शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०२३
शिवपिंडीवरील बर्फ आणि विरोधकांच्या हातात कोलीत
त्र्यंबकेश्वर- संग्रहित छायाचित्र गुगल फोटोच्या सौजन्याने
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील शिवपिंडीवर बर्फ जमा होण्याचा प्रकार बनावट असल्याचे उघड झाले आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात ज्यांनी हा प्रकार घडवून आणला तो पुजारी आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात कोणत्याही दबावाला बळी न पडता कठोर कारवाई झालीच पाहिजे.
गेल्या वर्षी ३० जून २०२२ या दिवशी मंदिरातील एक पुजारी आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांनी शिवपिंडीवर बर्फ जमा झाल्याची ध्वनिचित्रफित तयार करून ती समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात आली. घडलेल्या घटनेनंतर देवस्थानच्या ट्रस्टने तीन विश्वस्त सदस्यांची समिती नेमून समितीला अहवाल सादर करण्यास सांगितला. या समितीने मंदिराचे सीसीटीव्ही चित्रीकरण आणि चौकशी करून बर्फ तयार झाल्याचा हा प्रकार बनावट असल्याचा अहवाल सादर केला.
या प्रकरणी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत 'पुजारी' असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघाने पुजारी म्हणजे पुरोहित नाही. त्र्यंबकेश्वर येथे हे हे दोन घटक वेगवेगळे आहेत, अशी जाहीर सूचनाच पुरोहित संघाने केली आहे.
तथाकथित ढोंगी पुरोगामी, अंनिसवाले आणि हिंदू धर्म, संस्कृतीविरोधक आधीच टपून बसलेले असतात. त्यांच्या हातात नाहक कोलीत मिळेल असे कृत्य करायचेच कशाला? हा सगळा प्रकार चीड आणणारा आहे. या प्रकरणातील आरोपी फरार झाले असून ते अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जाते. लाखो भाविकांच्या श्रद्धेशी खेळण्याच हा प्रकार संतापजनक आहे.
या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा दबाव आणला जाणार नाही हे पाहिले पाहिजे. हा प्रकार पुजा-यानी केला आहे. भविष्यात कोणा पुरोहिताकडूनही समजा असे गैरकृत्य घडले तर त्यांच्या विरोधातही कठोर कारवाई केली जावी. मुळातच भावना,श्रद्धेशी खेळण्या-यांना कोणतीही दयामाया दाखविली जाऊ नये.बर्फ ठेवणारे ते आरोपी महादेवाच्या पिंडीवरील विंचू ठरू नयेत, ही त्या त्रंबकेश्वरचरणी प्रार्थना.
मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३
ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशनतर्फे डोंबिवलीत दोन दिवसीय परिषद
ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशतर्फे येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीत सातव्या व्यावसायिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे सहयोगी संचालक अरविंद कोऱ्हाळकर यांनी दिली.
ही परिषद डोंबिवली पूर्व येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात होणार असून परिषदेस महाराष्ट्रासह देश- विदेशातून सातशे उद्योजक उपस्थित राहणार आहेत, असेही कोऱ्हाळकर यांनी सांगितले.
उद्योग, व्यवसाय याविषयी ब्राह्मण समाजात जागरूकता निर्माण करून अधिकाधिक ब्राह्मण युवकांना उद्योग, व्यापार, व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी दिली.
तर 'लोकल ते ग्लोबल' ह्या संकल्पनेवर ही परिषद आधारित असून उद्योज क्षेत्रातील दीपक घैसास, संजय लोंढे, बँकिंग क्षेत्रातील सतीश मराठे, आशुतोष रारावीकर आदि मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस, भाजप उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार यांचे मार्गदर्शन परिषदेत होणार आहे, असे 'परिवर्तन २०२३' चे प्रमुख महेश जोशी यांनी सांगितले. दोन दिवसांच्या या परिषदेत व्यावसायिक प्रदर्शन, नेटवर्किंगद्वारे व्यवसाय वाढविण्यासाठी ई प्लॅटफॉर्म उपलब्ध असणार असल्याची माहिती उद्योजिका श्वेता इनामदार यांनी दिली.
परिषदेच्या नावनोंदणीसाठी www.parivartan23.in या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच अधिक माहितीसाठी ७२०८२६६१६९ किंवा ८३६९९३१३६६ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३
मंदिरांच्या संरक्षणासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना
हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे, त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे. यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ' स्थापना करण्यात आला आह, अशी घोषणा हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी येथे केली.
जळगाव येथील ‘पद्मालय विश्रामगृहा’त आयोजित पत्रकार परिषदेत घनवट यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष, अधिवक्ता भरत देशमुख, सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे सचिव नीळकंठ चौधरी, जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिराचे श्रीराम जोशी महाराज, हिंदू जनजागृती समितीचे जळगाव समन्वयक प्रशांत जुवेकर उपस्थित होते.
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून मंदिरांवरील सर्व प्रकारचे आघात, अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न केले जातील. मंदिरांचे सरकारीकरण होऊ न देणे, मंदिरांच्या प्रथा-परंपरा, धार्मिक कृत्ये शास्त्रीय पद्धतीने होण्यासाठी आग्रह धरणे, मंदिरांमध्ये कोणत्याही प्रकारे शासकीय-प्रशासकीय हस्तक्षेप होऊ न देणे, यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ' प्रयत्न आणि पाठपुरावा करेल, असेही घनवट यांनी सांगितले.
मंदिरांमध्ये धर्मशिक्षणवर्ग आयोजित करणे, मंदिरांमध्ये धर्मशास्त्रानुसार वस्त्रसंहिता लागू करणे, समाजाचे संघटन होण्यासाठी मंदिरांत सामूहिक गुढीपाडवा, सामूहिक शस्त्रपूजन, हनुमानचालिसापठण, महाआरती आदी उपक्रम चालू करणे, मंदिरांवरील आघातांच्या विरोधात व्यापक आंदोलन उभारणे आदि उपक्रम महासंघाकडून राबविण्यात वतीने येतील, अशी माहितीही घनवट यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारने सरकारीकरण झालेली मंदिरे मुक्त करून न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावे, राज्य सरकारने मंदिरांची संपत्ती विकासकामांसाठी न वापरण्याची घोषणा करावी, पौराणिक किंवा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या; परंतु प्रशासन, पुरातत्त्व विभाग यांकडून दुर्लक्षित मंदिरांचा तात्काळ जीर्णाेद्धार करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी, राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ल्यांवरील मंदिरे यांवरील इस्लामी, तसेच अन्य अतिक्रमण यांचे सर्वेक्षण करून ती तात्काळ हटवावीत आदि ठराव यावेळी मंजूर करण्यात आले.
या ठरावांचे निवेदन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन देण्यात येणार आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान (पुणे), श्रीक्षेत्र घृष्णेश्वर देवस्थान (वेरुळ, संभाजीनगर),अष्टविनायक मंदिर ट्रस्ट, श्री तुळजापूर देवस्थान पुजारी मंडळ, श्री काळाराम मंदिर (नाशिक), श्री लक्ष्मण मंदिर (पंचवटी, नाशिक), श्री रेणुकामाता मंदिर (माहूर), श्री कानिफनाथ देवस्थान (गुहा), श्री गणपति मंदिर देवस्थान मंडळ (पद्मालय, जळगाव), श्रीराम मंदिर (जळगाव), श्री मंगळग्रह सेवा संस्थान (अमळनेर), अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघ, सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठान, बालाजी मंदिर (पारोळा), नवकार जैन टेम्पल ट्रस्ट, श्री बालाजी महाराज संस्थान (देऊळगाव राजा) यांसह महाराष्ट्रातील विविध मंदिरांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते.
काशी येथील ‘ज्ञानवापी’ मुक्तीसाठी लढा देणारे सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन, जैन इरिगेशनचे आणि श्री पद्मालय मंदिराचे अध्यक्ष अशोक जैन, सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सदगुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे हे ही उपस्थित होते, अशी माहिती प्रशांत जुवेकर यांनी दिली.
शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३
आधी कोथरूड आता कसबा गृहित धरणा-यांना धडा शिकवा
जे कोथरूड मतदार संघात झाले तेच आता कसबा मतदार संघात घडते आहे, घडवून आणले जात आहे. दोन्ही ठिकाणची परिस्थिती जरी वेगळी असली तरी 'सॉफ्ट टार्गेट' 'कुलकर्णी' आणि 'टिळक' हेच आहेत हे स्पष्ट आहे. 'नाना फडणविशी' खेळी तेव्हाही खेळली गेली आणि आताही खेळली गेली आहे. त्यामुळे 'आधी कोथरूड आता कसबा गृहित धरणा-यांना मतपेटीतून धडा शिकवा' असे म्हणण्याची आणि कृती करण्याची वेळ आली आहे.
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासाठी सुरक्षित मतदार मतदार संघ हवा म्हणून तेव्हा प्रा. मेधा कुलकर्णी यांचा 'राजकीय बळी' घेण्यात आला. जे चंद्रकांत पाटील इतकी वर्षे कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करतात त्यांना स्वतः:ला इतक्या वर्षांत कोल्हापूर मतदार संघ का बांधता आला नाही? हे त्यांचे आणि भाजपचे अपयशच म्हणायचे.
बरे, चंद्रकांत पाटील यांना अगदी सुरक्षितच मतदार संघ हवाच होता तर तो डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा ही होता. अगदी शंभर टक्के 'चंपा' इथून निवडून आले असते. पण जी हिंमत कोथरूड मतदार संघात मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी कापण्यात देवेंद्र फडणवीस यांनी आणि भाजपच्या चाणक्यांनी दाखविली ती त्यांनी डोंबिवलीत रवींद्र चव्हाण यांच्याबाबतीत दाखविली नाही. कारण भाजपसाठी 'चव्हाण' यांच्यापेक्षा 'कुलकर्णी' हे सॉफ्ट टार्गेट होते. फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी डोंबिवलीत चव्हाण यांची उमेदवारी रद्द केली असती तर कदाचित मनी मसल पॉवर असलेल्या चव्हाण यांनी वेगळी वाट निवडली असती. आणि ते चंद्रकांत पाटील यांच्यासाठीही अडचणीचे ठरले असते. त्यामुळे भाजपच्या 'फडणविशी' खेळीने त्या तुलनेत कमी त्रासदायक किंवा त्रासदायक ठरणारच नाही, अशा 'कुलकर्णी' यांची उमेदवारी रद्द केली.
आता तीच खेळी कसबा मतदार संघात खेळली जात आहे. जो न्याय चिंचवड मतदार संघासाठी लावण्यात आला तोच न्याय कसबा मतदार संघासाठी लावण्यात येणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. चिंचवड आणि कसबा येथील उमेदवार जाहीर करण्यापूर्वी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी टिळक कुटुंबीयांची भेट घेतली आणि दिवंगत मुक्ता टिळक यांचे पती आणि मुलाची 'समजूत' काढली. यात गंमत अशी की टिळक कुटुंबातील एकाची पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती केली. खरे तर त्याची काहीच आवश्यकता नव्हती. पण आता टिळक कुटुंबातील एकाला पक्षप्रवक्तेपद दिल्याने पुन्हा कुटुंबातील अन्य व्यक्तीला उमेदवारी कशी द्यायची? असे साळसुदपणे सांगितले गेले. बिंबवले गेले.
हे सर्व करणे म्हणजे मतदारांना गृहीत धरणे आहे. आपण काहीही केले तरी मते आपण ज्याला ऊभा करू तोच निवडून येणार, पारंपारिक मतदार झाले गेले विसरून त्यालाच मतदान करणार, असा आत्मविश्वास भाजपच्या चाणक्यांना आहे आणि तो चुकीचा किंवा खोटा नाही. हेच सर्व ठिकाणी चालत आले आहे. या गृहीत धरण्याला कुठेतरी आळा बसण्याची, फाजील आत्मविश्वासाचा फुगा फोडण्याची वेळ आली आहे.
एकदा तरी धडा मिळू दे, निकाल वेगळा लागू दे...
©️ शेखर जोशी
शनिवार, २८ जानेवारी, २०२३
संस्कृत राजभाषा व्हावी' असे सांगणारे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे अभिनंदन
ी
आपल्या देशासाठी संस्कृत अत्यंत उपयुक्त भाषा आहे आणि संस्कृत राजभाषा व्हावी, असे स्पष्ट शब्दात सांगणारे भारताचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे अभिनंदन.
काही सन्माननीय अपवाद वगळता उच्च पदावर काम करणारी, काम केलेली माणसे भारतीय संस्कृती, धर्म, अध्यात्म, परंपरा याविषयी थेट समर्थन करणारी भाषा बोलत नाहीत. आपण असे काही बोललो, याचे समर्थन केले तर आपण प्रतिगामी ठरू, आपल्यावर मागासलेपणाचा, उजवी विचारसरणी असल्याचा शिक्का बसेल, अशी अनाठायी भीती या मंडळींना वाटत असते. किंवा काही मंडळींना मनातून हे पटलेले असले तरी हे सर्व नाकारून हे लोकं स्वतःला पुरोगामी म्हणवून घेण्यात धन्यता मानत असतात. त्या पार्श्वभूमीवर बोबडे यांनी संस्कृत भाषा, त्याचे महत्त्व आणि एकूणच संस्कृत भाषेच्या महत्वाविषयी जे भाष्य केले ते कौतुकास्पद आहे.
उच्च न्यायालयांसाठी संस्कृत अधिकृत भाषा म्हणून स्वीकारल्यास अपील हाताळणे सोपे होईल त्यासाठी शब्दसंग्रह विकसित करण्याची गरज आहे. 'संस्कृत भारती' ने नागपूर येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय युवा संमेलनात बोलताना बोबडे यांनी हे मत व्यक्त केले.आपल्या देशासाठी संस्कृत ही अत्यंत उपयुक्त भाषा आहे. त्यामुळे ती केवळ देवभाषा न राहता, धर्माशी न जोडता राजभाषा व्हावी, असेही त्यांनी सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नोव्हेंबर १९४९ मध्ये संविधान सभेत राष्ट्रीय आणि दुवा भाषा म्हणून स्वीकारलेल्या हिंदीचा विकास करण्यासाठी संस्कृतचा परिचय करून देण्याचा प्रस्ताव दिला होता मात्र चर्चेनंतर विधानसभेने डॉ. आंबेडकरांचा मूळ प्रस्ताव लांबवला आणि आठ अनुसूचित भाषांशी जोडला, असेही बोबडे म्हणाले.
शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३
ओम सदगुरू प्रतिष्ठानतर्फे श्रीगुरुचरित्र पारायण सप्ताह
ओम सद्गुरू प्रतिष्ठानतर्फे बोरिवली येथे येत्या ३० जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत श्रीगुरुचरित्र पारायणाचा ४० वा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमही होणार आहेत.
ओम सद्गुरू प्रतिष्ठानचे संस्थापक, सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांनी गाणगापूर यात्रेनिमित्त होणाऱ्या श्री गुरुचरित्र पारायणाची सुरवात १९८४ साली केली होती. ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान दररोज सकाळी सहा वाजता सद्गुरू भाऊ महाराज करंदीकर यांच्या ध्वनिमुद्रित आवाजातील श्रीगुरुचरित्राच्या अध्यायांचे पारायण होणार आहे.
दररोज संध्याकाळी लक्षार्चना, व्याख्यान, कीर्तन, प्रवचन आणि संगीत सेवा असे विविध अध्यात्मिक कार्यक्रम होणार आहेत.
मंगळवार ३१ जानेवारी रोजी लक्षार्चना, बुधवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी प्राची गडकरी यांचे "देवाचिये द्वारी" या विषयावर व्याख्यान, गुरुवार २ फेब्रुवारी रोजी ह. भ. प. वीणा खाडिलकर यांचे 'संत परम हितकारी' या विषयावर कीर्तन होणार आहे. शुक्रवार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत दत्तयाग तर ४ फेब्रुवारी रोजी डॉ. पं. संदीप अवचट यांचे 'शास्त्रामागचे विज्ञान' या विषयावर व्याख्यान, रविवार ५ फेब्रुवारी रोजी प पु गुळवणी महाराज यांचे शिष्य कानडे गुरुजी यांचे 'भारतीय कालगणना' या विषयावर प्रवचन, सोमवार ६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता 'मलन सप्तसुरांचे - भावगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारी महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.
उत्सवाचे कार्यक्रम ओम सद्गुरू प्रतिष्ठान, ए/८, दौलत नगर रस्ता क्र. ७, प प टेम्बेस्वामी महाराज चौक, नवनीत
रुग्णालयाशेजारी, बोरिवली (पूर्व) येथे होणार आहेत. संपूर्ण उत्सव सर्वांसाठी खुला असून विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - शशी करंदीकर ९७६९९३९०४५
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...
-
राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला हाच का तुमचा सार्वजनिक गणेशोत्सव? शेखर जोशी राज्य शासनाने म्हणे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य महो...
-
ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कल्याणला जोडल्या जाणाऱ्या अर्धवट बांधकामाचे थडगे ही छायाचित्रे डोंबिवली पूर्व भागातील ठाकुर्ली परिसरातील आहेत. छ...














