बुधवार, २६ मार्च, २०२५

'आपले सरकार सेवा केंद्रां'ची संख्या वाढवणार

आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार

- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा*

मुंबई, दि. २६ मार्च 

राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ रितीने उपलब्ध करून देण्यासाठी 'आपले सरकार सेवा केंद्रे' यांचे जाळे विस्तारीत करण्यात येणार असून सेवा केंद्राची संख्या वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सुधारित निर्णयानुसार, लोकसंख्या आणि प्रशासनाच्या गरजेनुसार सेवा केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सुधारित निकषानुसार ग्रामपंचायत स्तरावर ५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी १ ऐवजी २ सेवा केंद्रे तर पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी २ ऐवजी ४ सेवा केंद्रे देण्यात देणार आहेत.  बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात १२ हजार ५०० लोकसंख्येसाठी २ केंद्रे तर इतर महापालिका व नगरपरिषद क्षेत्रांमध्ये दहा हजार लोकसंख्येसाठी एक ऐवजी दोन सेवा केंद्रे देण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जाहीर केले. 

सध्या आपले सरकार सेवा केंद्रांवरील सेवा शुल्क २० रुपये असून २००८ पासून या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. वाढती महागाई आणि सेवा केंद्र चालकांच्या मागणीच्या अनुषंगाने सेवा शुल्क आता ५० रुपये करण्यात येणार आहेत.‌ नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळण्यासाठी घरपोच वितरण सेवाही सुरू करण्यात येणार आहे. घरपोच भेटीसाठी सेवा शुल्क १००रुपये प्रति नोंदणी (कर वगळून), महाआयटी सेवा दर २० टक्के, सेवा केंद्र चालक सेवा दर ८० टक्के, याशिवाय प्रति अर्ज अतिरिक्त शुल्क ५० रुपये असणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: