शतक महोत्सवी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने
राज्यात २२ ठिकाणी 'नाट्यकलेचा जागर'- प्रशांत दामले
- अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून पार पडला
रंगमंचामागील तंत्रज्ञ, कर्मचा-यांचा 'केळवण' सोहळा
शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने नव्या वर्षात २२ ठिकाणी 'नाट्यकलेचा जागर' आयोजित करण्यात आला असून यादरम्यान विविध सहा स्पर्धा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी मंगळवारी (१२ डिसेंबर) दादर येथे दिली.
ज्येष्ठ निवृत्त नाट्य व्यवस्थापक, रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यावेळी उपस्थित होते.
शतक महोत्सवी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने नेपथ्य व कपडेपट कर्मचारी, बस, टेम्पोचे चालक, क्लिनर आणि नाटकाच्या पडद्यामागील कामगार, कर्मचारी यांच्यासाठी 'केळवण' सोहळा उत्साहात पार पडला.
![]() |
अभिनेत्री प्राजक्ता माळी पंगतीत आग्रह करताना |
![]() |
छायाचित्रात डावीकडून अभिनेत्री भार्गवी चिरमुले, मंजिरी मराठे, श्रद्धा जाधव, प्रशांत दामले, विजय केंकरे, अशोक मुळ्ये |
आजचा केळवण सोहळा म्हणजे शतकमहोत्सवी नाट्य संमेलनाची सुरुवात असून जे काम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने करायला हवे होते ते मुळ्ये काकांनी केले आहे. नाटकाच्या प्रयोगासाठी आपण सर्व मेहनत घेतो. नाटक म्हणजे एकत्रित, परस्पर सहकार्याचा खेळ असून उत्तम प्रयोग करत राहणे हे आपले काम आहे आणि आपण ते करतच राहू, असेही दामले यांनी सांगितले.
विजय केंकरे म्हणाले, मुळ्ये काकांच्या पहिल्या उपक्रमापासून त्यांच्या सोबत असून शतक महोत्सवी नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आजचा हा कार्यक्रम महत्त्वाचा,कौतुकास्पद आणि आपल्या सर्वांच्या सन्मानाचा आहे. असा आगळा उपक्रम याआधी कोणी केला असेल असे आठवणीत नाही. मुळ्ये काका यापुढेही असेच वेगवेगळे उपक्रम करत राहतील आणि त्या सर्व उपक्रमात आमचाही सहभाग असेल.
![]() |
स्वाती मिटकरीचा सत्कार करताना प्रशांत दामले, शेजारी विजय केंकरे, अशोक मुळ्ये |
![]() |
डावीकडून संध्या खरात, प्रज्ञा खरात, प्रशांत दामले, विजय केंकरे, अशोक मुळ्ये |
कार्यक्रमात केशभुषाकार संध्या खरात यांच्या कन्या प्रज्ञा तसेच शिवाजी मंदिर नाट्य गृहातील रंगमंच कर्मचारी पांडुरंग मिटकरी यांच्या कन्या स्वाती यांचा दामले, केंकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रज्ञा यांनी पदवी परीक्षेत ८४. ५५ टक्के गुण मिळविले असून सध्या त्या जपानी भाषा तसेच 'व्हीएफएक्स' चा अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत तर स्वाती या मुंबईत मेट्रो रेल्वेच्या पायलट म्हणून काम करत आहेत.
रंगमंचाच्या पाठीमागे राहून नाट्य प्रयोगासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या नेपथ्य, रंगमंच, प्रकाश योजना, रंगारी, सुतार, कपडेपट इत्यादी तांत्रिक कामे करणारे कामगार, कर्मचारी, नाटकाच्या प्रयोगाच्या बसचे चालक, क्लिनर यांच्यासाठी आणि त्यांच्या मुला, मुलींच्या सत्कारासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे मुळ्ये काका यांनी प्रास्ताविकात सांगितले.
माजी महापौर श्रद्धा जाधव, अभिनेत्री भार्गवी चिरमुले, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मंजिरी मराठे यांच्या हस्ते दामले व केंकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता सुग्रास भोजन पंक्तीने झाली. अभिनेत्री प्राजक्ता माळी, श्रद्धा हांडे पंगतीत बसलेल्यांना आग्रह करून वाढत होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 'एबीपी माझा' चे वृत्त निवेदक अश्विन बापट यांनी केले.
शेखर जोशी