राजकीय फलकबाजीविना गुढीपाडवा साजरा व्हावा;
डॉ. श्रीकांत शिंदे, रवींद्र चव्हाण यांना आवाहन
- शहर विद्रूपीकरण न करण्याची गुढी उभारा
शेखर जोशी
यंदाच्या वर्षी गुढीपाडवा शुभेच्छा फलकबाजीने डोंबिवली शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा आणि शुभेच्छांच्या राजकीय फलकबाजीविना गुढीपाडवा साजरा व्हावा.
नववर्ष स्वागत यात्रेची सुरुवात डोंबिवलीतून झाली आणि पुढे संपूर्ण महाराष्ट्राने त्याचे अनुकरण केले. त्याप्रमाणे यंदाच्या गुढीपाडव्यापासून शुभेच्छा फलकबाजी विरहित गुढीपाडवा साजरा करण्याचा नवा आदर्श या दोघांनी घालून द्यावा.
शुभेच्छा द्यायच्याच असतील तर या दोघांनी पुढाकार घेऊन डोंबिवली शहरातील सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करावी. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्यावतीने शुभेच्छा देणारा फक्त एक मोठा फलक डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात रेल्वेस्थानक परिसरात लावावा.
या फलकावर डोंबिवलीतील सर्वपक्षीय नेत्यांची नावे ठेवावी. या मुख्य व प्रातिनिधिक फलकाखेरीज शहराच्या कोणत्याही भागात, रस्ते, चौकात शुभेच्छांची राजकीय फलकबाजी होणार नाही, यासाठी शिंदे व चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा. असे जर खरोखरच झाले तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ती एक नवी सुरुवात ठरेल.
नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता व महर्षी कर्वे रस्ता
नामफलक पुन्हा एकदा झाकला जाणार
गेल्या दोन/चार दिवसांपासून मोकळा श्वास घेत असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस व महर्षी कर्वे रस्ता नामफलक गुढीपाडवा शुभेच्छांनी पुन्हा एकदा झाकले जाणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून नेताजी सुभाषचंद्र बोस रस्ता, विष्णुनगर, पंजाब नॅशनल बँक चौक, डोंबिवली पश्चिम येथील हे दोन्ही नामफलक राजकीय फलकबाजीने झाकले जात होते. मात्र समाज माध्यमातून आणि लोकसत्ता ऑनलाईनने यावर लिहिल्यावर ते फलक हटविण्यात आले होते. शुक्रवारी फलकासाठी बांबूची कमान बांधण्यात आली. कमान बांधतांना एक कामगारा तर चक्क या दोन्ही नामफलकाच्या पाटीवर पाय ठेवून काम करतांना दिसून आला.
किती सर्वपक्षीय राजकारणी, नेते, पदाधिकारी अशा कमानी उभारून फलक लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घेतात? परवानगी न घेता किती राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी, संस्था, संघटना अशा अनधिकृत फलकबाजी करतात? आत्तापर्यंत अनधिकृत फलकबाजी करणा-यांच्या विरोधात किती गुन्हे महापालिकेने दाखल केले? किती दंड वसूल केला त्याचीही माहिती महापालिका प्रशासनाने जाहीर करावी.
शेखर जोशी
२२ मार्च २०२५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा