गुरुवार, ३ जुलै, २०२५

आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी अधिवेशन

आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी अधिवेशन पंढरपूर, दि. ३ जुलै वारकर्‍यांच्या श्रद्धास्थानांवर होणारे आघात, संघटन आणि अन्य संबंधित प्रश्नांसाठी येत्या ६ जुलै रोजी पंढरपूर येथे वारकरी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांची श्रद्धास्थाने, देवता आणि संतांवरील आघात व उपाय यावर अधिवेशनात चर्चा होणार आहे. हिंदू जनजागृती समितीसह वारकरी संप्रदाय आणि संघटना, राष्ट्रीय वारकरी परिषद, श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला, महाराष्ट्र मंदिर महासंघतर्फे आयोजित हे वारकरी अधिवेशन दुपारी एक ते साडेतीन या वेळेत श्री गंगागिरी महाराज मठ, भक्तीमार्ग, जनकल्याण रुग्णालयाच्या शेजारी येथे होणार आहे. महंत रामगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या अधिवेशनात ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. रामेश्‍वरशास्त्री महाराज, सचिव ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्‍वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ आणि हिंदुत्ववादी संस्था/ संघटनांचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र, छत्तीसगडचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली. पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण, मुक्ताईनगर यांसह सर्व तीर्थक्षेत्रे कायमस्वरूपी मद्य आणि मांस यांपासून मुक्त करावीत, तसेच या सर्व तीर्थक्षेत्री १० किलोमीटर परिसरात अहिंदूंच्या धर्मप्रसारावर बंदी आणावी, संत, संत-वांङ्मय, राष्ट्रपुरुष, धर्म, देवता आदींचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई होण्यासाठी ईशनिंदा प्रतिबंधक कायदा लागू करावा, संतांच्या श्‍लोकांचा चुकीचा अर्थ लावून वारीचे वातावरण कलुषित करणार्‍यांना शासनाने कायमचा प्रतिबंध केला जावा, गोहत्या आणि गो तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्रातील गोहत्या प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जावी, हिंदू युवतींचे रक्षण होण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तात्काळ संमत करण्यात यावा, इंद्रायणी आणि चंद्रभागा या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केली जावी इत्यादी मागण्यांवर अधिवेशनात चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे. धर्मरक्षणार्थ कार्य करणाऱ्या धर्मरक्षकांचा अधिवेशनात गौरव करण्यात येणार आहे. अधिवेशनासाठी वारकरी-भाविक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - राजन बुणगे ९७६२७२१३०४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: