ठाकरे, फडणवीस यांची 'दिल दोस्ती'
आणि बासनात गुंडाळलेली प्रकरणे
'निनावी' पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना थेट वरुन अभय मिळाले? आणि म्हणून त्यांनी आपले कट्टर राजकीय हाडवैरी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी हसतखेळत गप्पा मारल्या?
आधी अडीच वर्षे याच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर किती गरळ ओकली होती?
आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखाते आहे. सुशांतसिंह, दिशा सालियन संशयास्पद मृत्यू प्रकरण, पालघर साधू हत्याकांड, पत्राचाळ प्रकरण, करमुसे मारहाण, रश्मी उद्धव ठाकरे यांचे कथित बंगले, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि कुटुंबीय यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी, 'मातोश्री'च्या गळ्याशी आलेला 'पाटणकर' काढा ही सगळी प्रकरणे देवेंद्र फडणवीस यांनी बासनात गुंडाळून ठेवली का? की गुंडाळून ठेवा म्हणून वरुन आदेश आले?
सर्वसामान्य नागरिकांच्या मनात या घडलेल्या सर्व घटनांबाबत संशयाचे वातावरण आहे. त्या त्या वेळी भाजपने, भाजपच्या सर्व नेत्यांनी आणि दस्तुरखुद्द फडणवीस यांनीही त्यावेळी अगदी घसा खरवडून आवाज उठवला होता. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सत्ता स्थापन करून झाले की बरेच महिने. फडणवीस यांच्याकडेच गृहखाते आहे. काढा की सगळे पहिल्यापासून खणून. यावर, याची चौकशी केंद्रीय तपास संस्थांकडून सुरू आहे, असे तकलादू कारण पुढे केले जाईल. पण महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून जे तुमच्या हातात आणि अधिकारात आहे, ते तरी करा.
महाराष्ट्रात राजकीय शत्रुत्व नाही, आपली राजकीय संस्कृती, परंपरा वेगळी आहे, ही वाक्ये टाळ्या घेण्यासाठी ठिक आहेत. सत्ताधारी आणि विरोधक मग ते कोणत्याही राजकीय पक्षांचे असोत आतून सर्व एकमेकांशी मिळालेलेच असतात, एका मर्यादेपर्यंत एकमेकांच्या भानगडी, घोटाळे राजकीय सोयीसाठी बाहेर काढले जातात आणि नंतर बासनात गुंडाळूनही ठेवले जातात.
विद्यमान सत्ताधारी विरोधक आणि विद्यमान विरोधक सत्ताधारी झाले की लुटुपुटूची लढाई सुरू होते. कोणी किती ताणायचे हे आधीच ठरलेले असते. त्या त्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, समर्थक मात्र एकमेकांचे गळे धरतात आणि सर्वपक्षीय राजकीय नेते पडद्याआड गळ्यात गळे घालून याची मजा लुटतात, हेच कटू आणि संतापजनक सत्य आहे.
आम्ही योगायोगाने समोरासमोर आलो आणि म्हणून काही वेळ हसत खेळत गप्पा मारल्या, त्यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये किंवा भाकित करू नये अशी ठोकळेबाज मखलाशी उद्या ठाकरे आणि फडणवीस करतीलही, पण त्याला काहीही अर्थ नाही. कोणी शेंबडे पोरही त्यावर विश्वास ठेवणार नाही.
शेखर जोशी
२३ मार्च २०२३