पंढरपूर, देहू, आळंदी, पैठणसह सर्व मंदिरे
आणि तीर्थक्षेत्रे ‘मद्य-मांस मुक्त’ करावीत
- वारकरी अधिवेशनात एकमुखी मागणी
‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांच्या धर्तीवर श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी अन् पैठण ही तीर्थक्षेत्रे, तसेच राज्यातील सर्व मंदिरे अन् तीर्थक्षेत्रे यांचा परिसर शंभर टक्के ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यात यावा; पंढरपूर येथील चंद्रभागा आणि आळंदी येथील इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी; सर्व तीर्थक्षेत्रे, मंदिरांमध्ये ‘वस्त्रसंहिता’ लागू करावी, अशा मागण्या पंढरपूर येथील वारकरी अधिवेशना’त करण्यात आल्या.
वारकर्यांच्या विविध प्रश्नांसाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री बालयोगी महाराज मठ, दत्तघाट येथे ‘वारकरी संप्रदाय’, ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘परमहंस परिव्राजकाचार्य श्री स्वामी नारायणानंद सरस्वती’ यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी सर्वांनी कोणत्याही परिस्थितीत ‘हलाल उत्पादने’ विकत घेणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. अधिवेशनासाठी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारकरी संप्रदायात हिंदुत्वाचे कार्य करण्याची शक्ती रक्ताच्या थेंबाथेंबात आहे हे वैकुंठवासी पूजनीय वक्ते महाराज यांनी दाखवून दिले आहे. सर्व प्रकरच्या ‘जिहाद’ला प्रत्युत्तर देण्यासाठी वारकरी संप्रदायाने प्रत्येक ठिकाणी हिंदूंचे प्रबोधन केले पाहिजे. जे ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणतात त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे, असे हभप प्रकाश महाराज जवंजाळ यांनी सांगितले.
पंढरपूर हे पवित्र तीर्थक्षेत्र असूनही येथे सर्रास मद्य-मांस विक्री केली जाते हे दुदैवी आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मद्य-मांस विक्रीवर बंदी असावी. त्यासाठी कठोर कायदा व्हावा, यासाठी समस्त वारकरी आणि हिंदू यांनी सरकारवर दबाव आणायला हवा, असे ह.भ.प. रामेश्वर शास्त्री महाराज म्हणाले.
सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.एम्. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती शिवराज पाटील यांच्या खंडपीठाने ‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांत नगरपालिका प्रशासनाने आणलेली ‘मांस-मद्य’ यांवरील बंदी कायम ठेवली होती. त्याचधर्तीवर महाराष्ट्र शासनाने हा निर्णय राज्यात तात्काळ लागू करावा, असे हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक आणि ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी सांगितले.
ह.भ.प. मारुती महाराज तुणतुणे, ह.भ.प. नरहरि महाराज चौधरी, हिंदू जनजागृती समिती’चे धो सोलापूर, बीड आणि लातूर जिल्हा समन्वयक राजन बुणगे, हिंदू जनजागृती समितीचे युवा संघटक हर्षद खानविलकर यांनीही विचार मांडले. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. श्रीपाद पेठकर यांनी केले.
सर्व मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करावीत; हलाल प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घालावा; गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी; लव्ह जिहाद, धर्मांतरबंदी कायदे लागू करण्यात यावेत; हिंदू देवी-देवता, संत, श्रद्धास्थानांचे विडंबन रोखण्यासाठी कठोर कायदा करावा आदी ठराव अधिवेशनात संमत करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा