शुक्रवार, २८ मार्च, २०२५

डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग

डोंबिवलीच्या गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थ्यांचा सहभाग शेखर जोशी डोंबिवली, दि. २८ मार्च डोंबिवलीतील गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेत जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जम्मू काश्मीर भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरळीत व सुरक्षित शिक्षण घेता यावे आणि भारतातील इतर भागांशी या विद्यार्थ्यांची सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने डोंबिवलीतील हम चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था गेली आठ वर्षे जम्मू काश्मीरमध्ये काम करत आहे.'जोडो काश्मीर'हे संस्थेचे ध्येय आहे.
डोंबिवलीतील यंदाच्या नववर्ष शोभायात्रेत सेवाभारती संचालित जम्मू आणि कटरा येथील विद्यार्थी वसतिगृहातील ३१ विद्यार्थी आणि 'सेवाभारती'चे काही पदाधिकारी चित्ररथासह सहभागी होणार आहेत.‌ डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थान आयोजित या नववर्ष स्वागत यात्रेत हम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमधील विद्यार्थी करोना काळ वगळता गेली काही वर्षे सातत्याने सहभागी होत आहेत.‌
(संग्रहित छायाचित्र) जम्मू आणि कटरा येथील या विद्यार्थ्यांचा डोंबिवलीत पाच दिवसांचा मुक्काम असून हे विद्यार्थी सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत डोंबिवलीत वेगवेगळ्या कुटुंबात एक दिवस राहणार आहेत. तसेच या दौऱ्यात सर्व विद्यार्थी डोंबिवलीतील टिळकनगर विद्या मंदिर, पै फ्रेंड्स लायब्ररी, हेरंब म्युझिक अकादमीला तसेच मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्र तसेच अन्य काही महत्त्वाच्या ठिकाणीही भेट देणार आहेत.‌ दरम्यान हम चॅरिटेबल ट्रस्टच्या जम्मू काश्मीर येथील शिक्षण क्षेत्रातील कामाची माहिती डोंबिवलीकर नागरिकांना व्हावी यासाठी ३१ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात हम संस्थेच्या कार्याची माहिती तसेच जम्मू व कटरा येथून डोंबिवलीत आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद, या विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.‌ हा कार्यक्रम सर्वेश सभागृह, दुसरा मजला, डोंबिवली पूर्व येथे होणार असून डोंबिवलीकर नागरिक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हम चॅरिटेबल ट्रस्टने केले आहे. शेखर जोशी २८ मार्च २०२५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: