शेजो न्यूज ॲण्ड व्ह्यूज
बातम्या, भाष्य आणि संवाद
शनिवार, ११ ऑक्टोबर, २०२५
राज्यात येत्या बुधवारी 'वाचन प्रेरणा दिन'
राज्यात येत्या बुधवारी 'वाचन प्रेरणा दिन'साजरा होणार
मुंबई, दि. ११ ऑक्टोबर
वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्यात येत्या बुधवारी ( १५ ऑक्टोबर) वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे. माजी राष्ट्रपती दिवंगत डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्यानिमित्ताने राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद मराठवाडा साहित्य परिषद विदर्भ साहित्य संघ कोकण मराठी साहित्य परिषद दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. राज्य शासनाचे मंत्रालयातील सर्व विभाग तसेच त्यांच्या अधिपत्याखातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था, मंडळे सार्वजनिक उपक्रम, सर्व आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम साजरा होणार असून त्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
ग्रंथालय, महाविद्यालये, तंत्र महाविद्यालये, पदविका संस्था या ठिकाणीही वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
मुंबईतून मान्सून माघारी,ऑक्टोबर हीट जाणवायला सुरुवात
मुंबईतून मान्सून माघारी,ऑक्टोबर हीट जाणवायला सुरुवात
मुंबई, दि. ११ ऑक्टोबर
संपूर्ण राज्यभरातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असून मुंबईतून शुक्रवारी मान्सूनने माघार घेतली. यंदाच्या वर्षी मे महिन्यापासून महाराष्ट्रात पाऊस सुरू झाला होता. मान्सूनच्या माघारीनंतर आता मुंबईत 'ऑक्टोबर हीट' जाणवायला सुरुवात झाली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून मान्सूनचा परतीचा प्रवास खोळंबला होता. येत्या तीन ते चार दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघार घेईल असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी मुंबई सह देशातून 15 ऑक्टोबर रोजी मान्सूनचा माघारीचा प्रवास संपल्याचे जाहीर करण्यात आले होते.
दरम्यान मुंबईच्या कमाल तापमानात रविवारपासून वाढ होण्याची शक्यता आहे पुढच्या आठवड्यात सांताक्रुज येथे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५
'डोंबिवली टॅलेंट हंट' स्पर्धेत ओंकार इंटरनॅशनल, पवार पब्लिक स्कूलची बाजी
लायन्स क्लब डोंबिवलीच्या'डोंबिवली टॅलेंट हंट'स्पर्धेत
ओंकार इंटरनॅशनल, पवार पब्लिक स्कूलची बाजी
डोंबिवली, दि. ७ ऑक्टोबर
लायन्स क्लब डोंबिवली आयोजित 'डोंबिवली टॅलेंट हंट'
स्पर्धेच्या अंतिम फेरीत ओंकार इंटरनॅशनल, पवार पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. इयत्ता ५ वी ते ७वी आणि ८ वी ते १०वी अशा दोन गटात झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. स्पर्धेचे यंदा १३ वे वर्ष होते.
शिक्षणतज्ज्ञ दिवंगत सुरेंद्र बाजपेई सर यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणा-या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ४१ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राथमिक फेरीतून दुसऱ्या फेरीसाठी एक हजार तर अंतिम फेरीसाठी ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. वक्तृव, वैयक्तिक मुलाखत, बुद्धिकौशल्य, समयसूचकता, सामान्य ज्ञान, निर्णय घेण्याची क्षमता, संयम, इत्यादी निकषांचा आधारावर दोन्ही गटातील पहिल्या पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ दंतचिकित्सक डॉ. नितीन जोशी, प्रख्यात मानसोपचारतज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. विंदा भुस्कुटे, सनदी लेखापाल मंथन मेहता यांनी काम पाहिले. विजेत्यांना लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन ट्रेवर मार्टीस यांच्या हस्ते पारितोषिक सन्मानपदक, सन्मानपत्र, पुस्तक आणि शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. दोन्ही गटातील प्रथम आलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सायकल, द्वितीय ते पाचवा क्रमांक आलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि स्मार्ट वॉच देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक लायन्स क्लब ऑफ डोंबिवलीच्या विद्यमान अध्यक्षा लायन सपना सिंग यांनी केले, तर सचिव लायन रुपाली डोके यांनी उपस्थितांचे आभार मानले. डोंबिवली टॅलेंट हंट २०२५ चे प्रकल्प प्रमुख लायन नित्यानंद पोवार यांनी यंदाच्या स्पर्धेचा आढावा घेतला तर लायन अमोल पोतदार यांनी अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांसाठी पुढील महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या 'युथ लीडरशिप अवेयरन्स कॅम्प' ची माहिती दिली. कौस्तूभ कुलकर्णी, लायन अनघा चक्रदेव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्पर्धेतील पारितोषिक विजेते
गट इयत्ता ५ वी ते ७ वी
प्रथम क्रमांक : कु. मयूख नायर - पवार पब्लिक स्कूल, द्वितीय क्रमांक : आयुष दुघाडे - पवार पब्लिक स्कूल, तृतीय क्रमांक : अर्णव वैद्य ओंकार इंटरनॅशनल स्कूल, चौथा क्रमांक : दीक्षा प्रभुखोत - चंद्रकांत पाटकर विद्यालय (सेमी), पाचवा क्रमांक : गौरी तेवारी - रॉयल इंटरनॅशनल स्कूल.
गट इयत्ता ८ वी ते १० वी
प्रथम क्रमांक : राजनील चौधरी - ओंकार इंटरनॅशनल स्कूल, द्वितीय क्रमांक : ओजस करंदीकर - ओंकार इंटरनॅशनल स्कूल, तृतीय क्रमांक : यथार्थ शिंदे - गार्डियन हायस्कूल, चौथा क्रमांक : आभा लेले - सिस्टर निवेदिता हायस्कूल, पाचवा क्रमांक : आर्यन सेठ - पवार पब्लिक स्कूल
'मनाचे श्लोक’ चित्रपटाचे नाव न बदलल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही
'मनाचे श्लोक’ चित्रपटाचे नाव न बदलल्यास
चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही
- हिंदू जनजागृती समितीचा इशारा
मुंबई, दि. ७ ऑक्टोबर
राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’ धार्मिक ग्रंथाच्या नावाचा वापर करून त्याच नावाने मराठी चित्रपटाची निर्मिती करणे, म्हणजे हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडणे आहे. शासन आणि सेन्सॉर बोर्डाने याची तातडीने गंभीर दखल घेऊन 'मनाचे श्लोक' हे नाव चित्रपटाच्या शीर्षकातून हटवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. चित्रपटाचे नाव बदलले नाही तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार
नसल्याचा इशाराही हिंदू जनजागृती समितीने दिला आहे.
नैतिक मूल्ये शिकविणाऱ्या ग्रंथाचे नाव केवळ मनोरंजन, व्यावसायिक लाभ आणि सवंग प्रसिद्धीसाठी वापरणे, हा कोट्यवधी श्रीरामभक्त आणि समर्थभक्तांच्या धार्मिक भावना पायदळी तुडवण्याचा प्रकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणी कुराण किंवा बायबल यांसारख्या धार्मिक ग्रंथांची नावे वापरून चित्रपट बनवण्याचे धाडस करेल का? आणि जरी केले, तरी सेन्सॉर बोर्ड त्याला परवानगी देईल का? मग केवळ हिंदूंच्याच धार्मिक भावना वारंवार का दुखावल्या जातात? असा प्रश्न हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी उपस्थित केला आहे.
यापूर्वी ‘द डा विंची कोड’ आणि ‘विश्वरूपम’ यांसारख्या चित्रपटांमुळे अनुक्रमे ख्रिस्ती व मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्याने अनेक राज्यांत त्यांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने लाल बाबू प्रियदर्शी विरुद्ध अमृतपाल सिंग [(2015) 16 SCC 795] या खटल्यात स्पष्ट केले आहे की, 'रामायण'सारख्या पवित्र ग्रंथांच्या नावांचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी मक्तेदारी म्हणून करता येत नाही. या तत्त्वानुसार ‘मनाचे श्लोक’ हे नावही चित्रपटासाठी वापरणे कायद्याच्या आणि नैतिकतेच्या विरोधात असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे म्हणणे आहे.
सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५
विद्यादान सहाय्यक मंडळाच्या संस्थापक गीता शहा यांना यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार जाहीर
विद्यादान सहाय्यक मंडळाच्या संस्थापक
गीता शहा यांना यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. ६ ऑक्टोबर
ठाणे येथील विद्यादान सहाय्यक मंडळाच्या संस्थापक, विश्वस्त गीता शहा यांना यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार जाहीर झाला आहे.
केशवसृष्टी पुरस्काराचे यंदाचे १६ वे वर्ष असून पुरस्कार वितरण समारंभ येत्या ११ ऑक्टोबर रोजी ठाणे येथे होणार आहे. बृहन्मुबई महापालिकेच्या उपायुक्त ( शिक्षण ) डॉ. प्राची जांभेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्रीराम व्यायामशाळा, डॉ. मूस रोड, तलावपाळी जवळ, ठाणे पश्चिम येथे दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
शहा यांनी ग्रामीण भागातील गरजू, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षणाद्वारे सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने काम सुरू केले. काही सहकारी आणि कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन १५ ऑगस्ट २००८ रोजी विद्यादान सहाय्यक मंडळ संस्था सुरू केली.
शिक्षणासह या विद्यार्थ्यांच्या मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक इत्यादी प्रश्नांची जवाबदारीही संस्था घेते. त्यांना समाजात सक्षम पणे उभे करते. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक सुज्ञ पालक, मार्गदर्शक निवडला जातो. तो ह्या मुलांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याची सर्व जवाबदारी घेतो.आज असे पन्नास पालक मार्गदर्शक कार्यरत आहेत.
विद्यार्थ्यांंचा शैक्षणिक खर्च, निवास व्यवस्था, जेवणाचा खर्च , वैद्यकीय खर्च संस्थेतर्फे केला जातो. आजपर्यंत संस्थेने १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवला आहे. त्यामध्ये डॉक्टर, अभियंते, परिचारक, तंत्रज्ञ, वकील, सनदी लेखापाल, कला दिग्दर्शक, वास्तु विशारद यांचा समावेश आहे.
सहा शाखा , आठ वसतिगृहे, १७ मार्गदर्शक समित्या आणि एक हजारांहून अधिक कार्यरत माजी विद्यार्थी यांच्या मदतीने ३५ जिल्ह्यातील ८५० विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कार्यरत आहे.
अमेया जाधव यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अलका मांडके, डॉ. शुभा राऊळ, डॉ. कविता रेगे, हेमा भाटवडेकर, रश्मी भातखळकर, वैजयंती कुलकर्णी-आपटे, अर्चना वाडे, सुनयना नटे, ॲड. सुनीता तिवारी, राधा पेठे, शुभदा दांडेकर, सीमा उपाध्याय यांच्या निवड समितीने या वर्षीच्या केशवसृष्टी पुरस्काराची निवड केली.
शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५
'डोंबिवली टँलेन्ट हंट'ची रविवारी अंतिम फेरी
'डोंबिवली टँलेन्ट हंट'ची रविवारी अंतिम फेरी
- लायन्स क्लब ऑफ डोंबिवलीतर्फे आयोजन
डोंबिवली, दि. ३ ऑक्टोबर
लायन्स क्लब ऑफ डोंबिवली आयोजित 'डोंबिवली टँलेन्ट हंट' स्पर्धेची अंतिम फेरी येत्या ५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. दिवंगत प्राचार्य डॉ. सुरेंद्र बाजपेयी यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणा-या स्पर्धेचे यंदा १३ वे वर्ष आहे.
यंदाच्या वर्षी २० ऑगस्ट रोजी पहिली फेरी तर दुसरी फेरी २८ सप्टेंबर रोजी पार पडली. प्रथम फेरीत ४०,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते. त्यातून दुसऱ्या फेरीसाठी एक हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
अंतिम फेरीसाठी ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. वक्तृत्व - कौशल्य, वैयक्तिक मुलाखत, स्किल-टेस्ट, माईंड गेम्स इत्यादी विविध आव्हाने अंतिम फेरीतील सहभागी विद्यार्थ्यांना पार करावी लागणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. अंतिम फेरीतील ५० स्पर्धकांमधून ५ वी ते ७ वी आणि ८वी ते १०वी या दोन गटातून पहिल्या पाच विजेत्यांची निवड केली जाणार आहे.
मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५
'शिवप्रताप'दैनंदिनीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक हजार घटनांची नोंद
'शिवप्रताप'दैनंदिनीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या
जीवनातील एक हजार घटनांची नोंद
मुंबई, दि. ३० सप्टेंबर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्वाच्या एक हजार घटनांचा उल्लेख असलेली 'शिवप्रताप' दैनंदिनी लवकरच प्रकाशित होणार आहे.
डॉ. रवींद्र पाटील यांची संकल्पना असलेल्या २०२६ च्या दैनंदिनीत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांची सचित्र माहिती देण्यात येणार आहे.
'शिवप्रताप' दैनंदिनीची पृठसंख्या २४० असून दैनंदिनीत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज्ञापत्रे, जीवनपट, सनावळी, दर महिन्याचे नियोजन पान याचा समावेश असेल. दैनंदिनीचे प्रकाशक शब्दप्रभू पब्लिकेशन असून शिवप्रताप दैनंदिनीची नोंदणी सुरू झाली आहे.
अधिक माहिती आणि संपर्क
संजय जोशी- 9819371425 ( सकाळी साडेदहा ते रात्री साडेसात) किंवा शब्दप्रभू पब्लिकेशन- 7887337332
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...