बुधवार, ९ जुलै, २०२५

सोनदरा गुरुकुलात श्री सत्यवृक्ष महापूजा आणि व्रताचा शुभारंभ

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सोनदरा गुरुकुलात श्री सत्यवृक्ष महापूजा आणि व्रताचा शुभारंभ शेखर जोशी डोंबिवली, दि. ९ जुलै बीड जिल्ह्यातील डोमरी येथील दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान संचालित सोनदरा गुरुकुलात उद्या (१० जुलै) गुरुपौर्णिमा आणि संस्थेच्या ३९ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने श्री सत्यवृक्ष महापूजा आयोजित करण्यात आली आहे. तसेच यावेळी श्री सत्यवृक्ष व्रताचाही शुभारंभ करण्यात येणार आहे. श्री सत्यवृक्ष व्रत हा आगळावेगळा उपक्रम गुरुकुलातील निवासी कार्यकर्ते महेश खरे यांच्या संकल्पनेतून साकारला आहे. २१ जुलै १९८६ रोजी नानाजी देशमुख यांच्या प्रेरणेतून व त्यांचे सहकारी कृष्णा दामोदर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली डोमरी गावातील सर्वसामान्य कुटुंबातील सुदाम भोंडवे या तरुणाने सोनदरा गुरुकुल ही शैक्षणिक संस्था सुरु केली. मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाच्या समस्येवर उपाय म्हणून हे गुरुकुल बालाघाटाच्या डोंगर उतारावर सुरु झाले. डोंबिवलीकर महेश खरे आणि त्यांच्या पत्नी पूनम हे दोघेही गेल्या दीड वर्षापासून सोनदरा गुरुकुलात निवासी कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत.
निसर्गाची बेसुमार हानी ही सध्याची गंभीर समस्या असून ती सोडवण्यासाठी टाकलेले पाऊल म्हणजे श्री सत्यवृक्ष व्रत असून या उपक्रमाच्या माध्यमातून निसर्ग जतन, संरक्षण आणि संवर्धनाचा प्रयत्न केला जाणार आहे. गुरुवारी सकाळी दहा वाजता सोनदरा गुरुकुलाच्या कदंबवन शैक्षणिक संकुलात हा कार्यक्रम होणार असल्याचे उपक्रमाचे संकल्पनाकार महेश खरे यांनी सांगितले. गुरुवारी होणा-या कार्यक्रमात श्री सत्यवृक्ष व्रतात रुद्राक्ष वृक्षाची विधिवत पूजा केली जाणार आहे. पूजा झाल्यावर निसर्ग, पर्यावरण जतन व संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना याविषयीच्या माहितीचे कथा/अध्याय स्वरूपात वाचन केले जाणार असून 'निसर्ग आरती'ने श्री सत्यवृक्ष व्रता/पूजेची सांगता होणार आहे. पूजा केलेला रुद्राक्ष वृक्ष तसेच राहुरी कृषी विद्यापीठातून आणलेल्या आणि गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीतील आराध्य वृक्षांची जी रोपे तयार केली आहेत त्यांचेही रोपण संकुलातील आवारात केले जाणार आहे. गुरुकुलातील विद्यार्थ्यांकडून गेल्या वर्षी सुमारे साडेचारशे झाडांची लागवड देवराई पद्धतीने कदंबवन परिसरात करण्यात आली होती. गेले वर्षभर विद्यार्थ्यांनी त्यांची देखभाल केली असून यापैकी पाच झाडांचा वाढदिवस प्रातिनिधिक स्वरूपात साजरा केला जाणार आहे. या झाडांची पूजा व औक्षण केले जाणार असल्याची माहितीही खरे यांनी दिली.
भारतीय संस्कृतीत अनेक रुढी-परंपरा असून धर्म आणि रूढींच्या माध्यमातून काही चांगल्या गोष्टी समाजात रूढ केल्या गेल्या. सध्या आपल्यासमोर प्रदुषण, वृक्षतोड, नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर, कचऱ्याचे अव्यवस्थापन अशा पर्यावरणविषयक अनेक समस्या आहेत. समाजातील श्रद्धा, परंपरा आणि आधुनिक विचार यांची सांगड घालून हे नवे ‘सत्यवृक्ष’ व्रत / पूजा तयार करण्यात आली आहे. या व्रतामुळे वृक्षपुजन, वृक्षसंवर्धन आणि सर्व जीवांसह निसर्गस्नेह हे संस्कार होणे अपेक्षित असून हे व्रत व्यक्तिशः, समुहाने वा संस्थात्मक पातळीवर कोणीही करू शकेल, असे खरे म्हणाले. या आगळ्या कार्यक्रमासाठी निसर्ग व पर्यावरणप्रेमी नागरिक, विद्यार्थी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान सोनदरा गुरुकुलाचे अध्यक्ष अनिल लोखंडे, उपाध्यक्ष सतीश कुलकर्णी, सचिव अश्विन भोंडवे यांनी केले आहे. --पूर्ण--

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: