शनिवार, २३ ऑगस्ट, २०२५

पुन्हा एकदा तेच 'नाटक'! - मीटर पद्धत सुरू करायचीच असेल तर ती संपूर्ण कल्याण शहरात सुरू करावी

पुन्हा एकदा तेच 'नाटक'! - मीटर पद्धत सुरू करायचीच असेल तर ती संपूर्ण कल्याण शहरात सुरू करावी शेखर जोशी येत्या २५ ऑगस्टपासून कल्याणमध्ये मीटर पद्धतीने रिक्षा चालवल्या जाणार आहेत. वाहतूक पोलीस, आरटीओ, रेल्वे अधिकारी आणि रिक्षा चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मीटर रिक्षांसाठी रिक्षातळ निश्चित केला आहे. उल्हासनगर कडे जाणाऱ्या रिक्षा तळावरून या मीटर रिक्षा चालवल्या जाणार आहेत. मीटर पद्धतीने रिक्षा चालवण्याचे 'नाटक' पुन्हा एकदा रंगणार असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये आहे. एखाद्या विशिष्ट ठिकाणीच मीटरप्रमाणे रिक्षा थांबा/ तळ प्रवाशांना नको आहे तर संपूर्ण शहरात मीटर पद्धतीचा अवलंब झाला पाहिजे, अशी प्रवाशांची मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवली शहरामध्ये शेअर पद्धतीने रिक्षा चालवल्या जात आहेत. एखाद्या प्रवाशाने मीटर टाका, असे सांगितले तर इथे मीटरपद्धत नाही. शेअर किंवा थेट ( आम्ही सांगू तितके पैसे द्या) जायची पद्धत आहे.‌ वर्षानुवर्षे रिक्षाचालकांची ही मनमानी सुरू आहे. कल्याण डोंबिवलीतील विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना या प्रकरणी लक्ष घालायला वेळ नाही. सर्वपक्षीय राजकीय नेते, वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी रिक्षा चालक मालक संघटना, त्यांचे नेते आणि मुजोर रिक्षाचालकांपुढे नांगी टाकली आहे. १.०५ किलोमीटर अंतरासाठी रिक्षाचे किमान भाडे आता २६ रुपये झाले आहे. मात्र यापेक्षा कमी किंवा इतके अंतर जाण्यासाठी एखादा प्रवासी एकटा किंवा कुटुंबासोबत रिक्षात बसला तर रिक्षाचालक मनाला येईल ते (५० ते ७० रुपयांपर्यंत) पैसे मागतात.‌ अशा रिक्षाचालकांची तक्रार करा, असे वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सांगतात. पण प्रत्येक वेळी सर्वसामान्य माणसाला ते शक्य नाही. त्यामुळे रिक्षाचालक आणखी मुजोर झाले आहेत. मुळातच एखाद्या विशिष्ट ठिकाणीच मीटरप्रमाणे रिक्षा थांबा/तळ सुरू करणे हास्यास्पद आहे. याआधीही कल्याण डोंबिवलीत असे प्रयोग करून झाले आहेत. त्याला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तो प्रयोग बंदही झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत शेअर आणि मीटर अशा दोन्ही प्रकारच्या पद्धती असल्या पाहिजेत.‌ वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कल्याण डोंबिवलीत अधिकृत रिक्षातळ/ थांबे दिले आहेत त्य ठिकाणी शेअर आणि मीटर दोन्ही पद्धती ठेवायला हव्यात. तसेच अमूक ठिकाणी जायचे असेल तर हा थांबा, तमूक ठिकाणी जायचे असेल तर हा थांबा असे प्रकार केल्यामुळे कल्याण डोंबिवलीत रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रिक्षाथांबे तयार करण्यात आले आहेत. ते पहिल्यांदा बंद झाले पाहिजेत. रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर रिक्षाथांब्यावर प्रवासी बसला की तो सांगेल त्याप्रमाणे रिक्षाचालकाने कोणतीही कटकट न करता गेले पाहिजे. कल्याण डोंबिवलीत तो दिवस कधी उजाडेल माहिती नाही. खरे तर रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर कडोंमपाच्या परिवहन सेवेच्या बसगाड्यांना प्राधान्य दिले जाणे आवश्यक आहे. आता २५ ऑगस्टपासून उल्हासनगरकडे जाणा-या रिक्षा तळावरून मीटर प्रमाणे रिक्षा चालवल्या जाणार आहेत. रेल्वे स्थानकातून उतरणारे प्रवासीच फक्त रिक्षाने प्रवास करतात का? कल्याण रेल्वेस्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी फक्त उल्हासनगरला जाणारेच असणार आहेत का? त्यामुळे एकूणच हा प्रकार हास्यास्पद आहे. कल्याण डोंबिवली शहरात घरातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना घरापासून दुसरीकडे जायचे असेल तर काय? कल्याणमध्ये राहणा-या कोणाला घरापासून उल्हासनगरला जायचे असेल तर त्याने आधी घरापासून रिक्षाने कल्याण रेल्वे स्थानकावर यायचे आणि तिथून उल्हासनगरला जाण्यासाठी मीटरप्रमाणे असलेल्या रिक्षातळावर रिक्षा पकडावी, असे रिक्षा चालक मालक संघटना, त्यांचे पदाधिकारी, वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना अपेक्षित आहे का? कल्याणमधील रिक्षा चालक मालक संघटनांचे नेते, वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना मीटरनुसार रिक्षा घालाव्या, प्रवाशांची लुटमार होऊ नये असे खरोखरच वाटत असेल तर फक्त विशिष्ट ठिकाणीच मीटरप्रमाणे रिक्षातळ/ थांबा न करता संपूर्ण कल्याण व डोंबिवली शहरात रिक्षा मीटर सक्ती लागू करावी. मुठभर मुजोर रिक्षाचालकांपुढे नांगी न टाकता त्यांना वठणीवर आणावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: