शुक्रवार, २ जानेवारी, २०२६
खांद्यावरील झेंड्याचा दांडा आणि पालखीचा गोंडा मराठीच असला पाहिजे- संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील
खांद्यावरील झेंड्याचा दांडा आणि पालखीचा गोंडा
मराठीच असला पाहिजे- संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील
सातारा, दि. २ जानेवारी
तुमच्या खांद्यावर झेंडा कोणत्याही जातीचा, पक्षाचा किंवा धर्माचा असला तरी हरकत नाही, पण त्याचा दांडा मराठीच असला पाहिजे. खांद्यावर पालखी कोणाचीही असो तिचा गोंडा मराठीच असायला हवा, असे प्रतिपादन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शुक्रवारी येथे अध्यक्षीय भाषणात केले.
सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियममध्ये झालेल्या साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते. साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा तारा भवाळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इत्यादी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
लेखक/कवीला कोणतीही जात नसते, मात्र, त्याला धर्म असतो आणि तो म्हणजे फक्त मानवता धर्म. जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते तेव्हा गेल्या दोनशे वर्षात सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकाही साहित्यिकांनी पेलली असल्याचेही पाटील म्हणाले.
धान्य पिकविणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पत्नीचा आणि मातेचा गौरव करण्यासाठी ‘लढाऊ धरतीमाता’ नावाची नवी योजना सुरू करावी, माफक दरात पुस्तक विक्रीच्या दुकानांना परवानगी द्यावी, ग्रंथालये, मराठी शाळा टिकविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, महाराष्ट्रातच माय मराठीचे अध:पत होऊ नये या करीता सर्व स्तरांवर प्रयत्न व्हावेत, अशा सूचनाही पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात केल्या.
अन्य भाषांची सक्ती करणे अयोग्य- डॉ. भवाळकर
साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. भवाळकर म्हणाल्या, प्राथमिक स्तरावरील मुलांवर इतर भाषांचे ओझे, दडपण देऊ नका. मराठी व्यतिरिक्त इतर भाषांची सक्ती करणे अयोग्य आहे. आणि हे मी मराठी भाषेची शिक्षिका असल्यामुळे अनुभवातून ठामपणे सांगते आहे.
ग्रामीण, अर्ध ग्रामीण गावात नवीन मुले-मुली लिहिती झाली आहेत, तसेच नवीन प्रकाशक निर्माण होत आहेत, ही बाबही आश्वासक आहे. जेव्हा निरनिराळ्या जाती जमातीतील लोकं लिहायला लागतील तेव्हा त्यातील शब्द मराठी साहित्यात रुजतील आणि त्यातूनच मराठी भाषा समृद्ध होईल, असा विश्वासही डॉ. भवाळकर यांनी व्यक्त केला.
गोदावरीकाठी असलेल्या तपोवनावर कुऱ्हाड चालणार नाही, याची दक्षता आपण घेतली पाहिजे. प्रकृती टिकली तरच आपण टिकणार आहोत. आपल्याला जगायचे असेल तर झाडे, वने टिकायला हवीत. झाडे टिकली तरच आपली पुढची पिढी जगेल.
महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठीच सक्तीची- फडणवीस
महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीच सक्तीची आहे. परदेशी भाषांना पायघड्या घालताना भारतीय भाषांना विरोध करण्याची वृत्ती योग्य नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. माय मराठीची अवहेलना होत असताना अन्य भाषांचे कोडकौतुक नको. भाषेला विरोध नाही परंतु सक्तीला विरोध आहे’, अशी भूमिका अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी मांडली होती. त्याला उत्तर म्हणून फडणवीस यांनी उपरोक्त भूमिका मांडली.
इंग्रजी, फ्रेंच जर्मन अशा परदेशी भाषांना आपण पायघड्या घालतो; परंतु भारतीय भाषांना मात्र विरोध करतो. ही भूमिका योग्य नाही. स्वभाषेचा सन्मान नक्कीच व्हायला हवा. त्याचवेळी इतर भाषांचेही स्वागत व्हायला हवे, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली.
चतुरंग प्रतिष्ठानची सवाई एकांकिका स्पर्धा
राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रथम पारितोषिक
विजेत्या एकांकिकांची 'चतुरंग सवाई' स्पर्धा
- ३, ४ जानेवारीला प्रवेश अर्ज स्वीकारणार
- १०, ११ जानेवारीला प्राथमिक फेरी
- २५ जानेवारीला अंतिम फेरी
मुंबई, दि. २ जानेवारी
नाट्यक्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठानच्या सवाई एकांकिका स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या एकांकिका स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्या एकांकिकाच स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभागी होऊ शकतात.
चतुरंग प्रतिष्ठानच्या सवाई एकांकिका स्पर्धेचे यंदा ३७ वे वर्ष असून स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेऱ्यांमध्ये घेण्यात येणार आहे. प्राथमिक फेरीसाठीचे प्रवेश अर्ज येत्या
३ आणि ४ जानेवारी २०२६ या दोन दिवसातच स्वीकारले जाणार आहेत.
प्राथमिक फेरी येत्या १० आणि ११ जानेवारी रोजी होणार असून प्राथमिक फेरीतून निवडण्यात येणाऱ्या सात एकांकिकांची अंतिम फेरी २५ जानेवारी रोजी होणार आहे.
स्पर्धेचे पूर्ण भरलेले प्रवेश अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसहित येत्या तीन आणि चार जानेवारी रोजी दुपारी चार ते आठ या वेळेत चतुरंग प्रतिष्ठान, डी /ई, माहीमकर बिल्डिंग, बांगडवाडी, गिरगाव, मुंबई- ४००००४ येथे स्वीकारले जाणार आहेत.
सवाई एकांकिकेचे माहितीपत्रक, नियमावली, प्रवेश अर्जासाठी संबंधितांनी chaturang1974@gmail.com या ई मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन चतुरंग प्रतिष्ठानने केले आहे.
गुरुवार, १ जानेवारी, २०२६
साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांची 'साहित्य दिंडी'!
साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष
विश्वास पाटील यांची 'साहित्य दिंडी'!
सातारा, दि. १ जानेवारी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी संमेलनासाठी सातारा दाखल होण्यापूर्वी पुणे, सातारा, सांगली येथील साहित्यिकांच्या निवासस्थानी आणि स्मारकाला भेट दिली. सातारा येथे आजपासून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली.
मंगळवार आणि बुधवार अशा दोन दिवसांच्या या भेटीमध्ये विश्वास पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे
येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला भेट दिली आणि त्यांना अभिवादन केले.
सातारा जिल्ह्यातील आणि खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळाला तसेच आधुनिक मराठी कवितेचे जनक बासी मर्ढेकर यांच्या मरडे येथील स्मारकाला भेट दिली.
बुधवारी सकाळी पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र येथे जाऊन क्रांतिसिंह नाना पाटील यांना नंतर रेठरे हरणाक्ष येथे लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या जन्म व तिला भेट दिली. तसेच साताऱ्या त आगमन होण्याआधी पाटील यांनी कराड येथे प्रीती संगमावर जाऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकाला आदरांजली वाहिली.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्या नंतर पाटील यांनी मुंबईत आचार्य अत्रे यांच्या स्मारकाला तसेच घाटकोपर येथील शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला तसेच कादंबरीकार रवा दिघे आणि नाटककार कवी विवाह शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या स्मारकालाही भेट देऊन अभिवादन केले होते.
ध्वजारोहण, ग्रंथदालन, कवी कट्टा प्रकाशन कट्टा उदघाटनाने ९९ व्या साहित्य संमेलनाची सुरुवात
ध्वजारोहण, ग्रंथदालन, कवी कट्टा प्रकाशन कट्टा
उदघाटनाने ९९ व्या साहित्य संमेलनाची सुरुवात
सातारा, १ जानेवारी
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहूपुरी आणि मावळा फाउंडेशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गुरुवारी संमेलनस्थळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ग्रंथदालन, कवी कट्टा प्रकाशन कट्ट्याच्या उदघाटनाने साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. साताऱ्यातील ऐतिहासिक शाहू स्टेडियमवर हे संमेलन भरविण्यात आले आहे.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.
साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शन दालनाचे उदघाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले. तर नियोजित संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत कविकट्टा, गझलकट्टा आणि प्रकाशन कट्ट्याचे उदघाटन करण्यात आले.
'ह' च्या बाराखडीचा हास्यस्फोट!
रंगभूमीवर पुन्हा एकदा घुमतोय
'ह' च्या बाराखडीचा हास्यस्फोट!
मुंबई, दि. १ जानेवारी
मराठी रंगभूमीवर काही वर्षांपूर्वी प्रचंड गाजलेले 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' नाटक नव्या दमाने रंगभूमीवर सुरू झाले असून रंगभूमीवर पुन्हा एकदा 'ह' च्या बाराखडीचा हास्यस्फोट घुमतो आहे.
दिवंगत ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक प्रा. मधुकर तोरडमल यांनी लिहिलेले हे नाटक लोकप्रिय झाले. तोरडमल यांच्याच 'रसिकरंजन' नाट्यसंस्थेतर्फे १९७२ मध्ये हे नाटक रंगभूमीवर सादर झाले होते. अन्य नाट्य संस्थांतर्फेही हे नाटक रंगभूमीवर सादर झाले होते.
नाटकातील 'प्रा. बारटक्के' भूमिका स्वतः प्रा. तोरडमल करत असत. तर प्रा. 'डी. डी. थत्ते' ही भूमिका अरुण सरनाईक, मोहन जोशी या दिग्गज अभिनेत्यांनीही साकारली. अभिनेते अतुल परचुरे, सुनील तावडे, राजन पाटीलही नाटकात होते. संपूर्ण नाटक म्हणजे 'ह हा ही, ही, हु, हू' च्या बाराखडीचा अक्षरशः धुमाकूळ होता.
आता पुन्हा एकदा हे नाटक नव्याने रंगभूमीवर आले आहे.
अभिनेते, दिग्दर्शक राजेश देशपांडे दिग्दर्शित या नाटकाची निर्मिती प्रियांका पेडणेकर, मधुरा पेडणेकर, योगिता गोवेकर, प्राची पारकर, विजया राणे या पाच महिलांनी नाटकाची निर्मिती केली आहे.
'तरुण तुर्क म्हातारे अर्क' च्या नव्या संचात 'प्रा.बारटक्के' ही भूमिका अतुल तोडणकर तर 'प्रा. डी.डी.थत्ते' ही भूमिका अभिजित चव्हाण करत आहेत. या दोघांसह चिंतन लांबे, सोहन नांदुर्डीकर, स्वानंद देसाई, निलेश देशपांडे, श्रुती पाटील आणि नीता पेंडसे हे कलाकार नाटकात आहेत. अशोक मुळ्ये,दिनू पेडणेकर नाटकाचे सूत्रधार असून संदेश बेंद्रे (नेपथ्य), तुषार देवल (पार्श्वसंगीत), श्याम चव्हाण (प्रकाश योजना) मंगल केंकरे (वेशभूषा) हे अन्य जबाबदारी सांभाळत आहेत.
मुंबईत रंगणार दोन दिवसांची रंगजत्रा
स्वामीराज प्रकाशन आयोजित दोन दिवसीय 'रंगजत्रा'
- स्वामीराज महोत्सवात तीन एकांकिका, दोन दीर्घांक आणि नाटक सादर होणार, रसिकांना मुक्त प्रवेश
मुंबई, दि. १ जानेवारी
स्वामीराज प्रकाशन संस्थेतर्फे प्रायोगिक रंगभूमीला ऊर्जा देणारी वार्षिक रंगजत्रा अर्थात 'स्वामीराज महोत्सव' येत्या १७ आणि १८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
महोत्सवाचे यंदा दुसरे वर्ष आहे. ज्येष्ठ अभिनेते जनार्दन लवंगारे यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होणार असून ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
महोत्सवात गावय, मास्क, थिम्मक्का या तीन एकांकिका, युगानुयुगे तूच, जन्म एक व्याधी हे दोन दीर्घांक आणि साठा उत्तरांची कहाणी हे दोन अंकी नाटक सादर होणार आहे.
समारोप सोहळ्याला जेष्ठ अभिनेते अनिल गवस, दिग्दर्शक अनिल बांदिवडेकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवात अभिनेता चेतन दळवी (रंगसेवा पुरस्कार), विजय टाकळे (संहिता सन्मान), अमर हिंद मंडळ, दादर (प्रयोगघर पुरस्कार), लीला हडप (धुळाक्षर पुरस्कार), जयवंत देसाई (सेवाव्रती पुरस्कार) यांना गौरविण्यात येणार आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यंदाचा महोत्सव दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक रघुनाथ कदम यांच्या स्मृतीला समर्पित असून यशवंत नाट्य मंदिर, दादर येथे होणा-या महोत्सवासाठी नाट्यरसिकांना मुक्त प्रवेश आहे.
डोंबिवली पूर्व भागातील टपाल कार्यालयाचे स्थलांतर
कठड्याचा स्लॅब कोसळून धोकादायक झालेल्या
इमारतीमधील टपाल कार्यालयाचे स्थलांतर
- कार्यालय 'एमआयडीसी' त गेल्याने नागरिकांचीही गैरसोय
डोंबिवली, दि. १ जानेवारी
डोंबिवली पूर्व भागातील टपाल कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे. एमआयडीसी टपाल कार्यालय, के.वि. पेंढरकर महाविद्यालयामागे, डोंबिवली पूर्व येथे हे टपाल कार्यालय हलविण्यात आले आहे.
डोंबिवली पूर्व भागातील लक्ष्मी सागर इमारतीत हे टपाल कार्यालय होते. काही दिवसांपूर्वी या इमारतीचा स्लॅब ( गच्चीचा कठडा) कोसळला होता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी या दुर्घटनेत झाली नव्हती. स्लॅब कोसळल्यानंतर महापालिकेने ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली आणि इमारतीमधील रहिवासी, व्यावसायिक गाळे रिकामे केले होते.
डोंबिवली पूर्व भागात रेल्वे स्थानकापासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले हे टपाल कार्यालय या इमारतीत गेल्या अनेक वर्षांपासून होते. नागरिक, ज्येष्ठ नागरिकांसाठीही ते सोयीचे होते. आता डोंबिवली एमआयडीसी भागात हे टपाल कार्यालय हलविण्यात आल्याने नागरिक व टपाल कार्यालयात येणा-यांना तिथे जाणे गैरसोयीचे ठरते आहे.
स्थानिक आमदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून हे कार्यालय मूळ इमारतीत आणण्यासाठी किंवा रेल्वे स्थानकाच्या जवळ आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...




