शुक्रवार, २८ मार्च, २०२५

भारतीय किसान संघाचे 'भाकरी ठेचा' खाऊन निषेध आंदोलन!

भारतीय किसान संघाचे 'भाकरी ठेचा' खाऊन निषेध आंदोलन! अहिल्यानगर, दि. २८ मार्च शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय किसान संघाने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारने शेतीमालाची हमीभावाने खरेदी न केल्याने किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी अहिल्या नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात भाकरी व ठेचा खाऊन निषेधात्मक आंदोलन केले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निवेदन सादर करण्यात आले.‌ शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याने गोडधोड खाण्याऐवजी त्याला भाकरी -ठेचा खावा लागत आहे. याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी भारतीय किसान संघाचे अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष दिलीप गोंदकर, जिल्हा मंत्री निलेश चिपाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने आपल्या सरकारला पाठिंबा दिला. निवडणुकीच्या वेळी कर्जमुक्ती तसेच सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस यांची हमीभावाने खरेदी केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.‌ मध्यप्रदेशात सोयाबीनसाठी बोनससह ४५० रुपयांनी तर तेलंगणात ९० टक्के कापूस खरेदी करण्यात आला. कर्नाटकात तुरीसाठी ५० रुपये बोनस अधिक एमएसपी मिळून ८ हजार रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी झाली आहे. गुढीपाडवा हा नव्या कृषीवर्षाचा प्रारंभ आहे. या दिवशी शेतकऱ्यांची पुरणपोळी खाण्याची परंपरा असते. मात्र, यंदा शेतकरी आर्थिक संकटात अडकले असल्याने त्यांना गोडधोड नव्हे तर भाकरी ठेचा खावा लागणार आहे, याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: