मराठीत दिवाळी अंकाची एक परंपरा आहे. दरवर्षी मराठीत कथा, कविता, कादंबरी, व्यंगचित्रे, लेख आदी साहित्य असलेले किंवा पाककला, ज्योतिष, आध्यात्मिक, पर्यटन अशा विशिष्ट विषयांना वाहिलेले दिवाळी अंक प्रकाशित होत असतात. गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ ही परंपरा सुरु आहे. मराठीत ज्या प्रकारे दरवर्षी दिवाळी इतक्या मोठ्या प्रमाणात (साडेतीनशे ते चारशे) अंक निघतात तसे अन्य कोणत्याही भारतीय भाषेत निघत नाहीत.
दिवाळी अंकाच्या परंपरेप्रमाणेच चैत्र महिन्यात वासंतिक अंकाची परंपरा सुरु व्हावी या उद्देशाने प्रा. नरेंद्र पाठक यांनी 'चैत्रेय वासंतिक' ची सुरुवात केली. गेली १४ वर्षे नियमितपणे चैत्र महिन्यात 'चैत्रेय' प्रकाशित होत असून यंदाच्या वर्षी १५ वा अंक नुकताच प्रकाशित झाला. प्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरु असल्याने त्यांना अभिवादन करण्यासाठी यंदाच्या चैत्रेयच्या मुखपृष्ठावर दलाल यांनी रेखाटलेले छायाचित्र देण्यात आले आहे. या चित्राच्या संदर्भात चित्रकार विजयराज बोधनकर यांचा विशेष लेखही अंकात आहे.
कथा, मुलाखत, लेख, कविता यासह खास बालविभागही अंकात देण्यात आला आहे. ज्येष्ठ संगीतकार पं. यशवंत देव यांची प्रा. नरेंद्र पाठक यांनी घेतलेली खास मुलाखत अंकात आहे. मॉं रेवा तेरा पानी निर्मल (अश्विन पुंडलिक),नाटक, सिनेमा आणि देश (सुधीर जोगळेकर), टोकिओची सडक सुरक्षा संस्कृती (नि.श. गुळवणी), गुलमोहराचा जळलेला बुंधा (सतीश सोळांकूरकर), बाया कर्वे आणि तिचा संसार (अशोक बेंडखळे), गीत आणि गझलचा बादशाह संगीतकार मदनमोहन (शरद सोनवणे) व अन्य लेख यात आहेत.
दहा कथा, वीस कविता यासह अंकात विशेष बालविभाग देण्यात आला आहे. नव्या पिढीवर वाचनाचा संस्कार व्हावा, त्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी 'चैत्रेय'च्या अंकात काही पाने बालवाचकांसाठी राखून ठेवली जातात. या विभागात गोष्टी, कविता, गाणी, नाट्यछटा, काव्यकोडी असा विविधांगी मजकूर आहे. एकनाथ आव्हाड यांनी या बालविभागाचे संपादन केले आहे.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी 'चैत्रेय'चे खास समारंभात प्रकाशन करण्याची पद्धत प्रा. पाठक यांनी सुरु केली आहे. पहिल्या अंकाचे प्रकाशन ठाणे व अंमळनेर येथे २००२ मध्ये झाले होते. आत्तापर्यंत दादर, रत्नागिरी, विलेपार्ले, मुलुंड, गेट वे ऑफ इंडिया येथे भर समुद्रात बोटीवर, नाशिक, वाशी, कल्याण, औरंगाबाद, इंदूर येथे अंकाचे प्रकाशन झाले आहे. यंदाच्या अंकाचे प्रकाशन बडोदे येथे झाले.
'चैत्रेय'च्या रुपाने वासंतिक अंक सुरु करण्याची परंपरा अंकाचे संपादक आणि प्रकाशक प्रा. पाठक यांनी सुरु केली असून हा प्रयोग वाचकांच्याही पसंतीस उतरला आहे.
प्रा. नरेंद्र पाठक यांचा संपर्क
०२२-२५४१६९११/९८६९६८४०८६/९१६७४०६०५०
ई-मेल आयडी chaitreya@yahoo.com
@शेखर जोशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा