सोमवार, २४ मार्च, २०२५

हलाल प्रमाणित उत्पादने-महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी

हलाल प्रमाणित उत्पादनांवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याची सूचना समितीला केली आहे. समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. 

खाद्यपदार्थांच्या संदर्भातील कायद्यानुसार ‘भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) या शासकीय संस्थेला खाद्यपदार्थांचे मानके ठरवण्याचा व प्रमाणपत्र देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. असे असतानही ‘हलाल प्रमाणपत्र’ ही समांतर प्रणाली उभी करण्यात आली आहे.‌ यातून मिळणारा पैसा पैसा लष्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिदीन, इस्लामिक स्टेट आदी आतंकवादी संघटनांच्या सुमारे ७०० आरोपींना कायदेशीर साहाय्य करण्यासाठी वापरला जात असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्रासह देशभरात ‘हलाल इंडिया’, ‘हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया’, ‘जमियत उलेमा-ए-हिंद’, ‘जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र’ आदी अनेक संस्थांकडून बेकायदेशीपणे हलाल प्रमाणपत्रांचे वाटप करून कोट्यवधी रुपये गोळा करण्यात येत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात त्यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही खाजगी संस्थांना प्रमाणपत्र वाटप करून पैसे गोळा करण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट केले आहे, अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे.‌ 


महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे हलाल प्रमाणपत्रे देणार्‍या खाजगी संस्थांवर तत्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, हिंदूंच्या संविधानिक अधिकारांवर आघात करणार्‍या हलाल प्रमाणिकरणावर त्वरित बंदी आणावी; हलालच्या नावाखाली खाजगी संस्थांनी जमा केलेल्या निधीची चौकशी करून कारवाई करावी; हलाल प्रमाणपत्रांतून जमा केलेली अवैध संपत्ती व्याजासह वसूल करावी; या पैशाचा उपयोग कुठे केला आणि त्यातून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला का, याबाबतही सखोल चौकशी करावी, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: