मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५

दहावी अनुत्तीर्ण युवकांसाठी'कमवा आणि शिका' उपक्रम सुरू करणार- म. न. ढोकळे

दहावी अनुत्तीर्ण युवकांसाठी'कमवा आणि शिका' उपक्रम सुरू करणार-म.न.ढोकळे डोंबिवली, दि. १९ ऑगस्ट दहावी अनुत्तीर्ण आणि पुढे शिकण्याची संधी न मिळालेल्या युवकांसाठी'कमवा आणि शिका'हा उपक्रम सुरू करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे निवृत्त शाखा व्यवस्थापक आणि डोंबिवलीतील ढोकळे सराव परीक्षा केंद्राचे संस्थापक-संचालक म. न. ढोकळे यांनी दिली. ढोकळे यांच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणाच्या निमित्ताने डोंबिवली पश्चिम येथील ढोकळे सराव परीक्षा केंद्राच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन समितीचे माजी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद परशुराम म्हात्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून दहावी अनुत्तीर्ण युवकांना कामाची आणि शिकण्याची संधी देण्यात येईल. उपक्रमाची प्रेरणा बार्शीचे शिक्षणमहर्षी मामासाहेब जगदाळे यांच्याकडून मिळाली असल्याचे ढोकळे म्हणाले. माझ्या आई-वडिलांच्या नावाने 'लक्ष्मी नरसिंह फाऊंडेशन'ची स्थापन करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्येष्ठ नागरिकांना अन्न-वस्त्र उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही ढोकळे यांनी सांगितले. अभिनेते अशोक कुलकर्णींसह इतर मान्यवर तसेच डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिक संघ- विष्णुनगर, आचार्य अत्रे कट्टा, भागशाळा मैदान मंडळ, श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक मंडळ, गायत्री परिवार, वामनराव पै परिवार, जीवनविद्या मिशन परिवार इत्यादी संस्था, संघटनांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. छायाचित्र ओळ म. न. ढोकळे यांचा सत्कार करताना अभिनेते अशोक कुलकर्णी. छायाचित्रात डावीकडे प्रल्हाद परशुराम म्हात्रे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: