शनिवार, १५ नोव्हेंबर, २०२५
महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांसमुक्त व्हावीत;
महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांसमुक्त व्हावीत;
- वारकरी महाअधिवेशनात ठराव मंजूर
आळंदी, दि. १५ नोव्हेंबर
महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे मद्य आणि मांसमुक्त करावीत, तसेच मंदिर परिसरात अन्य धर्मियांच्या प्रचारावर बंदी घालण्यासाठी कठोर कायदा करावा, असे ठराव येथे झालेल्या १९ व्या वारकरी महाअधिवेशनात संमत करण्यात आले.
‘वारी आळंदीची, राष्ट्र आणि धर्मरक्षणाची’ हे ब्रीदवाक्य घेऊन पार पडलेल्या या अधिवेशनात राज्यभरातील एक हजाराहून अधिक वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते सहभागी झाले होते. हिंदू जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि अन्य संघटनांच्या संयुक्त विद्यमाने येथील सद्गुरू श्री गंगागिरी महाराज मठात कार्तिक वद्य एकादशीच्या निमित्ताने हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.
या वेळी बोलताना रामगिरी महाराज म्हणाले, रामायणातील उदाहरणे विकृत पद्धतीने मांडून आदिवासींचे धर्मांतरण करण्याचे ख्रिस्ती मिशनऱ्यांचे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे. सद्गुरू गंगागिरी महाराजांनी २०० वर्षांपूर्वी चारी वर्णाच्या हिंदूंना एकत्र करण्याचे महान कार्य केले. आपणही आपापल्या प्रभावक्षेत्रात हे कार्य केले, तर धर्मांतरण रोखणे शक्य होईल. तर संत-महंतांनी संघटित होऊन संदेश देण्याची परंपरा ज्ञानेश्वर माऊलींच्या काळापासून चालत आली आहे; पण आज आळंदीत आरोग्य आणि शिक्षण याचे महत्त्व सांगत ख्रिश्चन मिशनरी आळंदीतील हिंदूंचे धर्मांतरण करत आहेत. याला आपण आळा घातला पाहिजे, असे ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे यांनी सांगितले.
जादूटोणा कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेली; परंतु देव-धर्माची टीका करणारी महाराष्ट्र शासनाची ‘जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती, प्रचार व प्रसार समिती’ (PIMC) तात्काळ बरखास्त करण्यात यावी. तसेच नास्तिक आणि अर्बन नक्षलवादी विचारसरणीचे काही लोक पंढरीच्या वारीमध्ये वारकऱ्यांचा बुद्धीभेद घडवून आणत आहेत; हे त्वरित थांबवले पाहिजे. राज्यातील हिंदुत्ववादी सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व संत-महंतांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या वेळी सरकारशी चर्चेसाठी एकत्र येण्याचे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी केले.
रणरागिणी समितीच्या कु. क्रांती पेटकर, ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांचीही भाषणे यावेळी झाली. हिंदू युवतींच्या संरक्षणासाठी राज्यात 'लव्ह जिहाद विरोधी कायदा' तातडीने संमत करावा, हिंदूंची मंदिरे आणि भूमी बळकावणारा 'वक्फ कायदा' त्वरित रद्द करण्यात यावा, इंद्रायणी आणि चंद्रभागा नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, गोवंश हत्याबंदी कायद्याची राज्यात अत्यंत कठोर अंमलबजावणी करावी इत्यादी ठरावही अधिवेशनात मंजूर करण्यात आले.
शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५
'मणिपूरचे महाभारत' पुस्तकाचे प्रकाशन आणि मणिपूर सद्यस्थिती' विषयावर व्याख्यान
पूर्व सीमा प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात'मणिपूरचे महाभारत' पुस्तकाचे प्रकाशन, 'मणिपूर सद्यस्थिती' विषयावर व्याख्यान
ठाणे, दि. ८ नोव्हेंबर
'ईशान्य वार्ता'चे माजी संपादक पुरुषोत्तम रानडे लिखित 'चुराचांदपर्व मणिपूरचे महाभारत' या पुस्तकाचे प्रकाशन येत्या १६ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे एका कार्यक्रमात होणार आहे.
पूर्व सीमा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास रुईया महाविद्यालयाच्या तत्वज्ञान विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. हिमानी चौकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी पूर्व सीमा प्रतिष्ठानचे कार्यवाह आणि १९९९ पासून मणिपूर सीमावर्ती भागात 'शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता' या विषयावर कार्य करणारे जयवंत कोंडविलकर यांचे 'मणिपूर सद्यस्थिती' या विषयावर व्याख्यानही होणार आहे.
हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता श्रीराम व्यायामशाळा, गडकरी रंगायतनसमोर, ठाणे (पश्चिम) येथे होणार असून शंकर दिनकर काणे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा पुस्तक प्रकाशन सोहळा आणि व्याख्यान होणार आहे.
शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५
पादचारी पुलाला अडथळा ठरणारा रेल्वेस्थानक सुशोभीकरणाचा पूर्वेकडील काही भाग जमीनदोस्त
पादचारी पुलाला अडथळा ठरणारा रेल्वेस्थानक
सुशोभीकरणाचा पूर्वेकडील काही भाग जमीनदोस्त
- तोडकाम केलेला भाग रेल्वे पुन्हा बांधून देणार असली तरी सुशोभीकरणावर झालेला खर्च वाया
डोंबिवली, दि. ७ नोव्हेंबर
डोंबिवली रेल्वे स्थानकात नव्याने उभारण्यात येत असलेल्या पादचारी पुलाला अडथळा ठरणारा रेल्वे स्थानक सुशोभीकरणाचा पूर्वेकडील काही भाग शुक्रवारी सकाळी जमीनदोस्त करण्यात आला. डोंबिवली पश्चिमेतील चार मीटर आणि पूर्व भागातील वीस मीटर असा सुमारे २४ मीटर इतका सौंदर्यीकरणाचा भाग काढण्यात येणार आहे.अवघ्या काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेले हे सुशोभीकरण व पाट्यांचा काही भाग जमीनदोस्त केल्याने त्यावर झालेला खर्च वाया गेला आहे.
पादचारी पुलाच्या कामात सुशोभिकरणातील एकूण २४ मीटरचा भाग अडथळा ठणारा एकूण २४ मीटरचा भाग तात्पुरता काढण्याचा प्रस्ताव कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागाने मंजूर केला होता. त्यानुसार पूर्वेकडील काही भाग शुक्रवारी तोडण्यात आला. रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ते पाच दरम्यानचे पादचारी पूल उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूकडील तोडण्यात आलेले सुशोभीकरणाचे काम रेल्वेने पू्र्ववत करून देण्याची अट महापालिकेच्या प्रस्तावात समाविष्ट आहे.
डोंबिवली पूर्व व पश्चिम जोडणारा नवा पादचारी पूल डोंबिवली रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज एण्ड दिशेने उभारण्यात येत आहे. त्यासाठी डोंबिवली पश्चिमेला छत्रपती शिवाजी महाराज एण्ड दिशेकडे असलेले लोकल ट्रेनचे तिकीट कार्यालय व लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण केंद्रही काही महिन्यांपूर्वी हटविण्यात आले. लोकसभा/ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक सुशोभीकरणाचे उदघाटन करण्यात आले होते. पादचारी पुलाच्या उभारणीत डोंबिवली पूर्व व पश्चिम भागातील या सुशोभीकरणाचा काही भाग अडथळा ठरणार आहे, ही गोष्ट आधी का लक्षात आली नाही? की लक्षात येऊनही जाणूनबुजून सुशोभीकरणाचे काम करण्याची घाई करण्यात आली? तोडण्यात आलेल्या सुशोभीकरणाचा भाग रेल्वे पुन्हा बांधून देणार असली तरी सुशोभीकरणावरील वाया गेलेला खर्च कोणाकडून वसूल करणार? रेल्वे आणि कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय, संवाद नव्हता का? काही महिन्यांत नवीन पादचारी पुलाचे बांधकाम सुरू करायचेच होते तर या सुशोभीकरणाला सुरुवातच का केली? पादचारी पूल बांधून पूर्ण झाल्यानंतरच सुशोभीकरण केले असते तर आकाश कोसळले असते का? असे अनेक प्रश्न डोंबिवलीकरांना भेडसावत आहेत.
जाता जाता- सुशोभीकरण आणि उभारण्यात आलेल्या कमानी, पाट्यांना डोंबिवली पूर्वैतील रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाल्यांचा विळखा पडला आहे. फेरीवाले त्यांचे सामान, विकण्याच्या वस्तू या सुशोभीकरणाला बिनधास्त टांगून ठेवतात. तर पश्चिमेला अधिकृत रिक्षा थांबा आणि मुठभर मुजोर रिक्षाचालकांचा विळखा पडलेला असतो. हे असले सुशोभीकरण व सौंदर्यीकरण काय कामाचे?
शेखर जोशी
७ ऑक्टोबर २०२५
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा, विचारच देश आणि जगापुढील आजच्या सर्व समस्यांचे उत्तर - किशोरजी व्यास उर्फ गोविंददेवगिरी महाराज यांचे प्रतिपादन
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा,विचारच
देश आणि जगापुढील आजच्या सर्व समस्यांचे उत्तर
- किशोरजी व्यास उर्फ गोविंददेवगिरी महाराज यांचे प्रतिपादन
आळंदी, दि.६ नोव्हेंबर
छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा आणि विचार हेच देश, जगापुढील आजच्या सर्व समस्यांवरील उत्तर आहे, असे प्रतिपादन
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त निधीचे कोषाध्यक्ष किशोरजी व्यास उर्फ गोविंददेवगिरी महाराज यांनी गुरुवारी येथे केले.
गोविंददेवगिरी महाराज यांच्या हस्ते ' शिवप्रताप २०२६' या दैनंदिनीचे प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते. दैनंदिनीचे मुख्य संकल्पनाकार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचे अभ्यासक रविंद्र पाटील, डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे आणि महाराष्ट्र फेडरेशनचे संचालक मिलिंद आरोलकर, दैनंदिनीचे प्रवर्तक संजय जोशी, दैनंदिनीचे मुद्रणकर्तेसुबोध पटवर्धन इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.
शिवजयंती साजरी केली,एखादा उत्सव/ कार्यक्रम उरकला,अशी वृत्ती समाजात नसावी.छत्रपती शिवाजी महाराज या चैतन्याचा,विचारांचा संस्कार दररोज आपल्या मनावर झाला पाहिजे.या संस्कारांचे मूळ प्रभू श्री रामचंद्रांमध्ये आहे आणि प्रभू श्रीराम धर्माची पहिली आवृत्ती असतील तर छत्रपती शिवाजी महाराज धर्माची दुसरी आवृत्ती आहेत, असेही गोविंददेवगिरी महाराज यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने निघालेल्या काही दैनंदिनी या आधी पाहिल्या,पुस्तकेही चाळली आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभावी डोस देणारी'शिवप्रताप २०२६'सारखी अन्य कोणतीही दैनंदिनी मला दिसली नाही,अशा शब्दांत गोविंददेवगिरी महाराजांनी या दैनंदिनीचे कौतुक केले.
दैनंदिनी निर्मितीत सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन करून
गोविंददेवगिरी महाराज म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि प्रेरणा आपल्या अंगी बाणविण्यासाठी ही दैनंदिनी म्हणजे एक प्रभावी औषध असून सर्वांनी ते दररोज घ्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र, चैतन्य आणि प्रेरणेचा समाजात जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा, असे आवाहनही त्यांनी केले.
छायाचित्र ओळी.
छायाचित्रात डावीकडून रवींद्र पाटील, मिलिंद आरोलकर, गोविंददेवगिरी महाराज, संजय जोशी, सुबोध पटवर्धन.
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे जीवन प्रमाणपत्र शिबीराचे आयोजन
टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे
जीवन प्रमाणपत्र शिबीराचे आयोजन
डोंबिवली, दि. ७ नोव्हेंबर
येथील टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे निवृत्ती वेतनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र शिबीराचे (हयातीचा दाखला) आयोजन करण्यात आले आहे. येत्या ९ नोव्हेंबरपर्यंत हे शिबीर भरविण्यात आले असून ते विनामूल्य आहे.
टिळकनगर, डोंबिवली पूर्व येथील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे यंदा पाचवे वर्ष आहे. बँकांमध्ये जीवन प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या लांबलचक रांगापासून ज्येष्ठ निवृत्तीधारकांना दिलासा मिळावा, हा उद्देश यामागे आहे.
गुरुवारी शिबीराच्या पहिल्या दिवशी डोंबिवलीतील १३० निवृत्ती वेतनधारकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. निवृत्ती वेतनधारकांना आँनलाईन जीवन प्रमाणपत्र बनवून देण्याच्या कामात मंडळाचे हितचिंतक माधव मराठे, सुनील जोशी, सुहास वैद्य यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
आजारी,अंध ,वाँकर घेऊन चालणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना प्राधान्य देऊन लगेचच जीवन प्रमाणपत्र बनवून देण्यात आले. जास्तीत जास्त निवृत्ती वेतनधारकांनी मंडळाच्या या उपक्रमाचा फायदा घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे. शक्य झाल्यास डोंबिवलीतील आजारी तसेच घराबाहेर पडू न शकणाऱ्या वयोवृध्द निवृत्ती वेतनधारकांचे जीवन प्रमाणपत्र त्यांच्या घरी जाऊनही करुन देण्याचा मंडळाचा प्रयत्न असणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क संजय शेंबेकर- ९९२०१२९८०३
मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०२५
श्री क्षेत्र परशुराम डोंगर माथ्यावरील पणतीचे त्रिपुरारी पौर्णिमेला प्रज्वलन
श्री क्षेत्र परशुराम डोंगर माथ्यावरील
पणतीचे त्रिपुरारी पौर्णिमेला प्रज्वलन
चिपळूण, दि. ४ नोव्हेंबर
श्री क्षेत्र परशुराम येथे डोंगरमाथ्यावर , सवतसड्याच्या वरील टेकडीवर असणारी पुरातन भव्य पणती ५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रज्वलित करण्यात येणार आहे. भगवान श्री परशुराम मंदिरातून मशाल पेटवून नेऊन ही पणती प्रज्वलित केली जाणार असल्याची माहिती श्री भार्गवराम परशुराम संस्थानकडून देण्यात आली.
श्री क्षेत्र परशुराम येथील ही पुरातन दीपमाळ शिवकालीन असून महेंद्रगिरी पर्वतावरील एका ऊंच शिखर माथ्यावर हीदीपमाळ आहे. या शिखर बिन्दुवरून चिपळूण शहर, श्री परशुराम मंदिर व गाव, सह्याद्री पर्वताच्या मुख्य आणि उपरांगा परिसराचे दर्शन होते. दीपमाळेकडे जाण्यासाठी परशुराम गावच्या पायरवाडीतून पाऊलवाट असून ही वाट जंगलमय, गवताळ कुरणे, डोंगराळ भाग यातून जाते, असे संस्थानच्या फेसबुक पेजवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
ही भव्य दीपमाळ जांभा दगडात कोरलेली असून त्यावरील पुरातन भव्य पणती काळ्या दगडात कोरलेली आहे. दिपमाळ प्रज्वलनासाठी त्यामधे सुमारे १५ लिटर गोडेतेल आणि एक धोतर वात म्हणून वापरले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला संध्याकाळी साडेसहा वाजता या भव्य पणतीमध्ये दीपप्रज्वलन करण्यात येते. याच दिवशी सायंकाळी परंपरेने भगवान श्री परशुराम मंदिरात तुळशी विवाह सोहोळाही साजरा केला जातो.ज्ञ
पूर्वी ग्रामदैवत जुना काळभैरव देवस्थानतर्फे श्री क्षेत्र परशुराम येथील भव्य पणतीमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला दीप प्रज्वलनासाठी १ डबा तेल व वातीसाठी १ धोतराचे पान प्रतिवर्षी देण्याची ऐतिहासिक परंपरा होती. गेल्या २२ वर्षांपासून श्री ग्रामदैवत जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूणतर्फे ही परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली आहे .
पुर्वी या पणतीचा प्रकाश श्री देव परशुराम यांच्या मूर्तीवर पडत असे वयोवृद्ध, जाणकार मंडळींकडून सांगितले जाते. रात्री चिपळूण शहर परिसरातून या पणतीचा प्रकाश सर्वत्र दिसतो.
पणती प्रज्वलन कार्यक्रमासाठी परशुरामचे स्थानिक ग्रामस्थ, चिपळूण शहर व परीसरातील भक्तगण, कार्यकर्ते परिश्रम घेत असतात. भक्तगण, नागरिकांनी या दीप दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री भार्गवराम परशुराम संस्थानने केले आहे.
अधिक माहिती आणि उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क
नितीन लोकरे - 8149444044
समीर शेट्ये - 9890159247
( हे छायाचित्र श्री भार्गवराम परशुराम संस्थानच्या फेसबुक पेजवरून साभार)
सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५
ज्योतिषशास्त्र केवळ भविष्यच नव्हे, तर आध्यात्मिक उन्नतीचा मार्गही दाखवते !
ज्योतिषशास्त्र केवळ भविष्यच नव्हे, तर
आध्यात्मिक उन्नतीचा मार्गही दाखवते !
- ज्योतिष अधिवेशनात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन सादर
पणजी, दि. ३ ऑक्टोबर
ज्योतिषशास्त्र केवळ शिक्षण, विवाह, व्यवसाय इत्यादी व्यावहारिक गोष्टींपुरते मर्यादित नसून, ते व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नतीचा मार्गही दाखविते,असा दावा ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे ज्योतिष विशारद राज कर्वे यांनी येथे केला.
गोवा येथे आयोजित 'जयसिंगराव चव्हाण ११ व्या आंतरराष्ट्रीय ज्योतिष अधिवेशना'त कर्वे बोलत होते. अधिवेशनाचे उदघाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. ‘जन्मकुंडली - जिवात्म्याचा प्रवास दर्शवणारी मार्गदर्शिका !’ या शोधनिबंधाचे मार्गदर्शक डॉ. जयंत बाळाजी आठवले असून, कर्वे हे लेखक आहेत.
व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती करण्याची क्षमता आणि मार्ग दर्शविण्यामध्ये ‘ग्रहांमध्ये होणारे योग’ सर्वाधिक महत्त्वाचे असतात. जन्मकुंडलीत चंद्र, बुध, शुक, मंगळ, राहू यांमध्ये परस्पर योग असल्यास व्यक्ती बाह्य विषयवस्तूंपासून सुख मिळवण्यासाठी अधिक उत्सुक असते; याउलट जन्मकुंडलीत या ग्रहांचे सूर्य, गुरु, शनि, केतू, हर्षल, नेपच्यून यांच्याशी योग असल्यास व्यक्ती आंतरिक आनंद, सत्याचे ज्ञान आणि शांती प्राप्त करण्यासाठी प्रेरित होते, तसेच ती समाजाच्या हिताचा विचार करते, असे कर्वे यांनी सांगितले.
जन्मकुंडलीत असणार्या ग्रहयोगांप्रमाणे व्यक्तीचा आध्यात्मिक उन्नती करण्याचा मार्ग असतो; कुणी भक्तीद्वारे, कुणी ज्ञानाद्वारे, कुणी कर्माद्वारे तर कुणी सेवेद्वारे अध्यात्मात प्रगती करतात. आध्यात्मिक प्रगतीमुळे आपल्यात व्यापकता येते. ज्योतिषांनी लोकांच्या व्यावहारिक समस्यांवर दिशादर्शन देण्यासोबतच आध्यात्मिक उन्नतीसाठीही लोकांना दिशादर्शन करणे आवश्यक आहे, असे आवाहनही कर्वे यांनी यावेळी केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
-
डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढ...
-
गीता रहस्य ग्रंथ जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी उभारण्यात आलेला फलक फलकाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांचे स्मरण! - शैलेंद्र रिसबुड, प्रल्हा...
-
डोंबिवलीत तीन दिवसीय संपूर्ण गीत रामायण सादरीकरण - उपक्रमाचे यंदा ३० वे वर्ष डोंबिवली, दि. ८ मे भोसेकर कुटुंबीय आणि स्वर संस्कार यांच्या...










