सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५
सर्वपक्षीय राजकारण्यांचा 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी' - मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर
सर्वपक्षीय राजकारण्यांचा
'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी'
- मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर
शेखर जोशी
रस्ते आणि चौकांच्या नावांच्या पाट्या झाकून फलकबाजी करण्यात सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पटाईत आहेत. अधूनमधून या मंडळींना असे अनधिकृत फलक उभारून शहर बकाल, विद्रुप होत असल्याचा साक्षात्कार होतो आणि या सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींचा 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी' चे नाटक सुरू होते. प्रसार माध्यमातून ही मंडळी कठोर इशारे देतात आणि कार्यकर्ते, पदाधिकारीही 'मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर ' असे समजून तिकडे साफ दुर्लक्ष करतात.
अनधिकृत फलक उभारून शहर बकाल, विद्रूप केले जात आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत फलकबाजी करणाऱ्या मतदान करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे छायाचित्र असलेले फलक लागले असतील तर ते काढून टाका आणि ते लावणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. ही बातमी रविवारच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे.
या आधीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी असे आदेश दिले होते. पण काही फरक पडलेला नाही. असे अनधिकृत फलक लावणारे, रस्ते, चौकांचे नामफलक झाकून त्यावर आपले चेहरे फलक लावणारे राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांना जबरदस्त आर्थिक दंड होत नाही तोपर्यंत ही फलकबाजी अशीच सुरू राहणार आहे. किमान एक तरी प्रकरणी अशी कठोर कारवाई झाली तर आणि तरच या प्रकाराला आळा बसेल. सर्वसामान्य नागरिकांना जे दिसते ते महापालिका प्रशासन, महापालिका अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग यांना दिसत नसेल यावर शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही.
डोंबिवली पश्चिमेत नेताजी सुभाषचंद्र बोस रस्त्यावरील ( पंजाब नॅशनल बँक/आरबीएल बॅंक चौक) सुभाष रस्ता, महर्षी कर्वे रस्ता नावांच्या पाट्यांवर सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची फलकबाजी सुरू आहे. मध्यंतरी वेळोवेळी याची छायाचित्रे काढून समाज माध्यमातून प्रसारित करत होतो.
स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही लक्ष 'एक्स' (ट्विटर) वेधून घेतले होते. मात्र काहीही फरक पडलेला नाही. निर्लज्ज आणि कोडगे सर्वपक्षीय राजकीय नेते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते रस्ता व चौक नामफलक झाकून आपले चेहरे फलक बिनदिक्कतपणे लावत आहेत. हे सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासारख्या निर्लज्जपणा, कोडगेपणा मला करता येत नाही, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या फलकबाजीच्या विरोधात समाज माध्यमातून छायाचित्रे प्रसारित करणे बंद केले आहे. अशीच परिस्थिती डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रस्ता, आयआरबीचे म्हैसकर यांच्या नावाचा चौक, घनश्याम गुप्ते रस्ता, गोपी मॉल चौक येथे आहे. आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदींसह भाजपचे पदाधिकारी यांची छायाचित्रे असलेल्या मोठ्या कमानी डोंबिवलीभर लावण्यात आल्या आहेत. या कमानीवर सर्व मिळून साठ/ सत्तरहून अधिक स्टॅम्पसाईज फोटो आहेत. या कमानी अधिकृत असतीलही. पण या कमानींनी रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील दोन ते अडीच फूट जागा अडवली गेली आहे. दरवर्षीप्रमाणे भाजपच्या या कमानी आता नवरात्रोत्सव, दिवाळीपर्यंत अशाच कायम असतील. अनेक रस्ते अरुंद असल्याने या कमानींमुळे वाहतूक कोंडीतही भर पडत आहे. पण सत्ताधारी भाजपकडूनच हे होत असल्याने महापालिका प्रशासनही तिकडे डोळेझाक करत आहे.
त्यामुळे अनधिकृत फलक उभारून शहर बकाल आणि विद्रुप करणा-यांना आगामी महापालिका निवडणुकीत मतदान करू नका, हे अजित पवार यांनी केलेले आवाहन योग्यच आहे. मतदारांनी ते खरोखरच मनावर घ्यावे आणि मतदान करताना 'नोटा' वापरून आपला निषेध व्यक्त करावा.
©️शेखर जोशी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा