![]() |
क्रांतिकारकांचे मुकुटमणी आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी वंदनीय आहेत. युती आणि आघाडीच्या दळभद्री आणि गलिच्छ राजकारणात स्वातंत्र्यवीर सावरकर किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, असे म्हणणेही त्या क्रांतीसूर्याचा अपमान आहे.
काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोन्ही पक्षांची सावरकर यांच्याबाबतची भूमिका भिन्न आहे. ‘सावरकर’ आमच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाहीत. लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. पटोले यांचे हे वक्तव्य म्हणजे त्यांच्या सडक्या मेंदूचे लक्षण आहे.
राहुल गांधी आणि काँग्रेसधील सडक्या मेंदूचे भोंदू आणि ढोंगी धर्मनिरपेक्षवादी नेते वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची मुस्लिम लांगुलचालनाची, हिंदुत्व द्वेषाची भूमिका नवी नाही आणि तरीही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्ष दोन्ही काँग्रेसच्या दावणीला बांधला. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असतानाही राहल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी, पक्षाने आजवर कधीही राहुल गांधी यांच्या विरोधात थेट आणि ठोस कृती केली नाही.
परवा मालेगावच्या सभेतही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राहुल गांधी यांचा तोंडदेखला निषेध केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तुम्ही खरोखरच दैवत मानत असता तर राहुल गांधी यांनी आजवर सावरकर यांचा वेळोवेळी जो अपमान केला त्यासाठी रस्त्यावर उतरायला हवे होते. मणिशंकर अय्यर विरोधात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जी भूमिका घेतली होती ती भूमिका तुम्ही घ्यायला हवी होती. पण? ते होणार नाही.
आताही नाना पटोले यांनी ‘सावरकर’ आमच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाहीत, असे वक्तव्य केल्यानंतर तातडीने पटोले यांचा निषेध करणारे वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून यायला हवे होते. आणि महाविकास सरकार स्थापन करण्यापूर्वी कॉंग्रेसने सावरकर’ किमान समान कार्यक्रमाचा भाग होऊ शकत नाहीत, अशी जर अट घातली होती तर त्याच वेळी सावरकरप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना म्हणून ती अट धुडकावून लावायला हवी होती. पण मुख्यमंत्रीपदाच्या खूर्चीवर बसायची अतीघाई झाल्यामुळे तुम्ही याकडे दुर्लक्ष केलेत. आणि खरे तर त्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्ववाला तुम्ही तिलांजली दिली हे सत्य आहे.
शेखर जोशी
२८ मार्च २०२३