सोमवार, २३ जानेवारी, २०२३
सुट्टीच्या फक्त आठवणी उरल्या- बाळासाहेब ठाकरे
'मुंबई सकाळ' असताना १९९३ मध्ये 'आमची सुट्टी' हे सदर मी चालवले होते. सकाळमध्ये दरवर्षी सुट्टीच्या कालावधीत लहान मुलांसाठी 'सुट्टीचे पान' असायचे. लहान मुलांसाठीचा मजकूर या पानावर असायचा. सकाळ-पुणे कडून या पानासाठी जो मजकूर यायचा तोच आम्ही मुंबई सकाळमध्ये लावत असू. मुंबई सकाळचे तेव्हाचे संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांच्याकडे मी 'आमची सुट्टी' ही कल्पना मांडली. विविध क्षेत्रातील मान्यवर लहान असताना मे महिन्याची सुट्टी कशी घालवत होते? ते या सदरात असेल असे त्यांना सांगितले. नार्वेकर साहेबांना कल्पना आवडली आणि मला कामाला लाग म्हणून सांगितले.
यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कसेही करुन घ्यायचेच असे मनाशी ठरविले आणि प्रयत्न सुरु केले. 'मातोश्री'वर दूरध्वनीकरुन संपर्क साधला. चार/सहा वेळा प्रयत्न केल्यानंतर एका प्रयत्नात मातोश्रीवरील ऑपरेटरने बाळासाहेब यांच्याशी फोन जोडून दिला. मी माझ्या सदराची कल्पना सांगितली आणि त्यासाठी भेटीची वेळ मागितली.
बाळासाहेबांनी मला वीस मिनिटांचा वेळ दिला होता. ठरलेल्या दिवशी आणि वेळी 'मातोश्री' वर दाखल झालो. पत्रकारिता सुरु करुन चार वर्ष झाली होती. आणि मी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांच्यासमोर बसलो होतो. त्यामुळे नाही म्हटले तरी थोडेसे दडपण मनावर होतेच. पण बाळासाहेबांनी सुरुवातीलाच मोकळेपणाने बोला असे सांगून आणि कुठे राहता? मुंबई सकाळमध्ये किती वर्षे आहात? तिथे काय पाहता? अशी आस्थेवाईकपणे चौकशी करुन मनावरचे दडपण कमी केले.
खरे तर मी पहिला प्रश्न विचारुन गप्पांना सुरुवात केली आणि नंतर मला प्रश्नच विचारावे लागले नाहीत. बाळासाहेब भरभरुन बोलायला लागले. मध्येच त्यांनी, अगं मीना येऊन बस इकडे ऐकायला आणि मीनाताईही गप्पा ऐकायला येऊन बसल्या. या मुलाखतीच्या वेळी शिवसेना नेते सुभाष देसाई आणि सुधीर जोशी ही उपस्थित होते.
म्हणजे मी 'मातोश्री'वर गेलो तेव्हा अन्य काही कामासाठी बाळासाहेब यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते दोघे जण आधीच तिथे आलेले होते. आमच्या गप्पा/मुलाखत सुरु झाली तेव्हा, हे दोघे इथेच बसले तर चालतील ना? असे मला बाळासाहेबांनी विचारले. खरे तर बाळासाहेबांनी हे मला विचारले नसते तरी चालले असते पण संकेत म्हणून त्यांनी विचारले आणि मी ही हो म्हटले.
लहानपणच्या आठवणीत बाळासाहेब रंगून गेले होते. खरे तर मुलाखतीसाठी त्यांनी वीस मिनिटेच दिली होती पण या गप्पा जवळपास तास/सव्वातास चालल्या. राजकारण हा विषयच कुठे आला नाही आणि म्हणूनही ते लहानपणीच्या जुन्या आठवणीत रंगून गेले असतील. गप्पा झाल्यावर बाळासाहेब म्हणाले, मुलाखत प्रसिद्ध करण्यापूर्वी मला पाहायला मिळाली तर चांगले म्हणजे काही संदर्भ चुकायला नको. मी हो म्हटले आणि मुलाखत लिहून झाली की दूरध्वनीकरुन तुम्हाला वाचून दाखवेन असे सांगितले. बाळासाहेब यांनीही त्याला होकार दिला. एक/दोन दिवसात मजकूर लिहून झाल्यावर 'मातोश्री'वर दूरध्वनीकरुन बाळासाहेबांना मुलाखत वाचून दाखवली. एखाद, दुसरा शब्द/वाक्य बदलायला सांगून त्यांनी छान लिहिलाय असे सांगून सर्व मुलाखत ओके केली.
आणि ही मुलाखत २६ एप्रिल १९९३ या दिवशी मुंबई सकाळमध्ये प्रसिद्ध झाली. 'आमची सुट्टी' हे सदर सकाळच्या अन्य आवृत्यांमध्येही त्यांच्या सोयीनुसार आणि जागेनुसार लावले जात होते. 'आमची सुट्टी' या सदरात तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्यासह रामदास पाध्ये, दिलीप प्रभावळकर, महेश कोठारे, अजय वढावकर, दिलीप वेंगसरकर, डॉ. श्रीराम लागू, शिवाजी साटम, शाहीर साबळे, मोहन जोशी, सुरेश वाडकर या मान्यवरांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या होत्या. हे सदर तेव्हा वाचकप्रिय ठरले होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा