औरंगजेबाची मूळ कबर तशीच ठेवून
सभोवतालचे बांधकाम जमीनदोस्त करा
- लाखो रुपयांचे अनुदान बंद करण्यासाठी निवेदन द्या
- औरंगजेबाच्या क्रूरकृत्यांची माहिती देणारा फलक लावा
शेखर जोशी
क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद रंगला आहे. सर्वपक्षीय राजकारणी, हिंदुत्ववादी संघटनांसह समाज माध्यमातून सर्वसामान्य हिंदुत्ववादी नागरिक आपापली मते, विचार हिरीरीने मांडत आहेत. बाबरीप्रमाणे ही कबर उद्ध्वस्त करावी ते कबर तशीच राहू द्यावी अशी मतमतांतरे आहेत. औरंग्याच्या मूळ कबरीला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत राहून त्या कबरीभोवतीचे सुशोभीकरण व बांधकाम विस्तार करण्यात आले आहे, ते नक्कीच जमीनदोस्त करता येईल. लाखो रुपयांचे अनुदान बंद करण्यासाठी निवेदन देता येईल तसेच औरंगजेबाच्या क्रूरकृत्यांची माहिती देणारा फलकही लावता येईल. अर्थात हे सर्व करण्यासाठी राजकीय धडाडी व इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे, मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती दाखवावी, अशी माफक अपेक्षा.
प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानची कबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या वेळी जी काही छोटी कबर बांधली होती, त्याचे नंतरच्या काळात भव्य स्मारकात रुपांतर झाले, केले गेले. सुशोभीकरण झाले, आजुबाजूची जागा हडप करून अनधिकृत बांधकाम केले गेले. गेली अनेक वर्षे कबरीसभोवती झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत हिंदुत्ववादी, हिंदुत्ववादी संस्था, संघटना यांच्याकडून तक्रारी करण्यात येत होत्या. न्यायालयातही दाद मागण्यात आली होती. न्यायालयाकडून वेळोवेळी कबरी सभोवताली झालेले/ केलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे, असे आदेश देण्यात आले होते. मात्र मुसलमानांचे लांगूलचालन करणा-या कॉग्रेसच्या आणि नंतर महाविकास आघाडीच्या काळातही ते पाडले गेले नाही. कबरीच्या सभोवताली अनधिकृत बांधकाम, विस्तार वाढत चालला होता.
महाविकास आघाडी पायउतार झाल्यानंतर महायुती सत्तेवर आली. आणि त्यानंतर काही दिवसात तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इच्छाशक्ती दाखवून अफजलखानाच्या मूळ कबरीला कोणताही धक्का न लावता न्यायालयाच्या आदेशानुसार कबरी सभोवताली झालेले अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. त्याच धर्तीवर आता मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इच्छाशक्ती दाखवून औरंगजेबाच्या मूळ कबरीला धक्का न लागता त्या कबरीभोवती जे भव्य बांधकाम केले आहे, त्याचा जो विस्तार झाला आहे तो तातडीने जमीनदोस्त करावा. केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देण्यात आले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. ते बरोबर आहे. पुरातत्त्व विभागाने मूळ कबरीला धक्का लावू नये असे सांगितले आहे. पण त्या कबरीभोवती जे सुशोभीकरण, भव्य बांधकाम झाले आहे, त्याचेही संरक्षण करा, असे तर सांगितलेले नाही ना? योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे मूळ कबरीला धक्का न लावता बाकीचे बांधकाम बुलडोझर लावून जमीनदोस्त केले जावे.
आणखी एक, केंद्रातही भाजपचे शासन आहे. या कबरीच्या देखभालीसाठी केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडून लाखो रुपयांची जी खैरात केली जाते, ती तातडीने बंद करण्यात यावी, असे लेखी पत्र महाराष्ट्र शासनाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन आणि पुरातत्व विभागाला देण्यात यावे. एक वेळ उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे आमदार या निवेदनावर स्वाक्षरी करणार नाहीत, पण भाजप आणि शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदार यांची स्वाक्षरी तर या निवेदनावर तेवढे तरी तुम्ही करू शकता ना? त्या कबरीच्या ठिकाणी क्रूरकर्मा औरंगजेबाने केलेले अत्याचार, छत्रपती संभाजी महाराज यांचे केलेले हाल याची माहिती देणारा फलकही तिथे महाराष्ट्र शासनाच्यावतीने लावा आणि मूळ कबरीला धक्का न लावता कबरी सभोवताली झालेले सुशोभीकरण जमीनदोस्त करण्याची राजकीय धडाडी व इच्छाशक्ती दाखवा, इतकीच माफक अपेक्षा. या गोष्टी करणे आपल्या हातात आहेत. तिथे कोणताही नियम आड येणार नाही, असे वाटते.
शेखर जोशी
२१ मार्च २०२५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा