मंगळवार, ८ जुलै, २०२५

देव, देश, धर्माच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करा

देव, देश, धर्माच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करा - समस्त वारकरी संप्रदाय, संस्था, संघटनांची मागणी पंढरपूर, दि. ८ जुलै आषाढीवारी चालू असतांना पुणे येथे वारकर्‍यांवर मांस फेकण्याचा प्रकार झाला. वारीत विविध संघटनांकडून घुसखोरी सुरू आहे. देव, देश, धर्म यांच्यावर सातत्याने आघात घडवून आणले जात असून देव, देश, धर्माच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समस्त वारकरी संप्रदाय, संस्था, संघटनांकडून करण्यात आली. वारकरी संघटना आणि संप्रदाय, राष्ट्रीय वारकरी परिषद, सद्गुरु श्री गंगागिरी महाराज संस्थान, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समितीतर्फे पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या वारकरी संमेलनात ही मागणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘व्हिडिओ कॉल’ करून वारकऱ्यांशी संवाद साधला आणि 'वारकरी व संतपरंपरा महाराष्ट्राचे वैभव असून सरकार नेहमीच वारकर्‍यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले. अधिवेशनात महंत रामगिरी महाराज, श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्‍वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, विश्‍व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री आणि सत्संगप्रमुख दादा वेदक, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगडचे राज्य संघटक सुनील घनवट, शिवव्यंकटेशानंद भारती स्वामी, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. नरेंद्र महाराज मस्के यांच्यासह अन्य मान्यवरांची भाषणे झाली. सूत्रसंचालन ह.भ.प. दत्तात्रय चोरगे महाराज यांनी केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात खोट्या खटल्यात अडकवून दोन वर्षे कारावास भोगावा लागलेले तसेच ‘दाभोलकर हत्या आणि मी’, आणि ‘मालेगाव स्फोटामागील अदृश्य हात’ हा पुस्तकाचे लेखक विक्रम भावे, वारकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांवर सातत्याने आवाज उठवणारे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वरिष्ठ वार्ताहर अजय केळकर, सुदर्शन वाहिनीचे वार्ताहर दीपक चव्हाण, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे गणेश लंके यांचा महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वारीत होणारी नक्षलवादी, साम्यवादी यांची घुसखोरी या संदर्भात विधान परिषेदत आवाज उठविल्याप्रकरणी शिवसेनेच्या सचिव, प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले. पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण, मुक्ताईनगर यांसह सर्व तीर्थक्षेत्रे कायमस्वरूपी मद्य आणि मांस यांपासून मुक्त करावीत, या सर्व तीर्थक्षेत्री १० किलोमीटर परिसरात अहिंदूंच्या धर्मप्रसारावर बंदी आणावी, संत, संत-वांङ्मय, राष्ट्रपुरुष, धर्म, देवता आदींचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई होण्यासाठी ईशनिंदा प्रतिबंधक कायदा लागू करावा, संतांच्या श्‍लोकांचा चुकीचा अर्थ लावून वारीचे वातावरण कलुषित करणार्‍यांना शासनाने कायमचा प्रतिबंध करावा, गोहत्या आणि गोतस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्रातील गोहत्या प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, हिंदू युवतींचे रक्षण होण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तात्काळ संमत करावा, इंद्रायणी आणि चंद्रभागा या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी इत्यादी ठराव मंजूर करण्यात आले‌.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: