बुधवार, २६ नोव्हेंबर, २०२५
सरसंघचालकांचे ऐकून झाडांची कत्तल थांबणार का?
डॉ. मोहन भागवत सांगती वृक्षांची महती!
- महाराष्ट्र भाजप सरसंघचालकांचे ऐकून
झाडांची कत्तल थांबवणार की कत्तल करणार?
शेखर जोशी
भारतीय जनता पक्षासाठी आदरणीय, गुरुतुल्य असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा आदर राखून नाशिक येथील हजारो वृक्षांची संभाव्य कत्तल थांबवायची की सोयीस्कर दुर्लक्ष करून कत्तल करायची? असा पेच भाजपपुढे निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपची मातृ/ पितृ संघटना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते/ पदाधिकारी किंवा भाजपचे नेते जाहीरपणे मान्य करोत अथवा न करोत पण रा.स्व. संघाचे सरसंघचालक व संघ नेते, पदाधिकारी जे सांगतील ते भाजपसाठी शिरसावंद्य असते. कधीतरी नड्डा काहीतरी बरळतात आणि त्याचा प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष फटका कसा बसतो हे भाजपने लोकसभा निवडणुकीत पाहिले. आणि म्हणूनच पाठोपाठ झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रा. स्व. संघ, संघप्रणित संस्था, संघटना भाजपच्या बाजूने अप्रत्यक्षपणे निवडणुकीत उतरल्यावर काय परिणाम झाला ते ही पाहायला मिळाले. नगरसेवक ते खासदार पदापर्यंतच्या निवडणुकीत संघ आणि संघप्रणित संस्था/ संघटना भाजप उमेदवारांसाठी किंवा संघ ज्याच्यामागे आपली संपूर्ण ताकद उभी करेल ते निवडून येतात. संघ व संघप्रणित संस्था संघटनांचे कार्यकर्ते निस्वार्थीपणे प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष काम करतात म्हणूनच भाजपचे उमेदवार निवडून येतात हे कटू सत्य आहे. असो.
नाशिक येथे होणा-या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्रामसाठी सुमारे १ हजार ७०० झाडे तोडण्याच्या निर्णयामुळे स़ध्या वातावरण तापले आहे. पर्यावरण व निसर्गप्रेमी नाशिककर या संभाव्य वृक्षतोडीच्या विरोधात एकवटले आहेत. हा विषय ऐरणीवर आला आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरावरील धर्मध्वजारोहणप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी जे भाषण केले, एक संस्कृत श्लोक सांगून वृक्षांची सांगितली, ते भाषण महाराष्ट्र भाजप पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनावर घेऊन हजारो वृक्षांची होणारी संभाव्य कत्तल थांबविणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
भागवत यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरावरील धर्मध्वजारोहणप्रसंगी केलेल्या भाषणात
छायां अन्य कुर्वन्ति:,
तिष्ठन्ति स्वयं आतपे:,
फलान्यपि परार्थाय:
वृक्षाः सत्पुरुषा इव:
असा संस्कृत श्लोक अर्थासहित सांगितला होता.
' या धर्मध्वजावर रघुकुलाचे प्रतिक असलेला कोवीदार वृक्ष आहे. मंदार आणि पारिजात या दोन्ही वृक्षांचे गुण या कोविदार वृक्षात आहेत. हे दोन्ही वृक्ष 'देव वृक्ष' म्हणून मानले जातात. वृक्ष स्वतः उन्हात उभे राहून दुसऱ्यांना सावली, फळे देतात. वृक्ष हे सत्पुरुष असतात', असा भावार्थ भागवतांनी सांगितला.
आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्रामसाठी नाशिकच्या तपोवनातील सतराशे झाडांची कत्तल केली जाणार आहे. भाजपसाठी मातृ/पितृतुल्य असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्या संघाच्या सरसंघचालकांनी जे वृक्षमहात्म्य सांगितले, वृक्ष हे सत्पुरुष असतात, असा गुणगौरव केला त्या भागवतांचा व त्यांच्या भाषणाचा आदर करणार का? हा खरा प्रश्न आहे.
या संभाव्य वृक्षतोड/ कत्तल प्रकरणी नाशिकमध्ये अलिकडेच जनसुनावणी झाली. या जनसुनावणीत उपस्थित सर्वच नाशिककरांनी ठाम विरोध केला. झाडांची कत्तल केली जाऊ नये, अशी आग्रही भूमिका घेतली. आता महाराष्ट्र भाजपने विचार करून निर्णय घ्यायचा आहे. जनभावनेचा अनादर करून महाराष्ट्र भाजपने/ सरकारने वृक्षतोड करण्याचा निर्णय घेतलाच तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी महाराष्ट्र भाजप व सरकारला या निर्णयापासून परावृत्त केले पाहिजे. चार शब्द सुनावले पाहिजेत, अशी निसर्ग आणि पर्यावरणप्रेमींनी अपेक्षा आहे. नाहीतर भागवत यांचे भाषणही 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी' ठरेल. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला याची किंमत मोजावी लागेल, मतदारांनीही ती मोजून दाखवावी.
शेखर जोशी
२६ नोव्हेंबर २०२६
👇सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या भाषणातील काही
भाग
मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५
रामायण शिल्पांपैकी काही शिल्पे घडविण्यात शिल्पकार संदीप लोंढे यांचा सहभाग
श्रीराम मंदिराच्या पायातील रामायण शिल्पांपैकी
काही शिल्पे घडविण्यात शिल्पकार संदीप लोंढे यांचा सहभाग
- नाशिककर आणि लोंढे कुटुंबीयांसाठी गौरवाचा क्षण
नाशिक, दि. २५ नोव्हेंबर
अयोध्येतील श्रीराम मंदिरावर मंगळवारी धर्मध्वजारोहण झाले आणि नाशिक येथील शिल्पकार संदीप लोंढे व लोंढे घराण्यासाठी हा अभिमानाचा आणि भाग्याचा क्षण ठरला. अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या तळातील पायावर (lower plinth) जी रामायण शिल्पे आहेत, त्यातील काही शिल्पे घडविण्याचे भाग्य लोंढे यांना लाभले.
अयोध्येत श्रीराम मंदिरावर पवित्र भगवा ध्वज अभिमानाने, डौलाने उभारला गेला आणि माझे डोळे भरून आले. रामरायाने माझ्याहीकडून सेवा करून घेतली. यात माझ्या सहकाऱ्यांचाही मोठा वाटा आहे, अशी कृतज्ञतेची भावना यानिमित्ताने लोंढे यांनी व्यक्त केली.
आमच्या पुढील काही पिढ्यांना सांगायला आनंद होईल, की नाशिकच्या शिल्पकार लोंढे घराण्यातील एका कलाकाराला हा सन्मान मिळाला, मी धन्य झालो, अशी प्रतिक्रिया लोंढे यांनी दिली.
शेखर जोशी
२५ नोव्हेंबर २०२५
(सर्व छायाचित्रे संदीप लोंढे यांच्या फेसबुक पोस्टच्या सौजन्याने)
रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५
अत्रे ग्रंथालयातर्फे तीन दिवसीय व्याख्यानमाला
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अत्रे ग्रंथालयाच्या
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमाला
डोंबिवली, दि. २३ नोव्हेंबर
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्र के अत्रे वाचनालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्र के अत्रे वाचनालय २०१७ मध्ये डोंबिवलीच्या श्री गणेश मंदिर संस्थानाला ३० वर्षांसाठी हस्तांतरित करण्यात आले. ही व्याख्यानमाला दररोज संध्याकाळी सात वाजता श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली-पूर्व येथे होणार आहे.
२६ नोव्हेंबर २०२५ रोजी 'संविधान सर्वांसाठी' या विषयावर संविधान अभ्यासक माधव जोशी आपले विचार मांडणार आहेत. २७ नोव्हेंबर रोज 'मला शिवराय व्हायचंय' या विषयावर अतिश अविनाश कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. तर २८ नोव्हेंबर रोजी 'डिजिटल जगात सुरक्षितता;कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर संरक्षण' या विषयावर अभिषेक सोनार बोलणार आहेत.
व्याख्यानमाला सर्वांसाठी विनामूल्य असून डोंबिवलीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गणेश मंदीर संस्थांनने केले आहे.
प्र. के. अत्रे ग्रंथालयाचे सुमारे १ हजार ६०० सभासद असून ग्रंथालयात सुमारे ३९ हजार पुस्तके आहेत. येथे बारा तास मोफत वृत्तपत्र वाचनालय तसेच २५० विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सोयही उपलब्ध आहे.
शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रूरकर्मा टीपू सुलतान'ची जयंती साजरी
क्रूरकर्मा टीपू सुलतान'ची जयंती
शाळेत साजरी करणे हा 'राष्ट्रद्रोह' - हिंदू जनजागृती समिती
- माजलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रकार
बीड, दि. २१ नोव्हेंबर
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 'क्रूरकर्मा टीपू सुलतान'ची जयंती साजरी करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
शासकीय परिपत्रकात कोणताही उल्लेख नसताना, एका क्रूर शासकाचे उदात्तीकरण करणे हा केवळ नियमांचा भंग नाही, तर हिंदुच्या भावना दुखावून राज्यातील शांतता बिघडवण्याचा अक्षम्य प्रयत्न आहे. या राष्ट्रद्रोही कृत्यासाठी संबंधित शिक्षक, आयोजक आणि निष्काळजी शिक्षण अधिकाऱ्यांवर तातडीने 'गुन्हा दाखल' करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
टीपू सुलतान हा कोणताही आदर्श राजा नसून, त्याने सक्तीचे हिंदुचे धर्मपरिवर्तन, मंदिरांचा विध्वंस आणि हजारो निष्पाप हिंदुच्या हत्यांसारखी क्रूरकृत्ये केली आहेत. एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जपत असताना, शासकीय यंत्रणेचा भाग असलेल्या शाळेत अशा क्रूरकर्मा व्यक्तीचे उदात्तीकरण करणे म्हणजे पुढील पिढीला चुकीचा इतिहास शिकवून राष्ट्रविरोधी प्रवृत्तींना खतपाणी घालण्यासारखे असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे म्हणणे आहे.
हा कार्यक्रम आयोजित करणारे शिक्षक, मुख्याध्यापक व निष्काळजी शिक्षण अधिकारी यांच्यावर भारतीय दंड संहिता अंतर्गत धार्मिक भावना दुखावणे आणि राज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
तसेच संबंधित शिक्षकांचे त्वरित निलंबन करावे. जर या प्रकरणातील सूत्रधारांवर तातडीने आणि कठोर कारवाई झाली नाही, तर हिंदु जनजागृती समिती तीव्र जनआंदोलन छेडण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही हिंदू जनजागृती समितीने दिला आहे.
गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५
कल्याणमध्ये मीटर पद्धतीने रिक्षा सुरू;ही तर धूळफेक.
ही तर निव्वळ धूळफेक...
शेखर जोशी
कल्याणमध्ये मीटर पद्धतीने रिक्षा सुरू झाली म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रिक्षा चालक मालक संघटनांचे नेते, पदाधिकारी, वाहतूक पोलीस डांगोरा पिटत आहेत, पण ही निव्वळ धूळफेक आहे. रिक्षा मीटर सक्ती एखाद्या ठराविक ठिकाणी नको तर संपूर्ण कल्याण डोंबिवली शहरात सर्वत्र होण्याची आवश्यकता आहे.
या बातमीनुसार सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी कल्याण रेल्वे स्थानकातून मीटर रिक्षा चालविण्यात येत आहे. मंगळवारपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. याआधीही कल्याण, डोंबिवलीत मीटर रिक्षासाठी वेगळी रांग ठेवण्याचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी तो बंद पडला. अर्थात तो फसणारच होता. आता कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर मीटर रिक्षा सुरू करण्याचा प्रयोगही फसण्याचीच शक्यता जास्त आहे. फक्त सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळेत कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरून मीटर पद्धतीने रिक्षा चालविण्याचा हा प्रकारच मुळात हास्यास्पद आहे. म्हणजे कल्याण शहराच्या अन्य वेगवेगळ्या भागातून एखाद्याला रेल्वे स्थानकावर मीटर पद्धतीने यायचे असेल तर तो येऊ शकत नाही. रिक्षाचालक मनमानी पद्धतीने जेवढे पैसे सांगतील तेवढे देऊनच यावे लागेल. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरून सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी मीटर पद्धतीने रिक्षा सुरू करण्याचा प्रयोग अत्यंत अयोग्य व चुकीचा आहे. प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रिक्षा चालक मालक संघटना, पदाधिकारी यांना खरोखरच आणि मनापासून मीटर पद्धतीने रिक्षा सुरू करायच्या असतील तर त्या संपूर्ण कल्याण शहरात सुरू कराव्यात. संपूर्ण कल्याण शहरात मीटर पद्धतीने रिक्षा सुरू झाल्या म्हणजे शेअर पद्धत बंद करावी, असे अजिबात म्हणणे नाही. दोन्ही पद्धतीने रिक्षाप्रवास करता आला पाहिजे. रिक्षाचालक किंवा रिक्षा चालक मालक संघटना, पदाधिकारी यांना मीटर पद्धतीने रिक्षा नकोत आणि फक्त शेअर पद्धतीनेच रिक्षा चालवायचे एकमेव कारण म्हणजे जर रिक्षा मीटर सक्ती केली गेली तर रिक्षा चालकांना मनमानी पद्धतीने पैसे उकळता येणार नाहीत.
कल्याण किंवा डोंबिवलीत रेल्वे स्थानकाच्या बाहेर जे रिक्षातळ आहेत, तिथे प्रवासी बसला की ठरवून दिलेले जे शेअर भाडे आहे त्यापेक्षा जास्त पैसे रिक्षाचालक घेऊ शकत नाहीत. याउलट मीटर सक्ती नसल्याने रिक्षातळ सोडून शहराच्या कोणत्याही भागात प्रवासी रिक्षात बसला की त्याला मनमानी पद्धतीने पैसे उकळता येतात. मीटर पद्धतीने १.०५ किलोमीटर अंतरासाठी फक्त २६ रुपये इतके भाडे ठरवून दिलेले आहे. मात्र इतक्या किंवा यापेक्षाही कमी अंतरासाठी रिक्षाचालक ५० ते ७० रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त पैसे सांगतात. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि अन्य हतबल प्रवाशांना ते देऊन प्रवास करावाच लागतो. अशा रिक्षाचालकांची तक्रार करा, असे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस सांगत असतात. पण प्रत्येक वेळी प्रत्येक प्रवासी, ज्येष्ठ नागरिक रिक्षाचालकांशी वाद घालत बसत नाही. सर्वांना ते शक्य होते असे नाही.
त्यामुळे संपूर्ण शहरात, कोणत्याही भागात प्रवासी रिक्षात बसला आणि त्याने मीटरने जायचे आहे सांगितले तर रिक्षाचालकाने मीटर टाकलेच पाहिजे. आणि त्यासाठीच अमूक एखाद्या ठिकाणी, अमूक रिक्षा तळावर, मीटर रिक्षांची वेगळी रांग असा तोंडाला पाने पुसण्याचा आणि मीटर पद्धतीने रिक्षा सुरू झाल्याची धुळफेक न करता तातडीने संपूर्ण कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रिक्षा मीटर सक्ती केली जावी. सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी, रिक्षा चालक मालक संघटना, त्यांचे पदाधिकारी आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधी- अर्थात निवडून आलेले आमदार व खासदार या सर्वांनी मुठभर आणि मुजोर, बेशिस्त रिक्षाचालकांच्यापुढे नांगी टाकली आहे.
लवकरच कल्याण डोंबिवली महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत कल्याण डोंबिवलीत रिक्षा मीटर सक्ती हा मुद्दा ऐरणीवर आला पाहिजे. सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी आणि उमेदवार मत मागायला येतील तेव्हा प्रत्येकाने 'आधी रिक्षा मीटर सक्ती नंतर मतदान' किंवा ' रिक्षा मीटर सक्ती नाही तर मतही नाही' अशी भूमिका घेतली पाहिजे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही संधी आहे. आत्ता झाले तरच काहीतरी हालचाल होईल. निवडणूक पार पडली की काहीही होणार नाही.
गुगल मॅपवर अंतर पाहून भाडे द्यावे
आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो. प्रत्येक प्रवाशाने रिक्षात बसल्यावर जिथे बसलो ते आणि जिथे उतरायचे असेल ते ठिकाण टाकावे. जितके किलोमीटर अंतर दाखवतील तितकेच पैसे द्यावे. एम. इंडिकेटर ॲपवर १.०५ किलोमीटर अंतरापासून ते पुढील किलोमीटरपर्यंत किती भाडे होते त्याचा तक्ता दिला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रिक्षा चालक मालक संघटनांनी या भाडेतक्त्याचा फलक सर्व प्रमुख रिक्षातळांवर आणि शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी लावावेत. रिक्षा चालक मालक संघटना, पदाधिकारी आणि रिक्षा चालकांना मीटर सक्ती मान्य नसेल तर या पद्धतीने प्रवासी पैसे देतील आणि ते तुम्हाला मान्य करावेच लागेल, असे आदेश, सूचना द्याव्यात.
आमदार व खासदारांचे दुर्लक्ष
विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रिक्षा मीटर सक्ती या प्रश्नाकडे सोयीस्कर डोळेझाक केली आहे. या दोघांनी आणि त्यांच्या राज्यातील वरिष्ठांनी अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनावर घेतले तर कल्याण डोंबिवलीत रिक्षा मीटर सक्ती होऊ शकते. ते अशक्य नाही. भाजप स्वतःला 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवून घेतो. आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी किमान भाजपप्रणीत रिक्षाचालक मालक संघटनेला व याचे सभासद असलेल्या रिक्षाचालकांनी तरी आपली रिक्षा मीटरप्रमाणे चालविण्यासाठी सक्ती करावी, आवाहन करावे.
शेखर जोशी
२० नोव्हेंबर २०२५
बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५
महाराष्ट्रात 'अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट' लागू करा
देवस्थानांच्या भूमींचे रक्षण करण्यासाठी
'अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट' राज्यात तात्काळ लागू करा
- २२ जिल्ह्यांतील १ हजारांहून अधिक
मंदिर विश्वस्तांची शासनाकडे मागणी
मुंबई, दि. १९ नोव्हेंबर
महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हजारो एकर जमिनी भूमाफियांनी, महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने बेकायदेशीरपणे हडपल्या आहेत. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी, गुजरात व कर्नाटकच्या धर्तीवर ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांतील एक हजारांहून अधिक मंदिर विश्वस्तांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना
मंदिर महासंघाने सादर केलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. तसेच महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह सुमारे २२ जिल्हाधिकारी, तहसिलदार,आमदार यांना ३०० हून अधिक निवेदने सादर करण्यात आली आहेत.
देवस्थानांच्या इनाम जमिनी (वर्ग-३) कायद्याने अहस्तांतरणीय असतांनाही, महसूल विभागातील भ्रष्टाचारामुळे भूमाफियांना मुक्त संधी मिळाली असून हजारों एकर जमिनी हडपल्या आहेत. केवळ पश्चिम महाराष्ट्रातच ६७१ गटांवर थेट अतिक्रमण झाले आहे; विदर्भातील अमरावती, अकोला जिल्ह्यांत ५० कोटींची जमीन केवळ ९६० रुपयांना विकल्याचे समोर आले असल्याचे मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी सांगितले.
या राज्यव्यापी अभियानात रायगड येथील श्री हरिहरेश्वर, साताऱ्याचे श्री सज्जनगड, पालीतील श्री बल्लाळेश्वर, वसईचे श्री परशुराम तपोवन, नाशिकचे श्री मुक्तीधाम, आकोट-अकोल्याचे श्री कान्होबा, रत्नागिरीचे श्री काशी विश्वेश्वर, कोल्हापूरचे श्री उजळाई व अनेक क्षेत्रातील मंदिरांचे विश्वस्त तसेच विविध जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह अकोला येथील १६० अधिवक्ते उपक्रमात सहभागी झाले होते.
उदवाहनापर्यंत जाण्याची डोंबिवलीकरांची वाट बिकट
पक्ष फोडाफोडीच्या महत्त्वाच्या कामामुळे
चव्हाण, शिंदे यांचे 'या'नागरी प्रश्नाकडे दुर्लक्ष
- उदवाहनापर्यंत जाण्याची वाट बिकट
शेखर जोशी
डोंबिवली, दि. १८ नोव्हेंबर
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सध्या पक्ष फोडाफोडीच्या महत्त्वाच्या कामात व्यग्र आहेत. त्यामुळे डोंबिवली पश्चिमेकडील उदवाहनाच्या नागरी समस्येकडे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कल्याण एण्डच्या दिशेकडील रस्ता पत्रे लावून बंद केल्याने प्रवाशांना पूर्ण हेलपाटा मारून उदवाहनापर्यंत जावे लागते आहे.
दहा ते बारा महिन्यांपूर्वी रेल्वे स्थानक सुशोभीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेकडे बांधण्यात येणाऱ्या पादचारी पुलाच्या कामामुळे येथे असलेले लोकल ट्रेन तिकिट घर आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण केंद्र डोंबिवली पश्चिमेला कल्याण एण्ड दिशेकडे फलाट क्रमांक एकवर हलविण्यात आले. तसेच सुशोभीकरणाच्या कामामुळे कल्याण एण्ड दिशेकडून उदवाहनापर्यंत जाण्या- येण्याचा सहज, सुलभ मार्ग होता तो पत्रे लावून बंद करून टाकला. त्यामुळे आता रेल्वे स्थानकात शिरून उदवाहनापर्यंत पोहोचण्यासाठी काही मुठभर व मुजोर, बेशिस्त रिक्षाचालकांचा अडथळा पार करून, वळसा घालून उदवाहनापर्यंत जावे लागते आहे.
खरे म्हणजे या उदवाहनापर्यंत जाण्या-येण्यासाठी रस्त्यावरून थेट सोय सहज करता येणे शक्य आहे. जेव्हा उदवाहन सुरू झाले तेव्हाच हे करता आले असते. ठिक आहे, तेव्हा केले नाही. पण आता कल्याण एण्ड दिशेकडील रस्ता पत्रे लावून बंद केल्याने प्रवासी, नागरिक यांची होणारी गैरसोय व त्रास ठरविले तर एका दिवसात दूर करता येऊ शकतो. पण ते करण्याचीही इच्छा हवी. रस्त्यावरून उदवाहनापर्यंत एका बाजूला पायऱ्या आणि एका बाजूला उतार केला तर नागरिक, प्रवासी यांची दररोजच्या त्रासातून सुटका होऊ शकते. अर्थात त्यासाठी रेल्वे स्थानक परिसर व उदवाहनाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर रस्ता अडवून उभ्या राहणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांचा बंदोबस्त करावा लागेल, तसेच इथे कचरा व राडारोडा टाकला जातो त्यावरही बंदी घालावी लागेल.
आमदार व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजप व शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी मनात आणले तर अक्षरशः एका रात्रीत हे काम ते करू शकतात. पण पक्ष फोडाफोडीतून वेळ मिळाला तर या नागरी समस्येकडे लक्ष द्यायला सवड मिळेल.
शेखर जोशी
१९ नोव्हेंबर २०२५
शनिवार, १५ नोव्हेंबर, २०२५
महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांसमुक्त व्हावीत;
महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांसमुक्त व्हावीत;
- वारकरी महाअधिवेशनात ठराव मंजूर
आळंदी, दि. १५ नोव्हेंबर
महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे मद्य आणि मांसमुक्त करावीत, तसेच मंदिर परिसरात अन्य धर्मियांच्या प्रचारावर बंदी घालण्यासाठी कठोर कायदा करावा, असे ठराव येथे झालेल्या १९ व्या वारकरी महाअधिवेशनात संमत करण्यात आले.
‘वारी आळंदीची, राष्ट्र आणि धर्मरक्षणाची’ हे ब्रीदवाक्य घेऊन पार पडलेल्या या अधिवेशनात राज्यभरातील एक हजाराहून अधिक वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते सहभागी झाले होते. हिंदू जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि अन्य संघटनांच्या संयुक्त विद्यमाने येथील सद्गुरू श्री गंगागिरी महाराज मठात कार्तिक वद्य एकादशीच्या निमित्ताने हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.
या वेळी बोलताना रामगिरी महाराज म्हणाले, रामायणातील उदाहरणे विकृत पद्धतीने मांडून आदिवासींचे धर्मांतरण करण्याचे ख्रिस्ती मिशनऱ्यांचे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे. सद्गुरू गंगागिरी महाराजांनी २०० वर्षांपूर्वी चारी वर्णाच्या हिंदूंना एकत्र करण्याचे महान कार्य केले. आपणही आपापल्या प्रभावक्षेत्रात हे कार्य केले, तर धर्मांतरण रोखणे शक्य होईल. तर संत-महंतांनी संघटित होऊन संदेश देण्याची परंपरा ज्ञानेश्वर माऊलींच्या काळापासून चालत आली आहे; पण आज आळंदीत आरोग्य आणि शिक्षण याचे महत्त्व सांगत ख्रिश्चन मिशनरी आळंदीतील हिंदूंचे धर्मांतरण करत आहेत. याला आपण आळा घातला पाहिजे, असे ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे यांनी सांगितले.
जादूटोणा कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेली; परंतु देव-धर्माची टीका करणारी महाराष्ट्र शासनाची ‘जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती, प्रचार व प्रसार समिती’ (PIMC) तात्काळ बरखास्त करण्यात यावी. तसेच नास्तिक आणि अर्बन नक्षलवादी विचारसरणीचे काही लोक पंढरीच्या वारीमध्ये वारकऱ्यांचा बुद्धीभेद घडवून आणत आहेत; हे त्वरित थांबवले पाहिजे. राज्यातील हिंदुत्ववादी सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व संत-महंतांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या वेळी सरकारशी चर्चेसाठी एकत्र येण्याचे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी केले.
रणरागिणी समितीच्या कु. क्रांती पेटकर, ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांचीही भाषणे यावेळी झाली. हिंदू युवतींच्या संरक्षणासाठी राज्यात 'लव्ह जिहाद विरोधी कायदा' तातडीने संमत करावा, हिंदूंची मंदिरे आणि भूमी बळकावणारा 'वक्फ कायदा' त्वरित रद्द करण्यात यावा, इंद्रायणी आणि चंद्रभागा नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, गोवंश हत्याबंदी कायद्याची राज्यात अत्यंत कठोर अंमलबजावणी करावी इत्यादी ठरावही अधिवेशनात मंजूर करण्यात आले.
शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५
'मणिपूरचे महाभारत' पुस्तकाचे प्रकाशन आणि मणिपूर सद्यस्थिती' विषयावर व्याख्यान
पूर्व सीमा प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात'मणिपूरचे महाभारत' पुस्तकाचे प्रकाशन, 'मणिपूर सद्यस्थिती' विषयावर व्याख्यान
ठाणे, दि. ८ नोव्हेंबर
'ईशान्य वार्ता'चे माजी संपादक पुरुषोत्तम रानडे लिखित 'चुराचांदपर्व मणिपूरचे महाभारत' या पुस्तकाचे प्रकाशन येत्या १६ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे एका कार्यक्रमात होणार आहे.
पूर्व सीमा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास रुईया महाविद्यालयाच्या तत्वज्ञान विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. हिमानी चौकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी पूर्व सीमा प्रतिष्ठानचे कार्यवाह आणि १९९९ पासून मणिपूर सीमावर्ती भागात 'शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता' या विषयावर कार्य करणारे जयवंत कोंडविलकर यांचे 'मणिपूर सद्यस्थिती' या विषयावर व्याख्यानही होणार आहे.
हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता श्रीराम व्यायामशाळा, गडकरी रंगायतनसमोर, ठाणे (पश्चिम) येथे होणार असून शंकर दिनकर काणे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा पुस्तक प्रकाशन सोहळा आणि व्याख्यान होणार आहे.
शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५
पादचारी पुलाला अडथळा ठरणारा रेल्वेस्थानक सुशोभीकरणाचा पूर्वेकडील काही भाग जमीनदोस्त
पादचारी पुलाला अडथळा ठरणारा रेल्वेस्थानक
सुशोभीकरणाचा पूर्वेकडील काही भाग जमीनदोस्त
- तोडकाम केलेला भाग रेल्वे पुन्हा बांधून देणार असली तरी सुशोभीकरणावर झालेला खर्च वाया
डोंबिवली, दि. ७ नोव्हेंबर
डोंबिवली रेल्वे स्थानकात नव्याने उभारण्यात येत असलेल्या पादचारी पुलाला अडथळा ठरणारा रेल्वे स्थानक सुशोभीकरणाचा पूर्वेकडील काही भाग शुक्रवारी सकाळी जमीनदोस्त करण्यात आला. डोंबिवली पश्चिमेतील चार मीटर आणि पूर्व भागातील वीस मीटर असा सुमारे २४ मीटर इतका सौंदर्यीकरणाचा भाग काढण्यात येणार आहे.अवघ्या काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेले हे सुशोभीकरण व पाट्यांचा काही भाग जमीनदोस्त केल्याने त्यावर झालेला खर्च वाया गेला आहे.
पादचारी पुलाच्या कामात सुशोभिकरणातील एकूण २४ मीटरचा भाग अडथळा ठणारा एकूण २४ मीटरचा भाग तात्पुरता काढण्याचा प्रस्ताव कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागाने मंजूर केला होता. त्यानुसार पूर्वेकडील काही भाग शुक्रवारी तोडण्यात आला. रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ते पाच दरम्यानचे पादचारी पूल उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूकडील तोडण्यात आलेले सुशोभीकरणाचे काम रेल्वेने पू्र्ववत करून देण्याची अट महापालिकेच्या प्रस्तावात समाविष्ट आहे.
डोंबिवली पूर्व व पश्चिम जोडणारा नवा पादचारी पूल डोंबिवली रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज एण्ड दिशेने उभारण्यात येत आहे. त्यासाठी डोंबिवली पश्चिमेला छत्रपती शिवाजी महाराज एण्ड दिशेकडे असलेले लोकल ट्रेनचे तिकीट कार्यालय व लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण केंद्रही काही महिन्यांपूर्वी हटविण्यात आले. लोकसभा/ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक सुशोभीकरणाचे उदघाटन करण्यात आले होते. पादचारी पुलाच्या उभारणीत डोंबिवली पूर्व व पश्चिम भागातील या सुशोभीकरणाचा काही भाग अडथळा ठरणार आहे, ही गोष्ट आधी का लक्षात आली नाही? की लक्षात येऊनही जाणूनबुजून सुशोभीकरणाचे काम करण्याची घाई करण्यात आली? तोडण्यात आलेल्या सुशोभीकरणाचा भाग रेल्वे पुन्हा बांधून देणार असली तरी सुशोभीकरणावरील वाया गेलेला खर्च कोणाकडून वसूल करणार? रेल्वे आणि कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय, संवाद नव्हता का? काही महिन्यांत नवीन पादचारी पुलाचे बांधकाम सुरू करायचेच होते तर या सुशोभीकरणाला सुरुवातच का केली? पादचारी पूल बांधून पूर्ण झाल्यानंतरच सुशोभीकरण केले असते तर आकाश कोसळले असते का? असे अनेक प्रश्न डोंबिवलीकरांना भेडसावत आहेत.
जाता जाता- सुशोभीकरण आणि उभारण्यात आलेल्या कमानी, पाट्यांना डोंबिवली पूर्वैतील रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांचा विळखा पडला आहे. फेरीवाले त्यांचे सामान, विकण्याच्या वस्तू या सुशोभीकरणाला बिनधास्त टांगून ठेवतात. तर पश्चिमेला अधिकृत रिक्षा थांबा आणि मुठभर मुजोर रिक्षाचालकांचा विळखा पडलेला असतो. हे असले सुशोभीकरण व सौंदर्यीकरण काय कामाचे?
शेखर जोशी
७ ऑक्टोबर २०२५
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा, विचारच देश आणि जगापुढील आजच्या सर्व समस्यांचे उत्तर - किशोरजी व्यास उर्फ गोविंददेवगिरी महाराज यांचे प्रतिपादन
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा,विचारच
देश आणि जगापुढील आजच्या सर्व समस्यांचे उत्तर
- किशोरजी व्यास उर्फ गोविंददेवगिरी महाराज यांचे प्रतिपादन
आळंदी, दि.६ नोव्हेंबर
छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा आणि विचार हेच देश, जगापुढील आजच्या सर्व समस्यांवरील उत्तर आहे, असे प्रतिपादन
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त निधीचे कोषाध्यक्ष किशोरजी व्यास उर्फ गोविंददेवगिरी महाराज यांनी गुरुवारी येथे केले.
गोविंददेवगिरी महाराज यांच्या हस्ते ' शिवप्रताप २०२६' या दैनंदिनीचे प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते. दैनंदिनीचे मुख्य संकल्पनाकार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचे अभ्यासक रविंद्र पाटील, डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे आणि महाराष्ट्र फेडरेशनचे संचालक मिलिंद आरोलकर, दैनंदिनीचे प्रवर्तक संजय जोशी, दैनंदिनीचे मुद्रणकर्तेसुबोध पटवर्धन इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.
शिवजयंती साजरी केली,एखादा उत्सव/ कार्यक्रम उरकला,अशी वृत्ती समाजात नसावी.छत्रपती शिवाजी महाराज या चैतन्याचा,विचारांचा संस्कार दररोज आपल्या मनावर झाला पाहिजे.या संस्कारांचे मूळ प्रभू श्री रामचंद्रांमध्ये आहे आणि प्रभू श्रीराम धर्माची पहिली आवृत्ती असतील तर छत्रपती शिवाजी महाराज धर्माची दुसरी आवृत्ती आहेत, असेही गोविंददेवगिरी महाराज यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने निघालेल्या काही दैनंदिनी या आधी पाहिल्या,पुस्तकेही चाळली आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभावी डोस देणारी'शिवप्रताप २०२६'सारखी अन्य कोणतीही दैनंदिनी मला दिसली नाही,अशा शब्दांत गोविंददेवगिरी महाराजांनी या दैनंदिनीचे कौतुक केले.
दैनंदिनी निर्मितीत सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन करून
गोविंददेवगिरी महाराज म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि प्रेरणा आपल्या अंगी बाणविण्यासाठी ही दैनंदिनी म्हणजे एक प्रभावी औषध असून सर्वांनी ते दररोज घ्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र, चैतन्य आणि प्रेरणेचा समाजात जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा, असे आवाहनही त्यांनी केले.
छायाचित्र ओळी.
छायाचित्रात डावीकडून रवींद्र पाटील, मिलिंद आरोलकर, गोविंददेवगिरी महाराज, संजय जोशी, सुबोध पटवर्धन.
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे जीवन प्रमाणपत्र शिबीराचे आयोजन
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे
जीवन प्रमाणपत्र शिबीराचे आयोजन
डोंबिवली, दि. ७ नोव्हेंबर
येथील टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे निवृत्ती वेतनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र शिबीराचे (हयातीचा दाखला) आयोजन करण्यात आले आहे. येत्या ९ नोव्हेंबरपर्यंत हे शिबीर भरविण्यात आले असून ते विनामूल्य आहे.
टिळकनगर, डोंबिवली पूर्व येथील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे यंदा पाचवे वर्ष आहे. बँकांमध्ये जीवन प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या लांबलचक रांगापासून ज्येष्ठ निवृत्तीधारकांना दिलासा मिळावा, हा उद्देश यामागे आहे.
गुरुवारी शिबीराच्या पहिल्या दिवशी डोंबिवलीतील १३० निवृत्ती वेतनधारकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. निवृत्ती वेतनधारकांना आँनलाईन जीवन प्रमाणपत्र बनवून देण्याच्या कामात मंडळाचे हितचिंतक माधव मराठे, सुनील जोशी, सुहास वैद्य यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
आजारी,अंध ,वाँकर घेऊन चालणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना प्राधान्य देऊन लगेचच जीवन प्रमाणपत्र बनवून देण्यात आले. जास्तीत जास्त निवृत्ती वेतनधारकांनी मंडळाच्या या उपक्रमाचा फायदा घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे. शक्य झाल्यास डोंबिवलीतील आजारी तसेच घराबाहेर पडू न शकणाऱ्या वयोवृध्द निवृत्ती वेतनधारकांचे जीवन प्रमाणपत्र त्यांच्या घरी जाऊनही करुन देण्याचा मंडळाचा प्रयत्न असणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क संजय शेंबेकर- ९९२०१२९८०३
मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०२५
श्री क्षेत्र परशुराम डोंगर माथ्यावरील पणतीचे त्रिपुरारी पौर्णिमेला प्रज्वलन
श्री क्षेत्र परशुराम डोंगर माथ्यावरील
पणतीचे त्रिपुरारी पौर्णिमेला प्रज्वलन
चिपळूण, दि. ४ नोव्हेंबर
श्री क्षेत्र परशुराम येथे डोंगरमाथ्यावर , सवतसड्याच्या वरील टेकडीवर असणारी पुरातन भव्य पणती ५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रज्वलित करण्यात येणार आहे. भगवान श्री परशुराम मंदिरातून मशाल पेटवून नेऊन ही पणती प्रज्वलित केली जाणार असल्याची माहिती श्री भार्गवराम परशुराम संस्थानकडून देण्यात आली.
श्री क्षेत्र परशुराम येथील ही पुरातन दीपमाळ शिवकालीन असून महेंद्रगिरी पर्वतावरील एका ऊंच शिखर माथ्यावर हीदीपमाळ आहे. या शिखर बिन्दुवरून चिपळूण शहर, श्री परशुराम मंदिर व गाव, सह्याद्री पर्वताच्या मुख्य आणि उपरांगा परिसराचे दर्शन होते. दीपमाळेकडे जाण्यासाठी परशुराम गावच्या पायरवाडीतून पाऊलवाट असून ही वाट जंगलमय, गवताळ कुरणे, डोंगराळ भाग यातून जाते, असे संस्थानच्या फेसबुक पेजवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
ही भव्य दीपमाळ जांभा दगडात कोरलेली असून त्यावरील पुरातन भव्य पणती काळ्या दगडात कोरलेली आहे. दिपमाळ प्रज्वलनासाठी त्यामधे सुमारे १५ लिटर गोडेतेल आणि एक धोतर वात म्हणून वापरले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला संध्याकाळी साडेसहा वाजता या भव्य पणतीमध्ये दीपप्रज्वलन करण्यात येते. याच दिवशी सायंकाळी परंपरेने भगवान श्री परशुराम मंदिरात तुळशी विवाह सोहोळाही साजरा केला जातो.ज्ञ
पूर्वी ग्रामदैवत जुना काळभैरव देवस्थानतर्फे श्री क्षेत्र परशुराम येथील भव्य पणतीमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला दीप प्रज्वलनासाठी १ डबा तेल व वातीसाठी १ धोतराचे पान प्रतिवर्षी देण्याची ऐतिहासिक परंपरा होती. गेल्या २२ वर्षांपासून श्री ग्रामदैवत जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूणतर्फे ही परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली आहे .
पुर्वी या पणतीचा प्रकाश श्री देव परशुराम यांच्या मूर्तीवर पडत असे वयोवृद्ध, जाणकार मंडळींकडून सांगितले जाते. रात्री चिपळूण शहर परिसरातून या पणतीचा प्रकाश सर्वत्र दिसतो.
पणती प्रज्वलन कार्यक्रमासाठी परशुरामचे स्थानिक ग्रामस्थ, चिपळूण शहर व परीसरातील भक्तगण, कार्यकर्ते परिश्रम घेत असतात. भक्तगण, नागरिकांनी या दीप दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री भार्गवराम परशुराम संस्थानने केले आहे.
अधिक माहिती आणि उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क
नितीन लोकरे - 8149444044
समीर शेट्ये - 9890159247
( हे छायाचित्र श्री भार्गवराम परशुराम संस्थानच्या फेसबुक पेजवरून साभार)
सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५
ज्योतिषशास्त्र केवळ भविष्यच नव्हे, तर आध्यात्मिक उन्नतीचा मार्गही दाखवते !
ज्योतिषशास्त्र केवळ भविष्यच नव्हे, तर
आध्यात्मिक उन्नतीचा मार्गही दाखवते !
- ज्योतिष अधिवेशनात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन सादर
पणजी, दि. ३ ऑक्टोबर
ज्योतिषशास्त्र केवळ शिक्षण, विवाह, व्यवसाय इत्यादी व्यावहारिक गोष्टींपुरते मर्यादित नसून, ते व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नतीचा मार्गही दाखविते,असा दावा ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे ज्योतिष विशारद राज कर्वे यांनी येथे केला.
गोवा येथे आयोजित 'जयसिंगराव चव्हाण ११ व्या आंतरराष्ट्रीय ज्योतिष अधिवेशना'त कर्वे बोलत होते. अधिवेशनाचे उदघाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. ‘जन्मकुंडली - जिवात्म्याचा प्रवास दर्शवणारी मार्गदर्शिका !’ या शोधनिबंधाचे मार्गदर्शक डॉ. जयंत बाळाजी आठवले असून, कर्वे हे लेखक आहेत.
व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती करण्याची क्षमता आणि मार्ग दर्शविण्यामध्ये ‘ग्रहांमध्ये होणारे योग’ सर्वाधिक महत्त्वाचे असतात. जन्मकुंडलीत चंद्र, बुध, शुक, मंगळ, राहू यांमध्ये परस्पर योग असल्यास व्यक्ती बाह्य विषयवस्तूंपासून सुख मिळवण्यासाठी अधिक उत्सुक असते; याउलट जन्मकुंडलीत या ग्रहांचे सूर्य, गुरु, शनि, केतू, हर्षल, नेपच्यून यांच्याशी योग असल्यास व्यक्ती आंतरिक आनंद, सत्याचे ज्ञान आणि शांती प्राप्त करण्यासाठी प्रेरित होते, तसेच ती समाजाच्या हिताचा विचार करते, असे कर्वे यांनी सांगितले.
जन्मकुंडलीत असणार्या ग्रहयोगांप्रमाणे व्यक्तीचा आध्यात्मिक उन्नती करण्याचा मार्ग असतो; कुणी भक्तीद्वारे, कुणी ज्ञानाद्वारे, कुणी कर्माद्वारे तर कुणी सेवेद्वारे अध्यात्मात प्रगती करतात. आध्यात्मिक प्रगतीमुळे आपल्यात व्यापकता येते. ज्योतिषांनी लोकांच्या व्यावहारिक समस्यांवर दिशादर्शन देण्यासोबतच आध्यात्मिक उन्नतीसाठीही लोकांना दिशादर्शन करणे आवश्यक आहे, असे आवाहनही कर्वे यांनी यावेळी केले.
दहावी आणि बारावीच्या लेखी, प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक माहितीसाठी संकेतस्थळावर
दहावी आणि बारावीच्या लेखी, प्रात्यक्षिक
परीक्षेचे वेळापत्रक माहितीसाठी संकेतस्थळावर
- परीक्षेपूर्वी शाळांना देण्यात येणारे वेळापत्रकच अंतिम
ठाणे, दि. ३ ऑक्टोबर
पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणा-या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक माहितीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र परीक्षेपूर्वी शाळांना देण्यात येणारे वेळापत्रकच अंतिम असेल, असे मंडळाने जाहीर केले आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत या परीक्षा घेण्यात येतात.
इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ( शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह ) २ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. तर इयत्ता बारावीची लेखी परीक्षा (सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा) १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहे.
सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मात्र ते फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दासबोध अभ्यास शिबिर समारोप कार्यक्रमात 'मनाचे श्लोक' (अर्थासहित) पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन
दासबोध अभ्यास शिबिर समारोप कार्यक्रमात
'मनाचे श्लोक' (अर्थासहित) पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन
डोंबिवली, दि. ३ नोव्हेंबर
स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समिती, मंथन व्याख्यानमाला आणि समर्थायन, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत तीन दिवसीय दासबोध अभ्यास शिबिर आयोजित करण्यात आले होते. श्री गणेश मंदिर संस्थानच्या वक्रतुंड सभागृहात झालेल्या या शिबिरात मनाचे श्लोक आणि दासबोध यांचा अभ्यास कसा करावा यासंबंधी समर्थभक्त समीर लिमये यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शिबिराच्या समारोपाला लिमये यांनी लिहिलेल्या श्री मनाचे श्लोक (अर्थासहित १ते ६८ श्लोक) पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन शेगावच्या श्री गजाननमहाराजांचे भक्त, वारकरी संप्रदायाचे बाळकृष्ण कुलसुंगे दादा यांच्या हस्ते झाले. यावेळी समीर लिमये,माधव जोशी ,सुधाताई म्हैसकर,प्रवीण दुधे, विनोद करंदीकर, संदीप वैद्य, संजय शेंबेकर, धनश्री नानिवडेकर, संदीप करंजेकर इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.
शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५
'मी अश्वत्थामा चिरंजीव' महाकादंबरीची नववी आवृत्ती प्रकाशनाच्या वाटेवर
अशोक समेळ लिखित 'मी अश्वत्थामा चिरंजीव'
महाकादंबरीची नववी आवृत्ती प्रकाशनाच्या वाटेवर
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक अशोक समेळ यांनी लिहिलेल्या 'मी अश्वत्थामा चिरंजीव' या महाकादंबरीची नववी आवृत्ती प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ६८८ पृष्ठांच्या या महाकादंबरीची पहिली आवृत्ती 'डिंपल पब्लिकेशनाने ३१ जानेवारी २०१५ रोजी प्रकाशित केली होती.
महाभारत आणि संबंधित साहित्याचे अध्ययन करून, जिथे अश्वत्थाम्याचा वास असल्याची वदंता आहे, तो 'अस्तंबा' पर्वत आणि सभोवतालचा परिसर पालथा घालून, तिथल्या लोकांना अश्वत्थाम्याचे आलेले अनुभव ऐकून आणि स्वानुभव घेऊन समेळ यांनी ही महाकादंबरी लिहिली आहे. अश्वत्थाम्याच्या भळभळत्या जखमेचा नवा आयाम शोधण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे.
गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत समेळ यांनी लिहिलेल्या भीष्म पितामह यांच्या जीवनावरील 'ते आभाळ भीष्माचं होतं' आणि
याज्ञसेनी द्रौपदीच्या व्यक्तिमत्वावरील 'द्रौपदी : काल, आज, उद्या' या दोन महाकादंब-या प्रकाशित झाल्या आहेत. 'डिंपल पब्लिकेशन'नेच त्या प्रकाशित केल्या आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...


























