मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५
पं. वसंतराव देशपांडे यांच्याकडून गाण्याची 'नजर' मिळाली- पं. चंद्रकांत लिमये
ज्येष्ठ शास्त्रीय संगीत- नाट्यसंगीत गायक पं. वसंतराव देशपांडे यांचे पट्टशिष्य आणि शास्त्रीय संगीत गायक- अभिनेते पं. चंद्रकांत लिमये आज १९ ऑगस्ट रोजी ७५ वर्षे पूर्ण करून ७६ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने पं. लिमये यांच्याशी केलेली बातचीत.
पं. वसंतराव देशपांडे यांच्याकडून
गाण्याची 'नजर' मिळाली- पं. चंद्रकांत लिमये
शेखर जोशी
'वसंताची गायकी परंपरेच्या पालखीतून संथपणे मिरवीत जाणारी नाही, द-या खोऱ्यातून बेफाम दौडत जाणाऱ्या जवान घोडेस्वारासारखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे. भर उन्हाळ्यात पलाशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी. ती फुले पाहायला उन्हाची तिरीप सोसणारी जवानी हवी' अशा शब्दात 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व' पु.ल. देशपांडे यांनी पं. वसंतराव देशपांडे यांचा गौरव केला होता. नाट्य, शास्त्रीय संगीतातील असे श्रेष्ठ गायक लिमये यांना गुरु म्हणून लाभले. वसंतराव देशपांडे यांच्याकडे लिमये यांनी तब्बल बारा वर्षे गुरुकुल पद्धतीने गाण्याचे धडे घेतले. लिमये यांच्यासाठी पं. वसंतराव देशपांडे हे त्यांच्या आयुष्यातील सर्वस्व होते. वसंतराव देशपांडे यांनी गाजवलेल्या 'कट्यार काळजात घुसली' या नाटकात वसंतराव काम करत असताना लिमये यांना 'चांद' ही भूमिका करायची संधी मिळाली तर वसंतरावांच्या पश्चात याच नाटकात वसंतरावांनी लोकप्रिय केलेली 'खॉंसाहेब आफताब हुसेन' ही भूमिका करायची संधीही लिमये यांना लाभली. वसंतरावांनी लिमये यांना आपल्या गायकीचे उत्तराधिकारी मानले. लिमये यांच्या बोलण्यात आणि गाण्यातही त्यांचे गुरु वसंतराव यांचा भास होतो. याविषयी लिमये यांना विचारले असता ते म्हणाले, गुरुप्रति नितांत श्रद्धा आणि पूर्णपणे समर्पित भावना यामुळे त्या शिष्याच्या गळ्यात आपोआपच त्याच्या गुरुंची गायकी उतरते. वसंतरावांसारखे गायचे किंवा बोलायचे असं मुद्दाम ठरवून काही करत नाही, माझ्याकडून ते आपोआपच होते.
वडिलांकडून सूर तर आईकडून लय मिळाली
लिमये यांचे वडील गणेश दत्तात्रय लिमये हे कवी होते. नथूबुवा कथ्थक यांच्याकडे ते गाणे शिकले होते तर आई विमल गणेश लिमये या माटेबुवांकडे संवादिनी शिकल्या होत्या. गाण्याचा वारसा आई-वडिलांकडून मिळाला. आईकडून लय आणि वडिलांकडून सूर मिळाला. आणि यामुळेच आपण गायक झाल्याचे लिमये म्हणाले. गाण्याचे शिक्षण नेमके कधी सुरू झाले? याविषयी माहिती देताना लिमये म्हणाले, माझे सहावीपर्यंतचे शिक्षण कल्याणला झाले. त्यानंतर आम्ही मुंबईत आलो. इकडे दादरला छबीलदास शाळेत होतो. शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आमचे शिक्षक बालशंकर देशपांडे यांनी ग्वाल्हेर घराण्याचे गायक डॉ. वसंतराव राजोपाध्ये यांना गाणी बसवून घेण्यासाठी बोलावले होते. त्यांनी शिकवलेले मी चटकन आत्मसात केले. गाणे आत्मसात करण्याची माझी वृत्ती व आवाज ऐकल्यानंतर राजोपाध्ये यांनी, कोणाकडे गाणे शिकतोस? असा प्रश्न विचारला. कोणाकडेही गाणे शिकत नाही असे त्यांना सांगितले. त्यानंतर राजोपाध्ये यांनी वडिलांना देण्यासाठी एक चिठ्ठी दिली. हा मुलगा भविष्यात चांगला गायक होऊ शकेल, त्यामुळे त्यांने गाणे शिकणे आवश्यक आहे. तुम्ही त्याला व्यास संगीत विद्यालयात गाणे शिकायला पाठवता की मी मी तुमच्या घरी येऊन त्याला गाणे शिकवू? असे राजोपाध्ये यांनी त्या चिठ्ठीत लिहिले होते. माझे वडील मला पं. नारायणराव व्यास यांच्या व्यास संगीत विद्यालयात घेऊन गेले. राजोपाध्ये उपप्राचार्य होते. आणि मी गाणे शिकण्यासाठी जाऊ लागलो. राजोपाध्ये यांच्यानंतर ग्वाल्हेर घराण्याचेच गायक पं. नारायणराव व्यास, पं. गजाननबुवा जोशी, सी.पी. उर्फ बाबूकाका रेळे तसेच पुढे आग्रा घराण्याचे गायक बालकराम जाधव, जयपूर घराण्याचे गायक पंडित रत्नाकर पै यांच्याकडेही गाणे शिकलो. व्यास संगीत विद्यालयात मासिक जलसा होत असे. त्यात माझे गाणे पं. नारायणराव व्यास यांनी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत ऐकले. मी त्यांना नमस्कार करायला गेल्यावर त्यांनी उद्यापासून घरी यायचे, असा आदेश दिला. नारायणराव व्यास हेपं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य व फार मोठे गायक होते.
आयुष्यातील तब्बल बारा वर्षे वसंतरावांकडे
आयुष्यातील सर्वात जास्त काळ म्हणजे तब्बल बारा वर्षे वसंतराव देशपांडे यांच्याकडे मी फक्त शास्त्रीय संगीत शिकलो. बाकी नाट्य संगीत, ठुमरी इत्यादी उपशास्त्रीय प्रकार गाण्यासाठी जो उपजत 'लायटर फॉर्म' गळ्यात असावा लागतो तो माझ्या गळ्यात होताच. पण त्याला वसंतराव देशपांडे यांनी शिस्त लावली, आवाज फेकण्याची जी कला असावी लागते तिला वसंतराव ऊर्फ बुवांनी नजर दिली. आवाजाची फेक व तो लगाव मला बुवांमुळे मिळाला आणि माझे गाणे आपोआपच बुवांच्या वळणाचे झाले. हे नुसते शिकवून होत नाही तर त्यासाठी गुरुप्रती प्रचंड निष्ठा, अत्यंत श्रद्धा आणि शरणभाव असावा लागतो. तेव्हा ते आपोआप गाणे शिष्यात पाझरते. आणि तिथेच एखाद्या प्रतिभासंपन्न आणि श्रेष्ठ गायकाचे घराणे सुरू होते.
'कट्यार' मधील 'चॉंद' मुळे आयुष्याला वेगळे वळण
तेव्हा मी 'हिंदुस्तान फेरडो' कंपनीत नोकरी करत होतो. एक दिवस 'नाट्यसंपदा'चे प्रभाकर पणशीकर यांचा दूरध्वनी आला. त्यांनी मला भेटायला बोलावले. 'नाट्यसंपदा'च्या 'कट्यार काळजात घुसली' नाटकात वसंतराव 'खॉंसाहेब' भूमिका करत होते. या नाटकातील 'चॉंद' भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली. माझ्या गाण्याच्या तालमी नाटकात ऑर्गनसाथ करणारे विष्णुपंत वष्ट घेत असत. तालिम सुरू असताना अभिनेते शंकर घाणेकर तिथे रोज माझे गाणे ऐकण्यासाठी येत असत. पुढे गोवा दौऱ्यात एकदा नाटकातील प्रकाश घांग्रेकर, फैय्याज, बकुल पंडित कलाकारांना बुवा गाणे शिकवत होते. मी बाहेर पायरीवर बसून ते ऐकत होतो. अभिनेते शंकर घाणेकर रंगभूषा करून बाहेर आले. मला पायरीवर बसलेले पाहून घाणेकर म्हणाले, अरे मुला तू काय इकडे बसला आहेस? जा तिकडे. आणि त्यांनी बुवांना सांगितले की याला शिकवा. त्यांच्या बोलण्यातून त्यांनी बुवांना हाच तुमचा खरा शिष्य आहे असे सुचित केले. तेव्हापासून गाणे शिकण्यासाठी मी जो तंबोरा हातात घेतला तिथपासून आत्तापर्यंत तो तंबोरा सोडला नाही. बुवांची तंबो-याची ती जोडी आजही माझ्याकडेच आहे. 'कट्यार' मधील 'चॉंद' भूमिकेमुळे आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले. नाटकाच्या दौऱ्याच्या निमित्ताने वसंतरावांचा खूप सहवास मिळाला. भरभरून शिकायला मिळाले. नाटकाचा दौरा, जाहीर कार्यक्रम किंवा घरगुती मैफिली असल्या की वसंतराव मला त्यांच्याबरोबर घेऊन जायचे, जणू काही त्यांचे शेपूटच. पुढे त्यांच्या पुण्यातील घरी किंवा ते मुंबईत आले की आमच्या घरी गाणे शिकायला मिळाले.
वसंतराव यांची गायकी पूर्ण वेगळी
वसंतरावांच्या गाण्यात नाविन्य आणि उत्स्फूर्तपणा होता. वसंतराव यांची गायकी पूर्णपणे वेगळी होती. आवाजाचा लगाव, स्वरांची फेक, एखाद्या रागात जाणे आणि बाहेर पडणे, ताना, सरगम हे सर्व काही वेगळे होते. प्रचलित गाण्यांपेक्षा त्यांचे गाणे कानांना वेगळे कळत असे. कोणत्या रागात काय करायचे आणि ते का करायचे? राग वाढवत कसा न्यायचा? सरगम कशी गायची? अशा अनेक गोष्टी बुवांकडे शिकायला मिळाल्या. तसेच कुठे काय गायचे? आणि कुठे काय गायचे नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अत्यंत निकोप, निर्मळ आणि सहज सूर कसा लावायचा? हे त्यांच्याकडून शिकायला मिळाले. वसंतरावांकडे शिकायला सुरुवात केली तेव्हा माझे बऱ्यापैकी नाव झाले होते. शास्त्रीय संगीतातील तीन घराण्यांची तालीम मला मिळाली होती. मानधन घेऊन मी कार्यक्रम करत होतो. वसंतरावांकडे शिकायला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे मी कार्यक्रम करणे थांबवले. बुवांची गायकी गळ्यावर चढायला हवी म्हणून मी माझ्या चालणा-या मैफिली बंद केल्या. असे उदाहरण कुठेही मिळणार नाही. वसंतरावांकडे मी नव्याने घडलो, नव्याने शिकलो. त्यांच्यामुळे मला गाण्याची 'नजर' मिळाली असे लिमये यांनी सांगितले.
आणि 'खॉंसाहेब' म्हणून रसिकांनी स्वीकारले
वसंतरावांच्या पश्चात 'कट्यार काळजात घुसली' मधील त्यांनी लोकप्रिय केलेल्या 'खॉंसाहेब आफताब हुसेन' या मुख्य भूमिकेसाठी माझी निवड झाली. मी गुरुऋण फेडण्यासाठी जी मेहनत घेतली त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. प्रसिद्धी माध्यमे, सर्वसामान्य रसिक, वसंतराव यांचे चाहते यांनीही भूमिकेचे कौतुक केले. वसंतराव ऊर्फ बुवा माझे सर्वस्व होते. ते आई, वडील, गुरु, मित्र असे सर्व काही होते. वसंतराव आणि मी एकमेकांपासून वेगळे होऊच शकत नाही. पुण्यातील 'कट्यार' च्या एका प्रयोगाला पं. अभिषेकी बुवा आले होते. प्रयोग झाल्यानंतर ते आत आले आणि 'चंदूजी बुवांची आठवण आली' इतकेच बोलले. अभिषेकी बुवांच्या त्या एका वाक्यात सर्व काही आले. व.पु. काळे तर मला मिठी मारून रडले आणि बक्षीस म्हणून मला त्याकाळी पाचशे रुपये दिले. अजून एक हृदय आठवण. पुण्यातील नाटकाच्या एका प्रयोगाला बुवांच्या पत्नी कुटुंबासह आल्या होत्या. त्यावेळी तिसऱ्या अंकात 'तेजोनिधी लोहगोल' म्हणण्यासाठी मी प्रवेश केला आणि बुवांच्या पत्नीला अक्षरशः बुवाच रंगमंचावर आले आहेत असे वाटून त्या नाट्यगृहातून डोळे पुसत बाहेर पडल्या. बापूने म्हणजे बुवांचा मुलगा विजय देशपांडे यांनी मला आत येऊन सांगितले, चंदू तुझे नाटक खूप छान चालले आहे. पण आईला बाबांची आठवण येऊन दुःख असह्य झाले आणि म्हणूनच ती नाटक सोडून घरी गेली.
वसंतराव देशपांडे संगीत सभा
गुरु आणि माझे सर्वस्व असलेल्या वसंतरावांच्या प्रति कृतज्ञता म्हणून आणि नव्या पिढीमध्ये शास्त्रीय संगीताची आवड निर्माण करण्यासाठी, तरुण गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी २००० मध्ये 'वसंतराव देशपांडे संगीत सभा' संस्थेची मध्ये स्थापना केली. करोना येईपर्यंत संस्थेतर्फे विविध कार्यक्रम केले. 'होरी के रंग', 'श्रुतीरंग' वर्षा के', शाकुंतल ते कट्यार', 'नाट्यरंग', ' हवेली संगीत, घराणोंकी खासियते' या कार्यक्रमांचा समावेश आहे. एका मोठ्या मराठी मनोरंजन वाहिनीवर सादर झालेला 'वसंतराव देशपांडे एक स्मरण' हा कार्यक्रम मैलाचा दगड ठरला. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी संगीत संमेलन, शास्त्रीय, नाट्य व सुगम संगीत मैफल असे कार्यक्रमही होत असतात. सध्या मी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे धडे देतो आहे. स्वानंद भुसारी, सुनील पंडित, सीमा ताडे, ओंकार मुळ्ये, शीतल देशपांडे, अमोल भागीवंत, दिवंगत विठ्ठल कामन्ना हे माझ्याकडे गाणे शिकलेले माझे विद्यार्थी. गाणे शिकण्याकरता तुम्ही जो गुरु केला असेल त्याच्याशी एकनिष्ठ राहा. जसा शिष्य आपल्या गुरुचा शोध घेतो तसाच गुरुही आपल्या शिष्याला शोधत असतो. आपल्यात काय कमी आहे? आपले दोष हे योग्य आणि उत्तम गुरूच आपल्याला सांगू शकतो. त्यामुळे गुरु जे सांगेल त्याप्रमाणेच गाणे शिकावे. गाण्याप्रती असलेली आपली निष्ठा शेवटपर्यंत टिकवून ठेवावी आणि गुरूंच्या सहवासात राहावे. आजच्या तरुण पिढीतील काही अपवाद वगळता शिकायला येणारे विद्यार्थी हे गाणे शिकायला नव्हे तर 'तास' भरायला येतात, अशी खंत लिमये यांनी व्यक्त केली. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या ब-याच विद्यार्थ्यांना आपण विनाशुल्क शिकविले असल्याचेही त्यांनी सांगितले.
विविध संगीत मैफलीत सहभाग
पं. लिमये यांना त्यांच्या आजवरच्या दीर्घ सांगितिक कारकिर्दीत 'सूर संसद'चा 'सूरमणी' पुरस्कार मिळाला. कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये तेथील विद्यापीठाकडून त्यांना 'भारतीय शास्त्रीय संगीत' विषयावर सादरीकरणासाठी बोलाविण्यात आले. कॅनडा, अमेरिकेतील काही ठिकाणी नाट्यसंगीत आणि मराठी अभंग यावर त्यांची व्याख्याने व सादरीकरणही झाले. शास्त्रीय संगीतासाठी केंद्र सरकारची 'सीनियर फेलोशिप' त्यांना मिळाली. महाराष्ट्र कलानिकेतनतर्फे 'महाराष्ट्र वैभव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ठाण्यातील सिद्धकला संगीत अकादमीतर्फेही विशेष पुरस्कार देण्यात आला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 'स्वर रंगराज' पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई, दिल्ली आणि नागपूर दूरदर्शन केंद्रांवर त्यांचे गाण्याचे कार्यक्रम झाले आहेत. मुंबई महाराष्ट्रासह गोवा, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, नवी दिल्ली या ठिकाणी लिमये यांच्या सांगितिक मैफली झाल्या आहेत. पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सव, देवास येथील कुमार गंधर्व सोहळा, कर्नाटकातील कुंदगोळ येथील सवाई गंधर्व संगीत महोत्सव, नागपूर, दिल्ली येथील डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती समारोह, नवी दिल्लीत पं. पलूस्कर पुण्यतिथीनिमित्त संगीत संमेलन, दिल्लीतील संगीत नाटक अकादमी, दिल्लीतीलच भेंडी बाजार घराणा संगीत संमेलन अशा विविध ठिकाणी लिमये यांचे गायन झाले आहे. लिमये यांनी गायलेल्या मराठी अभंगांची 'भक्तीयात्रा' ही ध्वनिफीतही प्रकाशित झाली आहे. ज्येष्ठ संगीतकार दिवंगत स्नेहल भाटकर यांनी हे अभंग संगीतबद्ध केले आहेत. 'जयध्वनी' या जोडरागाची आणि 'चंद्र मोहिनी' या स्वतंत्र रागाची निर्मितीही लिमये यांनी केली आहे. तसेच 'देखादेखी'सह अनेक बंदिशी आणि तराणे त्यांनी बाधले आहेत. नेहरू सेंटरने गायक/ अभिनेते सैगल यांच्या आयुष्यावर 'फिर तेरी राह गुजर याद आयी' हे नाटक सादर केले होते. या नाटकात लिमये यांनी उस्ताद अब्दुलकरीम खाँसाहेब आणि उस्ताद फैयाज खाँसाहेब अशा दोन भूमिका केल्या होत्या. पुण्याच्या संध्या देवरुखकर यांनी डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यावर लिहिलेले 'वसंत बहार' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकासाठी पं. चंद्रकांत लिमये यांनी 'तेजोनिधी लोहगोल' हा विशेष लेख लिहिला. डॉ. वसंतराव देशपांडे यांची स्वतंत्र, बुद्धीप्रधान गायकी कशी घडली, त्यांना कोण कोण गुरुजन लाभले आणि त्यांचा संगीत प्रवास कसा समृद्ध होत गेला या बद्दलच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या या लेखावर आधारीत 'तेजोनिधी लोहगोल' ही मालिका पं. लिमये यांच्या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'आजचा दिवस माझा ' या मराठी चित्रपटात लिमये यांनी अंध गवई' भूमिका साकारली. 'द फर्म लॅण्ड' या फ्रेंच चित्रपटात लिमये यांची गाण्याची मैफल दाखविली आहे.
राज्य/केंद्र शासनाच्या सर्वोच्च पुरस्कारांपासून वंचित
शास्त्रीय आणि नाट्य संगीतात महत्त्वपूर्ण योगदान देणारे लिमये राज्य किंवा केंद्र शासनाच्या सर्वोच्च पुरस्कारांपासून अद्यापपर्यंत वंचित राहिले आहेत. लिमये यांच्यापेक्षा वयाने आणि सांगितिक अनुभवानेही लहान असलेल्या मंडळींना राज्य आणि शासनाचे सर्वोच्च पुरस्कार मिळाले आहेत. या मंडळींना हे सर्वोच्च पुरस्कार मिळाले म्हणून राग नाही. मात्र आजवरच्या माझ्या दीर्घ सांगितिक योगदानाची दखल या सर्वोच्च पुरस्कारांसाठी राज्य किंवा केंद्र शासनाकडून अद्याप घेतली गेली नाही, याचे वाईट वाटते. शासनाकडून असा भेदभाव होणे, मला तरी अपेक्षित नाही. आपल्याला हेतूपुरस्सर डावलले जात नाही ना? अशी शंकाही मनात येते. राज्य आणि केंद्र शासनाचा कोणताही सर्वोच्च पुरस्कार अद्याप मिळाला नसला तरी रसिकांचे भरभरून सर्वोच्च प्रेम आजवर लाभले आहे. या रसिकांचा मी ऋणी आहे.
पुन्हा जाहीर संगीत मैफल करायची आहे
पत्नी प्रज्ञासह प्राची, दीपा या विवाहित कन्या, जावई, नातवंडे आणि मुलगा निनाद असा लिमये यांचा परिवार. निनाद अभिनय क्षेत्रात आहे. वयोपरत्वे लिमये आता जाहीर संगीत मैफिली किंवा कार्यक्रम करत नाहीत. मात्र पुन्हा एकदा संगीत मैफल, जाहीर कार्यक्रम करण्याची त्यांची इच्छा आहे. बघू या देवाची इच्छा, असे सांगत लिमये यांनी या गप्पांचा समारोप केला.
अन्य छायाचित्रे
--पूर्ण--
पं. चंद्रकांत लिमये
(+91 98334 31164)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा