मंगळवार, १ जुलै, २०२५

'हम' संस्थेकडून जम्मू काश्मीर येथील ११२ युद्धग्रस्तांना २५ लाखांची आर्थिक मदत

डोंबिवलीच्या 'हम' संस्थेकडून जम्मू काश्मीर येथील ११२ युद्धग्रस्तांना २५ लाखांची आर्थिक मदत डोंबिवली, १ जुलै 'जोडो काश्मिर' हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या डोंबिवलीच्या 'हम चॅरिटेबल ट्रस्ट' ने जम्मू काश्मीर येथील सीमावर्ती भागातील ११२ युद्धग्रस्त नागरिकांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. कालबद्ध आखणी आणि काटेकोर अंमलबजावणी यामुळे अवघ्या महिनाभरात निधी संकलन आणि वाटप दोन्ही गोष्टी पार पडल्या. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले.‌ या दरम्यान जम्मू काश्मीर येथील सीमावर्ती भागातील नागरिकांना तोफगोळे, क्षेपणास्त्रे, ड्रोन्स याच्या माऱ्याला सामोरे जावे लागले. यात अनेक घरांचे नुकसान झाले होते.‌ या आपत्तीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी 'हम' कार्यकर्त्यांची एक तुकडी जम्मूला गेली होती. जम्मूतील राजौरी पूंछ, नौशेरा तर काश्मीर मधील उरी, लगामा आणि सलमाबाद भागाला त्यांनी भेट दिली. या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी २५ लाख रुपये खर्च येणार होता. 'हम'ने त्याचा आराखडा तयार केला आणि ४ जून रोजी डोंबिवली येथे जाहीर कार्यक्रम घेऊन या निधीसाठी 'देणे राष्ट्राचे' म्हणून आवाहन करण्यात आले. कल्याण, भांडुप येथेही जाहीर कार्यक्रम झाले. या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. जम्मू काश्मीर मधील नागरिकांसाठी डोंबिवली, मुंबई शहर आणि उपनगरे, पुणे, ठाणे, भिवंडी , तसेच बेंगलोर, हैदराबाद अशा विविध भागातून आर्थिक मदत जमा झाली. अमेरिका, कॅनडातील भारतीयांनी सुद्धा या संकल्पाला हातभार लावला.
हम ट्रस्टच्या पेमेंट लिंकमुळे आर्थिक मदत एका क्लिकवर करणे सहज शक्य झाले. यासाठी अक्षय फाटक यांचे बहुमोल सहकार्य लाभले.‌ देणगीची रक्कम किमान १०१ रुपये ते कमाल ५ लाख रुपये अशी होती. संकेत ओक यांनी जम्मू काश्मीर मधील परिस्थितीच्या चित्रणाची ध्वनिचित्र तयार करून समाज माध्यमातून प्रसारित केली. अवघ्या वीस दिवसांत 'हम' चे विश्वस्त, कार्यकर्ते, हितचिंतक आणि देणगीदार यांच्या अथक प्रयत्नातून २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले. जम्मू काश्मीर येथील सीमावर्ती भागातील आपदग्रस्तांच्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी 'हम'च्या विश्वस्तांनी 'हम' चे संस्थापक सदस्य मनोज नशिराबादकर यांच्या सल्ल्याने व प्रत्यक्ष पाहणी करून आराखडा तयार होता. त्यानुसार ९० कुटुंबप्रमुखांच्या बँक खात्यामध्ये आर्थिक मदत देण्यात तर ज्यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा २२ जणांना 'हम' च्या विश्वस्तांनी प्रत्यक्ष भेटून धनादेशाद्वारे ही मदत केली.‌ 'हम'चे संस्थापक सदस्य मनोज नशिराबादकर यांच्यासह 'हम'चे विश्वस्त जयंत पित्रे, सुनिल देशपांडे उपस्थित होते.‌ एकूण ११२ कुटुंबांना ही आर्थिक मदत देण्यात आली.
'हम' चँरीटेबल ट्रस्ट निमित्तमात्र आहे. लोकसहभागातून आणि नियोजित कालावधीत संकल्प पूर्ण केल्याचे समाधान आणि आनंद आम्हाला आहे. देणगीदारांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळ 'जोडो जम्मू काश्मीर' हा उद्देश पूर्ण झाला, असे 'हम'चे अध्यक्ष सुनिल देशपांडे, विश्वस्त जयंत पित्रे यांनी सांगितले.

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

Link?