मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

उचलली जीभ आणि लावली टाळ्याला


मराठीत 'उचलली जीभ आणि लावली टाळ्याला' अशी म्हण आहे. सध्या काही राजकीय नेत्यांनी हा प्रकार सुरु केला असून सभा, संमेलने, जाहीर कार्यक्रमातून राजकीय नेत्यांची जीभ घसरत चालली आहे. हातात माईक आणि समोर श्रोता मिळाला की काय बोलावे, कसे बोलावे याचे भान व ताळतंत्र सुटत चाललेले पाहायला मिळत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन. दारु विक्री वाढवायची असेल तर दारुला महिलांचे नाव द्या. कारखान्यात तयार केलेल्या दारुला 'महाराजा' ऐवजी 'महाराणी' असे नाव ठेवा त्याची विक्री वाढेल असा सल्ला महाजन यांनी सातपुडा साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाला दिला. महाजन यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध झाल्यानंतर त्यांना उपरती झाली आणि त्यांनी जाहीर माफी मागितली. पण मुळात जाहीरपणे असे बोलायची खुमखुमी महाजन यांना का आली हा प्रश्नच आहे.

जाहीर कार्यक्रमातून बोलताना जीभ घसरणारे महाजन हे काही पहिलेच राजकीय नेते किंवा मंत्री नाहीत. याही अगोदर अजित पवार, आर. आर. पाटील, गिरीश बापट, रावसाहेब दानवे आदी राजकीय नेत्यांची जीभ घसरली होती. महाराष्ट्रात ऐन दुष्काळी परिस्थीती असताना धरणात पाणी नाही तर मी काय xx का?, असा सवाल जाहीरपणे विचारुन अजित पवार यांनी खालची पातळी गाठली होती. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेव्हाचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी 'बडे बडे शहरोंमे ऐसे छोटे छोटे हादसे होते है असे विधान करुन गदारोळ उडविला होता. 'भाजप'चे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी 'साले'हा शब्द उच्चारला आणि स्वतला व पक्षालाही अडचणीत आणले होते. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनीही 'तसल्या'व्हिडिओ क्लिपा आम्ही पण पाहतो, आम्ही पिकलेलं पान असलो तरी आमचे हिरवे देठ आहेत असे वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला होता. भाजप समर्थक आमदार प्रशांत परिचारक यांचीही जीभ अशीच घसरली. राजकारण कसे असते हे उपस्थीतांना समजून सांगताना परिचारकांनी सैनिकांविषयी संतापजनक वक्तव्य केले. ‘सीमेवरील जवान वर्ष भर घरी येत नाही. तरीदेखील घरी आल्यावर त्याला मुलगा झाल्याचे समजते आणि तो गावात मुलगा झाल्याच्या आनंदात पेढेही वाटतो’, असे परिचारक बोलले होते. केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात पत्रकार आणि नागरिकांना उद्देशून‘तुमच्या नशिबी लक्ष्मीदर्शनाचा योग आहे. येणाऱ्या लक्ष्मीला नाकारू नका’, असे वक्तव्य केले होते. निवडणुक आयोगनेही गडकरी यांच्या या विधानाची दखल घेऊन ताशेरे ओढले होते.लोकसभा निवडणुकीच्या वेळी साताऱ्यातील सभेत बोलताना ‘बोटाची शाई पुसून पुन्हा मतदान करा’ हे त्यांचे विधान भलतेच गाजले. त्यांच्या या विधानाची निवडणुक आयोगानेही दखल घेतली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही मराठी साहित्यिकांची ‘बैल’ या शब्दांत संभावना करून तसेच ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व’ पु. ल. देशपांडे यांना दिलेल्या ‘महाराष्ट भूषण’ पुरस्कारावरून ‘झक मारली आणि पुलंना हा पुरस्कार दिला’, 'मोडका पूल' अशी विधाने केली होती.

खरे तर सार्वजनिक जीवनात वावरताना मोठ्या पदावर किंवा समाजात ज्याला मान व प्रतिष्ठा आहे अशा कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीने आचार-विचार आणि कृतीचे काही किमान संकेत पाळणे अत्यंत गरजेचे आहे. कारण ही सर्व मंडळी ज्या पदावर काम करत आहेत, त्यांना अशा प्रकारची बेजबाबदार आणि जीभ घसरणारी वक्तव्ये करणे न शोभणारे आहे. आजही आपल्या समाजात अशा प्रकारचे बोलणे हे असंस्कृत आणि निषेधार्ह मानने जाते आणि त्यात काहीही चूक नाही. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिला असला तरी त्याचा अर्थ उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असा होत नाही, याचे भान राजकीय नेत्यांनी ठेवण्याची गरज आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काहीही कृती करून, काहीही बोलून, आपल्या जीभेचा पट्टा वाट्टेल तसा सैल सोडून इतरांना दुखावणे नव्हे. आपण बोलतो किंवा वागतो त्याचा काय परिणाम होईल याचा विचार प्रत्येक राजकीय नेत्याने केला पाहिजे. अशी विधाने करताना त्याचा इतरांवर, समाजावर काय परिणाम होईल याचे भान ठेवले पाहिजे. जीभ घसरणार नाही याची त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य एखाद्या राजकीय नेत्याने केले तर तो माफी मागून मोकळा होतो आणि सुटतो. काही दिवसांनी लोकही तो काय बोलला होता ते विसरुन जातात. या मंडळींच्या विरोधात पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व कोणतीही कारवाई करत नाही त्यामुळे राजकीय मंडळीही पुन्हा आपल्याला हवे ते बोलायला मोकळी होतात. असे वक्तव्य पुन्हा होणार नाही याची जरब बसण्यासाठी त्यांना काहीतरी शिक्षा झाली पाहिजे, तरच असे प्रकार थांबतील. राजकीय पक्ष त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करणा नसेल तर त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे, न्यायालयात याचिका दाखल करणे किंवा निवडणुकीत मत मागायला आले की त्यांच्या वक्तव्याची आठवण करुन देऊन त्यांना मतदान न करणे अशी पावले उचलून त्यांना धडा शिकविला पाहिजे.

असे जो पर्यंत होत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांची जीभ अशीच वळवळत राहणार, घसरणार आणि उचलली जीभ व लावली टाळ्याला असेच घडत राहणार...

-शेखर जोशी

सोमवार, १७ जुलै, २०१७

समर्थ रामदास स्वामींचे बोल


आज अमरनाथ यात्रा नरसंहाराच्या पार्श्वभूवीवरती ,,,, रामदास स्वामी आठवतात

अध्यात्माच्या पोकळ आणि वांझोट्या गप्पा न मारता ज्यांनी हिन्दु समाजास बलोपासनेची शिकवण दिली आणि क्षात्रतेज जागृत ठेवले त्या समर्थ रामदास स्वामींना साष्टांग प्रणाम.

जयासी वाटे जीवाचे भय।

तेणे क्षात्रधर्म करो नये।

काहीतरी करोनी उपाये।

पोट भरावे।।

मराठा तितुका मेळवावा।


महाराष्ट्र धर्म वाढवावा।

सगट स्वकीयांचा जिव्हाळा।

सोडु नये।।

धर्मासाठी झुंजावे।

झुंजोनी अवघ्यासी मारावें।

मारितां मारितां घ्यावें।

राज्य आपुलें।।

आधी गाजवावे तडाखे।

तरिच भूमंडळ धाके।

हे न करिता धक्के।

राज्यास होती।।

धटासी आणावा धट।

उद्धटासी उद्धट।

खटनटासी खटनट।

सामर्थ्य करीं।।

देशद्रोही तितुके कुत्ते।

मारोनि घालावे परते।

देवदास पावती फत्ते।

यदर्थी संशयो नाही।।

आहे तितुके जतन करावें।

पुढे आणिक मेळवावें।

महाराष्ट्र राज्य करावें।

जिकडे तिकडे।।

~समर्थ रामदास स्वामी

असा रांगडा आणि क्षात्रवृत्ती उत्तेजित करणारा उपदेश करणारा संत क्वचितच कोणत्याही प्रांतात जन्मला असेल. राष्ट्रभक्ती आणि धर्मभक्ती हेच खरे अध्यात्म असा उपदेश करणारे समर्थ रामदास लवकरात लवकर उभ्या हिन्दुस्थानास समजणे अत्यंत आवश्यक आहे. रामदास स्वामींच्या उपदेशाप्रमाणे स्वत्व आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा, हिंमत आणि ताकत सर्व भारतीयांना लाभो हीच प्रार्थना.

।।जय जय रघुवीर समर्थ।।

महाराष्ट्राची 'राज'धारा


http://epaper.loksatta.com/c/20620076 महाराष्ट्राची 'राज'धारा लोकसत्ता-मुख्य अंक ३० एप्रिल २०१७

लावणी सम्राज्ञी


पुनर्भेट

सुलोचना चव्हाण

संगीतकार वसंत पवार एक दिवस अचानक त्यांच्या घरी आले आणि चित्रपटासाठीची एक लावणी मला तुमच्याकडूनच गाऊन घ्यायची आहे, असे त्यांनी सांगितले. लावणी आणि तीही आपण गायची या कल्पनेने त्या क्षणभर गांगरल्या. लावणी गाऊ शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. पण वसंत पवार यांनी आपला हट्ट सोडला नाही. अखेर त्या ती लावणी गायला तयार झाल्या. ती लावणी होती ‘नाव गाव कशाला पुसता मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हनत्यात लवंगी मिरची’. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली ती लावणी ‘रंगल्या रात्री अशा’ चित्रपटातील होती. या लावणीने ज्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आणि आचार्य अत्रे यांनी ज्यांना ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब दिला त्या ज्येष्ठ पाश्र्वगायिका सुलोचना चव्हाण आजच्या ‘पुनर्भेट’च्या मानकरी आहेत. ‘सेलिब्रेटी’पणाचा कोणताही तोरा नसलेल्या सुलोचानाबाई यांना घरात आणि परिचितांमध्ये ‘माई’ या नावाने संबोधले जाते. त्यांच्याकडे पाहिले तर या व्यक्तिमत्त्वाने लावणीचा तो ठसका, खटय़ाळपणा, शृंगार गाण्यातून पुरेपूर पोहोचवला यावर विश्वासच बसत नाही. प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर असतानाही त्या जशा साध्या होत्या तशा त्या आजही आहेत. कपाळावर मोठे कुंकू आणि अंगभर लपेटून घेतलेला पदर हे त्यांचे रूप आजही तसेच आहे.

‘नाव गाव कशाला पुसता..’ या लावणीचा किस्सा अधिक विस्ताराने सांगताना त्या म्हणाल्या, माझे पती शामराव चव्हाण हे मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक-कॅमेरामन म्हणून काम करत होते. त्यांचा आणि वसंत पवार यांचा परिचय होता. मी पाश्र्वगायन करते हे पवार यांना ठाऊक होतेच. पण तेव्हा मी हिंदीत जास्त गात होते. मराठीत नुकतीच सुरुवात केली होती. पवार घरी आले आणि चव्हाणांना (मी आशा भोसले यांच्या सांगण्यावरून शामरावांना ‘अहो’च्या ऐवजी चव्हाण अशी हाक मारू लागले.) म्हणाले, ‘नाव गाव कशाला पुसता’ ही लावणी मला सुलोचनाबाईंकडूनच गाऊन घ्यायची आहे. चव्हाणांना मी खुणेने नाही नाही असे म्हणत होते. चव्हाण यांनी मला थांब अशी खूण केली. पवार यांनी ही लावणी गाऊन घेणार तर तुमच्याकडूनच असा प्रेमळ हट्ट धरला. चव्हाण यांनीही तू लावणी गाऊ शकशील असे प्रोत्साहन दिले.

पवार यांनी खिशातून लावणी लिहिलेला कागद काढला आणि त्यांनी केलेल्या संवादिनीच्या साथीवर लावणी गायले. त्यांना ती आवडली. पुढे लावणीचे ध्वनिमुद्रण झाले आणि त्या एका लावणीने माझे आयुष्य बदलून गेले. पुढे लावणी गायिका म्हणून प्रसिद्ध झाले, त्याचा पाया ‘नाव गाव कशाला’ने घातला होता. आठवणींचा पट उलगडताना त्यांनी सांगितले, मी मूळची गिरगावचीच. माहेरची सुलोचना कदम. गिरगावातील फणसवाडी येथील चाळीतच लहानाची मोठी झाले. माझा मोठा भाऊ दीनानाथ कदम याने मेळा काढला होता. त्या मेळ्यात अभिनेत्री संध्या, त्यांची बहीण वत्सला देशमुख काम करायच्या. माझी मोठी बहीण शकुंतलाही त्यात असायची. घरचाच मेळा असल्याने मीही त्यात लहानसहान कामं करायची. आमच्या घरचे वातावरण बाळबोध. एकदा भावाने वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायलेल्या ‘सांभाळ गं दौलत लाखाची तुझ्या ज्वानीची..’ ही ध्वनिमुद्रिका घरी आणली. ग्रामोफोनवर ती लावली. मला ते गाणे आवडले. ते मी सतत म्हणू लागले. आमच्या आईला काही ते आवडले नाही. लावणी किंवा असली गाणी घरात आणि तीही मुलीने म्हणायची, असा तो काळ नव्हता. ही अशी गाणी घरात लावतात का, म्हणून ती ओरडायची. प्रसंगी मला तिच्या हातचा मारही खावा लागला. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कारण पुढे लावणी गायिका म्हणूनच मी प्रसिद्ध झाले.

मेळ्यात काम करत असताना काही भजने व गाणी गायचे. आमच्या मेळ्यातील रंगभूषाकार दांडेकर एके दिवशी मला संगीत दिग्दर्शक श्यामबाबू पाठक यांच्याकडे घेऊन गेले. माझा आवाज त्यांनी ऐकला आणि ‘कृष्ण सुदामा’ या हिंदी चित्रपटातील गाणे गायची संधी मला मिळाली. पाश्र्वगायन केलेले ते माझे पहिले गाणे. गाण्याचे ध्वनिमुद्रण फ्रॉकमध्ये केले होते. तेव्हा मी जेमतेम आठ ते दहा वर्षांची होते. पुढे काही वर्षांनी मा. भगवान यांच्या चित्रपटांसाठी मी पाश्र्वगायन केले. सी. रामचंद्र, मन्ना डे, मोहंमद रफी, मुकेश, जोहराबाई, आमीरबाई, शमशाद बेगम आणि त्या काळातील सर्व मान्यवर गायक-गायिकांबरोबर द्वंद्वगीते, तसेच माझी स्वत:ची वैयक्तिक गाणीही त्या वेळी ध्वनिमुद्रित झाली. ‘चोरी चोरी’, ‘जो बिगड गयी वो किस्मत हू’, ‘नजर से नजर लड गई’, ‘जिगर में छुरी गड गई’ ‘हाए राम’या , ‘आँखो से मिली आँखे’, ‘आरमानोंकी दुनिया मे एक’, ‘रात अंधेरी मत कर देरी तु मेरा मै तेरी’, ‘अब तू ही बता तेरा दिल किसको पुकारे’, ही आणि अशी अनेक हिंदी गाणी मी गायले असून त्यांची संख्या सुमारे अडीचशे इतकी आहे. ही सर्व गाणी त्या काळात खूप लोकप्रिय झाली. मी गायलेली ही हिंदी गाणी माझ्या वाढदिवसाच्या (१३ मार्च) दिवशी ‘रेडिओ सिलोन’वरून दरवर्षी सकाळी दीड ते दोन तास वाजवली जातात. ती ऐकून रसिक श्रोते व चाहत्यांकडून आजही प्रतिसाद मिळतो, आपल्यासाठी ती आनंदाची गोष्ट असल्याचेही सुलोचनाबाई यांनी सांगितले. लावणी गायनाने मला प्रसिद्धी व यश मिळवून दिले. मला मोठे केले. लावणी गायनाला मी प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून दिली. स्वत:चा आब, मर्यादा राखूनच मी लावणी गायनाचे अक्षरश: हजारो कार्यक्रम केले. महाराष्ट्रातील असे कोणतेही छोटे-मोठे शहर, गाव, तालुका किंवा खेडे नसेल की जेथे मी कार्यक्रम केला नाही. आणि खरे सांगू का, कोणत्याही प्रकारचे संगीत असो ते कधीही कमी दर्जाचे नसते. प्रत्येक संगीत प्रकाराची स्वत:ची स्वतंत्र ओळख आणि वैशिष्टय़ आहे, हे विसरता कामा नये. हल्लीचे लावणी सादरीकरण, गायन याविषयी आपले मत स्पष्टपणे मांडताना त्या म्हणाल्या, आज लावणी सादर करण्यापेक्षा त्याचे प्रदर्शन अधिक प्रमाणात केले जाते. श्रोते किंवा प्रेक्षकांपर्यंत लावणी पोहोचवण्यासाठी तोकडे कपडे, अश्लील हावभाव, भडक रंगभूषा, अंगप्रदर्शन याची काहीही गरज नसते. ‘शिवाजी मंदिर नाटय़गृहा’चे उद्घाटन माझ्या लावणी गायन कार्यक्रमाने झाले. तसेच ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनप्रसंगीही माझ्या गाण्याचा कार्यक्रम झाला असल्याची आठवण त्यांनी सांगितली.

गायन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना विविध सन्मान पुरस्कार मिळाले. राज्य शासनाच्या लता मंगेशकर पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले. पण केंद्र शासनाच्या पद्मश्री, पद्म पुरस्कारासाठी अद्याप त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. या दिग्गज पाश्र्वगायिकेला स्वत:चे हक्काचे घर नाही. आजही त्या गिरगावात एका चाळीत छोटय़ा घरात भाडय़ाच्या जागेत राहात आहेत. मोठी सून प्रफुल्ल, (मोठा मुलगा जय आता या जगात नाही) व त्यांची मुलगी आरती, धाकटा मुलगा विजय, त्यांची पत्नी कविता आणि त्यांचा मुलगा अजय असा त्यांचा परिवार. विजय हे प्रसिद्ध ढोलकी वादक असून अन्यही लोकतालवाद्ये ते वाजवितात. मराठी, हिंदूीसह काही भारतीय प्रादेशिक भाषांमधील मान्यवर संगीतकारांकडे ते संगीतसाथ करतात. लौकिक अर्थाने केवळ चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या आणि गाण्यातील कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतलेल्या सुलोचनाबाई यांनी अथक परिश्रम, सतत शिकण्याची वृत्ती यामुळे गाण्याच्या क्षेत्रात विशेषत: लावणी गायनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.

आचार्य अत्रे यांच्या ‘हीच माझी लक्ष्मी’ चित्रपटात संगीतकार वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली ‘मुंबईच्या कॉलेजात गेले पती, आले होऊनशान बी.ए. बी.टी.’ ही लावणी त्यांनी गायली. पुढे ‘कलगीतुरा’ चित्रपटासाठी काही लावण्या त्या गायल्या. लावणी गायनाने त्यांना प्रसिद्धी मिळाल्यानंतर पुढे अनेक तमाशाप्रधान चित्रपटांतील लावण्या त्यांनी आपल्या दमदार आणि खडय़ा आवाजाने लोकप्रिय केल्या. लावणी आणि सुलोचना चव्हाण असे एक अतूट नाते तयार झाले. ‘औंदा लगीन करायचं’, ‘कसं काय पाटील बरं हाय का’, ‘कळीदार कपुरी पान’, ‘खेळतांना रंग बाई होळीचा’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘फड सांभाळ गं तुऱ्याला आला’, ‘मी बया पडले भिडची, ग बाई भिडची’, ‘सोळावं वरिस धोक्याचं’ या आणि इतरही अनेक लावण्या आजही लोकप्रिय आहेत. त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. विविध पुरस्कार वितरण सोहळ्यांत या लावण्यांवर नृत्य सादरीकरण केले जाते ते मूळ गाणे सुलोचना यांच्याच आवाजातील असते.

शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता-रविवार वृत्तान्त, ३० एप्रिल २०१७

जीएसटी कारणे संभ्रमाचा अंक


जीएसटीकारणे संभ्रमाचा अंक..

शेखर जोशी

जीएसटी’ लागू झाला असल्याने २५० रुपयांवरील तिकीटांसाठी निर्मात्यांना १८ टक्के कर भरावा लागणार आहे. वस्तू-सेवा कराला अर्थात ‘जीएसटी’ला नाटय़वर्तुळातून विरोध झाला. त्यापुढे नाटकांच्या तिकिटांवर २५० रुपयांची असलेली मर्यादा ५०० रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी नाटय़ निर्मात्यांनी नुकतीच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली. ही मागणी मान्य होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत ‘जीएसटी’ भरावा लागू नये म्हणून नाटय़व्यावसायिकांनी काही नवनव्या शक्कल लढवायला सुरुवात केली आहे. अर्थात, या युक्त्या व्यवहार्य किती हा भाग वेगळा, पण या ‘जीएसटी’ कारभारामुळे नाटय़निर्मात्यांमध्ये आपापसातही सावळ्यागोंधळाचा अंक सुरू झाला आहे.

जीएसटी' कारणे संभ्रमाचा अंक... लोकसत्ता-रविवार वृत्तान्त १६ जुलै २०१७ http://epaper.loksatta.com/c/20591400 पान-१ http://epaper.loksatta.com/c/20591443 पान-६

अगदी आत्ता-आत्तापर्यंत नाटकाचे दर सरसकट ३०० ते ३५० रुपयांपासून सुरू व्हायचे. मात्र, आता ‘जीएसटी’ लागू झाला असल्याने २५० रुपयांवरील तिकीटांसाठी निर्मात्यांना १८ टक्के कर भरावा लागणार आहे. त्यामुळे हा कर भरावा लागू नये यासाठी आता बहुतांश नाटय़निर्मात्यांनी नाटकांच्या तिकिटांचे दर २५० रुपयांपासून सुरू केले आहेत. नाटकांच्या तिकिटांचे दर आम्ही कमी केले आहेत असे ते सांगत असले तरी ‘जीएसटी’तून वाचण्यासाठीच त्यांनी ही पळवाट काढली हे वास्तव आहे. तर काही जण तीनशे ते पाचशे रुपये तिकीट दर लावून नाटकाचे प्रयोग करत आहेत. मात्र ही सगळीच मंडळी ‘जीएसटी’चे सर्व कायदे, नियम पाळत आहेत का?, याबद्दलबही शंका घ्यावी अशी परिस्थिती आहे. पाऊस आणि अन्य कारणांमुळे आधीच नाटय़ व्यवसायाची गाडी खडखड करत चालली आहे. त्यात १८ टक्केजीएसटी लागू झाल्याने नाटय़निर्मात्यांचे कंबरडेच मोडले आहे. त्यामुळे एकीकडे नाईलाज म्हणून अडीचशे रुपये तिकीटविक्री करणारे नाटय़निर्माते तर दुसरीकडे हा व्यवसाय असल्याने त्यातील बदलत जाणारी आर्थिक गणिते सांभाळायलाच लागणार असे म्हणत तीनशे-पाचशे रुपये तिकीट लावणारे नाटय़निर्माते असे दोन गट नाटय़निर्मात्यांमध्ये तयार झाले आहेत.

मुळात काही नाटकांचे अपवाद वगळता मराठी नाटकांचे ‘हाऊसफुल्ल’ बुकिंग होत नाही. नाटकाचे ३०० ते ३५० रुपयांपासून सुरू होणारे तिकीटही सर्वसामान्य मराठी प्रेक्षकांना महाग वाटते. त्यामुळे पाचशे रुपये तिकीट झाले तर जो आहे तो प्रेक्षकवर्ग नाटकांकडे पाठ फिरविण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘जीएसटी’नंतर नाटय़व्यावसायिक आणि निर्मात्यांमध्ये एकूण संभ्रमाचे व गोंधळाचे वातावरण आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काही शक्कल लढवीत आहेत.

वस्तू आणि सेवा कर ‘मनोरंजन’ क्षेत्राला लागू होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर या क्षेत्रातही खळबळ उडाली. मराठी नाटय़ निर्मात्यांनी या कराला विरोध केला. २५० रुपयांपर्यंतच्या तिकिटांना ‘जीएसटी’ लागू नाही. मात्र २५० रुपयांमध्ये नाटक चालविणे शक्य नाही, अशी भूमिका घेत नाटय़निर्माते-व्यावसायिकांनी ही मर्यादा ५०० रुपयांपर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे. अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी ही मागणी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यापर्यंत पोहोचवू असे आश्वासन मराठी नाटय़निर्मात्यांना दिले आहे. ती मागणी पूर्ण होईल की नाही ते आत्ताच सांगता येणार नाही. पण समजा नाटय़निर्मात्यांची ही मागणी मान्य झाली तर ५०० रुपयांचे तिकीट काढून प्रेक्षक नाटकाकडे येईल का? की आहे त्या प्रेक्षकांमध्येही घट होईल?, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

नाटय़निर्माते शेखर ताम्हाणे म्हणाले, हल्ली बहुतांश नाटके दोन अंकी असतात. पहिल्या आणि दुसऱ्या अंकाला प्रत्येकी २५० रुपये असा दर लावून तिकिटांची विक्री करायची. आमचे नवे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार असून त्या नाटकासाठी हा प्रयोग करण्याचा विचार आहे. ज्या प्रेक्षकांना संपूर्ण नाटक पाहायचे आहे ते प्रेक्षक दोन्ही अंकांची तिकिटे किंवा ज्यांना फक्त एकच अंक पाहायचा आहे ते प्रेक्षक त्यांना जो अंक पाहायचा आहे, त्या अंकाची तिकिटे घेतील. यासाठी नाटकाच्या तिकिटावर भाग १ व भाग २ असे लिहून तिकिटांची विक्री करण्याचा विचार असून या विषयातील तज्ज्ञ आणि कायदेशीर सल्ला घेऊनच हा नवा प्रयोग करणार आहोत. हिंदी किंवा गुजराथी नाटकांपेक्षा आपल्या मराठी नाटकांचे तिकिट दर कमीच आहेत. दोन अंकांना अशी वेगवेगळी तिकिटे करण्याच्या प्रयोगाला प्रेक्षकांकडून कसा आणि किती प्रतिसाद मिळेल, हा प्रयोग यशस्वी होईल की नाही, त्याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. कारण शेवटी तो ‘प्रयोग’ आहे.

व्यावसायिक नाटय़ निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना याविषयी विचारले असता त्यांनी दोन अंकांसाठी स्वतंत्र तिकिटे विकण्याचा प्रकारच मुळात अव्यहार्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर मुळातच बहुतांश नाटय़ निर्मात्यांनी नाटकाचा तिकीट दर २५० रुपये व त्याखाली असा केला आहे. त्यामुळे सध्या जो काही तोटा होत आहे तो निर्माते सहन करत आहेत. २५० रुपये असलेली मर्यादा ५०० रुपयांपर्यंत करावी ही आमची मागणी मान्य झाली तर त्यात सर्वाचेच हित आहे. त्याचा निर्णय येत्या २ ते ३ महिन्यांत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडी वाट पाहावी. ज्या कोणाला २५० रुपयांच्या वरती तिकीट दर ठेवायचे असतील त्यांनी ते खुशाल ठेवावेत. मात्र त्यासाठी ‘जीएसटी’चे जे काही नियम आणि कायदे आहेत त्याचे त्यांनी पालन करावे. नाटय़गृहातही पहिला आणि दुसरा अंक असे सत्र नसते. असे दोन-दोन तासांचे सत्र कोणतेही नाटय़गृह देत नाही ते सलग चार तासांचे दिले जाते. त्यामुळे मला तरी ते व्यवहार्य वाटत नाही, असे त्यांनी सांगितले.

‘३०० रुपयांपर्यंतच्या तिकिटावर ‘जीएसटी’ लावू नये. त्याच्यावर जो कोणी तिकीट दर लावेल त्यावर ‘जीएसटी’ लावायचा की नाही त्यावर सरकारने विचार करावा. ३०० रुपयांपर्यंत ‘जीएसटी’ लावला नाही तर सध्या जो काही बरा-वाईट नाटय़ व्यवसाय सुरू आहे तो किमान स्थिर राहील’, असे मत माजी ज्येष्ठ नाटय़ व्यवस्थापक आणि नाटय़कर्मी अशोक मुळ्ये यांनी व्यक्त केले. दोन अंकांसाठी स्वतंत्र तिकिटांची विक्री करण्याला काहीही अर्थ नाही. नाटकाला येणारे प्रेक्षकही त्याला तयार होतील का? हा प्रश्न आहे. त्यामुळे असे करणे म्हटले तर मोठ्ठा विनोद आणि म्हटले तर स्तुत्य, असे सांगत ३०० रुपयांपर्यंतच्या तिकिटावर जीएसटी नको यावर त्यांनी जोर दिला. एकंदरीत ‘जीएसटी’वरून हा गोंधळ आणि संभ्रम आणखीही काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. सध्या मराठी रंगभूमीवर काही नाटकांचा अपवाद वगळता अन्य नाटकांना ‘बुकिंग’ मिळत नाही. आणि जे चांगले नाटक आहे ते चालते असे चित्र आहे. त्यामुळे हा गोंधळ निस्तरेपर्यंत एकतर आहे त्या तिकीटदरांमध्ये नाटक चालवावी लागतील किंवा वाढीव दरांमध्ये तिकीट विकत घेऊन नाटक पाहणे प्रेक्षक आणि निर्माते दोघांच्याही अंगवळणी पडेल.

एक अंकाचे तिकीट..

‘जीएसटी’च्या जाचातून सुटका करून घेण्यासाठी काही तिसरा मार्ग निघतोय का याचाही आपापल्या परीने शोध घेणारे निर्माते आहेत. ज्यांच्यात नाटय़निर्माते शेखर ताम्हाणे यांचे नाव घ्यावे लागेल. शेखर ताम्हाणे यांनी नुकतीच ‘सामाजिक माध्यमा’वर एक पोस्ट टाकली. नाटकाला २५० रुपयांपर्यंतच्या तिकिटाला ‘जीएसटी’ लागणार नाही. त्यातून मी मार्ग काढला आहे. पहिल्या अंकाला २५० रुपये आणि दुसऱ्या अंकाला २५० रुपये अशी दोन वेगवेगळी तिकिटे विकायची. दुसऱ्या अंकाचे तिकीट पहिल्या अंकाच्या सुरुवातीला आगाऊ देण्यात येईल’, असे ताम्हाणे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. म्हणजे ज्यांना फक्त एकच अंक पहायचा आहे किंवा २५० रुपयांपर्यंतचेच तिकीट घ्यायचे आहे त्यांना पहिला किंवा दुसरा अंक पाहता येईल, अशी सोय उपलब्ध करण्याचा त्यांचा विचार आहे. प्रत्यक्षात हे व्यवहार्य आहे का हा प्रश्न आहे? २५० रुपये मोजून फक्त एक अंक बघण्यासाठी प्रेक्षक का तयार होईल?, असे प्रश्न या पर्यायासमोर उभे असल्याने त्यात तथ्य नाही हाच निष्कर्ष काढला जातो आहे.

शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता-रविवार वृत्तान्त/१६ जुलै २०१७)

शनिवार, २४ जून, २०१७

'वार'करी पवार


'वार'करी पवार

(शेखर जोशी)

राज्यात आणि केंद्रात नसलेली सत्ता, 'मराठा कार्ड'चे कमी झालेले महत्व, आधी पंतप्रधान व आता राष्ट्रपतीपद मिळवायची हुकलेली संधी, स्वतच्या राष्ट्रवादी पक्षाची (जी काही शिल्लक होती ती) घसरत आणि संपत चाललेली विश्वासार्हता, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कमी संख्येत निवडून आलेले पक्षाचे उमेदवार, मराठा मोर्चा, शेतकरी संपातील संपलेली हवा, त्याचा पक्षाला न झालेला फायदा, आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पक्ष अस्तित्वात तरी राहील की नाही याची भेडसाविणारी चिंता या सगळ्यामुळे शरद पवार अस्वस्थ झाले आहेत. त्यातून शरद पवार असे 'वार' अधूनमधून करत असतात. अफजल खान, गो ब्राह्मण प्रतिपालक या विषयांवर त्यांनी नुकतेच केलेले विधान त्याचेच द्योतक आहे.

शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या नावाचा जप ते सतत करत असतात. सामाजिक समता व बंधुभावाचा आव आणून बहुजन व दलित समाजासाठी आपण काहीतरी करतोय असे ढोलही पवार आणि त्यांचे समर्थक नेहमी बडवतात. पण तो केवळ मुखवटा आहे. कारण पवार यांनी आजपर्यंत केवळ मराठा राजकारण व सत्ताकारणच केले आहे. राज्यात मुख्यमंत्रीपद, केंद्रात कृषीमंत्रीपद आणि केंद्रात व राज्यात सत्तेवर असताना यांना ना शेतकऱयांचे प्रश्न सोडविता आले ना त्यांच्या आत्महत्या थांबविता आल्या. आणि तरी हे म्हणे शेतकऱयांचे कैवारी.

इशरत जहाँ सारखी निष्पाप बिचारी मुलगी अतिरेकी झाली, मालेगाव स्फोटाप्रकरणी तीन वर्ष तुरूंगात खितपत पडणाऱ्यांना मुलांना हा देश आपला का वाटावा?,'या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी कोणी इतर कृत्य केलं तर त्याला दोषी का ठरवावं?, अल्पसंख्याक समाजाचा व्यक्ती ‘जुम्मा’च्या दिवशी मशिदीत कधी हल्ला करेल, हे शक्य नाही. मी अजूनपर्यंत हे पाहिले नाही, अशी वादग्रस्ते विधानेही पवार यांचीच.

निवडणुकीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशाचा उल्लेख करत भटा-ब्राह्मणांच्या हाती सत्ता देणार का, अशी विचारणा शरद पवार यांनी केली होती, संभाजीराजे छत्रपती यांची राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर निवड करण्यात आल्यानंतर पवार यांनी, छत्रपतींनी पेशव्यांची नियुक्‍ती केली हा इतिहास सर्वज्ञात आहे. पेशवाईत फडणवीसांनी छत्रपतींची नियुक्‍ती कधीच केली नव्हती; मात्र संभाजीराजे छत्रपती यांच्या रुपाने प्रथमच पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्‍ती केल्याची घटना घडली आहे, अशा शब्दांत टीका केली होती. ब्राह्मण द्वेष करत असताना शिवाजी महाराज यांना फितुर असलेल्या, स्वराज्याशी बेईमानी करणारया मराठा सरदारांबद्दल ते एक अवाक्षर काढत नाहीत. त्याबाबत मात्र अळी मिळी गुप चिळी!

समाजात जाणीवपूर्वक कलागती लावण्याच्या उद्देशातून ते नेहमीच वादग्रस्त विधाने आणि असे 'वार' करत असतात.

हे 'वार'करी

कसले राष्ट्रवादी

हे तर राष्ट्रघातकी!

-शेखर जोशी

रविवार, २ एप्रिल, २०१७

मत्स्यगंधा


मत्स्यगंधा

मुंबई मराठी साहित्य संघाच्या ‘भाऊबंदकी’ या नाटकात त्यांना ‘आनंदीबाई’ साकारायची संधी मिळाली. हे नाटक नव्याने पुन्हा एकदा रंगभूमीवर सादर होणार होते. अभिनेत्री दुर्गाबाई खोटे यांनी साकारलेली ‘आनंदीबाई’ करायची संधी त्यांना मिळाली. मा. दत्ताराम, मामा पेंडसे, दाजी भाटवडेकर अशी दिग्गज मंडळी नाटकात होती. साहित्य संघातील तो प्रयोग पार पडला. नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक त्या प्रयोगाला आले होते. प्रयोगानंतर ते आत कलाकारांना भेटायला आले. ‘आनंदीबाई’चे काम करणाऱ्या त्या अभिनेत्रीच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देताना ते म्हणाले, ‘‘आजच्या प्रयोगात मी ‘राघोबादादा’ नाही याचे मला वाईट वाटते..’’

नानासाहेब फाटक यांच्याकडून कौतुकाची व शाबासकीची थाप मिळविणाऱ्या त्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर आजच्या ‘पुनर्भेट’च्या मानकरी आहेत. ‘पुनर्भेट’ सदर सुरू झाले तेव्हापासून आजवर पडद्याआड असलेल्या २४ दिग्गजांना ‘रविवार वृत्तांत’ने बोलतं केलं. आजचा सदराचा पंचविसावा खास भाग हा आशालता यांच्याशी मारलेल्या गप्पांनी रंगला आहे.

खरे तर ही भूमिका याआधी दुर्गाबाई खोटे यांनी साकारली होती. पण त्यांच्या भूमिकेची कोणतीही छाप न ठेवता किंवा अनुकरण न करता आशालता यांनी आपल्या खास शैलीत ही ‘आनंदीबाई’ साकारली. आशालता यांच्या बाबतीत असा योग (म्हणजे अगोदर अन्य अभिनेत्रींनी केलेली भूमिका काही प्रयोगांनंतर त्यांच्या वाटय़ाला आल्याची उदाहरणे) बरेचदा आला. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात सुधा करमरकर यांनी साकारलेली ‘येसुबाई’, ‘गारंबीचा बापू’मधील उषा किरण यांनी साकारलेली ‘राधा’, ‘गुंतता हृदय हे’मधील पद्मा चव्हाण यांनी साकारलेली ‘कल्याणी’ अशा भूमिका आशालता यांनी साकारल्या. त्याबाबत आशालता म्हणाल्या, ‘‘एखाद्या अभिनेत्रीने साकारलेली भूमिका नंतर पुन्हा त्याच नाटकात साकारणे हे एक आव्हान असते. कारण प्रेक्षकांच्या मनात त्या कलाकाराने केलेली भूमिका ठसलेली असते. तो प्रभाव पुसून टाकून आपली स्वतंत्र प्रतिमा नव्याने भूमिका करणाऱ्या कलाकाराला निर्माण करावी लागते. मी त्याबाबतीत नक्कीच सुदैवी आहे. कारण माझी तुलना कोणाबरोबरही झाली नाही आणि मी केलेल्या भूमिकांचे कौतुकच झाले. अर्थात याचे श्रेय त्या त्या नाटकाच्या दिग्दर्शकांनाही आहेच. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून केलेली माझी निवड व त्यांचे मार्गदर्शन यामुळे ते आव्हान मला पार पाडता आले.’’

आशालता यांचा जन्म मुंबईचाच. मुंबईतच त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झाले. गिरगावातील ‘सेंट कोलंबो हायस्कूल’ ही त्यांची शाळा. तेव्हाच्या अकरावी मॅट्रिकनंतर त्यांनी काही काळ मंत्रालयात नोकरीही केली. त्याच वेळी नोकरी सांभाळून कला शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. ‘नाथीबाई दामोदर ठाकरसी’ महिला विद्यापीठातून त्यांनी ‘मानसशास्त्र’ विषयात ‘एमए’ केले आहे. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गाण्याचे प्राथमिक शिक्षण घेत असताना आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर त्यांनी काही कोंकणी गाणीही गायली. त्या आठवणींच्या स्मरणरंजनाचा गोफ उलगडताना त्यांनी सांगितले, आमच्या घरी नाटय़, संगीत कला असे कोणतेही वातावरण नव्हते. शिक्षण महत्त्वाचे, ते आधी पूर्ण कर आणि मग तुला नाटक-गाणे वगैरे काय करायचे ते कर अशी आई-वडिलांची भूमिका होती. त्यामुळे सुरुवातीला नाटकातून काम वगैरे काहीही केलेले नव्हते. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करत असतानाच ती संधी मिळाली. ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’ने राज्य नाटय़ स्पर्धेसाठी ‘संगीत संशयकल्लोळ’ हे नाटक बसवले होते. पं. अभिषेकी यांनी माझे नाव सुचवले. गोपीनाथ सावकार यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. त्या नाटकातील ‘रेवती’च्या भूमिकेसाठी माझी निवड झाली. स्पर्धेत नाटकाला सवरेत्कृष्ट नाटक आणि मला उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. पुढे ‘धी गोवा’चीच ‘संगीत शारदा’ आणि ‘संगीत मृच्छकटीक’ ही दोन नाटके राज्य नाटय़ स्पर्धेसाठी केली. याही दोन्ही नाटकांत मला अभिनयासाठीचे पारितोषिक मिळाले. हे सगळे करत असतानाही पूर्णवेळ नाटक, अभिनय करायचे असे काहीही ठरविलेले नव्हते. पण नाटकाचे वाचन, त्यातील बारकावे, आपल्यासह अन्य कलाकारांच्या भूमिका किंवा ती पात्रे जिवंत होताना पाहणे यात काहीतरी वेगळेपण आहे, असे मला जाणवत गेले. ती प्रक्रिया मला आवडली आणि मी नाटकाकडे ओढले गेले.

आशालता वाबगावकर यांच्या आजवरच्या अभिनय कारकीर्दीतील त्यांचे ‘मत्स्यगंधा’ हे नाटक मैलाचा दगड ठरले. इतक्या वर्षांनंतरही त्यांनी साकारलेली ‘मत्स्यगंधा’ आजही रसिकांच्या स्मरणात आहे. नाटकातील त्यांनी गायलेली ‘गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी’, ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ ही नाटय़पदे गाजली. ही नाटय़पदे आजही लोकप्रिय व रसिकांच्या ओठावर आहेत. ‘मत्स्यगंधा’चा आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या, वसंत कानेटकर लिखित आणि मा. दत्ताराम दिग्दर्शित या नाटकाचे संगीत पं. जितेंद्र अभिषेकी यांचे होते. नाटकातील संगीताने पं. अभिषेकी यांनी नाटय़संगीताचा बाज बदलला, त्याला नवे रूप दिले. नाटकातील ‘सत्यवती’ (मत्स्यगंधा)च्या भूमिकेसाठी माझी निवड झाली. अठरा वर्षांची अल्लड तरुणी, पराशराकडून फसविली गेलेली आणि सूड घेण्याची प्रतिज्ञा करणारी राजकन्या आणि आयुष्यात पूर्णपणे हरलेली राजमाता अशा १८ ते ७० वर्षे वयोगटातील विविध भावना/ छटा मला यातून सादर करायच्या होत्या. माझ्यासाठी ते एक आव्हान होते. दिग्दर्शक मा. दत्ताराम आणि नाटकातील अन्य सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने मी ते पेलले आणि ही भूमिका साकारली. १ मे १९६४ रोजी बिर्ला मातोश्री सभागृहात नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेले नाटक दुपारी अडीचच्या सुमारास संपले. संगीत आणि नाटय़पदे हा या नाटकाचा मूळ आत्मा. पुढे काही प्रयोगांनंतर ते नाटक अधिक आटोपशीर व कमी करण्यात आले. या नाटकाने मला खूप नावलौकिक आणि प्रसिद्धी मिळवून दिली. माझी स्वतंत्र ओळख निर्माण झाली. माझ्या आजवरच्या अभिनय प्रवासात हे नाटक महत्त्वाचे आहे.

‘मत्स्यगंधा’नंतर आशालता यांनी मागे वळून पाहिलेच नाही. नाटक पूर्णवेळ करायचे असे ठरवून त्यांनी नोकरी सोडली. ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’, ‘चंद्रलेखा’, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, ‘माऊली प्रॉडक्शन’, ‘कलामंदिर’, ‘आयएनटी’ आदी नाटय़संस्थांमधून त्यांनी आजवर पन्नासहून अधिक नाटके केली आहेत. या सर्व नाटकांचे मिळून पाच हजारांहून अधिक प्रयोग त्यांनी केले आहेत. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘मदनाची मंजिरी’, ‘गारंबीचा बापू’, ‘गुडबाय डॉक्टर’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘स्वामी’, ‘गरुडझेप’, ‘तुज आहे तुजपाशी’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘विदूषक’, ‘ही गोष्ट जन्मांतरीची’, ‘भावबंधन’, ‘गुंतता हृदय हे’, ‘छिन्न’, ‘देखणी बायको दुसऱ्याची’ ही त्यांची काही गाजलेली नाटके. पु. ल. देशपांडे यांनी दूरदर्शनसाठी केलेल्या ‘वाऱ्यावरची वरात’मध्येही त्या होत्या. ‘सावित्री’, ‘उंबरठा’, ‘पुढचं पाऊल’, ‘माहेरची साडी’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘एकापेक्षा एक’, ‘आत्मविश्वास’ आणि अन्य शंभर मराठी चित्रपटही त्यांच्या नावावर आहेत.

मराठी नाटक आणि चित्रपटांबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटाचा पडदाही गाजविला. दोनशेहून अधिक हिंदी चित्रपटांत त्यांनी ‘चरित्र अभिनेत्री’ म्हणून काम केले आहे. बासू चॅटर्जी यांचा ‘अपने पराये’ हा त्यांचा पहिला चित्रपट. तो कसा मिळाला, याविषयी त्यांनी सांगितले, मुंबई दूरदर्शनवरील एका कोंकणी नाटकात मी काम केले होते. ते नाटक बासुदांच्या पाहण्यात आले. त्यानंतर त्यांनी माझे ‘गुंतता हृदय हे’ नाटकही पाहिले. आणि माझी ‘अपने पराये’साठी निवड केली. रंगभूमीवर काम केलेले असले तरी चित्रपटाची भाषा आणि तंत्र माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी होते. शबाना आझमी यांच्याबरोबर माझे पहिले दृश्य होते. या चित्रपटाच्या निमित्ताने बासुदांच्या मार्गदर्शनाखाली खूप काही शिकायला मिळाले. ‘नमक हलाल’ चित्रपटाच्या चित्रीकरण प्रसंगाची एक आठवण सांगताना त्या म्हणाल्या, यात मी आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी व्यक्तिरेखा रंगविली होती. परवीन बाबीच्या आईची भूमिका मी करत होते. आधुनिक (ज्याला मॉडर्न म्हणता येईल अशी माझी भूमिका होती) चित्रीकरणाच्या वेळी समोरून अमिताभ बच्चन आले, नमस्कार करून म्हणाले मी अमिताभ बच्चन. पाठोपाठ शशी कपूर यांनी ओळख करून दिली. अमिताभ म्हणाले, मराठी थिएटर मे आप तो ‘दादा’ है, आपकी बहोत तारीफ सुनी है’..

‘अपने पराये’नंतर आशालता यांचा हिंदीतील प्रवास सुरू झाला. ‘अंकुश’, अग्निसाक्षी’, ‘नमकहलाल’, ‘शराबी’, ‘कुली’, ‘निकाह’, ‘सद्मा’, ‘चलते चलते’, ‘जंजीर’, ‘आज की आवाज’, ‘वो सात दिन’, ‘पसंद अपनी अपनी’, ‘मंगल पांडे’, ‘ये तो कमाल हो गया’, ‘तेरी मॉंग सितारोंसे भर दू’, ‘मरते दम तक’, ‘घायल’ ‘शौकिन’ आदी सुमारे २०० हून अधिक हिंदी चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. तीन कोंकणी आणि एका इंग्रजी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. मुंबई दूरदर्शनवरील ‘महाश्वेता’, ‘पाषाणपती’ तसेच ‘जावई विकत घेणे’, ‘कुलवधु’ या त्यांच्या काही गाजलेल्या मालिका. आशालता यांच्या बाबतीत आणखी एक माहिती नसलेली गोष्ट म्हणजे कल्याणजी-आनंदजी यांच्या वाद्यवृंदातून त्यांनी काही काळ गाणी गायली आहेत. वाद्यवृंदातील त्या मुख्य गायिका होत्या. मुकेश, हेमंतकुमार आदींबरोबर त्यांनी गाणी गायली. अभिनेत्री सुधा करमकर यांच्या ‘लिटिल थिएटर’च्या ‘गणपती बाप्पा मोरया’ या बाल नाटय़ातील त्यांनी गायलेली ‘तू सुखकर्ता तू दु:खहर्ता विघ्नविनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया’ ही आरती आजही लोकप्रिय आहे. गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात दरवर्षी ही आरती वाजविली जाते. ‘एचएमव्ही’ कंपनीने त्याची ध्वनिमुद्रिकाही काढली. सुधा करमरकर यांच्यामुळे ती आरती गायची संधी त्यांना मिळाली. ‘चांद भरली रात आहे’, ‘चांदण्यांची रोषणाई मी कधी ना पाहते’, ‘राजस राजकुमारा’(नाटक-विदूषक, तीनही गाण्यांचे संगीतकार श्रीनिवास खळे), ‘जन्म दिला मज त्यांनी’, ‘तव भास अंतरा झाला मन रमता मोहना’ (मत्स्यगंधा), ‘रवी किरणांची झारी घेऊनी’ (भावगीत) ही त्यांनी गायलेली अन्य काही गाणी.

‘अंकुश’ चित्रपटात त्यांच्यावर चित्रित झालेले आणि पाश्र्वगायिका पुष्पा पागधरे यांनी गायलेले ‘इतनी शक्ती हमे दे न दाता’ हे गाणेही लोकप्रिय आहे. त्याची आठवण सांगताना त्या म्हणाल्या, मी जम्मू-काश्मीरला फिरायला गेले होते. बाजारात फिरताना एका दुकानात खरेदी करताना त्या दुकानदाराने मला ओळखले. तुम्ही उद्या अर्धा तास देऊ शकाल का?, म्हणून विचारणा केली. दुसऱ्या दिवशी तो मला एका शाळेत घेऊन गेला. मी शाळेत पाऊल टाकत नाही तोच ‘इतनी शक्ती हमे दे न दाता’ हे गाणे तिथे सुरू झाले. त्या शाळेत ते गाणे दररोज प्रार्थना म्हणून वाजविले जात होते. शाळेत सगळ्या मुलांसमोर हे गाणे ज्यांच्यावर चित्रित झाले त्या या आहेत, अशी माझी ओळख करून दिली आणि त्या गाण्याच्या काही ओळी मी तिथल्या मुलांसमोर सादर केल्या. हा अनुभव अविस्मरणीय होता.

वयाच्या ७७ व्या वर्षांत असलेल्या आशालता यांना आजही मालिका किंवा चित्रपटात आव्हानात्मक भूमिका मिळाली तरच करायची इच्छा आहे. सध्याची चांगली मराठी नाटके, चित्रपट त्या आवर्जून पाहतात. वाचन हा त्यांचा छंद आहे. या वयातही त्या संगणक शिकल्या असून संगणकाचा तसेच ‘फेसबुक’, ‘व्हॉट्स अ‍ॅप’ या सध्याच्या सामाजिक माध्यमांचाही त्या वापर करतात. सतत नवीन

काहीतरी शिकण्याची त्यांची वृत्ती आहे. त्यामुळे आजच्या पिढीबरोबरही त्या सहज जुळवून घेतात.पुढे काय होणार याचा विचार मी कधीही केला नाही आणि करतही नाही. जे व्हायचे असेल ते त्याच वेळेत होते आणि होणार नसेल तर कितीही व काहीही केले तरी होत नाही. त्यामुळे आलेला प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा. आपण स्वत: आनंद घ्यायचा आणि इतरांनाही तो वाटायचा. जे समोर येते, मिळते ते स्वीकारायचे आणि पुढे जायचे हे माझ्या जीवनाचे सूत्र असल्याचे सांगत त्यांनी गप्पांचा समारोप केला..

(हा मजकूर २ एप्रिल २०१७ च्या लोकसत्ता-रविवार वृत्तान्तमध्ये प्रसिद्ध झाला आहे)

शनिवार, १ एप्रिल, २०१७

जागर मराठीचा- रविवार, २ एप्रिल रोजी डोंबिवलीत बैठक


जागर मराठीचा! रविवार, २ एप्रिल रोजी डोंबिवलीत बैठक

मराठी भाषा संरक्षण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. शांताराम दातार व व्हाॅट्स अॅपवरील 'मराठीचे मार्गदर्शक' हा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २ एप्रिल रोजी डोंबिवलीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

भाषावार प्रांतरचनेच्या सूत्रानुसार १ मे १९६० ला अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीस या वर्षी ५७ वर्ष पूर्ण होतील. भाषावार प्रांतरचनेचा उद्देश शासनाचे, विधिमंडळाचे कामकाज व न्यायदान राजभाषेतून व्हावे; शिक्षणाचे माध्यम केवळ इंग्रजी न ठेवता राज्यभाषेतून सुद्धा महाविद्यालयीन व उच्च शिक्षण मिळवण्याची सोय आणि भाषेचा समग्र विकास असा आहे.

आज १० कोटी पेक्षा जास्त जनतेची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेची स्थिती गंभीर आजाराने ग्रस्थ असलेल्या व्यक्तिसारखी आहे. भाषा व संस्कृतीचा अन्योन्य संबंध लक्षात घेता हे चित्र बदलले पाहिजे.यावर विचार करण्यासाठी आणि मराठी भाषेच्या जागरण-जागृतीसाठी १ मे २०१७ ला काय कार्यक्रम करता येईल याचा विचार व चर्चा या बैठकीत करण्यात येणार आहे.

कधी- रविवार, २ एप्रिल २०१७

कुठे--उन्मेष इनामदार कला अकादमी,पांडुरंगवाडी, श्रीराम वसंत इमारत,पांडुरंग वाडी,मानपाडा रोड,गांवदेवी मंदिरासमोर डोंबिवली-पूर्व.

केव्हा- संध्याकाळी ५ वाजता

अधिक माहितीसाठी संपर्क मृणाल पाटोळे-७५०६९१९८१६,

किरण दामले-९९२०६५७५६०

प्रियांका कुंटे-९८२०९४१९०३

(मराठीचे मार्गदर्शक समूह)

रविवार, १९ मार्च, २०१७

विनोदवीर- किशोर नांदलस्कर


विनोदवीर

‘नवरे सगळे गाढव’ चित्रपटात त्यांच्या वाटय़ाला अगदी छोटा प्रसंग आला होता. पण तो प्रसंगही त्यांनी आपल्या अभिनयाने व खास शैलीत असा काही रंगवला की विनोदसम्राट साक्षात शरद तळवलकरही त्यांच्याकडे एक क्षण पाहात राहिले आणि त्यांनी शाबासकीची थाप त्या अभिनेत्याच्या पाठीवर मारली. तळवलकर यांच्याकडून कौतुकाची थाप मिळविलेले ते ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर आजच्या ‘पुनर्भेट’चे मानकरी आहेत.

‘पुनर्भेट’च्या निमित्ताने गप्पांच्या ओघात नांदलस्कर यांनी वरील किस्सा सांगितला. त्या आठवणीत रमताना ते म्हणाले, ‘नवरे सगळे गाढव’ हा चित्रपट जवळपास पूर्ण झाला होता. शरद तळवलकर, पद्मा चव्हाण अशी मोठी कलाकार मंडळी त्यात होती. त्या चित्रपटात मला अगदी छोटीशी म्हटली तर नगण्य भूमिका मिळाली. त्यात एक प्रसंग असा होता. तळवलकर यांचे मयताच्या सामान विक्रीचे दुकान असते. मी त्या दुकानात जातो. तळवलकर ‘हं, मयताचे आडनाव काय?’ असा प्रश्न मला करतात. मी त्यांना ‘खरे’ असे उत्तर देतो. त्या वेळी मी ‘पण खऱ्याला तर मरण नसतं ना’ असं एक पदरचं वाक्य टाकलं आणि एक क्षणभर तळवलकर माझ्याकडे पाहात राहिले. त्यांनी त्यांच्या शैलीत मला उत्तर दिले आणि तो प्रसंग तिथेच संपला. माझ्या त्या पदरच्या वाक्याने शरद तळवलकर खूश झाले आणि त्यांनी मला शाबासकी दिली. माझ्या अभिनय प्रवासातील तो पहिला चित्रपट होता. तळवलकर यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याकडून माझे झालेले कौतुक मी अद्यापही विसरलेलो नाही, माझ्यासाठी तो आशीर्वाद आहे...

किशोर नांदलस्कर यांचे मूळ गाव खारेपाटण तालुक्यातील शेजवली. त्यांचा जन्म मुंबईचाच. मुंबईत लॅमिंग्टन रस्ता, नागपाडा, घाटकोपर आणि अन्य काही भागात त्यांचे लहानपण गेले. ‘न्यू इरा हायस्कूल’ आणि ‘युनियन हायस्कूल’ येथे त्यांचं शालेय शिक्षण झालं. किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता. त्या काळात त्यांनी नाटकांमधून स्त्री भूमिका केल्या होत्या. केशवराव दाते यांच्या नाटक कंपनीत तसेच अन्य काही नाटकांमधून त्यांनी काम केले होते. पुढे अभिनयाला रामराम करून खंडेराव यांनी काही काळ ‘ज्युपीटर’ गिरणीत नोकरी केली. गिरणीत काम करत असतानाच ते आंतरगिरणी तसेच कामगार नाटय़स्पर्धेतही नाटकं बसवायचे. त्या वातावरणातच नांदलस्कर लहानाचे मोठे झाले. त्यामुळे अभिनयाचं वेड त्यांना लागलेलं होतंच.

एक दिवस त्यांनी वडिलांना मलाही नाटकात काम करायचे आहे, असं सांगितलं. वडिलांनीही होकार दिला आणि १९६०-६१ च्या सुमारास रंगभूमीवर सादर झालेल्या ‘आमराई’ नाटकात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. ती आठवण सांगताना ते म्हणाले, माझी अगदीच नगण्य भूमिका होती. माझ्या वाटय़ाला जो प्रसंग आला होता त्यात मला फक्त ‘बाप्पा’ अशी हाक मारायची होती. घाटकोपर येथे एका वाडीत ते नाटक झाले. मी रंगमंचावर प्रवेश केला आणि मला दरदरून घाम फुटला. ‘बाप्पा’ हा एक शब्दही माझ्या तोंडून निघाला नाही. सहकलाकार अरे बोल, बोल असं सांगत होते. प्रेक्षकांमधूनही हुर्यो उडवली गेली. तो माझ्यासाठी एक ‘धडा’ ठरला. अभिनय हा वाटतो तितको सोपा नाही हे मला कळलं. मी त्या वेळी जरी नापास झालो असलो तरी पुढे काम करत करत, अनुभवातून शिकत गेलो. ‘मुंबई मराठी साहित्य संघा’त सादर होणारी अनेक नाटकं, त्यातील कलाकारांचा अभिनय पाहिला. त्यातून जे मिळत गेलं ते टिपलं आणि माझ्यातील अभिनेता घडवत गेलो. त्याच काळात ‘कलाकिरण’ ही संस्था काढली. वसंत जाधव यांनी लिहिलेली छोटी छोटी नाटकं केली. घाटकोपर येथील ‘सवरेदय रुग्णालया’च्या आवारात रुग्णांसाठी श्रीराम इंदूलकर यांच्या सहकार्याने काही नाटकंकेली. त्याच काळात एका कंपनीत काही वर्षे नोकरीही केली. नोकरी सांभाळून नाटक सुरूच ठेवलं होतं. लोकनाटय़ लेखक शरद निफाडकर यांच्या ‘विठ्ठल फरारी’, ‘नथीतून मारला तीर’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ आदी नाटकं केली. त्याच सुमारास म्हणजे १९८० मध्ये दूरदर्शनच्या ‘गजरा’, ‘नाटक’ आणि अन्य कार्यक्रमांतून सहभागी झालो होतो. यातून हळूहळू माझं नाव झालं, लोक ओळखायला लागले.

नांदलस्कर यांनी आत्तापर्यंत सुमारे ४० नाटके, २५ हून अधिक मराठी व हिंदूी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमधून काम केले आहे. ‘नाना करते प्यार’ हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम केलेले शेवटचे नाटक. ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ आणि इतर काही चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक नव्याने पुन्हा रंगभूमीवर सादर झालं. त्याचं दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे यांचं होतं. या नाटकातील ‘राजा’ची भूमिका तसेच दिलीप प्रभावळकर यांनी लोकप्रिय केलेले ‘वासूची सासू’ हे नाटकही नव्याने रंगभूमीवर सादर झालं. यात प्रभावळकर यांची भूमिका नांदलस्कर यांना साकारायची संधी मिळाली. दोन्ही भूमिका नांदलस्कर यांनी खास त्यांच्या शैलीत सादर केल्या. व्यावसायिक रंगभूमीवर नांदलस्कर यांनी ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून प्रेक्षकांना पोट धरून हसवलं.

महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’ (गोविंदा), ‘तेरा मेरा साथ है’ (अजय देवगण), ‘खाकी’ (अमिताभ बच्चन) यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली. ‘चाल जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांतही त्यांची भूमिका होती. इतकी वर्षे काम करूनही छोटय़ा छोटय़ा भूमिकाच मिळत गेल्या. लक्षात राहील अशी मोठी आणि विशेष भूमिका साकारायची संधी मिळाली नाही, याची कधी खंत वाटते का?, या प्रश्नाला उत्तर देताना नांदलस्कर यांनी सांगितलं, माझ्या बरोबर काम कोण करतंय, माझी भूमिका किती आहे याचा विचार मी कधीही केला नाही. कोणतीही भूूमिका ही लहान नसते. ‘वन रूम किचन’मधील ‘पितळे मामा’, ‘पाहुणा’मधील ‘नेने’, ‘विच्छा माझी पुरी करा’मधील ‘राजा’असो किंवा आणखीही अन्य भूमिका असोत. माझ्या वाटय़ाला आलेली प्रत्येक भूमिका मी जीव ओतून केली. त्यामुळे लांबी-रुंदीच्या दृष्टीने त्या फार मोठय़ा नसल्या तरीही प्रत्येक भूमिकेवर मी माझी छाप पाडली, माझ्या अभिनय शैलीत ती साकारली आणि म्हणूनच आजही मी प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ‘हुंटाश’ (यात माझी एकदम वेगळी भूमिका आहे), ‘मिस यू मिस’, ‘कंदीलगाव’ हे माझे आगामी चित्रपट आहेत.

पत्नी लक्ष्मी आणि तीन विवाहित पुत्र, सुना, नातवंडे असा त्यांचा परिवार. गेल्या वर्षी अचानक दम लागणे, छातीत धडधडणे असा शारीरिक त्रास त्यांना सुरू झाला. नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये व्यग्र असलेल्या नांदलस्कर यांनी त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. पण असह्य़ झाले तेव्हा डॉक्टरांकडे जाण्यावाचून पर्यायच नव्हता. वैद्यकीय तपासण्यातून हृदयविकार, मधुमेह असल्याचे समोर आले. यातून माझी ‘बायपास’ झाली. ‘पेसमेकर’ बसवला गेला. हिंडणे-फिरणे, काम करणे यावर बंधनं आली. त्यामुळे सध्या काही काळ विश्रांती घेतली आहे. या अल्पविरामानंतर पुन्हा एकदा अभिनयाची नवी खेळी खेळण्यास आपण उत्सुक असल्याचं नांदलस्कर म्हणाले. माझा स्वभाव काहीसा बुजरा आणि भिडस्त असल्याने अभिनय कारकीर्दीत त्याचा थोडासा तोटाही झाल्याचे नांदलस्कर यांनी मोकळेपणाने कबूल केले.

-शेखर जोशी

(हा लेख लोकसत्ता-रविवार वृत्तान्त- १९ मार्च २०१७ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे)

बुधवार, १५ मार्च, २०१७

'साडेतीन टक्के' वाल्यांनीही महाराष्ट्र घडविला...


'साडेतीन टक्के' वाल्यांनीही महाराष्ट्र घडविला...

महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते विशेषत; कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची मंडळी नेहमी फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असा उल्लेख जमेल तिथे करत असतात. तसेच ब्राह्मणांचा उल्लेखही जाणीवपूर्वक 'साडेतीन टक्केवाले' असा कुचेष्टेने केला जातो. जाहीर सभा, संमेलने आणि कार्यक्रमातून तसेच खासगीतही ब्राह्मणांना शिव्या दिल्या जातात. जणू काही आजचा पुरोगामी महाराष्ट्र 'त्या' तीन जणांमुळेच घडला आहे, असेच भासविले आणि ठसविले जाते.महाराष्ट्र घडण्यात त्या तिघांचे योगदान आहेच ते कोणीही नाकारत नाही. पण महाराष्ट्र घडविण्यात बाकीच्यांचेही विशेषत 'साडेतीन टक्केवाल्यां'चे म्हणजेच ब्राह्मणांचेही महत्वाचे योगदान आहे, हे मात्र ही मंडळी सोयीस्कर विसरतात किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. सर्वच बाबतीत अग्रेसर असलेल्या आणि महाराष्ट्र घडविण्यात ज्या ब्राह्मण मंडळींंचेही मोठे योगदान आहे, त्यांची नावे कधीही जाहीरपणे घेतली जात नाहीत. महाराष्ट्राच्या अलिकडच्या काही वर्षातील इतिहासावर सहज नजर टाकली तरी साडेतीन टक्केवाल्यांनी केलेले सामाजिक कार्य, सामाजिक सुधारणा या ठळकपणे जाणवतील अशा आहेत. पण या तथाकथित बेगडी, पुरोगामी आणि केवळ ब्राह्मण द्वेष हाच ज्यांचा एककलमी कार्यक्रम आहे त्यांनी या इतिहासाकडे डोळेझाक केली आहे. महाराष्ट्रात या साडेतीन टक्केवाल्यांनी जे काही काम करून ठेवले आहे, त्याची सर खरेतर कोणालाच नाही. हे ब्राह्मणेतरांना कितीही कटू वाटले तरी सत्य आहे.


‘सामाजिकपरिषद’, ‘डेक्कन सभा’ अशा संस्थांची स्थापना करून जातिभेद, वंशभेद, अंधश्रद्धेला विरोध करण्याचे महत्काचे काम केले. स्त्री-शिक्षण आणि विधवा विवाह,बुद्धीनिष्ठा यांचाही सातत्याने पुरस्कार केला ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे या साडेतीन टक्क्यातीलच होते.‘सुधारक’ या नावाचे नियतकालिक काढून त्याद्वारे जातिभेद, बालविवाह, केशवपन, सतीची चाल, अस्पृष्यता या अनिष्ट रुढी व परंपरांना प्रखर विरोध करणारे गोपाळ गणेश आगरकर हे ही साडेतीन टक्केवालेच. विधवा विवाह आणि स्त्रीयांचे शिक्षण याविषयी समाजाचा विरोध पत्करून प्रसंगी अवहेलना सहन करुन ज्यांनी या क्षेत्रात खूप मोठे काम केले, स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी घातला ते आणि आजच्या नाथीबाई दामोदार ठाकरसी महिला विद्यापीठाचे संस्थापक महर्षी धोंडो केशव कर्वे हे ही ब्राह्मणच होते. ज्या काळात संतती नियमन, त्यासाठी वापरायची साधने याविषयी बोलणेही अवघड होते, अशा काळात ज्यांनी संतती नियमन, लैंगिक शिक्षण याचा पुरस्कार केला, त्यासाठी समाजस्वास्थ्य हे मासिक चालविले ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र रघुनाथ धोंडो कर्वे हे ही ब्राह्मणच होते.


हिंदू धर्मातील अनिष्ट रुढी व परंपरा यावर घणाघात करणारे, अस्पश्यता निवारणाचे काम करणारे आणि दलित, अस्पश्य व इतर जाती-धर्मीयांसाठी रत्नागिरी येथे पतीतपावन मंदिराची स्थापना करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, सामाजिक समरसता आणि विविध धर्माच्या ऐक्याचा पुरस्कार करणारे, पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मंदिरात अस्पश्यांनाही प्रवेश मिळावा म्हणून आमरण उपोषण करणारे पांडुरंग सदाशिव साने हे ही ब्राह्मणच होते.कोळी व आगरी समाजातील अनिष्ट प्रथा, व्यसनाधिनता दूर करून त्यांच्यात आपल्याबद्दल विश्वास निर्माण करणारे स्वाध्याय परिवाराचे पांंडुरंगशास्त्री आठवले, १९३४ मध्ये आपल्या निर्भीड साप्ताहिस्कापश्च्याय माध्यमातून सामाजिक समरसतेचा पुरस्कार करणारे, स्पृश्य-अस्पृश्यता, केशवपन या अनिष्ट प्रथांच्या विरोधात जनजागृती करणारे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दलित व सवर्ण यांच्यातील दरी मिटविण्यासाठी झुणका भाकर चळवळ व यातून समाजाच्या सर्व स्तरातील लोकांचे एकत्र भोजन सुरु करणारे समतानंद अनंत हरी गद्रे तसेच काही शतके मागे गेलो तर संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास स्वामी हे ही या साडेतीन टक्क्यातीलच आहेत. या सगळ्यांचेच योगदान नाकारणार आहात का?

भारतीय असंतोषाचे जनक व स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, अशी गर्जना करणारे लोकमान्य टिळक हे तेल्या-तांबोळ्यांंचे पुढारी म्हणूनही ओळखले जात. लोकमान्य टिळकही साडेतीन टक्क्यातीलच होते.

अनेकदा ब्राह्मण मंडळींनी ब्राह्मणेतर लोकांवर अन्याय केला, असा डांगोराही पिटला जातो. काही अंशी ते सत्य असे मानले तर त्यांच्याच पुढच्या पिढ्यांनी ब्राह्मणेतरांना वर येण्यासाठी आणि प्रसंगी स्वजातीयांचा तीव्र विरोध पत्करुन मोलाची मदत केली हे ही सोयीस्कर विसरले जाते. ब्राह्मणांकडून त्यांच्या पूर्वजानी ब्राह्मणेतरांवर केलेल्या तथाकथीत अन्यायाचे ते एक प्रकारे परिमार्जनच आहे. याचे दाखलेही सर्वांना तोंडपाठ आहेत. अनेक ब्राह्मणेतरानी आपल्या कामात ब्राह्मणांनी वेळोवेळी केलेल्या या मदतीचा व सहकार्याचा उल्लेख लेखनातून केला आहे. पण आज इतिहास बदलण्याच्या हट्टामुळे किंवा ब्राह्मण द्वेषामुळे ते नाकारले जात आहे.

सामाजिक सुधारणा किंवा अन्य क्षेत्रात ब्राह्मण मंडळींनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाची ही केवळ काही सहज आठवली अशी वानगीदाखल उदाहरणे. साडेतीन टक्क्यातील या सगळ्या मंडळींनी साहित्य,कला, नाट्य, गायन, राजकारणासह सामाजिक कार्य, समाजसुधारणा आणि समाजाच्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. महाराष्ट्र घडविण्यात या सर्व मंडळींचे महत्वाचे योगदान आहे. केवळ ब्राह्मण द्वेषातून ही मंंडळी हे नाकारत असतील किंवा त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून केवळ त्या तिघांचाच डंका वाजवित असतील तर महाराष्ट्र आणि या साडेतीन टक्के असलेल्या मंडळींच्या कार्याचा, कर्तृत्वाचा तो घोर अपमान ठरेल. पण त्यामुळे या ब्राह्मण मंडळींचे महत्व व कर्तृत्व कमी होत नाही तर यातून या मंडळींचे योगदान नाकारणारे मात्र अधिक खुजे ठरतात.


-शेखर जोशी

मंगळवार, १४ मार्च, २०१७

मराठी भाषेसाठी सर्वकाही...


मराठी भाषेसाठी सर्वकाही...

'डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत मराठी भाषा मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे' असे विधान जागतिक मराठी परिषदेच्या मुंबईत झालेल्या पहिल्या अधिवेशनाच्या उदघाटन प्रसंगी ज्येष्ठ नाटककार-कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी केले होते.

आज २५/३० वर्षांनंतरही त्यात बदल झालेला नाही. इंग्रजीचे वाढते प्रस्थ, मराठीची होणारी गळचेपी, बंद पडत चाललेल्या मराठी शाळा, इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याकडे वाढलेला कल, हळूहळू कमी होत चाललेली मराठी वाचन संस्कृती आणि अन्य काही कारणांमुळे मराठी भाषेवरील आक्रमणे वाढत चालली आहेत. मराठी भाषा व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन तसेच राज्य व्यवहारापासून ते वेगवेगळ्या स्तरावर मराठीचाच वापर करणे आणि मराठी भाषेला तिचे राजभाषेचे स्थान मिळवून देणे हे खरे तर राज्य शासनाचे काम. पण महाराष्ट्र राज्य शासनाच्या स्थापनेनंतर इतक्या वर्षानंतरही् ते पूर्णपणे साध्य झाले आहे आणि मराठीचा वापर होतो आहे असे दिसत नाही. कुसमाग्रज यांच्या जन्मदिनी किंवा १ मे या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनी आयोजित कार्यक्रमातून मराठीचे गोडवे गायले जातात. मराठी भाषेसाठी अमुक करु, तमूक करु म्हणून घोषणा होतात पण प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळेच पाहायला मिळते.

हे काम राज्य शासनाचे असले तरी ते कर्तव्य शासन जर योग्य प्रकारे पार पाडत नसेल तर मराठी भाषकांनी एकत्र येऊन जनमताचा रेटा लावणे आवश्यक ठरते. पण त्या पातळीवरही आनंदी-आनंद आहे. मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी काही संस्था त्यांच्या पातळीवर काम करत आहेत. पण त्यांचे एकत्र येऊन सामुहिक प्रयत्न झाले आहेत, असेही दिसत नाही. राजभाषा मराठीला सर्व स्तरावर तिचे न्याय्य स्थान मिळवून देण्यासाठी या सर्व संस्था आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱया सर्वांनी एकत्र येण्याची आज गरज आहे.

राज्य शासनावर दबाव टाकून मराठी भाषेसंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न न करता सर्वांनी एकत्र आले पाहिजे. मराठी अस्मितेची वज्रमुठ व दबावगट तयार करणे सगळ्यात महत्वाचे आहे. त्यादृष्टीने मराठी भाषा संरक्षण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि न्यायालयात मराठीचा वापर झालाच पाहिजे यासाठी लढा देणारे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. शांताराम दातार यांनी पुढाकार घेतला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्याशी दातार यांनी चर्चा केली आणि साहित्य महामंडळानेही या कामात सक्रीय पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महामंडळाचे काम फक्त साहित्य संमेलन भरविण्यापुरतेच मर्यादित नाही. तर मराठी भाषा, साहित्य व संस्कृती जतन आणि संवर्धनासाठीही महामंडळाने काम केले पाहिजे, अशी भूमिका डॉ. जोशी यांनी घेतली होती.

त्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून या संदर्भात येत्या १९ मार्च रोजी डोंबिवलीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मराठी भाषेला तिचे स्थान मिळवून देण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा होणारच आहे. हा लढा संपूर्ण राज्य स्तरावर उभारला जावा आणि मराठी भाषकांची एकजूट व्हावी हा उद्देश या मागे आहे. भारतीय राज्य घटनेतील कलम ३४८-२ नुसार उच्च न्यायालयाचीही प्राधिकृत भाषा मराठीच झाली पाहिजे, त्यासाठी काय करता येईल हा विषयही बैठकीत आहे. २१ जुलै १९९८ च्या राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार तालुका आणि जिल्हा पातळीवरील न्यायालयाची भाषा मराठी झाली पण ती पूर्णपणे स्थिरावली नाही. मराठीला ज्ञानभाषा करण्याचे बोलले जाते, पण प्रत्यक्षात त्यासाठी राज्य शासन काय पावले उचलते, मराठीसाठी काम करणाऱया संस्था काय करतात, त्यांनी नेमके काय करायला पाहिजे, अशा सर्व विषयांवर या बैठकीत उहापोह होणार आहे.

मराठी भाषेवर प्रेम करणाऱया, मराठी भाषेविषयी आस्था असणाऱया आणि मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी होणाऱया उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा असलेल्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन अॅड. दातार यांनी केले आहे. ही बैठक १९ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता डोंबिवली साहित्य संमेलनाचे कार्यालय असलेल्या आगरी युथ फोरमच्या कार्यालयात (जगन्नाथ प्लाझा, पहिला मजला, मानपाडा रस्ता, गोदरेज शो रुमच्या जवळ,, डोबिवली-पूर्व) होणार आहे.

अॅड. शांताराम दातार यांचा संपर्क क्रमांक-

९८२०९२६६९५

-शेखर जोशी

सोमवार, १३ मार्च, २०१७

विधायक आणि आक्रमक शक्तीचा नरसिंह प्रकटू दे


कला वक्तृत्वाची-१८

कला वक्तृत्वाची

अविनाश धर्माधिकारी

विधायक आणि नागरी शक्तीचा नरसिंह प्रकटू दे

निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी हे आज, शुक्रवारी होणाऱ्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीस प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. धर्माधिकारी यांनी जून १९९६ ते डिसेंबर १९९७ कालावधीत ‘लोकसत्ता’मध्ये ‘नागरिक’या नावाचा स्तंभ चालविला होता. दर मंगळवारी हे सदर प्रसिद्ध होत होते. ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीच्या निमित्ताने त्या सदरातील समारोपाच्या लेखातील काहीभाग. या भागाबरोबरच ‘कला वक्तृत्वाची’ हे सदर येथे समाप्त होत आहे.

आज स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांनंतर एक राष्ट्र, एक संस्कृती म्हणून आपण एका अत्यंत अर्थपूर्ण आणि निर्णायक वळणावर आहोत. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, देशद्रोही आणि तत्त्वशून्य राजकारण, पर्यावरणाचा नाश, वाढती विषमता, निरक्षरता, बेरोजगारी, स्त्रियांवरचे वाढते अत्याचार, फुटीरतावाद हे घटक प्रबळ होत गेले तर एक राष्ट्र, एक संस्कृती म्हणून आपण नष्ट होऊ. पण याच पन्नास वर्षांत गाठता आलेली अन्नधान्याची स्वयंपूर्णता, शास्त्र-तंत्रज्ञानातील प्रगती, अणू-अवकाश-अंटाक्र्टिका-जैव तंत्रज्ञान-सुपर कंडक्टिव्हिटी-संगणक, इत्यादी घटक प्रबळ होत गेले तर भारताच्या इतिहासातलं एक नवीन, अभूतपूर्व सुवर्णयुग आपण निर्माण करू शकू. यातनं काय निवडायचं, हा ऐतिहासिक पर्याय आपल्यासमोर आहे. कुठले तरी ग्रह-तारे, कुठला तरी नॉस्टड्रॅमस

किंवा बहुउद्देशीय कंपन्या याविषयीचा निर्णय करणार नाहीत. तो इथल्या प्रत्येक नागरिकाच्या अंत:करणातून आणि कृतीतूनच आकाराला येणार आहे.नव्या सुवर्णयुगाच्या आशेचं हे स्वप्न मांडताना देश मध्यावधी निवडणुकांना सामोरा जातोय. सर्वच पक्ष, आघाडय़ांनी कंबरेचं सोडून डोक्याला बांधलंय आणि एकमेकांच्या नागडेपणाचा शंख करणं चाललंय. राजकारण पन्नास वर्षांतल्या सर्वात नीच पातळीला पोचलंय हे बरंच आहे. गटाराचे हे सर्व पूर वाहून, ओसरून गेले की स्वच्छ निर्मळ पाण्यासाठी वाटा तयार होतील. तोवर मात्र स्वच्छ, निर्मळ पाण्यानं आपलं स्वत्व जपून ठेवायला हवं. गटाराच्या संगतीत धीर सोडून, शॉर्ट टर्म फायद्यांसाठी स्वच्छ, निर्मळ, पारदर्शक पाण्यानं गटाराशी आघाडी केली, तडजोड केली, सीट अ‍ॅटजस्टमेंट केली, तर सत्तेच्या सिंहासनावर गटारच ओघळणार आहे. आपलं स्वत्व आपणच जपून ठेवायला हवं. त्यासाठी नागरिक म्हणून एकत्र यायला हवं. गेल्या पन्नास वर्षांत या सामान्य नागरिकांनीच पुन्हा पुन्हा आपली राजकीय प्रगल्भता सिद्ध करुन दाखवली आहे. ही प्रगल्भता ही आपली बहुधा शेवटची आणि सर्वात भरवशाची आशा आहे.

आपण नीट विचारपूर्वक दिलेलं एकेक मत आणि आनंदानं बजावलेलेलं एकेक कर्तव्य नव्या सुवर्णयुगाचं मंदिर घडवेल. ‘नागरिक’ हा त्या मंदिराचा एक स्तंभ. वेगवेगळ्या स्वरूपातल्या नागरिकांच्या समित्या, इथल्या राजकारण, अर्थकारण, समाजकारण सर्व मिळून तयार होणाऱ्या देशकारणाला दिशा देऊ शकतील. कारण जगातली सर्व तत्त्वज्ञानं, सर्व धर्म, सर्व विचारधारा, सर्व पोथ्या या सर्वाचा मानवी जीवनाच्या रोजच्या जगण्याच्या पातळीवर एका ओळीचा सारांश काढायचा, तर तो अगद सोपा आहे. तो म्हणजे स्वत:चं कर्तव्य आनंदानं करत जगणं. मला समजणाऱ्या भारतीय/वैश्विक संस्कृतीचा आत्मा हाच आहे. आणि आज तरी दुर्दैवानं संपूर्ण भारतवर्षांत हा आत्मा हरवलेला आहे. आपण कर्तव्य चुकवणारा समाज बनलोय. आणि चुकवत चुकवत कधी कर्तव्य बजावलंच तर ते खत्रूडपणे, रडत-भेकत, आदळआपट करत, घिसाडघाईनं, अकार्यक्षमतेनं, शोषणाचे साक्षीदार बनत आपण कर्तव्य बजावण्याची ‘पाटी’ टाकतो. शंभर कोटींच्या या मानवतेला उत्थानासाठी हवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांत कर्तव्य बजावणाऱ्या नागरिकांची सेना. संघटित सेना. आम्हाला शिवाजी जन्माला यायला हवा असतो, पण तो शेजाऱ्याच्या घरात. माझ्या घरात आपला पोटार्थी तडजोडवीरच जन्माला यावा. हे झुगारून देऊन आपणच अफजलखानाचा कोथळा काढणारा व आपल्यातच लपलेला शिवाजी बाहेर काढायला हवा. वाघनख्यांसकट. आता आपला उद्धार दुसरा कोणी तरी करणार नाहीये, आपला उद्धार आपणच करायचाय, या भूमिकेवर जेवढे जास्त नागरिक येतील, तेवढा हा देश, हे विश्व जगायला अधिक सुंदर जागा बनेल.

नाही तर सामान्य नागरिकाला लाथा बसतातच आहेत. आपला नुसता जगत राहण्याचा संघर्ष रोज जास्त जास्तच अवघड बनतोय. तो संघर्ष लढत, धडपडत, चाचपडत आपण जगतो. वर लाथा खात राहतो. लाथा देणारा बदलतो. त्याची विचारधारा, रंग, त्याची परिभाषा बदलते, पण नागरिकाला लाथा चालूच राहतात. याला खरा उपाय एकच. लाथा खाणारा हा स्तंभ कडाडू दे. त्यातून विधायक आणि आक्रमक नागरिक शक्तीचा नरसिंह प्रकटू दे. मानवी सन्मान आणि आत्मविश्वास असलेला, आपलं कर्तव्य आनंदानं करणारा नागरिक म्हणजे हा नरसिंह. विसाव्या शतकाच्या संध्यासमयी, एकविसाव्या शतकाच्या उंबरठय़ावर राक्षसही नाही आणि देवही नाही अशा माणसांच्या संघटित नख्यांनी दुष्ट, भ्रष्ट, लुटारू, चारित्र्यशून्य, अन्याय, अनीतिसंपन्न हिरण्यकश्यपूंची पोटं

फाडून काढू दे. हा स्तंभ कडाडू दे.

आता सामान्य नागरिकानं

नख्या रोवाव्यात जमिनीत खोल

अन् मान ठेवावी ताठ

क्रूरच असतील कर्मभोग, तर

बळकट व्हावेत हात

तर आता, कामाला सुरुवात करू या.

संकलन – शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/१७ फेब्रुवारी २०१७)

कवितेचे कवितापण हरवणार नाही याची काळजी कवींनी घ्यावी


कला वक्तृत्वाची-१७

शांता शेळके

कवितेचे कवितापण हरवणार नाही याची काळजी कवींनी घ्यावी

साहित्य सभा, बडोदे या संस्थेचे वार्षिक संमेलन ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या अध्यक्षतेखाली काही वर्षांपूर्वी आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी केलेल्या ‘आजची मराठी कविता- स्वरूप व समस्या’ या भाषणातील काही भाग...

कविता हा माझा सर्वाधिक आवडीचा, कुतूहलाचा व चिंतनाचा विषय आहे. गेली अनेक वर्षे मी कविता फार प्रेमाने आणि पूर्वग्रहरहित वृत्तीने वाचत आले आहे. माझ्यासारख्या काव्यप्रेमी व्यक्तीला आजची मराठी कविता वाचताना काही गोष्टी तीव्रतेने जाणवतात. काही उणिवा तिच्यात दिसून येतात. काही अपप्रवृत्ती तिच्यामध्ये वाढीला लागत आहेत असे वाटते. पूर्वीच्या काळी कविता लिहिताना वृत्त, जाती, छंद अशा अनेक रचनाप्रकारांवर किमान काही प्रभुत्व असावे लागे. आज मुक्तछंदात कविता लिहिली जात असल्यामुळे कवींना तेवढेही ज्ञान असण्याची गरज भासेनाशी झाली आहे. कविता नेमके कोणत्या रचनेला म्हणावे यासंबंधी अनेकांच्या मनात फार संदिग्ध व धूसर कल्पना असतात. त्यामुळे आज कालबाह्य़ ठरलेल्या वृत्तात व छंदात लिहिली जाणारी सांकेतिक कविता, मंगलाष्टके, बारशाची कविता, स्वागतगीते, मान्यवर मंत्र्यांच्या प्रशस्तीखातर लिहिली जाणारी पद्यात्मक रचना या साऱ्या ‘कविता’च असतात. यामुळे कवींची संख्या नको तितकी वाढत आहे.

जिला ‘कविता’ हे नाव प्रामाणिकपणे देता येईल अशी फार मोजकी रचना आपल्यासमोर येते. पण तीही पूर्णत: निर्दोष वा समाधानकारक नसते. अशा कवितेचा विचार कताना प्रथम नजरेसमोर येते ती दलित कविता. ही कविता प्रथम लिहिली गेली ती प्रामुख्याने पांढरपेशा प्रस्थापित कवितेच्या विरोधात. हिंदू धर्मातील चातुर्वण्र्यव्यवस्था, जातीपातींची उतरंड, विषमता समाजाने निर्माण केली आहे तिच्याशी असलेला कट्टर विरोध व्यक्त करावा, तिच्यावर हल्ले चढवावेत ही दलित कवितेची मूळ भूमिका होती. ‘विद्रोह’ हा तिचा परवलीचा शब्द होता. डॉ. आंबेडकर यांनी दलित समाजाची अस्मिता जागृत केली. दलित साहित्याचा प्रथम जो उत्तम अविष्कार झाला तो मुख्यत्वे आत्मचरित्र आणि कविता या साहित्यातून. दलित कवितेने एक अगदी वेगळे अनुभवविश्व प्रथमच मराठी कवितेत आणले. दलित कवितेने एकूणच मराठी कवितेच्या कक्षा विस्तारल्या, इतकेच नव्हे तर तिने या कवितेला एक वेगळे परिमाणही दिले, परंतु आता दलित कवितेतली वाफ गेली आहे, असे वाटू लागते. मराठी कवितेतील सांकेतिकतेच्या विरोधात उभ्या असलेल्या दलित कवितेने आपलेही काही संकेत निर्माण केले आहेत की काय अशी शंका येऊ लागते. केवळ विध्वंसक, आरडाओरड करणारी, अपशब्द वापरणारी कविता फार काळ टिकून राहणे शक्य नव्हते. दलितांना, पीडितांना अंतर्मुख करून त्यांना विद्रोहाला प्रवृत्त करण्याची तिची शक्तीही आता लुप्त होत आहे. जी गोष्ट दलित कवितेची तीच बाब ग्रामीण कवितेची. मराठीत प्रथम ग्रामीण किंवा तेव्हाचा शब्द वापरायचा झाला तर जानपद कविता लिहिली गेली ती रविकिरण मंडळांच्या कवींकडून. पण हे कवी पांढरपेशे होते आणि त्यांनी लिहिलेल्या या कवितांमध्ये अस्सल जीवनदर्शकापेक्षा भावुक स्वप्नरंजनाचा भाग अधिक होता. बहिणाबाई चौधरी यांनी शिक्षण, संस्कार, व्यासंग यातले काहीही लाभलेले नसता जन्मजात प्रतिभेच्या बळावर उत्तम ग्रामीण कविता त्या काळात लिहिली. इथे वास्तव चित्रणाला जीवनचिंतनाचीही जोड मिळाल्यामुळे या कवितांचा दर्जा खूपच उंचावला आहे. आज ‘मंचीय कविता’ नावाचा एक नवा प्रकार मराठीत आला आहे. काही कवी रंगमंचावरून आपल्या कविता सादर करतात व त्यासाठी व्यासपीठावर सजावट, वाद्यमेळ, गेयता, जमल्यास नृत्य व नाटय़ या साऱ्याची जोड त्यांना देतात. कुठल्या कवीने आपली कविता कशा प्रकारे रसिकांपर्यंत पोहोचवावी हा ज्याच्या त्याच्या पसंतीचा प्रश्न असला तरी कवितेभोवती इतकी सारी सजावट करताना कवितेचे कवितापणच त्यात हरवून जात नाही ना, याची काळजी कवीने घेतली पाहिजे असे मला वाटते.

आजच्या कवींमध्ये मला आणखी एक प्रवृत्ती दिसून येते व ती भयावह आहे असे मला वाटते. हे कवी इंग्रजी कविता वाचतात, इतर प्रांतभाषांतल्या कविता वाचतात, पण मराठी कवितेची पूर्वपंरपरा ते जाणून घेत नाहीत. ही परंपरा म्हणताना मला एकीकडे संतपंडितांचे प्राचीन काव्य अभिप्रेत आहे तर दुसरीकडे ओव्या, स्त्री-गीते, लोकगीते, ग्रामीण गीते वगैरे मौखिक काव्य प्रकारांशी परिचय या दोन्ही गोष्टी कवींना आवश्यक आहेत, ते त्यांना उमगत नाही.जी गोष्ट जुन्या काव्यपरंपरेची तीच गोष्ट भजन, कीर्तन, भारूड, कूटकाव्ये, विराण्या यांची. या पारंपरिक काव्यरूपांना आधुनिक वळण देऊन त्यातून नव्या कवींना आपली कविता अधिक सुंदर, समृद्ध करता येईल.

संकलन – शेखर जोशी

(ज्ञानदा पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी प्रकाशित केलेल्या शांता शेळके यांच्या ‘पत्रं पुष्पं’ या पुस्तकावरून साभार)

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/१६ फेब्रुवारी २०१७)

मरणाचे स्मरण ठेवणे हा पापातून मुक्त होण्याचा उपाय


कला वक्तृत्वाची-१६

विनोबा भावे

मरणाचे स्मरण ठेवणे हा पापातून मुक्त हो्ण्याचा उपाय

संकलन-शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/१५ फेब्रुवारी २०१७)

ग्रंथ प्रकाशन व्यवसाय मनाची मशागत करणारा


कला वक्तृत्वाची-१५

जयंतराव साळगावकर

ग्रंथ प्रकाशन व्यवसाय मनाची मशागत करणारा

संकलन-शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धीी- लोकसत्ता/मुख्य अंक/१४ फेब्रुवारी २०१७)

युवकांसाठी वक्तृत्व महोत्सव साजरे केले जावेत- प्रा. शिवाजीराव भोसले


कला वक्तृवाची-१४

प्रा. शिवाजीराव भोसले

युवकांसाठी वक्तृत्व महोत्सव साजरे केले जावेत

तर्कशास्त्र व तत्त्वज्ञान विषयांचे अध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, संपूर्ण महाराष्ट्रभर विविध विषयांवर अनेक व्याख्याने देणारे लोकप्रिय व फर्डे वक्ते प्रा. शिवाजीराव भोसले यांचे ‘वक्तृत्व स्पर्धा’ आणि ‘भाषणे’ याविषयीचे विचार.

वक्तृत्व ही एक साधना आहे. तिचा संबंध अभ्यास, अभिव्यक्ती, विचार, भाषा, व्यक्तिमत्त्व अशा अनेक घटकांशी असतो. या सर्वाचे वारंवार प्रत्यक्ष प्रकटीकरण होत गेले, तर त्यांचे सहज संवर्धन घडते. ते घडावे या हेतूने वक्तृत्व सोहळ्यांचे नियोजन व्हावयास हवे. प्रतिवर्षी काही संगीत महोत्सव साजरे होतात तसे युवकांसाठी वक्तृत्व महोत्सव साजरे करता आले तर किती बरे होईल. ज्यांना बोलणे आवडत असेल, बोलणे या प्रकारात रस असेल, आपल्या शब्दसामर्थ्यांचे व विचारशक्तीचे कोठेतरी मुक्त आविष्करण व प्रकटीकरण घडावे, असे वाटत असेल. अशा मुला-मुलींचा एखादा आनंदमेळावा अगदी आवर्जून भरवावा आणि त्यांना बोलते करावे.

जर आपले वक्तृत्वकलेवर प्रेम असेल व नव्या पिढीविषयी मनात कौतुकाची भावना असेल तर आपण असे वातावरण निर्माण करावे की मुलांनी मनोभावे बोलत राहावे. त्यांच्या मनावर कसलेही दडपण येऊ देऊ नये. ज्यांना प्रभावी वक्तृत्व नावाची शक्ती प्रसन्न करून घ्यावी, असे वाटत असेल तर त्यांनी आपल्या मनातले विचार आपल्या भाषेत मनापासून मांडण्याचा प्रयत्न करावा. बोलणे आनंदाने व उत्स्फूर्तपणे करावे. पारितोषिक हे वक्तृत्वचे फळ किंवा गमक मानू नये. मागच्या पिढीशी तुलना करता आजकालची अनेक मुले उत्तम भाषण करतात. मराठी, हिंदूी, इंग्लिश या भाषांतून प्रकट होणारे हे रसवंतीचे झरे आटू नयेत, याची सर्वानी काळजी घेतली पाहिजे. स्पर्धेपेक्षा वत्कृत्वाला आणि संयोजक व परीक्षक यापेक्षा वक्त्यांना महत्त्व मिळाले पाहिजे. मनापासून बोलणाऱ्याला मानसिक आनंद मिळतो.

भाषणे हा प्रकार केव्हा अस्तित्वात आला आणि कसा रूढ झाला हे सांगणे अवघड आहे. माणसांचे प्रारंभीचे बोलणे परस्परांशी व संवादरूप होते. या बोलण्यामुळे मने कळत होती, कामे होत होती. पुढे पुढे कळणे आणि बोलणे वाढतच गेले. सगळ्याच गोष्टी बदलत, सुधारत, संस्कारित, संवर्धित होत राहिल्या. जीवन हा एक परिवर्तनप्रवाह आहे. नित्यनूतनता हा त्याचा भाव आहे. बोलण्याच्या पद्धती यासुद्धा अशाच बदलल्या.

टिकून राहणारी भाषणे कशामुळे टिकली याचाही शोध घ्यावा लागेल. एका भाषणासाठी अरतीपरतीचा अनेक तासांचा प्रवास हा एक सायास असतो. भाषण हे उभ्यानेच करावे लागते. तोही एक ताण असतो. मनापासून बोलणाऱ्याला एक मानसिक आनंद मिळतो, हे खरे आहे. लोकांच्या सद्भावना व सदिच्छा ही एक अमूर्त आणि अनामिक शक्ती वक्त्याच्या कायेत प्रवेश करते. ही यंत्रशक्ती नसते, ती मन:शक्ती असते. उत्तम भाषणातही एक प्रकारची अपूर्णता राहू शकते. लिहिताना एखादी चूक घडली तर खाडाखोड करता येते. लिहिलेले वाक्य बदलून पुन्हा लिहिता येते. समर्पक शब्द सुचेपर्यंत थांबता येते. भाषणात ही संधी मिळत नाही. मागे वळून पाहता येत नाही. मध्येच थांबता येत नाही. फक्त एवढेच की नित्य उपाययोजनांमुळे मनाच्या काही शक्ती वाढीस लागतात. वक्ता हाच स्वत:चा श्रोता होतो. साक्षित्वाने स्वत:चे बोलणे ऐकत, त्यात रस घेत, जरूर तेथे थोडा बदल करीत तो बोलू शकतो. वाट पाहत पावले टाकणे, हा सराईत पांथस्थाचा गुण बोलणाऱ्याच्या अंगी उतरतो. त्याच सहजतेने तो सभासंचार करतो.

येथून पुढे भाषणांना बहर येईल काय? अर्थपूर्ण, रसपूर्ण, भावपूर्ण भाषणे केली जातील काय? लोकांना भाषणांचे आकर्षण राहील काय? सभा भरतील काय? एकूण परिस्थिती निराशाजनक नसली तरी फारशी आशादायकही नाही. लोकांच्या आवडी बदलत चालल्या आहेत. सिनेसंवाद आणि गीते यांनी अलंकृत झालेली वाणी रसवंतीच्या राज्यात रमणार नाही असे वाटते. या पिढीतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अतिशय प्रगल्भ आहेत. पण बिकट जीवनकलहामुळे आलेली व्यग्रता त्यांना शब्दांची आणि विचारांची हौसमौज करण्याची संधी देत नाही. जगण्याची दिशा आणि ओघ यात सतत आणि अकल्पित बदल होत आहेत.

साहित्य, संगीत, तत्त्वज्ञान यांचा मूलगामी विचार मागे पडत चालला आहे. व्यायामशाळा आणि ग्रंथालये कमी होत चालली आहेत. दवाखाने, औषधांची दुकाने यांची संख्या वाढते आहे. भेळपुरीची दुकाने आणि गाडे रात्रभर चालत आहेत. अशा स्थितीत संस्कृतीच्या आकाशात शब्दांची इंद्रधनुष्ये दिसतील काय? विचारांची नक्षत्रे आढळतील काय? तंत्रविद्येमुळे पंचमहाभूते शरणागती पत्करून आपल्या सेवेत सतत राहतील, पण तुकोबांची अभंगवाणी, ज्ञानदेवांची अमृतवाणी, मुक्तेश्वराची विवेकवाणी श्रवणी पडेल काय? विवेकानदांची भाषणे, सावरकरांची व्याख्याने ही वाग्देवतेची रूपे पुन्हा पाहावयास मिळतील काय?

(प्रा. शिवाजीराव भोसले लिखित आणि अक्षरब्रह्म प्रकाशन प्रकाशित ‘एक विचार मांडव जागर खंड १ व २’ या पुस्तकांवरून साभार)

संकलन-शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/१३ फेब्रुवारी २०१७)

कीर्ती आणि सामर्थ्य यात फरक आहे--डॉ. पु.ग. सहस्त्रबुद्धे


कला वक्तृत्वाची-१३

डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे

कीर्ती आणि सामर्थ्य यात फरक आहे

प्रखर बुद्धिवादी, राष्ट्रीय विचारवंत, समाजशिक्षक, ग्रंथकार, अभ्यासू वक्ते असलेले डॉ. पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे यांनी ‘लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान’ या विषयावर आठ व्याख्याने दिली होती. यापैकी सहा व्याख्यानांमध्ये त्यांनी ‘भारतीय लोकसत्तेच्या सामर्थ्यां’चे मूल्यमापन केले होते. त्यातील ‘राष्ट्रीय स्वार्थाची उपासना’ या व्याख्यानातील काही भाग.

१९५४ सालीच चीनने भारताचा सीमाप्रांत बळकावला होता. आपल्या पंतप्रधानांनी काही राजकीय धोरणाने ते भारताच्या नागरिकांना कळू दिले नाही इतकेच. पण नव्याने उघडकीस आलेल्या सत्यामुळे या आक्रमणाचे स्वरूप जास्त भयानक आहे असे ठरते. चीनमध्ये कम्युनिस्टांची सत्ता १९४९ मध्ये प्रस्थापित झाली आणि त्यानंतर अवघ्या पाच वर्षांत भारतासारख्या एका मोठय़ा राष्ट्राला शह देण्याइतके सामथ्र्य, इतका आत्मविश्वास चीनला प्राप्त व्हावा हे जितके आश्चर्यकारक तितकेच भारताच्या दृष्टीने लज्जास्पद आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळून बारा वर्षे झाली, पण आपला एकही प्रश्न सोडविण्यात आपल्याला यश आलेले नाही. गोवा, काश्मीर हे प्रश्न बाजूलाच राहिले. पाकिस्तानकडून आपले कर्ज वसूल करण्याचे सुद्धा सामथ्र्य आपल्यात नाही. आणि चीनला मात्र चार-पाच वर्षांत भारताच्या सरहद्दीत घुसून केवळ भारताच्या नव्हे तर सर्व जगाच्या छातीवर पाय देण्याइतके सामथ्र्य प्राप्त करून घेण्यात यश आले आहे. आपले राष्ट्र नुकतेच स्वतंत्र झाले आहे तेव्हा इतक्यातच आक्रमणामुळे निर्माण होणारा संघर्ष आपण ओढवून घेतला तर आपला नाश होईल ही भीती चीनला नाही. आपण केलेला मनसुबा ‘युनो’ संघटनेला अमान्य झाला तर जगातली अनेक बलाढय़ राष्ट्रे आपल्याविरुद्ध उठतील याची चीनला पर्वा नाही आणि भारतावर स्वारी केली तर तो प्रतिकार करील आणि मग मोठे रणकंदन माजेल ही चिंता तर स्वप्नातसुद्धा चीनच्या मनाला स्पर्श करीत नाही. चीन व पाकिस्तानच्या दृष्टीने भारत हा इतका प्रतिकारशून्य, इतका दुबळा ठरला आहे. आम्ही आत्मरक्षणाला पूर्ण समर्थ आहोत असे भारताचे शास्ते सर्वाना कंठरवाने सांगत आहेत. पण आपल्या स्त्रियांची विटंबना, सरहद्दीचा भंग व तेथील नागरिकांची मानखंडना, विवस्त्र होत असलेल्या द्रौपदीकडे शांतपणे पाहणाऱ्या धर्मराजाच्या शांतपणाने भारत पाहात उभा असताना, या घोषणांना वल्गनांपेक्षा जास्त किंमत द्यावी असे कोणालाच वाटत नाही. अर्थात या संयमामुळे, या शांततावादामुळे जगात भारताची कीर्ती पसरत चालली आहे हे खरे आहे. पण कीर्ती आणि सामथ्र्य यात फरक आहे हे आपण जाणले पाहिजे.

स्वार्थ, सत्तालोभ, धनक्षोभ, जातीयता या दुर्धर रोगांनी काँग्रेसला ग्रासले आहे. त्यामुळे राष्ट्रसेवा करण्याचे सामथ्र्यच तिच्या ठायी राहिलेले नाही. आपल्या कार्यक्षमतेचा हिशेब केला तर ती शून्यावर येऊन ठेपली आहे असे दिसते. आपल्याला साधे हिशेबसुद्धा नीट करता येत नाहीत. मग ठरल्या वेळात, ठरलेल्या भांडवलात एखादी योजना यशस्वी करून दाखविणे लांबच राहिले. आपल्या रेल्वे, आपले कारखाने, आपली शेती, आपली रुग्णालये याविषयी सरकारने नेमलेल्या समित्यांचे अहवाल पाहिले तर उधळपट्टी, विध्वंस, कर्तव्यशून्यता हीच आपल्या अठरा कारखान्यांची लक्षणे होऊन बसलेली दिसतात.

आपण धर्महीन, चारित्र्यहीन तरी का झालो याचा आपण विचार केला पाहिजे. स्वातंत्र्याआधीच्या वीस-पंचवीस वर्षांत आपण अनेक सत्याग्रहसंग्राम केले होते. त्यावेळी राष्ट्राच्या हाकेला साद देऊन लक्षावधी लोक संग्रामात उतरले आणि ध्येयवादाने प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केले. गेल्या शंभर वर्षांच्या काळात रानडे, टिळक, आगरकर, लाला लजपतराय, गांधी, पटेल, नेहरू, सुभाषचंद्र यासारखे अव्वल दर्जाचे श्रेष्ठ नेते भारताने निर्माण केले आणि त्यांच्या संदेशाने प्रेरित होऊन अखिल भारतभर हिंडून, सरकारी रोषाची पर्वा न करता लोकजागृती करणारे तरुण तर प्रत्येक प्रांतात सहस्रसंख्येने निर्माण झाले होते. हे सर्व लोक आता कोठे गेले? सत्ता-मोहिनीचे दर्शन होताच हे सर्व पतित आणि भ्रष्ट झालेत काय? स्वातंत्र्यसंग्रामात निर्माण झालेले ते शुभ्र चारित्र्य, तो ध्येयवाद, ते असामान्य कर्तृत्व एकाएकी अगदी निपटून नष्ट व्हावे याला केवळ सत्तालोभ, स्वार्थ ही कारणमीमांसा पुरेशी नाही असे वाटते. रशियात, चीनमध्ये राज्यक्रांती झाली, पण सत्ता हाती आल्यामुळे तेथल्या नेत्यांच्या कर्तृत्वाचा व चारित्र्याचा इतका लोप केव्हाही झाला नाही. मग भारतातच तसे का व्हावे? आपला ध्येयवाद इतका तकलुपी, इतका दिखाऊ होता काय? कीर्ती, सत्ता, धन यांचा मोह जिंकण्याचे सामथ्र्यच भारतीयांच्या ठायी नाही काय? असे म्हणवत नाही. याची काहीतरी निराळी कारणे असली पाहिजेत. तीच आता शोधायची आहेत..

(डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे विचारमंच व त्यांचे समग्र साहित्य असलेल्या https://sites.google.com/site/drpgsahasrabudhevicharmanch/home या संकेतस्थळावरून साभार)

संकलन – शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/ मुख्य अंक/१२ फेब्रुवारी २०१७)

शुद्ध चित्ताचे बनणे आणि इतरांचे कल्याण करणे हाच उपासनांचा सारांश-स्वामी विवेकानंद


कला वक्तृत्वाची-१२

स्वामी विवेकानंद

शुद्ध चित्ताचे बनणे आणि इतरांचे कल्याण करणे हाच उपासनांचा सारांश

स्वामी विवेकानंद रामेश्वर मंदिरात गेले होते. तेथे जमलेल्या लोकांनी काहीतरी बोलावे अशी विनंती त्यांना केली. त्यावेळी स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या भाषणातील काही भाग. धर्म हा अनुरागांत असतो, अनुष्ठानात नव्हे. हृदयातील पवित्र आणि निष्कपट प्रेमातच धर्माचे अधिष्ठान असते. जर देह आणि मन शुद्ध नसेल तर मंदिरात जाऊन शिवपूजा करणे व्यर्थ होय. या कलियुगात लोक इतके अवनत होऊन गेले आहेत की त्यांना वाटते की आपण एरवी हवे तसे वागू, तीर्थस्थानी जाताच आपली सगळी पापे धुऊन निघतील. परंतु वस्तुत: कुणी जर अपवित्र भावाने एखाद्या तीर्थाला जाईल तर तिथे जमा झालेले इतर सगळ्या लोकांचे पाप त्याच्या मानगुटीला येऊन बसेल. पापाचा आधीपेक्षा आणखी मोठा बोजा खांद्यावर घेऊन त्याला घरी परतावे लागेल. सगळ्या उपासनांचा सारांश आहे, शुद्धचित्ताचे बनणे आणि इतरांचे कल्याण करणे. गरीब, दुबळे, रोगी वगैरेंमध्ये ज्यांना शिव दिसतो तेच खरेखुरे शिवाचे उपासक होत. तेच खरोखर शिवाची उपासना करीत असतात.

तुम्ही शुद्धचित्ताचे व्हावयास हवे आणि जो कुणी तुमच्याकडे येईल त्याची यथाशक्ती सेवा करावयास हवी. अशा भावाने दुसऱ्याची सेवा करणे हे शुभ कर्म होय. अशा सत्कर्माच्या शक्तीने चित्त शुद्ध होते आणि सगळ्यांच्या अंतर्यामी जो शिव वसत आहे तो त्या शुद्ध चित्तात प्रकट होतो. तो शिव सगळ्यांच्याच हृदयात विराजमान आहे. जर आरशावर धूळ, माती बसलेली असेल तर त्यात आपल्याला आपले रूप दिसत नाही. आमच्या हृदयरूपी आरशावरदेखील असला अज्ञानाचा आणि पापाचा मळ साचलेला आहे. सगळ्यात मोठे पाप म्हणजे स्वार्थीपणा हे होय. स्वार्थीपणा म्हणजे आधी स्वत:चीच फिकीर करणे. आधी आपलाच विचार करणे. मी आधी खाईन, मी सगळ्यांपेक्षा जास्त श्रीमंत होईन, मीच सगळ्या धनाचा मालक होईन असे ज्याला वाटते तो स्वार्थी होय.

कुणी धार्मिक आहे की अधार्मिक आहे याची पारख करावयाची असल्यास बघावे की ती व्यक्ती कितपत नि:स्वार्थ आहे. जो अधिक नि:स्वार्थ तोच अधिक धार्मिक होय. तोच शिवाच्या अधिक जवळ असतो. आणि जर कुणी स्वार्थी असेल तर तो जरी जगातील सारी मंदिरे पुजून आला, सगळ्या तीर्थामध्ये बुचकळून आला, रोज साऱ्या अंगभर वाघासारखे भस्माचे पट्टे ओढीत असला अन् चित्यासारखे टिळे-ठिपके काढीत असला तरी तो शिवापासून खूप खूप दूर आहे असे समजावे.

स्वामी विवेकानंद यांनी मद्रास येथे दिलेल्या एका व्याख्यानातील काही भाग..

सामथ्र्यसंपन्न व्हा!

आपली उपनिषदे कितीही थोर असली, आपण ऋषींचे वंशज आहोत असा आपल्याला कितीही गर्व वाटला तरीही मला हे सांगितलेच पाहिजे की अन्य जातींशी तुलना करता आपण फार दुर्बल आहोत. प्रथमत: आपण शरीराने दुर्बल आहोत. आपले हे शारीरिक दौर्बल्य निदान आपल्या एकतृतीयांश दु:खाचे कारण आहे. आपण आळशी आहोत. आपण काम करू शकत नाही. आपण एकत्र येऊन कार्य करू शकत नाही. परस्परांवर आपण प्रेम करू शकत नाही. आपण अत्यंत स्वार्थी आहोत. आपल्यापैकी तीन जण जरी एकत्र आले तरी ते परस्परांचा द्वेष करतील, मत्सर करतील. आपली सध्याची अवस्था ही अशी आहे. आपल्यात मुळीच एकोपा नाही. आपली स्वार्थबुद्धी शिगेला पोहोचली आहे. कपाळावर आडवे गंध लावावे की उभे या गोष्टीसाठी आपण गेली शेकडो वर्षे परस्परांशी भांडत आहोत. एखाद्याच्या नजरेने माझे अन्न दूषित होईल काय, यासारख्या गोष्टींवर आपण मोठमोठे ग्रंथ लिहीत आहोत. या गोष्टी आपण गेली काही शतके करीत आलो. असल्या सुंदर व महत्त्वाच्या विषयांचे संशोधन करण्यात ज्यांचे सर्व बौद्धिक सामथ्र्य खर्ची पडले आहे अशा जातींकडून आपण कोणतीही उच्च अपेक्षा करू शकत नाही. आपण पोपटाप्रमाणे पुष्कळ गोष्टी बोलतो पण त्या प्रत्यक्ष करत नाही. केवळ बोलणे आणि काहीही न करणे ही आपली सवयच होऊन बसली आहे. याचे कारण काय? मानसिक दौर्बल्य हेच याचे कारण होय. दुर्बल मेंदू काहीच करू शकत नाही. आपण तो बलवान केला पाहिजे. प्रथम आपली तरुण पिढी सशक्त बनली पाहिजे. धर्म नंतरची बाब आहे. माझ्या तरुण मित्रांनो, सामथ्र्यसंपन्न व्हा! हा माझा तुम्हाला उपदेश आहे.

(श्रीरामकृष्ण आश्रम-नागपूर यांनी प्रकाशित केलेल्या ‘स्वामी विवेकानंद ग्रंथावली’ खंड पाचवा या ग्रंथावरून साभार)

संकलन – शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/११ फेब्रुवारी २०१७)