाक्षऱया घेणे असे छंद असतात. पुढे ते जोपासले जातात किंवा थांबतात. मी शाळेत असताना मलाही मान्यवर व्यक्तिंच्या स्वाक्षऱया जमा करण्याचा छंद होता. या स्वाक्षऱया आठवी ते दहावी-बारावीपर्यंतच्या काळात जमा केलेल्या आहेत.
डोंबिवलीमध्ये तेव्हाही अनेक साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे आणि आजही होत असतात. त्या कार्यक्रमाला जाऊन या पैकी काही मान्यवरांच्या स्वाक्षऱया घेतलेल्या आहेत. तर काही स्वाक्षऱया डोंबिवलीतील भरत नाट्य मंदिर या खुल्या नाट्यगृहात झालेल्या नाट्य प्रयोगाच्या वेळी घेतलेल्या आहेत.
सुनील गावसकर यांच्या स्वाक्षरीची आठवण मनात घर करुन आहे. परदेशातील मोठा दौरा जिंकून भारतीय संघ मुंबईत परतला होता. गावसकर हे संघाचे कप्तान होते. त्या निमित्ताने गावसकर यांचा सत्कार डोंबिवली नगरपालिकेच्या कार्यालयातील मोकळ्या जागेत झाला होता. कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. कार्यक्रम संपल्यानंतर व्यासपीठावर जाऊन त्या गर्दीत गावसकर यांची सही घेतल्याचे आठवत आहे.
'सौजन्याची ऐशी तैशी' या नाटकाच्या वेळी अभिनेते राजा गोसावी यांची घेतलेली सही (८-१२-८४) माझ्या संग्रहात आहे. अभिनेते अजय वढावकर यांचीही स्वाक्षरी आहे. जर मी चुकत नसेन तर 'पळा पळा कोण पुढे पळे तो'या नाटकात भक्ती बर्वे काम करत होत्या. त्यांच्यासह माधव वाटवे, आत्माराम भेंडे हे कलाकारही या नाटकात होते. हे नाटक भरत नाट्य मंदिर येथे पाहिले. त्या वेळेस या तिघांच्या स्वाक्षऱया घेतल्या. अभिनेते यशवंत दत्त, जयंत सावरकर, अभिनेते, दिग्दर्शक कमलाकर सारंग यांच्याही स्वाक्षऱया संग्रहात आहेत.
लहान मुलांसाठी लिहिणारे भा. रा. भागवत (फास्टर फेणे प्रसिद्ध) आणि लिलावती भागवत, वाचकप्रिय लेखक बाबा कदम, लक्ष्मण माने, कुमुदिनी रांगणेकर, कवी ना.धों.महानोर, ज्येष्ठ पत्रकार अशोक जैन, कुमार केतकर, अरुण साधू, कवीवर्य शंकर वैद्य, गायिका उत्तरा केळकर, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, वृत्तनिवेदक व सूत्रसंचालक प्रदीप भिडे, लेखक व नाटककार जयवंत दळवी, वसंत सबनीस, समीक्षक प्रा. माधव मनोहर, लेखक व नाटककार आणि आमचे डोंबिवलीकर असलेले शं. ना.नवरे, 'बलुत'कार दया पवार, व्यंगचित्रकार बळी लवंगारे, दूरदर्शनचे निर्माते 'ज्ञानदीप'कार आकाशानंद, ज्येष्ठ संगीत समीक्षक, तज्ज्ञ आणि आवाजाची जोपासना कशी करावी याचे मार्गदर्शन करणारे अशोक दा. रानडे, ज्येष्ठ अभिनेत्री रेखा (मराठीतील), विक्रमवीर धनंजय कुलकर्णी यांच्यासह कवी व लेखक रमेश तेंडुलकर (आत्ताच्या पिढीसाठी सचिन तेंडुलकर याचे वडील) यांचीही स्वाक्षरी संग्रहात आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्यानमाला काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत स. वा. जोशी विद्यालयाच्या पटांगणावर झाली होती. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांची स्वाक्षरी घेतल्याचे आठवते.
स्वाक्षरी घेताना काही मान्यवरांनी त्या खाली तारीख टाकलेली आहे. पण ज्यांनी ती टाकली नाही त्या स्वाक्षरीच्या खाली ती सही केव्हा घेतली त्याची तारीख किमान मी तरी टाकायला हवी होती, असे आता वाटते.
स्वाक्षरी घेण्याच्या निमित्ताने का होईना पण ती एक-दोन मिनिटे या मान्यवरांशी थेट बोलता व भेटता आले हा आनंद व समाधान खूप मोठे आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा