सोमवार, १३ मार्च, २०१७

लोकशक्ती हिच राष्ट्रशक्ती- बॅ. नाथ पै


कला वक्तृत्वाची-८

बॅ. नाथ पै

लोकशक्ती हिच राष्ट्रशक्ती

आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून १६ फेब्रुवारी १९६६ रोजी ‘राष्ट्राची शक्ती’ या राष्ट्रीय भाषणमालेत बॅ. नाथ पै यांचे भाषण झाले होते. त्या भाषणातील काही भाग.

लोकशक्ती हाच लोकशाहीचा पाया असतो. सर्व सत्तेचे उगमस्थान लोक हे असते आणि सत्तेचा संचयही लोक या घटकातच होत असतो. खऱ्या लोकशाहीची ही एक मूलभूत कल्पना आहे. जुन्या काळात लोकशाहीच्या या जाणिवेने अभिमंत्रित झालेली मंडळी होती तशी ती आजच्या काळातही आपल्याला आढळतात. लोकांची शक्तीच अखेर यशस्वी होते हे आपल्याला काही नवे नाही. जुन्या काळात आणि आधुनिक काळात हे आपल्या देशातील अनेक विचारवंतांनी सांगून ठेवले आहे. लोकशक्ती ही राज्यशक्तीपेक्षा प्रभावी असते.

आपले संविधान, आपली घटना हाच विश्वास, हीच श्रद्धा व्यक्त करते. शक्ती आणि सत्ता यांचे उगमस्थान जनता, लोक हेच आहे आणि तेच सत्तेचेही अधिष्ठान आहे. संचयस्थान आहे. आपली घटना, आपले संविधान हीच आपल्या स्वराज्याची सनद आहे, ग्वाही आहे. आपल्या स्वातंत्र्याचे ते संरक्षक कवच आहे. कधी स्वार्थान्ध, मतान्ध मंडळी, जगाच्या इतिहासात उठणाऱ्या प्रचंड लाटांचे भान नसणारी मंडळी, अज्ञानी मंडळी, लोकशक्तीला थोपविण्याचा आटापिटा करताना दिसतात, तिला पराभूत करण्याचा उद्योग करतात. पण त्यांनी उभ्या केलेल्या सगळ्या तटबंद्या लोकशक्तीपुढे धडाधड कोसळून पडतात. सगळे अडथळे लोकशक्तीच्या पुरात कुठल्या कुठे वाहून जातात. त्यातूनच क्रांतीचा उदय होतो. प्रचंड परिवर्तन आकाराला येते.

जागृत लोकशक्तीच्या मतपरिवर्तनकारी दडपणामुळे स्वतंत्र भारतात राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील किती तरी निर्णय हटवादी राज्यकर्त्यांना बदलावे लागले आहेत. लोकशक्तीचा अंतिम विजय निश्चित आहे, असे म्हणताना त्यात काहीच खाचखळगे नाहीत, अडथळे नाहीत, अडचणी नाहीत असे मला म्हणायचे नाही. लोकशक्ती आपोआप विजयी होते अशी समजूत कोणी करून घेऊ नये. पूर्वग्रह आणि भोळ्या समजुती, अज्ञान आणि अपसमज या गोष्टी अडचणी निर्माण करतात. काही वेळा लोककल्याण आणि जनतेची इच्छा यांच्या नावाखालीदेखील लोकशाहीला घातक अशी पावले टाकली जातात. अनेकदा लोकशक्तीचा वापर सामाजिक, राजकीय व आर्थिक परिवर्तन आणि न्याय धाब्यावर बसविण्यासाठी केल्याचेही दिसते. लोकांनी दडपशाहीला सिंहासनावर बसविले, एवढेच नव्हे तर ती दडपशाही चालू ठेवण्यासाठी साहय़ केले, असे दाखले दुर्मीळ नाहीत. ह्या अशा उदाहरणांमुळेच लोकशक्तीबद्दल लोकांची श्रद्धा भंग पावते आणि मग कडवटपणे ते लोकशक्तीबद्दल अद्वातद्वा बोलतात. लोकशाहीच्या कल्पनेबद्दल अशी मंडळी संशय व्यक्त करताना दिसतात. लोकांना सतत जागरूक ठेवणे, त्यांचे शिक्षण करणे, त्यांना सर्व अंगांनी विचार करायला शिकवणे हा लोकशाहीच्या अनुषंगाने पोसल्या जाणाऱ्या अनाचारांवर रामबाण इलाज आहे.

लोकशाही हे सामाजिक व आर्थिक न्यायप्रस्थापनेचे एक प्रभावी साधन आहे, असा दावा करणाऱ्यांचे हे कर्तव्य आहे की सत्तेचा दुरुपयोग रोखण्यासाठी लोकांनी सतत सबळ आणि तत्पर असले पाहिजे. ही जाणीव त्यांनी निर्माण करावी. असे सुजाण, संघटित लोकमत असेल तरच सत्तेला अंकुश लावता येतो आणि लाचलुचपतीने बरबटलेला कारभार नेस्तनाबूत करणे शक्य होते. लोकशाहीच्या यशाचे ते गमक आहे. नेत्याने लोकांची भाबडेपणाने भलावण करणे किंवा लोकमतापुढे लोटांगण घालणे म्हणजे लोकशाही नेतृत्व नव्हे. लोकशाही नेतृत्वाची कसोटी लोकांच्या व्यापक व उचित आकांक्षांशी ते किती एकरूप होते आणि त्यासाठी प्रसंगी तात्पुरती माघार व अपयश घेण्याची तयारी दाखवते यावर लागते. लोकांच्या पूर्वग्रह व अपसमजुतींविरुद्ध दंड थोपटण्याची त्याची तयारी असली पाहिजे. यासाठी आपले सर्वस्व समर्पण करण्यालाही त्याने कचरता कामा नये.

लोकेच्छेपुढे राज्यकर्त्यांची शरणागती

सत्ताधाऱ्यांना सत्तेचा पुष्कळदा मद चढतो, मस्ती येते. लोकशक्तीला ते क:पदार्थ समजतात. लोकशक्तीची अवहेलना करतात. तिला तुच्छ लेखतात. पण लोकशक्ती त्यांना नमवते. सरळ मार्गावर आणते. आपल्या उर्मटपणाचा त्यांना त्याग करावा लागतो. शिरजोरी, मुजोरी त्यांना सोडावी लागते. इतिहासात अशी कितीतरी उदाहरणे सापडतील की जेथे राज्यकर्त्यांना आपला हट्ट सोडून देऊन लोकेच्छेपुढे शरणागती पत्करावी लागली आहे.

संकलन – शेखर जोशी

(अनुबंध प्रकाशन प्रकाशित ‘वक्तृत्व कला दिग्गजांची’ -श्यामसुंदर उके या पुस्तकावरून साभार)

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/७ फेब्रुवारी २०१७)

प्रश्न मराठीच्या संरक्षणाचा आणि संवर्धनाचा-वि. वा. शिरवाडकर


कला वक्तृत्वाची-७

वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज

प्रश्न मराठीच्या संरक्षणाचा आणि संवर्धनाचा

महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या राजधानीत एक अपूर्व सोहळा संपन्न होत आहे. मायभाषेच्या हाकेला प्रतिसाद देऊन आपण अनेक राज्यांतून, अनेक देशांतून येथे आला आहात. मी आपणा सर्वाना मनापासून धन्यवाद देतो.आपण परप्रांतात, परदेशात राहता आहात. तेथील भाषांचा स्वीकार करणं, त्यात पारंगत होणं हे आपलं कर्तव्यच आहे. पण ते बजावत असताही आपण आपल्या मायभाषेवरील प्रेम देवघरातील समईसारखं जागृत ठेवलं आहे. खेद या गोष्टीचा की खुद्द महाराष्ट्रात मात्र या समया मंदावत विझत चालल्या आहेत. आम्हीच त्या मालवत आहोत आणि जुन्या बाजारात समयांची किंमत किती याचा शोध घेत आहोत. स्वातंत्र्याच्या चाळीस आणि राज्य स्थापनेच्या पंचवीस वर्षांनंतरही मराठीला आपलं हक्काचं सिंहासन अद्याप मिळालेलं नाही आणि ते मिळत नाही याचं कारण ते रिकामं नाही. या मातीशी कोणतंही नातं नसलेल्या एका परकीय भाषेनं इंग्रजीनं ते बळकावलेलं आहे.मी इंग्रजी भाषेचा द्वेष तर करत नाहीच उलट त्या भाषेवर माझं मनापासून प्रेम आहे. आपण सारेजण इंग्रजीचं ऋण कधी विसरू शकत नाही. केवळ जागतिक साहित्याचेच नव्हे तर जगातील ज्ञानविज्ञानाचे दरवाजे इंग्रजीनंच आमच्यासाठी उघडले आहेत.

कोणत्याही जिवंत समाजाची भाषा तळ्यासारखी सजीव नसते तर कालमानानं निर्माण होणाऱ्या नव्या ज्ञानाचे, विचारांचे, जाणिवांचे पाझर आत्मसात करीत पुढे जाणाऱ्या नदीसारखी प्रवाही असते. इतर प्रगत भाषांशी संपर्क ठेवूनच ती प्रगती करू शकते. शुद्धतेच्या कर्मकांडांत रुतलेल्या आणि त्यामुळेच प्रगतीला पराङ्मुख झालेल्या भाषा मृत या सदरात कशा जमा होतात हे इतिहासानं दाखवलेलं आहे. हे भान मराठीनं आपल्या पंधरा शतकांच्या प्रवासात राखलेलं आहे आणि म्हणूनच नव्या युगाची आव्हानं पेलण्याचं सामथ्र्य तिच्या ठिकाणी आलं आहे. भाषा समर्थ आहे, पण तिच्या सामर्थ्यांसंबंधी साशंक असलेली आम्ही तिची अपत्यं मात्र दुबळी आहोत. तेव्हा आमचं वैर कोणत्याही भाषेशी नाही आणि मावशीच्या मायनं आमचं पालन करणाऱ्या इंग्रजीशी तर नाहीच नाही. मावशीबाईनं आता आईच्या घराचा कब्जा पुन्हा आईकडं द्यावा एवढीच आमची मागणी आहे. म्हणून आपल्यासमोर प्रश्न आहे तो इंग्रजीच्या बहिष्काराचा नाही तर मराठीच्या संरक्षणाचा आणि संवर्धनाचा.

कागदोपत्री मराठी भाषा ही राजभाषा झालेली आहे. पण व्यवहारात तिचा हा अधिकार फारसा मान्य झाल्याचं दिसत नाही. डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत ती मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे. सरकारी आणि निमसरकारी संस्थांत मराठीला अद्याप खालच्या मानेनंच वावरावं लागतं. पण मराठीला राजभाषेचं रास्त स्थान आज ना उद्या लाभेल. अधिक धोका आहे तो लोकभाषा म्हणून तिच्यावर होणाऱ्या आक्रमणांचा.

मुंबईत म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीचं स्थान कोणतं हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. मुंबई हे सर्वाश्रयी शहर आहे. विविध प्रांतांतील लोक येथे येतात, राहतात याचा आम्हाला अभिमान, आनंद वाटतो. पण मुंबईतील मजलेदार इमारती, त्या बांधणारे वा त्यात राहणारे कोणीही असोत त्या मराठी मातीवर उभारलेल्या आहेत. मुंबई ही महाराष्ट्रातील मराठी भाषिकांची जीवनधात्री माता आहे. या माऊलीच्या वत्स सावलीत कोणीही यावं, राहावं, निर्वाहसाधना करावी. अवश्य. ‘हे विश्वचि माझे घर’ हा संतांचा संदेश या मातीत रुजलेला आहे. पण आठ कोटींच्या या आईला धनसत्तेच्या बळावर आपली बटीक करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.

महाराष्ट्राच्या अस्मितेवर संकट

मराठीवरील संकट हे तिच्या शब्दकोशावरील वा साहित्यावरील संकट नाही. ते महाराष्ट्राच्या अस्मितेवरील, मराठीपणावरील आणि येथील लोकांच्या भवितव्यावरीलही संकट आहे. संस्कृतचं स्तोम माजवून तेव्हाचा पुरोहितवर्ग आपली सत्ता समाजावर गाजवत होता. आज त्या पुरोहितवर्गाची जागा इंग्रजीत पारंगत असलेल्या चार-पाच टक्के लोकांनी घेतली आहे. या पाच टक्केवाल्यांच्या प्रस्थापित हितसंबंधांसाठी आठ कोटी लोकांचं भवितव्य धोक्यात लोटायचं का याचा विचार गंभीरपणानं व्हायला हवा. लोकभाषेवर आक्रमण..

सरकारी-निमसरकारी संस्थांमध्ये मराठीला मानच नाही या भाषेला धनसत्तेच्या बळावर बटीक करण्याचा प्रयत्न करू नये चार-पाच टक्के लोकांकडून मराठी भाषेचे भवितव्य धोक्यात मराठी भाषा नव्या युगाची आव्हाने पेलण्यास समर्थ

संकलन – शेखर जोशी

(जागतिक मराठी परिषदेच्या मुंबईत झालेल्या पहिल्या अधिवेशनाच्या (१२ व १३ ऑगस्ट १९८९) उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ नाटककार, कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी केलेल्या भाषणातील काही भाग)

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता-मुख्य अंक/५ फेब्रुवारी २०१७)

हातवारे आणि हावभाव-डॉ. अशोक दा. रानडे


कला वक्तृत्वाची-६

अशोक दा. रानडे

हातवारे आणि हावभाव

भाषणक्रियेवर ज्यांचा प्रत्यक्ष परिणाम होतो, प्रभाव पडतो अशा ज्या काही बाबी आहेत त्यात हातवारे आणि हावभाव यांचा निर्विवादपणे अंतर्भाव होतो. हालचाल, हातवारे आणि हावभाव यांच्यामुळे भाषणाचे हेल निश्चित होतात. हाताच्या चलनवलनांचे मानवी जीवनात खास महत्त्व आहे. भाषणासमवेत हातवारे होतात. तसेच हावभावही होतात. खरे पाहता हावभाव हा जोडशब्द मानायला हवा. भाव प्रकट करण्याच्या हेतूने मान, उच्छवास, भुवया व डोळ्याचे विस्फारणे इत्यादींचा वापर करणे हे हाव. हालचाल आणि हातवाऱ्यांखेरीजची शरीरांगांची सूक्ष्म चलने म्हणजे हाव असा अर्थ मानणे सोयीचे राहील. आता राहिला भाव. मनावरचा कोणताही तरंग म्हणजे भाव. भाव म्हणजे स्थिर मनातली कोणतीही सूक्ष्म चलबिचल हा सोपा अर्थ ध्यानात घेऊ. विशिष्ट प्रसंगाच्या अनुषंगाने भाव जेव्हा एक खास परंग घेऊन येतो तेव्हा निर्माण होते ती भावना. आपल्या हातवाऱ्यांचे आणि हावभावांचे भाषणाबरोबरोबरचे नाते काय ते पाहावयाचे. भाषणाचा स्वत:चा म्हणून जो काही परिणाम असतो त्याच्याशी हातवारे-हावभावांचे नाते दोन प्रकारचे संभवते. एक तर भाषणाच्या अर्थाला त्यांच्यामुळे दुजोरा मिळावा किंवा भाषणार्थास त्यांच्यामुळे छेद जावा.

भाषण, हातवारे आणि हावभाव हे तिन्ही एक समान आविष्काराचे घटक म्हणून येत असल्याकारणाने त्यांचे एकमेकांशी काहीही नाते नसणे संभवत नाही. मूळ भाषणार्थ कोणता हे समजून घेण्यात चूक झाली तर भाग वेगळा. पण सर्वसाधारणत: कोणत्या भाषणाबरोबर कोणते हातवारे वगैरे असावेत याची सूचना भाषणांतूनच मिळत असते. हातवारे आणि हावभाव जर निश्चित संकेतांच्या साखळीत बसविले तर नृत्यातली मुद्रांची भाषा तयार होते हे सर्वाना माहिती आहे.शरीरापासून दूर/जवळ जाण्याची क्रिया हात किती झपाटय़ाने, वेगाने करतात यातूनही भावनांचा आवेग दर्शविला जातो. काहीशी विरोधाभासात्मक बाब अशी की भावनाक्षोभाची तीव्रतम मानसिक अवस्था दाखविण्याकरिता हात शरीराला लगटून ठेवणे ‘बोलके’ ठरते.भाषणकर्त्यांचे शिष्टपण, गावंढळपण किंवा त्याच्या मनाचा समतोल/तिरकसपणा दर्शविण्यासाठी अनुक्रमे सफाईदार/खडबडीत वा हिसक्यांनी युक्त हातवारे उपयोगी पडतात.

सरळ रेषेत होणारे हातवारे आक्रमक व मर्दानी तर वक्र रेषेत होणारे मनमिळाऊ व जनानी असेही गमक मानता येईल. सर्वसाधारणत: शब्द अधिक असल्यास हातवारे कमी असे समीकरण मांडण्यास हरकत नाही. हालचाल, हातवारे आणि हावभाव यांची आपापली खास ‘भाषा’ त्याच क्रमाने अधिकाधिक सूक्ष्म होत जाते. म्हणजे असे की कर्त्यांची शरीरशक्ती कमी कमी खर्च होत जाते आणि त्याचबरोबर संदेशग्राकाची (म्हणजे प्रेक्षक वगैरेची) संवेदनशीलताही अधिकाधिक आवश्यक ठरू लागते. प्रयोग सादर करणाऱ्या बाह्य़ सोयी (उदा. प्रकाशयोजना, ध्वनिवर्धन इत्यादी) किती उपलब्ध आहेत त्याचा अंदाज घेऊनच ‘भाषा’ कितपत सूक्ष्म ठेवावी याचा निर्णय करावयाचा असतो.

फेक आणि हातवारे

मनात उद्भवलेला विकार साजेशा जलदीने व कमीत कमी अक्षरांच्या/ शब्दांच्या मदतीने दाखविण्याकरिता मानवी उद्गाराच्या या खास स्वरूपामुळे हातवाऱ्यांबरोबर त्याची सांगड घातली जाणे स्वाभाविक म्हटले पाहिजे. या स्वाभाविक संगतीमुळे हातवारे आणि उद्गारांची फेक यांनी मिळून काही अभ्यास सिद्ध होतात.

‘हा:’सारख्या कमी ध्वनींनी तयार होणाऱ्या उद्गारांची एक यादी तयार करा, यादीपैकी एक कोणताही उद्गार घेऊन बोटांची पेरे क्रमाक्रमाने वाकविताना त्याची फेक करा.


हळूहळू उद्गाराच्या फेकीचा वेग वाढवा, हाताचा पंजा सावकाश उघडा व बोटे पसरा. उभे राहून दोन्ही हात जमिनीला समांतर पसरा-पक्ष्याच्या पंखासारखे. बोटांच्या टोकापासून खांद्यापर्यंत एक लाट हळूहळू येत असून त्यानुसार बाताचा तो तो भाग खालीवर होत आहे अशी कल्पना करून त्यानुसार हातांची हालचाल करा.

मार्गदर्शक सूत्रे. हातवारे, हावभाव वगैरेंचे प्रमाण व प्रकार अंतिमत: भाषणार्थाच्या अनुषंगाने निश्चित होतात हे मूलतत्त्व ध्यानात घेता त्यांच्या जबरदस्त विविधतेची कल्पना सहजपणे करता येईल. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत निरपवादपणे लागू पडतील असे नियम सांगणे अवघड नव्हे तर अयोग्यही ठरेल. पण तरीही हातवारे आणि हावभाव कोणते असावेत ते ठरविण्यासाठी बऱ्याच प्रमाणात साहाय्यक ठरणारी काही सूत्रे पुढीलप्रमाणे मांडता येतील. सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की भावनांचा आवेग जितका तीव्र तितके हात शरीरापासून अधिक दूर नेणे स्वाभाविक वाटेल.

संकलन – शेखर जोशी

(अशोक दा. रानडे लिखित आणि पॉप्युलर प्रकाशन प्रकाशित ‘भाषणरंग-व्यासपीठ आणि रंगपीठ’या पुस्तकावरून साभार.)

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता-मुख्य अंक/४ फेब्रुवारी २०१७)

मराठी भाषेचे तेज आचार्य अत्रे यांनी शिकविले-पु. ल. देशपांडे


कला वक्तृत्वाची-५

पु. ल. देशपांडे

२८ मार्च १९८१ रोजी पुण्यातील आचार्य अत्रे सभागृहाचे उद्घाटन झाले. त्या वेळी श्रोत्यांच्या आग्रहास्तव पु. ल. देशपांडे यांनी आयत्या वेळी भाषण केले. आचार्य अत्रे यांच्यावरील पुलंचे ते भाषण म्हणजे श्रोत्यांना मेजवानीच होती. त्या भाषणातील काही भाग.

..आत्तापर्यंत आचार्य अत्रे यांच्यावर प्रत्येकाने बोलण्याचा प्रयत्न केला (हशा). मी असे विधान करतो याचे कारण असे की, आचार्य अत्रे ही अशी व्यक्ती होती तिच्यावर किती बोलले तरी शिल्लक राहते. काही धाडसी लोकांनी त्यांच्यावर ‘पीएच.डी.’ करण्याचाही प्रयत्न चालविला आहे (हशा). काही व्यक्ती महाराष्ट्रात अफाट झाल्या आहेत. बाळ गंगाधर टिळक, आचार्य अत्रे ही माणसेच अशी आहेत की त्यांच्याबद्दल कोणत्या अंगाने लिहावे आणि बोलावे?

आज आम्ही मोकळेपणाने लोकांना सांगू शकतो, न घाबरता सांगू शकतो की आम्ही अत्र्यांच्या काळात वाढलो. आम्ही मनात खांडेकर आणि जनात अत्रे धरूनच सगळं बोलत होतो (हशा). याचे कारणही तसंच आहे. अफाट लोकप्रियता बालगंधर्वाना आणि अत्र्यांना मिळाली. कारण हा आपला माणूस आहे असं लोकांना वाटत असे. तो बरोबर बोलतो असं वाटे. आपल्या विचारालाच प्रतिसाद मिळत आहे असं त्यांना वाटे. त्यांचा महाराष्ट्रावरचा सर्वात मोठा उपकार असा की अस्सल मराठी भाषेचं तेज म्हणजे काय ते त्यांनी आम्हाला शिकविलं. मराठीकडे थट्टेचा विषय म्हणून दुर्लक्ष होई. त्याच मराठीच्या माध्यमातून आचार्य अत्र्यांनी हसविलं आणि हसवता हसवता महाराष्ट्राला शहाणं केलं (टाळ्या). संयुक्त महाराष्ट्राचे दिवस आठवतात. अन्यायाविरुद्ध संतापून उठणं म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिलं. वन्ही चेतवित ठेवण्याचं, त्वेषानं लोकांना उठविण्याचं सामथ्र्य त्यांच्याकडं होतं. याचं कारण त्यांच्या जीवनाचे सर्वस्वच मुळी उत्कटतेत होतं. त्यांना लहान काही दिसत नाही. मी एकदा अत्रे यांना म्हटलं, आम्ही सारे जण बे एके बे, बे दुणे चार शिकलो. तुमच्या मास्तरांनी तुम्हाला दोन हजार एके दोन हजार, दोन हजार दुणे चार हजार असंच शिकवलेलं दिसतय (प्रचंड हशा).आमच्या म्युनिसिपल शाळेतील मास्तरांना आम्हाला दोन सांगतानाही आपण जास्त सांगतो असं वाटायचं. अत्र्यांना कोण ते सासवडचे गुरुजी मिळाले कोण जाणे (हशा).

एकदा माझं आणि अत्र्यांचं एका व्यासपीठावर भाषण होतं. अत्र्यांनी मला विचारलं, पीएल किती माणसं सभेला आहेत असं तुला वाटतं? मी आपला कारकुनी अंदाज करीत सांगितलं, असतील हजार बाराशे. अरे काय म्हणतोस, अत्रे म्हणाले. ७० ते ८० हजार लोक म्हण. नाही तर जिल्हा पत्राचाही तू संपादक होणार नाहीस (प्रचंड हशा). पुण्यात सभा असल्यामुळं एक माणूस दहा माणसांबरोबर होता ही गोष्ट निराळी (टाळ्या आणि हशा).

अत्रे ज्या क्षणी लिहित होते त्या क्षणाशी ते अत्यंत प्रामाणिक होते. मग ते त्या वेळी कोणतंही कृत्य करीत असो. कारण विनोदी लेखकाचे वैशिष्टय़च हे असते की त्याला जीवनातील सुसंगत म्हणजे काय ते कळावं लागतं. त्या वेळीच तो विसंगतीवर लिहू शकतो. अत्र्यांचं वाचन अफाट होतं. त्यांच्या शैलीवर संत वाङ्मयाचे संस्कार आहेत. अत्र्यांसारखं सरळ मराठी आज कुणी लिहीत नाही. आचार्य अत्रे व्यक्ती नसून जीवनाकडे पाहण्याची दृष्टी होती. चागलं असेल त्याला अति चांगलं करीत, वाईट असेल त्याला अतिवाईट ठरवून झोडपूनही काढीत. अशी त्यांची विचारसरणी होती. प्रत्येक क्षेत्रांत त्यांनी कर्तृत्व गाजवलं. अशा व्यक्तीला लवकर विसरून जाण्याइतका महाराष्ट्र कृतघ्न नाही.

संकलन- शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता/मुख्य अंक/३ फेब्रुवारी २०१७

भाषणाचे तंत्र आणि मंत्र-माधव गडकरी


कला वक्तृत्वाची-४

माधव गडकरी भाषणाचे तंत्र आणि मंत्र

आवाज कसा आहे त्याचा अभ्यास करा- प्रा. राम कुलकर्णी


कला वक्तृत्वाची-३

प्रा. राम कुलकर्णी

आवाजालाही व्यायाम हवा- प्रबोधनकार ठाकरे


कला वक्तृत्वाची-२

प्रबोधनकार ठाकरे

आवाजालाही व्यायाम हवा

आवाज हे वक्तृत्वाचे मुख्य अंग आहे. माणसाच्या नुसत्या बोलण्याच्या आवाजावरून त्याच्या अंतर्बाह्य़ संस्कृतीचा बोध होतो. वक्त्याच्या तोंडून नुसता पहिला स्वर निघताच तो विद्वान, व्यासंगी, निश्चयी, सत्यप्रेमी, कळकळीचा आहे की हळवा, कमजोर आहे याची श्रोत्यांना पारख करता येते. मनुष्याच्या अंत:करणातील गूढ विकाराचे आविष्करण त्याच्या स्वरांच्या रोखठोक अथवा कंपित लहरींवरून होत असल्यामुळे शीलाने तो कच्चा की पक्का, त्याच्या स्वभावातील बरे-वाईट गुणधर्म कोणते, त्याच्या भाषणात नि:स्पृहता आहे की दंभ आहे, तो ज्या विषयावर बोलणार आहे त्याबद्दल त्याचा आत्मविश्वास भरपूर आहे की कोता वगैरे अनेक गोष्टींचा साक्षात्कार श्रोत्यांना होतो.

भाषणाला काय किंवा व्याख्यान, प्रवचन, कीर्तनाला काय, निकोप आवाज हे मोठे आवश्यक भांडवल आहे. घोगरे, किरटे, चिरफाळलेले किंवा कोकीळकंठी बायकी आवाजाचे वक्ते पट्टीचे पंडित असले तरी श्रोत्यांवर त्यांना आपली छाप पाडता येत नाही. चारचौघांत बसून गप्पाष्टकी संभाषण करतानाही उत्तम, गहिरा, मोहक आवाजाचा चतुरस्र असामी बाकीच्या मंडळींवर तेव्हाच इतकी छाप पाडतो की थोडय़ाच वेळात तो एकटा वक्ता आणि बाकीचे सारे उत्सुक श्रोते असा बनाव बनतो. आवाजालाही व्यायाम हवाच. व्यायामाने आणि नियमित आहार-विहाराने शरीरप्रकृती व काव्यशास्त्र विनोदप्रचुर ग्रंथांच्या व्यासंगाने मानसिक प्रकृती उत्तम राखण्याची आपण काळजी घेतो. शरीर नि मनाइतकाच आपला आवाजही निकोप आणि निरोगी राखण्याची जरुरी आहे हे फार थोडय़ांच्या लक्षात येते. सकाळ, संध्याकाळ दोन-दोन तास तंबोऱ्यावर सुरावटीची मेहनत (रियाज) करणाऱ्यांचा आवाज आणि आरोग्य उत्तम राहते.

उत्तम आकर्षक गायनासाठी सकस, निकोप आणि झारदार गळ्याची जेवढी आवश्यकता तेवढीच ती भाषिक वक्त्यांनाही असावी लागते. वक्त्यांच्या पांडित्यापेक्षाही त्याच्या भरघोस मोहक आवाजाच्या मोहिनीचाच श्रोत्यांवर परिणाम होत असतो. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर हे जसे उच्च श्रेणीचे गायनाचार्य होते तसे पट्टीचे वक्तेही होते. त्यांचे शास्त्रोक्त गायन ऐकताना श्रोते नादब्रह्माने जसे मंत्रमुग्ध होत तसेच त्यांचे व्याख्यान, प्रवचन चालले असतानाही श्रोते तल्लीनतेने माना डोलवीत असत. महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांनी शंभरी ओलांडली. पण त्यांच्या आवाजातील गोंडसपणा आणि गोडवा जणू काय अगदी बाल आवाजाचाच वाटत असे. कशाचा हा परिणाम? शारीरिक आणि मानसिक आरोग्याप्रमाणे या थोर पुरुषांनी आवाजाच्या आरोग्यालाही तितक्याच काळजीने जोपासले. आवाज कमाविण्यासाठी वक्तृत्वाच्या हौशी व महत्त्वाकांक्षी उमेदवारांनी एखाद्या गवयाचे मार्गदर्शन पत्करल्यास फार चांगले. रोज तास-अर्धा तास तंबोऱ्यावर किंवा पेटीच्या स्वरावर खर्ज लावण्याच्या कसरतीने किरटा, घोगरा, कमताकद आवाज सुधारल्याची उदाहरणे आहेत.

आवाजाचा उपयोग करताना त्यावर कसल्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक दाब नसावा. तो अगदी मोकळा, दिलखुलास असावा. चोरटा नसावा. भाषणाची सुरुवात अगदी मंद, साहजिक आणि तोलदार आवाजात केली म्हणजे विचारशक्ती आपल्या ताब्यात राहते. उच्चार स्वच्छ, स्पष्ट आणि ठाशीव असले म्हणजे शब्दांचा नाद-निनाद श्रोत्यांच्या मनावर छान परिणाम घडवितो. माईकवर मोठय़ा आवाजात बोलणे ही आवाजाची वारेमाप उधळपट्टीच आहे. ती टाळावी. श्रोता आणि वक्ता परस्पर सन्मुख असले पाहिजेत. भाषणात खरे महत्त्व भावनेला असून स्वरांच्या खोचा, वाक आणि आरोह-अवरोह निरनिराळ्या गोष्टीतील, विचारांतील किंवा तत्त्वातील भेद दर्शवितात.

संकलन – शेखर जोशी

(पूर्वप्रसिद्धी- लोकसत्ता-मुख्य अंक/३० जानेवारी २०१७)

(‘प्रबोधनकारडॉटऑर्ग’ या संकेतस्थळाच्या सौजन्याने)