पै फ्रेंड्स लायब्ररीच्या पुस्तक आदानप्रदान सोहळ्यात
५० हजारांहून अधिक पुस्तकांपासून राममंदिर प्रतिकृती
- १९ ते २८ जानेवारी २०२४ या दरम्यान डोंबिवलीत आयोजन
शेखर जोशी
येथील पै फ्रेंड्स लायब्ररी आयोजित पुस्तक आदानप्रदान सोहळ्यात पन्नास हजारांहून अधिक पुस्तकांपासून अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. येत्या १९ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत डोंबिवलीत बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान सोहळा आयोजित करण्यात आला असून सोहळ्याचे हे सहावे वर्ष आहे.
राममंदिर प्रतिकृती उभारण्याचा शुभारंभ गुरुवारी (१४ डिसेंबर) संध्याकाळी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील प्रा. सुरेंद्र बाजपेयी सभागृहात पार पडला. पै फ्रेंड्स लायब्ररीचे संस्थापक- संचालक पुंडलिक पै यांनी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला. त्याआधी गणपती, भूमी वराह आणि विष्णुकर्मा पूजा करण्यात आली.
कल्याण डोंबिवली महापालिका, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवार यांचे विशेष सहकार्य या सोहळ्यासाठी लाभले आहे. 'विज्ञान आणि वैज्ञानिक' अशी यावेळच्या पुस्तक आदानप्रदान सोहळ्याची संकल्पना असून त्याअनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे पुंडलिक पै यांनी यावेळी सांगितले.
पुस्तकांची ही राममंदिर प्रतिकृती ८० फूट रुंद आणि ४० फूट उंच असून अशा प्रकारे तयार होणारी ही प्रतिकृती भारतातील नव्हे तर जगातील पहिली प्रतिकृती असणार आहे. येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत राममंदिराचे उदघाटन होणार आहे. या दिवशी पुस्तक आदानप्रदान सोहळ्यात सामुहिक रामरक्षा पठण होणार असून यात एक हजार शालेय विद्यार्थी आणि डोंबिवलीकर नागरिक सहभागी होणार आहेत, अशी माहितीही पै यांनी यावेळी दिली.
यावेळी सिद्धेश बागवे (डिझायनर), रवी घाडीगांवकर ( सुतार), नरेश ( वेल्डर), नवनाथ मोरे ( रंगारी) यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. ही मंडळी आणि त्यांचे सहकारी पुस्तकांची राममंदिर प्रतिकृती उभारणार आहेत. कडोंमपाच्या सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील प्रा. सुरेंद्र बाजपेयी सभागृहात हा पुस्तक आदानप्रदान सोहळा होणार आहे.
१४ डिसेंबर २०२३
-----