बुधवार, २६ मार्च, २०२५

श्री विठ्ठल रुख्माई संस्थान रेवसाची जमीन पुन्हा देवस्थानच्या नावावर होणार

श्री विठ्ठल रुख्माई संस्थान रेवसाची जमीन 

पुन्हा देवस्थानच्या नावावर होणार

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुढाकाराने मिळाला ऐतिहासिक विजय 

श्री विठ्ठल रुख्माई संस्थान, रेवसा (ता. जि. अमरावती) यांच्या मालकीची तब्बल ३० कोटी रुपयांची शेतजमीन अखेर देवस्थानच्या नावावर पुन्हा नोंदवली जाणार आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे झालेल्या पत्रकार परिषदेत मंदिर महासंघाचे राज्य पदाधिकारी अनुप प्रमोद जयस्वाल यांनी ही माहिती दिली. 

महासंघाचे जिल्हा संयोजक विनीत पाखोडे, हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक निलेश टवलारे, अधिवक्ता अभिजीत बजाज संस्थानचे विश्वस्त राजेंद्र वाकोडे, हरीभाऊ वाकोडे, हरिदास मानवटकर, समितीचे सचिन वैद्य उपस्थित होते. 

मौजा रेवसा येथील गट क्र. १६५, क्षेत्रफळ ३ हेक्टर ६९ आर ही शेतजमीन श्री विठ्ठल रुख्माई संस्थानच्या मालकीची आहे. मात्र, ही जमीन हडप करण्याच्या उद्देशाने प्रदीप त्र्यंबकराव वाकोडे व प्रवीण त्र्यंबकराव वाकोडे यांनी तत्कालीन तहसीलदार संतोष काकडे यांच्यासमोर जमिनीच्या ७/१३ उताऱ्यावरील संस्थानचे नाव कमी करून स्वतःच्या नावावर नोंद करण्यासाठी अर्ज सादर केला. 

९ मे २०२२ रोजी तहसीलदार काकडे यांनी महसूल कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करून ७/१२ उताऱ्यातून संस्थानचे नाव कमी केले आणि वाकोडे बंधूंच्या नावावर बेकायदेशीर नोंद केली. या निर्णयाविरोधात राजेंद्र पद्माकर वाकोडे यांनी उपविभागीय अधिकारी अमरावती यांच्यासमोर अपील दाखल केले. अपील प्रकरणात वाकोडे बंधू आणि महसूल कर्मचाऱ्यांचे संगनमत उघड झाले.‌

तहसिलदार काकडे यांनी पारीत केलेला आदेश हा आर्थिक लाभ घेण्याच्या दृष्टीनेच करुन घेतल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचा निष्कर्ष भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी रिचर्ड यंथन यांनी नोंदविला आणि १ ऑगस्ट २०२३ रोजी तहसीलदार काकडे यांचा आदेश रद्द केला. उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशावरील अपिल प्रकरणात अतिरिक्त जिल्हाधिकारी अमरावती यांनी प्रकरणाचा अधिक सखोल तपास करून पुन्हा सुनावणीचे आदेश दिले असल्याचे या वेळी सांगण्यात आले.‌ 

मंदिर महासंघाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देवस्थानच्या हितासाठी तहसीलदारांना निवेदन दिले. या पाठपुराव्याला यश मिळाले आणि तहसीलदार विजय लोखंडे यांनी २० मार्च २०१५ संस्थानच्या बाजूने अंतिम निर्णय दिला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: