शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०२५

डोंबिवलीच्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सजावट

जागतिक वारसा यादीतील बारा किल्ल्यांच्या सजावटीतून छत्रपती शिवरायांना मानवंदना - डोंबिवलीच्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सजावट छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा 'युनेस्को'ने अलिकडेच जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे. डोंबिवलीच्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या ७६ व्या वर्षांत या १२ किल्ल्यांची सजावट साकारली आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक संजय शशिकांत धबडे यांनी सलग २५ व्या वर्षी टिळकनगर गणेशोत्सवातील भव्य, नेत्रदीपक सजावट साकारली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या लष्करी भूदृश्यांची ओळख, माहिती सर्वांना करून देण्याच्या उद्देशाने ही सजावट केली आहे.‌ किल्ल्याच्या १२ दरवाज्यातून १२ किल्ले दिसतील अशी ही सजावट आहे. मुळचे डोंबिवलीकर असलेले धबडे गेली २४ वर्षे मुंबईतून किंवा कोणत्याही दौऱ्यावर असल्यास तिथून डोंबिवलीत स्वतः उपस्थित राहून सहका-यांच्या मदतीने टिळकनगर गणेशोत्सव मंडळासाठी भव्य देखावे साकारत आहेत.
शेजो उवाच https://youtu.be/gbolRCWRhL8

मंगळवार, २६ ऑगस्ट, २०२५

‘ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी गणेशोत्सव

'ब्राह्मण सेवा मंडळा’च्या शतकमहोत्सवी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मुंबई, दि. २६ ऑगस्ट दादर येथील 'ब्राह्मण सेवा मंडळा’च्या गणेशोत्सवाचे यंदा शतकमहोत्सवी वर्ष असून धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांसोबतच श्री गणेश याग, श्री गणेश अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ब्राह्मण सेवा मंडळाची स्थापना १० डिसेंबर १९१६ रोजी झाली. मात्र पहिला गणेशोत्सव ११ ते २० सप्टेंबर १९२६ रोजी ‘मुकुंद मॅन्शन’ मध्ये साजरा झाला. २९ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता ‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’ हा काव्यमय नाट्यप्रयोग सादर होणार आहे.‌ मुक्ता बर्वे यांच्यासह अमित वझे, मानसी वझे, निनाद सोलापूरकर, जयदीप वैद्य, अंजली मराठे हे कलाकार कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.‌ १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री आठ वाजता संकर्षण कऱ्हाडे, स्पृहा जोशी यांचा ‘संकर्षण via स्पृहा’ हा कार्यक्रम होणार आहे.‌ गणेशोत्सवातील अन्य कार्यक्रम ३० ऑगस्ट, ‘ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’. वक्ते : मा. ले. ज. विनायक पाटणकर (नि.) व मा. ले. ज. एस. एस. हसबनीस (नि.), मुलाखतकार : जेष्ठ पत्रकार उदय निरगुडकर. ३१ ऑगस्ट ‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’- वक्ते : प्रद्योत पेंढारकर, मुलाखतकार : सर्वेश देशपांडे. ३ सप्टेंबर पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी निमित्ताने माणिक वर्मा यांनी सुमधुर गायलेल्या गाण्यांचा कार्यक्रम ‘हसले मनी चांदणे’. ५ सप्टेंबर २०२५ वारकरी कीर्तन – ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील. सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असून 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश' या तत्त्वावर दिला जाणार आहे. ब्राह्मण सेवा मंडळ, भवानीशंकर मार्ग, दादर पश्चिम येथे होणा-या या सर्व कार्यक्रमाची वेळ रात्री आठ अशी आहे.

रोह्यातील 'एक गाव एक गणपती' सार्वजनिक गणेशोत्सव कौतुकास्पद आणि अनुकरणीय

रोह्यातील 'एक गाव एक गणपती' सार्वजनिक गणेशोत्सव कौतुकास्पद आणि अनुकरणीय - राज्यातील महापालिका क्षेत्रात 'एक प्रभाग एक गणपती' संकल्पना राबविण्याची गरज शेखर जोशी रायगड जिल्ह्यातल्या रोहा शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त न्यासाचे यंदा १०४ वे वर्ष असून रोह्यातील 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना स्तुत्य, कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. मुंबईसह राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात 'एक गाव एक गणपती' नव्हे तर 'एक प्रभाग एक गणपती' ही संकल्पना राबविली पाहिजे आणि खरोखरच मनावर घेतले तर ही गोष्ट अशक्य नाही. रस्ते अडवून, पादचारी आणि वाहन चालक यांना अडथळा होईल असा मंडप न उभारता शहरातील बंदिस्त सभागृहात हा गणेशोत्सव साजरा केला जावा, ती काळाची गरज आहे. अर्थात हे करण्यासाठी जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती हवी. केवळ आणि केवळ लोकानुनयाला बळी न पडता सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांनी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येऊन, चर्चा करून 'एक प्रभाग एक गणपती' ही संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हिच गोष्ट सार्वजनिक नवरात्रौत्सव, दहिहंडी उत्सवाच्या बाबतीतही करता येईल.
स्वतःला 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाने तरी भाजपची सत्ता असलेल्या महापालिका, नगरपालिका क्षेत्रात किंवा भाजपचे नगरसेवक असलेल्या किमान एका तरी प्रभागात 'एक प्रभाग एक गणपती' ही संकल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करावेत आणि इतर राजकीय पक्षापुढे एक नवा मापदंड व आदर्श निर्माण करावा. मनसेचे राज ठाकरेही महाराष्ट्राच्या नवनिर्माणाच्या गप्पा करत असतात. त्यांनीही किमान दादर भागात, ते राहतात त्या प्रभागात तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही आपापल्या कार्यक्षेत्रात 'एक प्रभाग एक गणपती' साठी प्रयत्न करावेत.
गणपती मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आणण्यासाठी शिवसेनेच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ ( शिवसेना एकसंघ असताना) यांनी काही वर्षांपूर्वी प्रयत्न केले होते. बृहन्मुंबई महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता होती. प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधनाचा वारसा सांगणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मनावर घेतले असते आणि शुभा राऊळ यांना पाठिंबा दिला असता तर कदाचित ही गोष्ट घडून गेली असती. पण उद्धव ठाकरे यांनी ती हिंमत दाखवली नाही. पुरोगामी असलेल्या आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाचा जप करणाऱ्या शरद पवार यांनी तरी बारामती किंवा पश्चिम महाराष्ट्रातील त्यांची राजकीय ताकद असलेल्या किमान एका तरी गावात 'एक प्रभाग एक गणपती' ही संकल्पना राबवून दाखवावी.

कल्याण गायन समाज संस्थेला सुभेदारवाडा शताब्दी पुरस्कार जाहीर

कल्याण गायन समाज संस्थेला सुभेदारवाडा शताब्दी पुरस्कार जाहीर - गणेशोत्सवाचे व्यवस्थापन यावर्षी श्रीराम सेवा मंडळाकडे कल्याण, दिनांक,२६ ऑगस्ट शास्त्रीय संगीत, गायनाचा प्रचार आणि प्रसाराचे महत्वपूर्ण काम करणाऱ्या कल्याणमधील गायन समाजाला सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदारवाडा शताब्दी पुरस्कार समितीतर्फे देण्यात येणारा यंदाचा शताब्दी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अलीकडेच कल्याण गायन समाजाने शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे. सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा १३१ वे वर्ष असून गणेशोत्सवाचे व्यवस्थापन यावर्षी श्रीराम सेवा मंडळा कडे आहे पुरस्कार वितरणाचा सोहळा येत्या २ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता सुभेदारवाडा शाळा येथील सभागृहात होणार आहे. बिर्ला महाविद्यालयाचे संचालक प्रा. डाॅ. नरेशचंद्र, शताब्दी पुरस्कार समिती न्यायासाचे चिटणीस डाॅ. रत्नाकर फाटक, ज्येष्ठ वकील ॲड. सुरेश पटवर्धन, श्रीकांत जोशी, भालचंद्र जोशी, मुयरेश आगलावे हे संचालक, श्रीराम सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शिंपी उपस्थित राहणार आहेत. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवाव्रती, संस्थांना प्रेरणा म्हणून सुभेदारवाडा गणेशोत्सवातर्फे शताब्दी पुरस्कार दिला जातो. शताब्दी वर्षात झालेल्या २५ हजार रूपयांच्या निधी संकलनातून जमा झालेली रक्कम मुदत ठेव म्हणून बँकेत ठेऊन त्यात देणगीदारांनी दिलेल्या देणगीची भर घालून त्या व्याजातून हा पुरस्कार दिला जातो. रोख रक्कम, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून हा कार्यक्रम २ सप्टेंबर रोजी होणार आहे. सुभेदार वाडा गणेशोत्सवात यंदा 'शिव साम्राज्य' ही संकल्पना घेऊन सजावट करण्यात येणार असून प्रसिद्ध कलादिग्दर्शक संजय धबडे यांनी सुभेदार वाड्याच्या मैदानावर शिवाजी महाराजांच्या महालाचे नेपथ्य केले आहे. २८ ऑगस्ट रोजी पांडुरंग बलकवडे यांचे 'शिवरायांची अष्टक्रांती' या विषयावर व्याख्यान होणार असून ३० ऑगस्ट रोजी मावळा बोर्ड गेमच्या निर्मात्यांशी गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. १ सप्टेंबर रोजी युवा शाहीर रामानंद उगले यांचा 'महाराष्ट्राची लोकगाणी' हा कार्यक्रम होणार असून सर्व कार्यक्रमांची वेळ रात्री साडेआठ अशी आहे. ४ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता 'कल्याणकर नवदुर्गा पुरस्कार' वितरण सोहळा व अचला वाघ यांचे 'शिवकालीन स्त्रिया' या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमास ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ४ आणि ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री १२ या वेळेत शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि नाण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५

सर्वपक्षीय राजकारण्यांचा 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी' - मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर

सर्वपक्षीय राजकारण्यांचा 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी' - मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर शेखर जोशी रस्ते आणि चौकांच्या नावांच्या पाट्या झाकून फलकबाजी करण्यात सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पटाईत आहेत.‌ अधूनमधून या मंडळींना असे अनधिकृत फलक उभारून शहर बकाल, विद्रुप होत असल्याचा साक्षात्कार होतो आणि या सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींचा 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी' चे नाटक सुरू होते. प्रसार माध्यमातून ही मंडळी कठोर इशारे देतात आणि कार्यकर्ते, पदाधिकारीही 'मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर ' असे समजून तिकडे साफ दुर्लक्ष करतात. अनधिकृत फलक उभारून शहर बकाल, विद्रूप केले जात आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत फलकबाजी करणाऱ्या मतदान करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे छायाचित्र असलेले फलक लागले असतील तर ते काढून टाका आणि ते लावणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. ही बातमी रविवारच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या आधीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी असे आदेश दिले होते. पण काही फरक पडलेला नाही. असे अनधिकृत फलक लावणारे, रस्ते, चौकांचे नामफलक झाकून त्यावर आपले चेहरे फलक लावणारे राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांना जबरदस्त आर्थिक दंड होत नाही तोपर्यंत ही फलकबाजी अशीच सुरू राहणार आहे. किमान एक तरी प्रकरणी अशी कठोर कारवाई झाली तर आणि तरच या प्रकाराला आळा बसेल. सर्वसामान्य नागरिकांना जे दिसते ते महापालिका प्रशासन, महापालिका अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग यांना दिसत नसेल यावर शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही. डोंबिवली पश्चिमेत नेताजी सुभाषचंद्र बोस रस्त्यावरील ( पंजाब नॅशनल बँक/आरबीएल बॅंक चौक) सुभाष रस्ता, महर्षी कर्वे रस्ता नावांच्या पाट्यांवर सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची फलकबाजी सुरू आहे. मध्यंतरी वेळोवेळी याची छायाचित्रे काढून समाज माध्यमातून प्रसारित करत होतो. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही लक्ष 'एक्स' (ट्विटर) वेधून घेतले होते. मात्र काहीही फरक पडलेला नाही. निर्लज्ज आणि कोडगे सर्वपक्षीय राजकीय नेते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते रस्ता व चौक नामफलक झाकून आपले चेहरे फलक बिनदिक्कतपणे लावत आहेत. हे सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासारख्या निर्लज्जपणा, कोडगेपणा मला करता येत नाही, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या फलकबाजीच्या विरोधात समाज माध्यमातून छायाचित्रे प्रसारित करणे बंद केले आहे. अशीच परिस्थिती डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रस्ता, आयआरबीचे म्हैसकर यांच्या नावाचा चौक, घनश्याम गुप्ते रस्ता, गोपी मॉल चौक येथे आहे. आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदींसह भाजपचे पदाधिकारी यांची छायाचित्रे असलेल्या मोठ्या कमानी डोंबिवलीभर लावण्यात आल्या आहेत. या कमानीवर सर्व मिळून साठ/ सत्तरहून अधिक स्टॅम्पसाईज फोटो आहेत. या कमानी अधिकृत असतीलही. पण या कमानींनी रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील दोन ते अडीच फूट जागा अडवली गेली आहे. दरवर्षीप्रमाणे भाजपच्या या कमानी आता नवरात्रोत्सव, दिवाळीपर्यंत अशाच कायम असतील. अनेक रस्ते अरुंद असल्याने या कमानींमुळे वाहतूक कोंडीतही भर पडत आहे. पण सत्ताधारी भाजपकडूनच हे होत असल्याने महापालिका प्रशासनही तिकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळे अनधिकृत फलक उभारून शहर बकाल आणि विद्रुप करणा-यांना आगामी महापालिका निवडणुकीत मतदान करू नका, हे अजित पवार यांनी केलेले आवाहन योग्यच आहे. मतदारांनी ते खरोखरच मनावर घ्यावे आणि मतदान करताना 'नोटा' वापरून आपला निषेध व्यक्त करावा. ©️शेखर जोशी

शनिवार, २३ ऑगस्ट, २०२५

पुन्हा एकदा तेच 'नाटक'! - मीटर पद्धत सुरू करायचीच असेल तर ती संपूर्ण कल्याण शहरात सुरू करावी

पुन्हा एकदा तेच 'नाटक'! - मीटर पद्धत सुरू करायचीच असेल तर ती संपूर्ण कल्याण शहरात सुरू करावी शेखर जोशी येत्या २५ ऑगस्टपासून कल्याणमध्ये मीटर पद्धतीने रिक्षा चालवल्या जाणार आहेत. वाहतूक पोलीस, आरटीओ, रेल्वे अधिकारी आणि रिक्षा चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मीटर रिक्षांसाठी रिक्षातळ निश्चित केला आहे. उल्हासनगर कडे जाणाऱ्या रिक्षा तळावरून या मीटर रिक्षा चालवल्या जाणार आहेत. मीटर पद्धतीने रिक्षा चालवण्याचे 'नाटक' पुन्हा एकदा रंगणार असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये आहे. एखाद्या विशिष्ट ठिकाणीच मीटरप्रमाणे रिक्षा थांबा/ तळ प्रवाशांना नको आहे तर संपूर्ण शहरात मीटर पद्धतीचा अवलंब झाला पाहिजे, अशी प्रवाशांची मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवली शहरामध्ये शेअर पद्धतीने रिक्षा चालवल्या जात आहेत. एखाद्या प्रवाशाने मीटर टाका, असे सांगितले तर इथे मीटरपद्धत नाही. शेअर किंवा थेट ( आम्ही सांगू तितके पैसे द्या) जायची पद्धत आहे.‌ वर्षानुवर्षे रिक्षाचालकांची ही मनमानी सुरू आहे. कल्याण डोंबिवलीतील विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना या प्रकरणी लक्ष घालायला वेळ नाही. सर्वपक्षीय राजकीय नेते, वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी रिक्षा चालक मालक संघटना, त्यांचे नेते आणि मुजोर रिक्षाचालकांपुढे नांगी टाकली आहे. १.०५ किलोमीटर अंतरासाठी रिक्षाचे किमान भाडे आता २६ रुपये झाले आहे. मात्र यापेक्षा कमी किंवा इतके अंतर जाण्यासाठी एखादा प्रवासी एकटा किंवा कुटुंबासोबत रिक्षात बसला तर रिक्षाचालक मनाला येईल ते (५० ते ७० रुपयांपर्यंत) पैसे मागतात.‌ अशा रिक्षाचालकांची तक्रार करा, असे वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सांगतात. पण प्रत्येक वेळी सर्वसामान्य माणसाला ते शक्य नाही. त्यामुळे रिक्षाचालक आणखी मुजोर झाले आहेत. मुळातच एखाद्या विशिष्ट ठिकाणीच मीटरप्रमाणे रिक्षा थांबा/तळ सुरू करणे हास्यास्पद आहे. याआधीही कल्याण डोंबिवलीत असे प्रयोग करून झाले आहेत. त्याला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तो प्रयोग बंदही झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत शेअर आणि मीटर अशा दोन्ही प्रकारच्या पद्धती असल्या पाहिजेत.‌ वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कल्याण डोंबिवलीत अधिकृत रिक्षातळ/ थांबे दिले आहेत त्य ठिकाणी शेअर आणि मीटर दोन्ही पद्धती ठेवायला हव्यात. तसेच अमूक ठिकाणी जायचे असेल तर हा थांबा, तमूक ठिकाणी जायचे असेल तर हा थांबा असे प्रकार केल्यामुळे कल्याण डोंबिवलीत रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रिक्षाथांबे तयार करण्यात आले आहेत. ते पहिल्यांदा बंद झाले पाहिजेत. रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर रिक्षाथांब्यावर प्रवासी बसला की तो सांगेल त्याप्रमाणे रिक्षाचालकाने कोणतीही कटकट न करता गेले पाहिजे. कल्याण डोंबिवलीत तो दिवस कधी उजाडेल माहिती नाही. खरे तर रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर कडोंमपाच्या परिवहन सेवेच्या बसगाड्यांना प्राधान्य दिले जाणे आवश्यक आहे. आता २५ ऑगस्टपासून उल्हासनगरकडे जाणा-या रिक्षा तळावरून मीटर प्रमाणे रिक्षा चालवल्या जाणार आहेत. रेल्वे स्थानकातून उतरणारे प्रवासीच फक्त रिक्षाने प्रवास करतात का? कल्याण रेल्वेस्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी फक्त उल्हासनगरला जाणारेच असणार आहेत का? त्यामुळे एकूणच हा प्रकार हास्यास्पद आहे. कल्याण डोंबिवली शहरात घरातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना घरापासून दुसरीकडे जायचे असेल तर काय? कल्याणमध्ये राहणा-या कोणाला घरापासून उल्हासनगरला जायचे असेल तर त्याने आधी घरापासून रिक्षाने कल्याण रेल्वे स्थानकावर यायचे आणि तिथून उल्हासनगरला जाण्यासाठी मीटरप्रमाणे असलेल्या रिक्षातळावर रिक्षा पकडावी, असे रिक्षा चालक मालक संघटना, त्यांचे पदाधिकारी, वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना अपेक्षित आहे का? कल्याणमधील रिक्षा चालक मालक संघटनांचे नेते, वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना मीटरनुसार रिक्षा घालाव्या, प्रवाशांची लुटमार होऊ नये असे खरोखरच वाटत असेल तर फक्त विशिष्ट ठिकाणीच मीटरप्रमाणे रिक्षातळ/ थांबा न करता संपूर्ण कल्याण व डोंबिवली शहरात रिक्षा मीटर सक्ती लागू करावी. मुठभर मुजोर रिक्षाचालकांपुढे नांगी न टाकता त्यांना वठणीवर आणावे.

मालेगाव बॉम्बस्फोट,७/११ आणि दाभोलकर प्रकरणांतील राजकीय हस्तक्षेप मीरा बोरवणकर यांनी जाहीर करावा -सनातन संस्थेचे आवाहन

मालेगाव बॉम्बस्फोट,७/११ आणि दाभोलकर प्रकरणांतील राजकीय हस्तक्षेप मीरा बोरवणकर यांनी जाहीर करावा -सनातन संस्थेचे आवाहन कोल्हापूर, दि. २३ ऑगस्ट मालेगाव बाँबस्फोट, मुंबईतील ७/११ चा रेल्वे बॉबस्फोट आणि दाभोलकर हत्या प्रकरणांत ‘राजकीय हस्तक्षेप करणार्‍या ‘त्या’ राजकीय नेत्यांची नावे माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी जाहीर करावी, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी शनिवारी येथे केले.‌ कोल्हापूर येथील प्रेसक्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या घटना ज्या काळात घडल्या, त्या वेळी महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार होते. दाभोलकर प्रकरणात काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हत्येच्या घटनेनंतर तपास चालू होण्यापूर्वीच ‘ही हत्या गोडसेवादी प्रवृत्तींनी केली’, असे म्हणत तपासाला दिशा दिली, हा राजकीय हस्तक्षेप होता, असे मीरा बोरावणकर यांना म्हणायचे होते का? एटीएस् प्रमुख हेमंत करकरे यांच्यावरही राजकीय दबाव होता, असे त्या म्हणाल्या, त्यातून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गृहमंत्री आर्.आर्. पाटील कि केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी हस्तक्षेप केला, असे बोरवणकर यांना म्हणायचे आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे राजहंस म्हणाले. पुणे येथे दाभोलकरांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (‘अंनिस’च्या) कार्यक्रमात मीरा बोरवणकर म्हणाल्या की, खाकीने हिरवे, भगवे वा पांढरे होणे, हे अत्यंत घातक आहे. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, खाकीने डावे आणि उजवेही असता कामा नये. ज्या संघटनेचे कार्यकर्ते नक्षलवादी म्हणून अटक होत आहेत, ज्या संघटनेचे नाव काँग्रेसच्या काळात आर्.आर्. पाटील हे गृहमंत्री असतांना महाराष्ट्र गुप्तवार्ता विभागाच्या ‘नक्षलवाद्यांना साहाय्य करणार्‍या संघटनांच्या’ यादीत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी राहिलेल्या बोरवणकर यांना हे माहिती नव्हते का ? नुकताच प्रशांत कांबळे उर्फ सुनील जगताप या कट्टर नक्षलवाद्याला रायगडमध्ये अटक झाली. तो अंनिसचे कार्यकर्ता आहे. हे बोरवणकर यांना माहिती नाही का ? स्वतःला विवेकाचा आवाज म्हणवणार्‍या अंनिसबद्दल आम्ही नव्हे, तर सातारा येथील साहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी कडक ताशेरे ओढत यांच्या ट्रस्टवर प्रशासक नेमण्याची, तसेच विशेष लेखापरिक्षण करण्याची शिफारस केली आहे, हे त्यांना माहित नाही का ? असा प्रश्नही राजहंस यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे करवीर तालुका संयोजक अशोक गुरव, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाप्रमुख दीपक देसाई, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक निरंजन शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी यावेळी उपस्थित होते.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील हे १२ पूल धोकादायक

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील हे १२ पूल धोकादायक घाटकोपर रेल्वे पूल, करी रोड रेल्वे पूल चिंचपोकळी रेल्वे पूल भायखळा रेल्वे पूल सँण्डहर्स्ट रोड रेल्वे पूल मरीन लाईन्स रेल्वे पूल ग्रँटरोड जवळील फ्रेंच पूल ग्रँटरोड ते चर्नीरोड दरम्यानचा केनडी रेल्वे पूल मुंबई सेंट्रल ते ग्रँटरोड महालक्ष्मी रेल्वे पूल दादर लोकमान्य टिळक रेल्वे पूल हे सर्व पूल धोकादायक स्वरूपाचे असून यातील काही पुलांच्या दोस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवकाळात गणपती आगमन, विसर्जन मिरवणुकीदरम्यान या पुलांवर मोठ्या प्रमाणात गर्दी तसेच नाचगाणी करू नये असे आवाहन बृहन्मुंबई महापालिकेने केले आहे.

अजितदादांना जे सुचले ते राजकारणी कोकण सुपुत्रांना का सुचले नाही?

अजितदादांना जे सुचले ते राजकारणी कोकण सुपुत्रांना का सुचले नाही? शेखर जोशी मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात सर्रास 'चाकरमानी' हा शब्द वापरला जातो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या शब्दासाठी 'कोकणवासीय' हा शब्द वापरला जावा, असे आदेश दिले, ते योग्यच आहे. वर्षानुवर्षे 'चाकरमानी' हाच शब्द मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी वापरला जातो. खरे तर 'चाकरमानी' ऐवजी 'नोकरदार' हा शब्द आणि आता अजित पवार म्हणतात त्याप्रमाणे 'कोकणवासीय' किंवा 'कोकणवासी' हा शब्द योग्य आहे. अजितदादांना जे सुचले ते राजकारणी कोकण सुपुत्रांना इतकी वर्षे का सुचले नाही? मुळचे कोकणवासीय असलेले आणि आता नोकरी/ व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत राहणारी सर्व नोकरदार/ व्यावसायिक मंडळी गणपती, शिमगा उत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जात असतात. त्यांचा हा नेम वर्षानुवर्षे अव्याहतपणे सुरू आहे. गणपती किंवा शिमगा सणासाठी कोकणात जाणाऱ्या मंडळींमध्ये मुंबईत राहून व्यवसाय करणारे मूळ कोकणवासीयही असतातच.‌ ते 'चाकरमानी' कसे होऊ शकतात.‌ उलट ते त्यांच्या दुकानात, कार्यालयात, व्यवसायात काही जणांना नोकरीवर ठेवतात. त्यामुळे नोकरदार किंवा मुंबईकर कोकणवासीय हा शब्द आता यापुढे वापरला गेला पाहिजे. मूळ कोकणवासीय राजकीय नेते सर्वपक्षात आहेत. अजित पवार यांना हे सुचले ते याआधी मुंबईकर झालेल्या आणि राजकारणात उच्च पदे भुषविलेल्या कोकण सुपुत्रांना का सुचले नाही? म्हटले तर अजित पवार यांनी दिलेल्या आदेशात तसे विशेष असे काही नाही. पण अजितदादांनी संधी साधली आणि बाजी मारली असे म्हणावे लागेल.

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५

ब्रह्माकुमारीजच्या आबुरोड येथील मुख्यालयात उद्या महा रक्तदान शिबिर

आबुरोड येथील मुख्यालयात उद्या महा रक्तदान शिबिर - ब्रह्माकुमारीजच्या देशभरातील सहा हजारांहून अधिक सेवाकेंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन आबूरोड (राजस्थान), दि. २२ ऑगस्ट येथील ब्रह्माकुमारीज संस्थानचे आंतरराष्ट्रीय मुख्यालय असलेल्या 'शांतीवन' येथे उद्या- २३ ऑगस्ट रोजी महाभव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रह्माकुमारीजच्या दिवंगत राजयोगिनी दादी प्रकाशमणि यांची पुण्यतिथी विश्वबंधू दिन म्हणून साजरी करण्यात येते. याचा एक भाग म्हणून ब्रह्माकुमारीजतर्फे संपूर्ण भारतभर तसेच नेपाळ येथे रक्तदानाचे महाअभियान आयोजित करण्यात आले आहे. या महाअभियानची सुरुवात १७ ऑगस्ट रोजी गुरुग्राम येथे केंद्रीय आरोग्यमंत्री जे.‌पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. आता ब्रह्माकुमारीजतर्फे संपूर्ण देशात २२ ते २५ ऑगस्ट या कालावधीत सहा हजारांहून अधिक सेवाकेंद्रात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या महारक्तदान शिबिरात एक लाख रक्त पिशव्या जमा करण्याचे लक्ष्य आहे.‌ तसेच या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी, यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.

मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५

दहावी अनुत्तीर्ण युवकांसाठी'कमवा आणि शिका' उपक्रम सुरू करणार- म. न. ढोकळे

दहावी अनुत्तीर्ण युवकांसाठी'कमवा आणि शिका' उपक्रम सुरू करणार-म.न.ढोकळे डोंबिवली, दि. १९ ऑगस्ट दहावी अनुत्तीर्ण आणि पुढे शिकण्याची संधी न मिळालेल्या युवकांसाठी'कमवा आणि शिका'हा उपक्रम सुरू करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे निवृत्त शाखा व्यवस्थापक आणि डोंबिवलीतील ढोकळे सराव परीक्षा केंद्राचे संस्थापक-संचालक म. न. ढोकळे यांनी दिली. ढोकळे यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणाच्या निमित्ताने डोंबिवली पश्चिम येथील ढोकळे सराव परीक्षा केंद्राच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन समितीचे माजी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद परशुराम म्हात्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून दहावी अनुत्तीर्ण युवकांना कामाची आणि शिकण्याची संधी देण्यात येईल. उपक्रमाची प्रेरणा बार्शीचे शिक्षणमहर्षी मामासाहेब जगदाळे यांच्याकडून मिळाली असल्याचे ढोकळे म्हणाले. माझ्या आई-वडिलांच्या नावाने 'लक्ष्मी नरसिंह फाऊंडेशन'ची स्थापन करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्येष्ठ नागरिकांना अन्न-वस्त्र उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही ढोकळे यांनी सांगितले. अभिनेते अशोक कुलकर्णींसह इतर मान्यवर तसेच डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिक संघ- विष्णुनगर, आचार्य अत्रे कट्टा, भागशाळा मैदान मंडळ, श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक मंडळ, गायत्री परिवार, वामनराव पै परिवार, जीवनविद्या मिशन परिवार इत्यादी संस्था, संघटनांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. छायाचित्र ओळ म. न. ढोकळे यांचा सत्कार करताना अभिनेते अशोक कुलकर्णी. छायाचित्रात डावीकडे प्रल्हाद परशुराम म्हात्रे.

पं. वसंतराव देशपांडे यांच्याकडून गाण्याची 'नजर' मिळाली- पं. चंद्रकांत लिमये

ज्येष्ठ शास्त्रीय संगीत- नाट्यसंगीत गायक पं. वसंतराव देशपांडे यांचे पट्टशिष्य आणि शास्त्रीय संगीत गायक- अभिनेते पं. चंद्रकांत लिमये आज १९ ऑगस्ट रोजी ७५ वर्षे पूर्ण करून ७६ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने पं. लिमये यांच्याशी केलेली बातचीत. पं. वसंतराव देशपांडे यांच्याकडून गाण्याची 'नजर' मिळाली- पं. चंद्रकांत लिमये शेखर जोशी 'वसंताची गायकी परंपरेच्या पालखीतून संथपणे मिरवीत जाणारी नाही, द-या खोऱ्यातून बेफाम दौडत जाणाऱ्या जवान घोडेस्वारासारखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे. भर उन्हाळ्यात पलाशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी. ती फुले पाहायला उन्हाची तिरीप सोसणारी जवानी हवी' अशा शब्दात 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व' पु.ल. देशपांडे यांनी पं. वसंतराव देशपांडे यांचा गौरव केला होता. नाट्य, शास्त्रीय संगीतातील असे श्रेष्ठ गायक लिमये यांना गुरु म्हणून लाभले. वसंतराव देशपांडे यांच्याकडे लिमये यांनी तब्बल बारा वर्षे गुरुकुल पद्धतीने गाण्याचे धडे घेतले. लिमये यांच्यासाठी पं. वसंतराव देशपांडे हे त्यांच्या आयुष्यातील सर्वस्व होते. वसंतराव देशपांडे यांनी गाजवलेल्या 'कट्यार काळजात घुसली' या नाटकात वसंतराव काम करत असताना लिमये यांना 'चांद' ही भूमिका करायची संधी मिळाली तर वसंतरावांच्या पश्चात याच नाटकात वसंतरावांनी लोकप्रिय केलेली 'खॉंसाहेब आफताब हुसेन' ही भूमिका करायची संधीही लिमये यांना लाभली. वसंतरावांनी लिमये यांना आपल्या गायकीचे उत्तराधिकारी मानले. लिमये यांच्या बोलण्यात आणि गाण्यातही त्यांचे गुरु वसंतराव यांचा भास होतो. याविषयी लिमये यांना विचारले असता ते म्हणाले, गुरुप्रति नितांत श्रद्धा आणि पूर्णपणे समर्पित भावना यामुळे त्या शिष्याच्या गळ्यात आपोआपच त्याच्या गुरुंची गायकी उतरते. वसंतरावांसारखे गायचे किंवा बोलायचे असं मुद्दाम ठरवून काही करत नाही, माझ्याकडून ते आपोआपच होते. वडिलांकडून सूर तर आईकडून लय मिळाली लिमये यांचे वडील गणेश दत्तात्रय लिमये हे कवी होते. नथूबुवा कथ्थक यांच्याकडे ते गाणे शिकले होते तर आई विमल गणेश लिमये या माटेबुवांकडे संवादिनी शिकल्या होत्या. गाण्याचा वारसा आई-वडिलांकडून मिळाला. आईकडून लय आणि वडिलांकडून सूर मिळाला. आणि यामुळेच आपण गायक झाल्याचे लिमये म्हणाले. गाण्याचे शिक्षण नेमके कधी सुरू झाले? याविषयी माहिती देताना लिमये म्हणाले, माझे सहावीपर्यंतचे शिक्षण कल्याणला झाले. त्यानंतर आम्ही मुंबईत आलो. इकडे दादरला छबीलदास शाळेत होतो. शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आमचे शिक्षक बालशंकर देशपांडे यांनी ग्वाल्हेर घराण्याचे गायक डॉ. वसंतराव राजोपाध्ये यांना गाणी बसवून घेण्यासाठी बोलावले होते. त्यांनी शिकवलेले मी चटकन आत्मसात केले. गाणे आत्मसात करण्याची माझी वृत्ती व आवाज ऐकल्यानंतर राजोपाध्ये यांनी, कोणाकडे गाणे शिकतोस? असा प्रश्न विचारला. कोणाकडेही गाणे शिकत नाही असे त्यांना सांगितले. त्यानंतर राजोपाध्ये यांनी वडिलांना देण्यासाठी एक चिठ्ठी दिली. हा मुलगा भविष्यात चांगला गायक होऊ शकेल, त्यामुळे त्यांने गाणे शिकणे आवश्यक आहे. तुम्ही त्याला व्यास संगीत विद्यालयात गाणे शिकायला पाठवता की मी मी तुमच्या घरी येऊन त्याला गाणे शिकवू? असे राजोपाध्ये यांनी त्या चिठ्ठीत लिहिले होते‌. माझे वडील मला पं.‌ नारायणराव व्यास यांच्या व्यास संगीत विद्यालयात घेऊन गेले. राजोपाध्ये उपप्राचार्य होते. आणि मी गाणे शिकण्यासाठी जाऊ लागलो. राजोपाध्ये यांच्यानंतर ग्वाल्हेर घराण्याचेच गायक पं. नारायणराव व्यास, पं. गजाननबुवा जोशी, सी.पी. उर्फ बाबूकाका रेळे तसेच पुढे आग्रा घराण्याचे गायक बालकराम जाधव, जयपूर घराण्याचे गायक पंडित रत्नाकर पै यांच्याकडेही गाणे शिकलो. व्यास संगीत विद्यालयात मासिक जलसा होत असे. त्यात माझे गाणे पं. नारायणराव व्यास यांनी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत ऐकले. मी त्यांना नमस्कार करायला गेल्यावर त्यांनी उद्यापासून घरी यायचे, असा आदेश दिला. नारायणराव व्यास हेपं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य व फार मोठे गायक होते.
आयुष्यातील तब्बल बारा वर्षे वसंतरावांकडे आयुष्यातील सर्वात जास्त काळ म्हणजे तब्बल बारा वर्षे वसंतराव देशपांडे यांच्याकडे मी फक्त शास्त्रीय संगीत शिकलो. बाकी नाट्य संगीत, ठुमरी इत्यादी उपशास्त्रीय प्रकार गाण्यासाठी जो उपजत 'लायटर फॉर्म' गळ्यात असावा लागतो तो माझ्या गळ्यात होताच. पण त्याला वसंतराव देशपांडे यांनी शिस्त लावली, आवाज फेकण्याची जी कला असावी लागते तिला वसंतराव ऊर्फ बुवांनी नजर दिली. आवाजाची फेक व तो लगाव मला बुवांमुळे मिळाला आणि माझे गाणे आपोआपच बुवांच्या वळणाचे झाले. हे नुसते शिकवून होत नाही तर त्यासाठी गुरुप्रती प्रचंड निष्ठा, अत्यंत श्रद्धा आणि शरणभाव असावा लागतो. तेव्हा ते आपोआप गाणे शिष्यात पाझरते. आणि तिथेच एखाद्या प्रतिभासंपन्न आणि श्रेष्ठ गायकाचे घराणे सुरू होते.
'कट्यार' मधील 'चॉंद' मुळे आयुष्याला वेगळे वळण तेव्हा मी 'हिंदुस्तान फेरडो' कंपनीत नोकरी करत होतो. एक दिवस 'नाट्यसंपदा'चे प्रभाकर पणशीकर यांचा दूरध्वनी आला. त्यांनी मला भेटायला बोलावले. 'नाट्यसंपदा'च्या 'कट्यार काळजात घुसली' नाटकात वसंतराव 'खॉंसाहेब' भूमिका करत होते. या नाटकातील 'चॉंद' भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली.‌ माझ्या गाण्याच्या तालमी नाटकात ऑर्गनसाथ करणारे विष्णुपंत वष्ट घेत असत. तालिम सुरू असताना अभिनेते शंकर घाणेकर तिथे रोज माझे गाणे ऐकण्यासाठी येत असत. पुढे गोवा दौऱ्यात एकदा नाटकातील प्रकाश घांग्रेकर, फैय्याज, बकुल पंडित कलाकारांना बुवा गाणे शिकवत होते. मी बाहेर पायरीवर बसून ते ऐकत होतो. अभिनेते शंकर घाणेकर रंगभूषा करून बाहेर आले. मला पायरीवर बसलेले पाहून घाणेकर म्हणाले, अरे मुला तू काय इकडे बसला आहेस? जा तिकडे. आणि त्यांनी बुवांना सांगितले की याला शिकवा. त्यांच्या बोलण्यातून त्यांनी बुवांना हाच तुमचा खरा शिष्य आहे असे सुचित केले.‌ तेव्हापासून गाणे शिकण्यासाठी मी जो तंबोरा हातात घेतला तिथपासून आत्तापर्यंत तो तंबोरा सोडला नाही.‌ बुवांची तंबो-याची ती जोडी आजही माझ्याकडेच आहे. 'कट्यार' मधील 'चॉंद' भूमिकेमुळे आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले. नाटकाच्या दौऱ्याच्या निमित्ताने वसंतरावांचा खूप सहवास मिळाला. भरभरून शिकायला मिळाले. नाटकाचा दौरा, जाहीर कार्यक्रम किंवा घरगुती मैफिली असल्या की वसंतराव मला त्यांच्याबरोबर घेऊन जायचे, जणू काही त्यांचे शेपूटच. पुढे त्यांच्या पुण्यातील घरी किंवा ते मुंबईत आले की आमच्या घरी गाणे शिकायला मिळाले. वसंतराव यांची गायकी पूर्ण वेगळी वसंतरावांच्या गाण्यात नाविन्य आणि उत्स्फूर्तपणा होता. वसंतराव यांची गायकी पूर्णपणे वेगळी होती. आवाजाचा लगाव, स्वरांची फेक, एखाद्या रागात जाणे आणि बाहेर पडणे, ताना, सरगम हे सर्व काही वेगळे होते. प्रचलित गाण्यांपेक्षा त्यांचे गाणे कानांना वेगळे कळत असे. कोणत्या रागात काय करायचे आणि ते का करायचे? राग वाढवत कसा न्यायचा? सरगम कशी गायची? अशा अनेक गोष्टी बुवांकडे शिकायला मिळाल्या. तसेच कुठे काय गायचे? आणि कुठे काय गायचे नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अत्यंत निकोप, निर्मळ आणि सहज सूर कसा लावायचा? हे त्यांच्याकडून शिकायला मिळाले. वसंतरावांकडे शिकायला सुरुवात केली तेव्हा माझे बऱ्यापैकी नाव झाले होते. शास्त्रीय संगीतातील तीन घराण्यांची तालीम मला मिळाली होती. मानधन घेऊन मी कार्यक्रम करत होतो. वसंतरावांकडे शिकायला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे मी कार्यक्रम करणे थांबवले. बुवांची गायकी गळ्यावर चढायला हवी म्हणून मी माझ्या चालणा-या मैफिली बंद केल्या. असे उदाहरण कुठेही मिळणार नाही. वसंतरावांकडे मी नव्याने घडलो, नव्याने शिकलो. त्यांच्यामुळे मला गाण्याची 'नजर' मिळाली असे लिमये यांनी सांगितले.
आणि 'खॉंसाहेब' म्हणून रसिकांनी स्वीकारले वसंतरावांच्या पश्चात 'कट्यार काळजात घुसली' मधील त्यांनी लोकप्रिय केलेल्या 'खॉंसाहेब आफताब हुसेन' या मुख्य भूमिकेसाठी माझी निवड झाली. मी गुरुऋण फेडण्यासाठी जी मेहनत घेतली त्याला उदंड प्रतिसाद मिळाला.‌ प्रसिद्धी माध्यमे, सर्वसामान्य रसिक, वसंतराव यांचे चाहते यांनीही भूमिकेचे कौतुक केले. वसंतराव ऊर्फ बुवा माझे सर्वस्व होते. ते आई, वडील, गुरु, मित्र असे सर्व काही होते. वसंतराव आणि मी एकमेकांपासून वेगळे होऊच शकत नाही. पुण्यातील 'कट्यार' च्या एका प्रयोगाला पं. अभिषेकी बुवा आले होते. प्रयोग झाल्यानंतर ते आत आले आणि 'चंदूजी बुवांची आठवण आली' इतकेच बोलले. अभिषेकी बुवांच्या त्या एका वाक्यात सर्व काही आले. व.पु. काळे तर मला मिठी मारून रडले आणि बक्षीस म्हणून मला त्याकाळी पाचशे रुपये दिले. अजून एक हृदय आठवण. पुण्यातील नाटकाच्या एका प्रयोगाला बुवांच्या पत्नी कुटुंबासह आल्या होत्या. त्यावेळी तिसऱ्या अंकात 'तेजोनिधी लोहगोल' म्हणण्यासाठी मी प्रवेश केला आणि बुवांच्या पत्नीला अक्षरशः बुवाच रंगमंचावर आले आहेत असे वाटून त्या नाट्यगृहातून डोळे पुसत बाहेर पडल्या. बापूने म्हणजे बुवांचा मुलगा विजय देशपांडे यांनी मला आत येऊन सांगितले, चंदू तुझे नाटक खूप छान चालले आहे. पण आईला बाबांची आठवण येऊन दुःख असह्य झाले आणि म्हणूनच ती नाटक सोडून घरी गेली. वसंतराव देशपांडे संगीत सभा गुरु आणि माझे सर्वस्व असलेल्या वसंतरावांच्या प्रति कृतज्ञता म्हणून आणि नव्या पिढीमध्ये शास्त्रीय संगीताची आवड निर्माण करण्यासाठी, तरुण गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी २००० मध्ये 'वसंतराव देशपांडे संगीत सभा' संस्थेची मध्ये स्थापना केली. करोना येईपर्यंत संस्थेतर्फे विविध कार्यक्रम केले. 'होरी के रंग', 'श्रुतीरंग' वर्षा के', शाकुंतल ते कट्यार', 'नाट्यरंग', ' हवेली संगीत, घराणोंकी खासियते' या कार्यक्रमांचा समावेश आहे. एका मोठ्या मराठी मनोरंजन वाहिनीवर सादर झालेला 'वसंतराव देशपांडे एक स्मरण' हा कार्यक्रम मैलाचा दगड ठरला. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी संगीत संमेलन, शास्त्रीय, नाट्य व सुगम संगीत मैफल असे कार्यक्रमही होत असतात. सध्या मी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे धडे देतो आहे. स्वानंद भुसारी, सुनील पंडित, सीमा ताडे, ओंकार मुळ्ये, शीतल देशपांडे, अमोल भागीवंत, दिवंगत विठ्ठल कामन्ना हे माझ्याकडे गाणे शिकलेले माझे विद्यार्थी. गाणे शिकण्याकरता तुम्ही जो गुरु केला असेल त्याच्याशी एकनिष्ठ राहा. जसा शिष्य आपल्या गुरुचा शोध घेतो तसाच गुरुही आपल्या शिष्याला शोधत असतो. आपल्यात काय कमी आहे? आपले दोष हे योग्य आणि उत्तम गुरूच आपल्याला सांगू शकतो. त्यामुळे गुरु जे सांगेल त्याप्रमाणेच गाणे शिकावे. गाण्याप्रती असलेली आपली निष्ठा शेवटपर्यंत टिकवून ठेवावी आणि गुरूंच्या सहवासात राहावे. आजच्या तरुण पिढीतील काही अपवाद वगळता शिकायला येणारे विद्यार्थी हे गाणे शिकायला नव्हे तर 'तास' भरायला येतात, अशी खंत लिमये यांनी व्यक्त केली. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या ब-याच विद्यार्थ्यांना आपण विनाशुल्क शिकविले असल्याचेही त्यांनी सांगितले.
विविध संगीत मैफलीत सहभाग पं. लिमये यांना त्यांच्या आजवरच्या दीर्घ सांगितिक कारकिर्दीत 'सूर संसद'चा 'सूरमणी' पुरस्कार मिळाला. कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये तेथील विद्यापीठाकडून त्यांना 'भारतीय शास्त्रीय संगीत' विषयावर सादरीकरणासाठी बोलाविण्यात आले. कॅनडा, अमेरिकेतील काही ठिकाणी नाट्यसंगीत आणि मराठी अभंग यावर त्यांची व्याख्याने व सादरीकरणही झाले.‌ शास्त्रीय संगीतासाठी केंद्र सरकारची 'सीनियर फेलोशिप' त्यांना मिळाली. महाराष्ट्र कलानिकेतनतर्फे 'महाराष्ट्र वैभव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ठाण्यातील सिद्धकला संगीत अकादमीतर्फेही विशेष पुरस्कार देण्यात आला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 'स्वर रंगराज' पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई, दिल्ली आणि नागपूर दूरदर्शन केंद्रांवर त्यांचे गाण्याचे कार्यक्रम झाले आहेत. मुंबई महाराष्ट्रासह गोवा, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, नवी दिल्ली या ठिकाणी लिमये यांच्या सांगितिक मैफली झाल्या आहेत. पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सव, देवास येथील कुमार गंधर्व सोहळा, कर्नाटकातील कुंदगोळ येथील सवाई गंधर्व संगीत महोत्सव, नागपूर, दिल्ली येथील डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती समारोह, नवी दिल्लीत पं. पलूस्कर पुण्यतिथीनिमित्त संगीत संमेलन, दिल्लीतील संगीत नाटक अकादमी, दिल्लीतीलच भेंडी बाजार घराणा संगीत संमेलन अशा विविध ठिकाणी लिमये यांचे गायन झाले आहे.‌ लिमये यांनी गायलेल्या मराठी अभंगांची 'भक्तीयात्रा' ही ध्वनिफीतही प्रकाशित झाली आहे. ज्येष्ठ संगीतकार दिवंगत स्नेहल भाटकर यांनी हे अभंग संगीतबद्ध केले आहेत. 'जयध्वनी' या जोडरागाची आणि 'चंद्र मोहिनी' या स्वतंत्र रागाची निर्मितीही लिमये यांनी केली आहे. तसेच 'देखादेखी'सह अनेक बंदिशी आणि तराणे त्यांनी बाधले आहेत. नेहरू सेंटरने गायक/ अभिनेते सैगल यांच्या आयुष्यावर 'फिर तेरी राह गुजर याद आयी' हे नाटक सादर केले होते. या नाटकात लिमये यांनी उस्ताद अब्दुलकरीम खाँसाहेब आणि उस्ताद फैयाज खाँसाहेब अशा दोन भूमिका केल्या होत्या. पुण्याच्या संध्या देवरुखकर यांनी डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यावर लिहिलेले 'वसंत बहार' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकासाठी पं. चंद्रकांत लिमये यांनी 'तेजोनिधी लोहगोल' हा विशेष लेख लिहिला. डॉ. वसंतराव देशपांडे यांची स्वतंत्र, बुद्धीप्रधान गायकी कशी घडली, त्यांना कोण कोण गुरुजन लाभले आणि त्यांचा संगीत प्रवास कसा समृद्ध होत गेला या बद्दलच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या या लेखावर आधारीत 'तेजोनिधी लोहगोल' ही मालिका पं. लिमये यांच्या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'आजचा दिवस माझा ' या मराठी चित्रपटात लिमये यांनी अंध गवई' भूमिका साकारली. 'द फर्म लॅण्ड' या फ्रेंच चित्रपटात लिमये यांची गाण्याची मैफल दाखविली आहे. राज्य/केंद्र शासनाच्या सर्वोच्च पुरस्कारांपासून वंचित शास्त्रीय आणि नाट्य संगीतात महत्त्वपूर्ण योगदान देणारे लिमये राज्य किंवा केंद्र शासनाच्या सर्वोच्च पुरस्कारांपासून अद्यापपर्यंत वंचित राहिले आहेत. लिमये यांच्यापेक्षा वयाने आणि सांगितिक अनुभवानेही लहान असलेल्या मंडळींना राज्य आणि शासनाचे सर्वोच्च पुरस्कार मिळाले आहेत. या मंडळींना हे सर्वोच्च पुरस्कार मिळाले म्हणून राग नाही. मात्र आजवरच्या माझ्या दीर्घ सांगितिक योगदानाची दखल या सर्वोच्च पुरस्कारांसाठी राज्य किंवा केंद्र शासनाकडून अद्याप घेतली गेली नाही, याचे वाईट वाटते. शासनाकडून असा भेदभाव होणे, मला तरी अपेक्षित नाही. आपल्याला हेतूपुरस्सर डावलले जात नाही ना? अशी शंकाही मनात येते. राज्य आणि केंद्र शासनाचा कोणताही सर्वोच्च पुरस्कार अद्याप मिळाला नसला तरी रसिकांचे भरभरून सर्वोच्च प्रेम आजवर लाभले आहे. या रसिकांचा मी ऋणी आहे. पुन्हा जाहीर संगीत मैफल करायची आहे पत्नी प्रज्ञासह प्राची, दीपा या विवाहित कन्या, जावई, नातवंडे आणि मुलगा निनाद असा लिमये यांचा परिवार. निनाद अभिनय क्षेत्रात आहे. वयोपरत्वे लिमये आता जाहीर संगीत मैफिली किंवा कार्यक्रम करत नाहीत. मात्र पुन्हा एकदा संगीत मैफल, जाहीर कार्यक्रम करण्याची त्यांची इच्छा आहे. बघू या देवाची इच्छा, असे सांगत लिमये यांनी या गप्पांचा समारोप केला. अन्य छायाचित्रे --पूर्ण-- पं. चंद्रकांत लिमये (+91 98334 31164)

सोमवार, १८ ऑगस्ट, २०२५

जयंत काशिद यांची ३० वेळा भीमाशंकर वारी

डोंबिवलीकर जयंत काशिद दरवर्षी श्रावणात भीमाशंकरला डोंगरवाटेने जातात. यंदाच्या वर्षी त्यांची ३० वी भीमाशंकर वारी झाली.‌ श्रावण सोमवारच्या निमित्ताने काशिद यांच्याशी केलेली बातचीत. शेजो उवाच https://youtu.be/WXgzFZ2aRjY?feature=shared लाईक, शेअर, सबस्क्राईब

गुरुवार, ७ ऑगस्ट, २०२५

पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस

सनातन संस्थेला ‘दहशतवादी’ म्हटल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस मुंबई, दि. ७ ऑगस्ट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन संस्थेला ‘दहशतवादी’ म्हटल्याप्रकरणी सनातन संस्थेचे विश्वस्त वीरेंद्र मराठे यांच्या वतीने त्यांना दहा कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच चव्हाण यांनी सनातन संस्थेची बिनशर्त माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी दिला आहे. चव्हाण यांनी १५ दिवसांच्या आत लेखी माफी मागणे, मूळ मुलाखतीइतक्याच प्रसिद्धीने ती माफी प्रसिद्ध करणे, भविष्यात कोणतीही बदनामीकारक विधाने न करणे आणि १० हजार रुपये कायदेशीर खर्च भरपाई देणे, अशा मागण्या या नोटीसीत करण्यात आल्या आहेत. चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे सनातन संस्थेची प्रतीमा मलीन झाली असून हजारो साधकांच्या भावना दुखावल्या आहेत. ही नोटीस मिळूनही उत्तर न दिल्यास चव्हाण यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल करण्यात येणार आहेत, असे संस्थेचे मानद कायदेशीर सल्लागार तथा मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता रामदास केसरकर यांनी नोटिसीत म्हटले आहे. पृथ्वीराज चव्हाण आज सांगत आहेत की, ‘भगवा’ हा महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीचा, छत्रपती शिवरायांचा, संत ज्ञानेश्वरांपासून सर्व संत आणि वारकर्‍यांचा पवित्र भगवा आहे. त्यामुळे कोणीही “भगवा दहशतवाद’’ असे म्हणू नये, असे काँग्रेसी नेत्यांना आवाहन करत आहेत; पण जेव्हा मालेगाव प्रकरण झाले, त्या वेळी काँग्रेसी नेते पी. चिदंबरम्, दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे आदी नेत्यांनी ‘भगवा दहशतवाद’ म्हणत हिंदूंना लक्ष्य केले. तेव्हा चव्हाण यांना ‘भगवा’ छत्रपतींचा आहे, संतांचा आहे, हे लक्षात आले नाही ? इतकी वर्षे ते झोपले होते का? असा प्रश्न वर्तक यांनी उपस्थित केला आहे.‌