शनिवार, १९ मार्च, २०१६

मिळून साऱया जणांचे पंचगव्य चिकित्सालय


पचंगव्य चिकित्सा अर्थात गोमुुत्र उपचार पद्धतीबाबत आता समाजात हळूहळू जागृती व्हायला सुरुवात झाली आहे. अॅलोपॅथीचे दुष्पपरिणाम समोर येऊ लागल्याने अॅलोपॅथीला पर्याय म्हणून या चिकित्सेकडे पाहिले जात आहे. आपल्याकडे प्राचिन काळापासून गाईला पवित्र मानले गेले आहे. गाईचे मूत्र, दूध, दही, तूप, शेण या पाच घटकांचा वापर आणि अन्य पुरक वनौषधी किंवा आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर यात केला जातो. महाराष्ट्राच्या विविध भागात गोपालन, गोसेवा आणि गोमूत्रावर संशोधन व त्यापासून विविध औषधे व उत्पादनांची निर्मिती केली जात आहे. सुशिक्षित व उच्चशिक्षित तरुण वर्गही याकडे आता वळायला लागला आहे. आमोद केळकर यांनी प्रद्युम्न गोडबोले, श्रीनाथ आगाशे, योगेश राऊत, पुनम राऊत, गोरक्ष वाल्हेकर, विजय खुटवड, मेहुल आंबेकर या उच्चशिक्षित तरुणांसोबत २०१४ मध्ये वेदिक फार्म्सचे काम सुरु केले. सहा गायींपासून सुरुवात झाली आज त्यांच्याकडे १८ गायी, १ नंदी आणि काही वासरे अशी गोधनाची एकूण ३५ इतकी संख्या आहे.

या सगळ्यांनी मिळून वेदिक फार्म्स पंचगव्य चिकित्सालय सुरु केले असून त्याचे उदघाटन रविवार २० मार्च रोजी चेन्नई येथील पंचगव्य गुरुकुलाचे गव्यसिद्धाचार्य निरंजनी वर्मा यांच्या प्रमुख आहे. ते स्वत चिकित्सा करुन या चिकित्सालयाची सुरुवात करणार आहेत. स्वदशी प्रचारक व दिवंगत राजीव दीक्षित यांचे सहकारी प्रा. मदनभाई हे ही या वेळी उपस्थित राहणार आहेत. स्वदेशी प वेदिक फार्म्स पंचगव्य चिकित्सालय व संशोधन केंद्र मुक्काम व पोस्ट-बावडा, तालुका-खंडाळा आणि जिल्हा सातारा येथे आहे.

वेदिक फार्म्स पंचगव्य चिकित्सालय व संशोधन केंद्रातर्फे चंद्रमा अर्क, तुलसी अर्क, त्रिफळा टॅब्ज, अर्जुन टॅलब्ज, पेन रिलीफ ऑईल, दंतमंजन, वेदिक मिल्क, वेदिक गोघृत आदी उत्पादनांची निर्मिती केली जाते.

अधिक माहिती व संपर्कासाठी आमोद केळकर यांचा संपर्क क्रमांक

९०११६४८३८३

शुक्रवार, १८ मार्च, २०१६

गोसेवा प्रचारक-अरुण ओक


एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात असा एक क्षण येतो की, त्याचे आयुष्य पालटून जाते. तो एखाद्या विशिष्ट ध्येयाने, उद्देशाने आणि कामाने पूर्णपणे झपाटला जातो. आपले पुढील आयुष्य केवळ त्याच कामासाठी वाहून घेण्याचा मनाशी निश्चय करतो. समाजामध्ये अशी माणसे तशी कमीच, पण ही माणसे आपल्या कामाने इतरांपुढे आदर्श निर्माण करतात. अन्य लोकांसाठीही प्रेरणास्थान ठरतात. सध्याच्या काळात अपवाद वगळता प्रत्येक जण आपण आणि आपले कुटुंब एवढय़ाच वर्तुळापुरता मर्यादित असतो. त्यामुळे समाजासाठी काही करणे किंवा एखाद्या विशिष्ट ध्येयाने काम करणे तसे विरळाच. नोकरी-व्यवसायातून निवृत्ती घेतल्यानंतर आता आराम करूम्हणणारेच जास्त. मात्र त्यालाही अपवाद असतात. डोंबिवलीचे अरुण ओक हे असेच सन्माननीय अपवाद.

पंच ऑपरेटर, मशीन ऑपरेटर, कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’त नोकरी, ‘टोटल क्वालिटी मॅनेजमेंट टीम’ तसेच नवी मुंबईतील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया येथे ‘एचटीपीआय’ स्कीममध्ये व्याख्याते, त्यानंतर स्वत:ची ‘विजया इन्फोटेक’ ही कंपनी स्थापन करून ‘सॉफ्टवेअर इंजिनीयरिंग’ क्षेत्रासाठी सल्लागार म्हणून काम असा अनुभव ओक यांच्या गाठीशी जमा आहे. आता गेल्या आठ ते दहा वर्षांपासून ओक यांनी गोसेवा, गोउत्पादन व संशोधन या कामाला वाहून घेतले आहे. बदलापूर-वांगणीदरम्यान कासगाव येथे स्वामी समर्थ संप्रदाय वाडी आहे. या वाडीतील गोशाळेचे सर्व व्यवस्थापन ओक पाहतात. या कामात अधिक सुसूत्रता यावी यासाठी ‘गोवर्धन गोवत्स पालन सोसायटी’ या विश्वस्त न्यासाची स्थापना करण्यात आली आहे. अरुण ओक हे मूळचे रायगड जिल्हय़ातील. सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा या गावचे. त्यांचे वडील केशव गोपाळ ओक हे वेदशास्त्रसंपन्न होते. त्यांचा भिक्षुकीचा व्यवसाय होता. ओक यांचे बालपण दादर येथे गेले. छबिलदास शाळेत त्यांचे शिक्षण झाले. ९ एप्रिल १९४४ रोजी जन्मलेल्या ओक यांना पाच भाऊ. त्यात अरुण ओक यांचा चौथा क्रमांक. वडील गेल्यानंतर आर्थिक परिस्थिती बेताची झाली. शिक्षण अर्धवट सुटते की काय असे वाटत असतानाच शाळेचे प्राचार्य एम. एल. जोशी आणि मुख्याध्यापक बापट यांच्यामुळे त्यांना शाळेची फी माफी मिळाली. त्या दोघांमुळे आपले शिक्षण (तेव्हाची अकरावी मॅट्रिक) पूर्ण होऊ शकले, असे ओक कृतज्ञतेने सांगतात. १९६१ च्या सुमारास ओक कुटुंबीय (आई व तीन भाऊ) डोंबिवलीत राहायला आले. दरम्यानच्या काळात शिकत असतानाच त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात दोन रुपये रोजावर ‘लिपिक’ म्हणून नोकरी केली. या काळात विद्युत मंडळातील पी.जी. कुलकर्णी, बी.एन. धर्माधिकारी या अधिकाऱ्यांचीही त्यांना मोलाची मदत झाली. या दोघांनीही पुढे शिकण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले.

पुढे मुंबईच्या राज्य विद्युत मंडळाच्या विभागीय कार्यालयात बदली, कार्ड पंचिंगचा अभ्यासक्रम, राज्य विद्युत मंडळात लोअर डिव्हिजन क्लार्क, मुंबई विद्यापीठात पंच ऑपरेटर म्हणून नोकरी, तिथून ‘कॅलिको केमिकल्स’मध्ये पंच ऑपरेटर, नंतर ‘फिलिप्स’मध्ये ‘इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग सेंटर’ (ईडीपी) येथे व पुढे लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोमध्ये नोकरी असा प्रवास त्यांचा झाला. १९९८ मध्ये नोकरीतून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोमधील नोकरी सोडल्यानंतर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया येथे सल्लागार म्हणून काही काळ काम केले. या काळात ते बदलापूर-वांगणीदरम्यान असलेल्या स्वामी समर्थ संप्रदाय वाडीचे संस्थापक श्री स्वामी सखा यांच्या ते संपर्कात आले. श्री स्वामी सखा यांनी सुमारे तेरा एकर परिसरांत १९९५ मध्ये ही वाडी स्थापन केली आहे. दत्त संप्रदायाचे विचार, आध्यात्मिक शिकवण याच्या प्रसाराचे काम येथून चालते. येथे गुरुपंचायतन मंदिरासह दत्तावतारातील सोळा प्रमुख अवतारांची तसेच सूर्यमंदिर, हनुमान, रेणुकादेवी मंदिर आणि गोशाळाही आहे. या वाडीत ते काम करू लागले. याच दरम्यान दूरचित्रवाहिनीवरील एक कार्यक्रम त्यांच्या पाहण्यात आला. शरद पाटील (जिल्हा- लातूर, गाव- मावळ, तालुका-अहमदपूर) यांच्यावर दाखविण्यात आलेल्या त्या कार्यक्रमात केवळ पाच गाईंच्या पाठबळावर पाटील यांनी त्यांच्या मुलीला डॉक्टरकीपर्यंतचे शिक्षण कसे दिले हे दाखविण्यात आले होते. हे पाहून प्रभावित झालेल्या ओक यांनी हे सगळे स्वामी समर्थ संप्रदाय वाडीच्या श्री स्वामी सखा यांना सांगितले. त्यांनी ओक यांना वाडीच्या गोशाळेचे काम पाहण्याची सूचना केली आणि ओक यांचे गोसेवेचे काम सुरू झाले.

कामाला सुरुवात केल्यानंतर भिवंडीजवळील अनगाव, नेरळजवळील नसरापूर येथील गोशाळा, औरंगाबाद येथील पोटुळ गावी सुधीर विद्वांस यांचे सुरू असलेले गोसेवेचे काम आणि अशा प्रकारचे काम जेथे जेथे सुरू आहे त्या त्या ठिकाणी ओक यांनी भेट दिली. गोमूत्रापासून अर्कनिर्मिती, साबण, कीटकनाशके, फिनेल तयार करणे याचे प्रशिक्षण घेतले. संकरित गाईंची निर्मिती करणे ते गोसेवा व अन्य आनुषंगिक कामांची सर्व माहिती त्यांनी घेतली. काही कार्यशाळांमध्येही ते सहभागी झाले. या सगळ्या कामात त्यांना डॉ. नितीन मरकडेय, मिलिंद देवल, डॉ. विनायक रानडे या तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले व आजही मिळते आहे. गोमूत्र आणि पंचगव्य (गाईचे गोमूत्र, शेण, दूध, दही आणि तूप) यावर वेगवेगळे प्रयोग व संशोधन होत आहे. पाश्चिमात्य देशातही यावर संशोधन सुरू आहे. गोमूत्र सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, गोमूत्रापासून तयार केलेली औषधे मधुमेह, कर्करोग आणि अन्य विकारांवरही उपयोगी ठरत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आमच्या स्वामी समर्थ संप्रदाय वाडीच्या गोवर्धन गोवत्स पालन सोसायटीतर्फेही आम्ही यावर काम व संशोधन करत आहोत. वेगवेगळ्या आजारांवर विविध प्रकारचे आठ गोमूत्र अर्क तसेच दंतमंजन, उटणे, साबण, गोघृत, वातावरणशुद्धी स्प्रे, गोमूत्र फिनेल, फेसपॅक आणि अन्य उत्पादने तयार करायची आहेत. या सर्व उत्पादनांची निर्मिती आणि विक्री यासाठी शासकीय मान्यता मिळविण्याची प्रक्रिया आम्ही सुरूकेली आहे. रीतसर मान्यता मिळाल्यानंतर आमची ही उत्पादने बाजारात विक्रीसाठी आणली जातील. सध्या आमच्या गोशाळेत १२ गाई, ५ वळू आणि ८ वासरे असल्याची माहितीही ओक यांनी दिली. गाय मेल्यानंतर तिचा मृतदेह वर्षभर जमिनीत पुरून ठेवला तर त्यापासूनही उत्तम असे खत तयार होते. ते शेतीसाठी उपयुक्त ठरते. गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांची ऑनलाइन विक्रीही चांगली होत आहे. गीर जातीच्या एका गाईची किंमत सुमारे ४० हजार, तर थारपारकर जातीच्या एका गाईची किंमत एक लाख रुपयांपर्यंत असते. माणसाप्रमाणे गाईलाही रक्तदाब असतो. एका गाईला दररोज सुमारे ६ किलो ओले गवत, ६ किलो सुका चारा (त्यात मिठाच्या व गुळाच्या पाण्याचा थोडासा शिडकावा) लागतो, अशी माहितीही ते गप्पांच्या ओघात देतात.

अरुण ओक यांच्या या कामात त्यांना मुलगा मनोज, सून मानसी, नातू मोहित, मुलगी ऋजुता जोशी, जावई भूषण यांचा नैतिक व सक्रिय पािठबा आहे. अनुभव, वाचन, अभ्यास यातून शिकत गेलो. पंचगव्यावर संशोधन व त्यापासून उत्पादन निर्मिती यावर आता काम करायचे ठरविले असल्याचे ओक सांगतात.

अरुण ओक यांचा संपर्क क्रमांक- ९८२०२९३४०१

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता-ठाणे/१८ मार्च २०१६/ पान क्रमांक ७)

लोकसत्ता-ठाणेमधील लेखाची लिंक http://epaper.loksatta.com/c/9174061

मंगळवार, १५ मार्च, २०१६

माकडीण आणि काकांचे अभय सिचंन


माकडीण आणि काकांचे 'अभय' 'सिंचन'! माकडीणीची गोष्ट आठवते कां? नाका तोंडात पाणी जाईपर्यंत माकडीण त्या पिल्लाला डोक्यावर घेते, पण जेंव्हा तिच्याच नाकातोंडात पाणी जायला लागते तेंव्हा मात्र ती स्वतः त्याच्या डोक्यावर उभी राहाते आणि आपला जीव वाचवते. ही गोष्ट आत्ताच आठवण्याचे कारण आहे. इतिहासात 'काका मला वाचवा' अशी याचना एका पुतण्याने काकांकडे केली होती पण काकांनी ती हाक ऐकलीच नाही. वर्तमानातील एका पुतण्याने 'काका मला वाचवा' अशी आरोळी ठोकताच हे काका त्याच्या मदतीला धावून गेले आणि 'भुजां'मधील 'बळ' कमी झालेल्या चेल्याचा व त्याच्या पुतण्याचा कसा बळीचा बकरा केला हे पाहायला मिळाले. याला म्हणतात अभयाचे 'सिंचन'! वर्तमानातील हे चित्र पाहून मला आपली माकडीणीची गोष्ट आणि इतिहासातले व वर्तमानातील काका आठवले. वास्तवात याचा काही संबंध आहे की नाही माहिती नाही, असलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा.

रविवार, १३ मार्च, २०१६

जुना 'पिंजरा' पुन्हा नव्याने


हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ ‘पब्लिसिटी डिझायनर’ श्रीकांत धोंगडे यांनी ४४ वर्षांपूर्वी (१९७२) ‘पिंजरा’ची जाहिरात केली होती आणि आज नवा साज घेऊन सादर होणाऱ्या ‘पिंजरा’ची जाहिरातही धोंगडे यांनीच केली आहे.

तमाशातील स्त्रीच्या नादी लागल्यामुळे एका शिक्षकाची झालेली वाताहात ‘पिंजरा’ चित्रपटात मांडण्यात आली. त्या काळी हा चित्रपट आणि त्यातील सर्व गाणी हिट ठरली. ४४ वर्षांपूर्वी सादर झालेल्या या चित्रपटावर काही तांत्रिक प्रक्रिया करून तो पुन्हा येत्या १८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाला किंवा त्यातील गाण्यांना, मूळ चालींना संगीतकार अविनाश-विश्वजित यांनी आधुनिक पाश्र्वसंगीताची जोड दिली आहे. मूळ चित्रपटातील काही प्रसंगाना नव्या ध्वनीचीही जोड देण्यात आली आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून चित्रपटाच्या मूळ प्रिंटवर तांत्रिक प्रक्रिया करण्याचे हे काम सुरू आहे. मूळ अभिजात कलाकृतीला कुठेही धक्का न लावता ‘पिंजरा’ पुन्हा प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे. त्याला कसा प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता सर्वानाच आहे. त्या निमित्ताने..

व्ही. शांताराम दिग्दर्शित व डॉ. श्रीराम लागू, संध्या, वत्सला देशमुख, निळू फुले यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘पिंजरा’ हा मराठी चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. चित्रपटातील ‘आली ठुमकत नार’, ‘दे रे कान्हा चोळी आणि लुगडी’, ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’, ‘मला इष्काची इंगळी डसली’ ही आणि अन्य सर्व गाणी/लावण्या आजही लोकप्रिय आहेत. जगदीश खेबुडकर यांची गाणी आणि राम कदम यांच्या संगीताची जादू कायम आहे. विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये सादर होणाऱ्या नृत्याविष्काराच्या कार्यक्रमात ‘पिंजरा’मधील काही गाणी हमखास असतातच. चित्रपटातील गाण्यांच्या मूळ चालींना संगीतकार अविनाश-विश्वजित यांनी आधुनिक पाश्र्वसंगीताची जोड दिली आहे. मूळ अभिजात

कलाकृतीला कुठेही धक्का न लावता ‘पिंजरा’ पुन्हा प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे.
नव्याने सादर होणाऱ्या या चित्रपटाचे एक ठळक वैशिष्टय़ आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ ‘पब्लिसिटी डिझायनर’ श्रीकांत धोंगडे यांनी ४४ वर्षांपूर्वी (१९७२) ‘पिंजरा’ची जाहिरात केली होती आणि आज नवा साज घेऊन सादर होणाऱ्या ‘पिंजरा’ची जाहिरातही धोंगडे यांनीच केली आहे. या संदर्भात ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना ते म्हणाले, बॉम्बे पब्लिसिटीचे वसंत साठे यांनी माझे नाव व्ही. शांताराम यांना सुचविले. चित्रपटाचे बॅनर, पोस्टर याचे काम ‘राजकमल’च्याच विभागाकडून केले जाणार होते. माझ्याकडे वर्तमानपत्रासाठी ‘पिंजरा’च्या जाहिराती करण्याचे काम सोपविण्यात आले. वर्तमानपत्रासाठी जाहिरात करताना तेव्हा फोटोचा ब्लॉग, हाफटोन फोटोला स्क्रीन टाकणे, फोटोवरून लाइनवर्क असे सर्व सोपस्कार करावे लागायचे. चित्रपटाच्या जाहिरातीसाठी अभिनेत्री संध्या यांचा पदर वाऱ्याने उडतोय अशा नृत्याच्या आविष्कारातील त्यांचे छायाचित्र मला मिळाले. डॉ. श्रीराम लागू यांच्या छायाचित्रावरून लाइन ड्रॉईंग करून झाले पण संध्या यांच्या छायाचित्रावरून लाइन ड्रॉईंग करणे अवघड जात होते. त्यांच्या नाकाची ठेवण अचूकपणे उतरत नव्हती. वेगवेगळ्या प्रकारे २८ वेळा प्रयत्न केले. अखेर तांत्रिक सोपस्कार पूर्ण करून ‘पिंजरा’ची वर्तमानपत्रासाठीची जाहिरात तयार झाली. व्ही. शांताराम यांना ती जाहिरात दाखविल्यानंतर मी केलेल्या जाहिरातीवर त्यांनी शिक्कामोर्तब केले.

पूर्वी वर्तमानपत्रांसाठी जाहिरात करताना ती कृष्णधवल रंगातच करावी लागत असे. आता जाहिराती रंगीत झाल्या आहेत. जाहिरातीसाठी जे छायाचित्र वापरायचे आहे, त्यात काही दोष असेल तर तो आता संगणकावर दूर करून ते छायाचित्र एकदम छान करता येते. मात्र पूर्वी तशी सोय नव्हती. छायाचित्रात दोष असेल तर त्यात फार काही सुधारणा करता यायची नाही. आता संगणकामुळे सगळे काम झटपट व सोपे झाले आहे. मात्र तंत्रज्ञान कितीही पुढे गेले असले आणि संगणकावर सर्व काही करता येत असले, तरीही संगणक केवळ ‘ऑपरेट’ करतो तो ‘क्रिएट’ करू शकत नाही. एखादी कल्पना, सर्जनशिलता ही माणसाच्या मेंदूमधूनच बाहेर पडते. त्यामुळे या कलेतसर्जनशीलतेला आणि माणसाच्या हाताला आजही तेवढेच महत्त्व असल्याचे धोंगडे यांनी सांगितले. हा चित्रपट ज्यांच्यामुळे नव्या पिढीला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे ते पुरुषोत्तम लढ्ढा म्हणाले, ‘पिंजरा’सारखी अजरामर कलाकृती आत्ताच्या पिढीसमोर यावी, या एकमात्र उद्देशाने आम्ही हा सगळा घाट घातला आहे. चित्रपटाच्या मूळ प्रिंटवर तांत्रिक सोपस्कार करून आणि नवे रंगरूप देऊन हा चित्रपट आम्ही प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहोत. मूळ प्रिंटचे २ के स्कॅनिंग करून नवी अद्ययावत प्रिंट तयार करण्यात आली आहे. हॅण्ड क्लिनिंग, अल्ट्रासॉनिक क्लिनिंग, ऑडिओ ग्रॅम्बिंग, कलर ग्रेडिंग आदी तांत्रिक प्रक्रिया करण्यात येऊन चित्रपटाला आधुनिकतेचा साज चढविण्यात आला आहे. या तांत्रिक कामाची जबाबदारी प्रामुख्याने ज्यांनी पाहिली ते ‘लाइन प्रोडय़ुसर’ मंदार खानविलकर यांनी सांगितले, चित्रपटाची निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मूळ प्रिंट खूप पुसट झालेली होती. त्यातील रंग एकमेकांमध्ये मिसळले गेले होते. प्रसाद लॅबच्या चेन्नई आणि मुंबई येथील प्रयोगशाळेत त्यावर सर्व तांत्रिक सोपस्कार करण्यात येऊन चित्रपटाच्या प्रिंटला आधुनिक साज चढविण्यात आला. गेले साडेतीन महिने हे काम सुरू आहे.

हे अनुभवण्यासाठी अण्णा हवे होते! ‘पिंजरा’ चित्रपटाला ४४ वर्षांपूर्वी अमाप यश आणि लोकप्रियता मिळाली. चित्रपटातील सर्व गाणी तेव्हा लोकप्रिय झाली आणि आजही ती तेवढीच लोकप्रिय आहेत. आता पुन्हा एकदा नव्याने ‘पिंजरा’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आताच्या पिढीकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास वाटतो. हे सर्व अनुभवण्यासाठी व्ही. शांताराम ऊर्फ अण्णा असायला हवे होते. आज त्यांची प्रकर्षांने आठवण येत आहे. मी आणि संध्या आम्ही दोघीही बहिणी. आमच्या दोघींची एकत्र भूमिका असलेला एखादा चित्रपट असावा, असे संध्याला खूप वाटायचे. ‘पिंजरा’च्या निमित्ताने तो योग जुळून आला आणि अण्णांमुळे चित्रपटातही मी संध्याच्या मोठय़ा बहिणीची ‘आक्का’ची भूमिका साकारली. चित्रपटावर अण्णांनी खूप मेहनत घेतली. चित्रपटातील सर्वच छोटय़ा-मोठय़ा भूमिकेचे त्यांच्या दृष्टीने महत्त्व होते. त्यामुळे चित्रपटातील सर्वच भूमिका ठळकपणे आजही लक्षात राहणाऱ्या ठरल्या. चित्रपटात भूमिका करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला महत्त्व देऊन, त्याच्याशी चर्चा करून, सल्लामसलत करून चित्रपट तयार केला. वत्सला देशमुख, ज्येष्ठ अभिनेत्री

(पूर्वप्रसिद्धी लोकसत्ता-मुंबई/ रविवार वृत्तान्त/१३ मार्च २०१६)

सोमवार, ७ मार्च, २०१६

मुकबधिर मुलांची शाळा उभारणारी माऊली

माझी मामी सौ. अपर्णा आगाशे हिने मुकबधीर मुलांसाठी १९९२ मध्ये संवाद कर्णबधिर प्रबोधिनी ही शाळा सुरु केली. या शाळेविषयी दैनिक प्रहारच्या प्रवाह पुरवणीत (६ मार्च २०१६) आलेला लेख

मुकबधिर मुलांची शाळा उभारणारी माऊली ‘आई’ म्हणजे केवळ दोन शब्द नव्हे तर संपूर्ण विश्व त्यामध्ये सामावलेले असते. आपल्या मुलांसाठी काहीही करायला नेहमी सज्ज राहणारी आई सर्वानाच ठाऊक आहे. Untitled-TrueColor-04‘आई’ म्हणजे केवळ दोन शब्द नव्हे तर संपूर्ण विश्व त्यामध्ये सामावलेले असते. आपल्या मुलांसाठी काहीही करायला नेहमी सज्ज राहणारी आई सर्वानाच ठाऊक आहे. मात्र, अपर्णा आगाशे या सर्वसामान्य माऊलीने चक्क आपल्या कर्णबधिर मुलाला समाजात आत्मविश्वासाने वावरता यावे, तो स्वावलंबी व्हावा, यासाठी १९९२ साली स्वत: शाळा स्थापन केली. गेली १५ र्वष त्या डोंबिवली पश्चिम भागात ‘संवाद कर्णबधिर प्रबोधिनी’ ही विशेष शाळा चालवत आहेत.

लहान मुलगा अमेय आगाशे ‘अस्तित्व’ या शाळेत शिकत असताना तेथील अपंग मुलांच्या महिला पालकांनी एकत्र येऊन ‘संवाद कर्णबधिर प्रबोधिनी’ ही शाळा सुरू केली. केवळ सात महिलांनी एकजूट होऊन आपल्या मुलांसाठी एक लहानसे रोपटे लावले. मात्र, आता या रोपटय़ाचे मोठय़ा वृक्षात रूपांतर झाले आहे. सुरुवातीला अपर्णा आगाशे यांच्या लहान घरातून या शाळेची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी शाळेत पाच ते सहा मुलं असायची. परंतु त्यानंतर मुलांची संख्या वाढत गेल्याने बसण्यासाठी जागा अपुरी पडायला लागली.

घरात शाळा असल्याने शासनमान्यता मिळत नसल्याच्या कारणास्तव त्यांनी आरोग्यक्रेंद्र बिल्डिंग, काळुनगर, ठाकूर वाडी, डोंबिवली (प.) येथे एक जागा भाडेतत्त्वावर घेतली. सध्या या शाळेला सरकारमान्यता प्राप्त झालेली आहे. कर्णबधिर मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी या शाळेचे संचालक मंडळ व शिक्षकवर्ग प्रयत्नशील आहे. याशिवाय सध्या शाळेत एकूण ४५ मुलं आहेत. मुळात शाळेत प्रवेश घेण्यासाठी मुलं येत नाहीत. आगाशे आणि शाळेतील शिक्षक प्रत्येकाच्या घरी जाऊन अशा कर्णबधिर मुलांचे सर्वेक्षण करतात. त्यांना अशी मुलं आढळल्यास त्यांच्या पालकांची समजूत काढून त्यांना शाळेत प्रवेश देण्यात येतो. आता बहुतांश लोकांना या शाळेबाबत माहिती मिळालेली आहे. परंतु तरीही संचालक मंडळ विविध परिसरात जाऊन अशा मुलांचा शोध घेतात. संवाद कर्णबधिर प्रबोधिनी या शाळेचे वैशिष्टय़ म्हणजे येथे आíथकदृष्टय़ा दुर्बल घटकातील मुलांना विशेष प्राधान्य देण्यात येते. कारण, अशा मुलांना शाळेत घालण्यासाठी त्यांच्या पालकांकडे पैसा नसतोशाळा. त्यामुळे ही मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. या शाळेच्या माध्यमातून या गरजू मुलांसाठी एक विश्व मंडळाने तयार केले आहे. ही मुलं इतरांपेक्षा कमी नाहीत. त्यामुळे इतर शाळांमधील मुलांप्रमाणेच या मुलांना सुद्धा सर्व विषय शिकविण्यात येतात. शिशू गटातील मुलांना विशेष मार्गदर्शन, व्यवसायभिमुख शिक्षणाची पूर्वतयारी, मुलांच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. सर्व प्रकारच्या अपंग मुलांना शासकीय योजनांची माहिती देण्यात येते.

शिशू वर्गापासून सातवी ते नववीपर्यंत मुलांना शिकविण्यात येते. त्यानंतर शाळाबाह्य मुलांना सतरा नंबरचा फॉर्म भरून दहावीच्या परीक्षेला बसविण्यात येते. या मुलांना लहानपणापासूनच संगणकाचे धडे गिरविण्यात येत आहेत. ठाणे, मुंबई, नाशिक, कल्याण परिसरातील होणा-या कला, क्रीडा बौद्धिक स्पर्धामध्ये राज्यस्तरीय नाटय़ स्पध्रेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली आहेत. कर्णबधिर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व जडणघडण होण्यासाठी शाळेत कवायत स्पर्धा, भाषा आकलन स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा, अभ्यासपूर्ण सहली व भेटीचे आयोजन, क्रीडास्पर्धा या मुलांना सामाजिक जाणिवांची जाण होण्यासाठी रेल्वेस्थानक परिसर स्वच्छ करणे, रुग्णालयात जाऊन रक्षाबंधन करणे, सर्वधर्मीय सण- उत्सव साजरे करणे याकडे लक्ष दिले जाते. त्याचबरोबर हवाईदलाची माहिती देणे, हिवताप निर्मूलनासाठी परिसरातील साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, अपंगांच्या हक्कासाठी व जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात येते. आजपर्यंत या शाळेचा एस.एस.सी. निकाल १०० टक्के लागला आहे. संवाद कर्णबधिर प्रबोधिनीतील इन्फंट सेंटरचा रत्नागिरी, डहाणू येथील कर्णबधिर मुलांनी लाभ घेतला आहे.

कर्णबधिर मुलांच्या शाळेतील शिक्षक हे विद्यार्थ्यांचे सहावे इंद्रिय म्हणून काम करीत असतात. त्यामुळे ही मुले प्रगती करतात. योग्य वयात योग्य असे श्रवणहासाचे निदान करून श्रवणयंत्र मिळवून देणे आवश्यक असते. योग्य श्रवणयंत्र न मिळाल्यास भाषा व ज्ञानापासून त्यांना वंचित राहावे लागते. म्हणून शाळा मुलांना योग्य ते श्रवणयंत्र मिळवून देण्याचा प्रयत्न करत असते. कर्णबधिर मुलांच्या विविध आíथक, शारीरिक इतर अडचणी सोडविण्याचा प्रयत्न शाळेत केला जातो. विद्यार्थ्यांना इतर दानशूर व्यक्तींकडून शालेय साहित्य, पोषक आहार मिळावा यासाठी विश्वस्त शिक्षण जागरूक असतात. त्यामुळे या शाळेला पुढे नेण्यासाठी प्रबोधिनीच्या संचालक मंडळ व शिक्षकांची अखंड धडपड सुरू असते. त्यामुळे एका लहानशा रोपटय़ाचे आता मोठय़ा वटवृक्षात रूपांतर झाले आहे. (दैनिक प्रहार/६ मार्च २०१६/प्रवाह पुरवणी/

http://prahaar.in/collag/390258

सौ.अपर्णा आगाशे यांचा संपर्क क्रमांक ७७३८७११०३२

मान्यवरांच्या पत्रांचा संग्रह

विविध क्षेत्रातील मान्यवरांचे हस्ताक्षर संग्रही असावे या उद्देशाने मान्यवरांना मी वाढदिवस, दिवाळी शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने पत्र पाठवत असे. हा छंद मी शाळा-कॉलेजपर्यंत जोपासला होता. त्यातून हा पत्रसंग्रह तयार झाला आहे.

घुमानला दरवर्षी भरणार बहुभाषा साहित्य संमेलन