शनिवार, २९ जुलै, २०२३

शतकवीर रक्तदात्यांचा गौरव

शतकवीर रक्तदाते

शंभरपेक्षा अधिकवेळा रक्तदान करुन अनेकांचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका बजाविणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने शतकवीर असणाऱ्या २० रक्तदात्यांचा विशेष सन्मान बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील 'मुंबई जिल्हा एड्स कंट्रोल नियंत्रण सोसायटी'द्वारे नुकताच करण्यात आला.


रक्तदान केल्यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. पर्यायने त्या व्यक्तीच्या कुटुंबालाही मदत होऊ शकते. ही बाब लक्षात घेता रक्तदान हे एक सामाजिक कार्य असून सर्व निरोगी व्यक्तींनी नियमितपणे रक्तदान करावे, असे आवाहन मुंबई जिल्हा एड्स कंट्रोल सोसायटी अर्थात एम-डॅक्सचे संचालक आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त  रमाकांत बिरादार यांनी यावेळी केले.  

अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजयकुमार करंजकर, सहाय्यक संचालिका (रक्त संक्रमण सेवा) श्रीमती. अपर्णा पवार, रक्त केंद्र अधिकारी, समुपदेशक आणि समाज विकास अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

रक्तदानाबरोबरच प्लेटलेट, नेत्रदान, अवयव-दान आणि देहदान यासाठी देखील सर्वांनीच पुढाकार घेणे आणि आपल्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींना यात सहभागी करून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचेही बिरादार यांनी सांगितले. 

शतकवीर रक्तदात्यांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर अविनाश सुपे, ज्येष्ठ पत्रकार  प्रसाद मोकाशी यांच्यासह किरण राजूरकर, विश्वेश लेले,  संजय डोबके, हिरोस खंबाटा, विठ्ठल शितोळे, संतोष मिश्रा, तरुण भगत, सतीश सावंत, राजेंद्र कुलकर्णी, संजय लवांडे, गणेश आमडोसकर, मनीष सावंत, मंतोष केळकर, विलास घाडीगावकर, गजानन नार्वेकर, डॉ. प्रगती वाझा, प्रशांत म्हात्रे दिव्या चंडोक यांचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: